मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अखेरची इच्छा … भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ अखेरची इच्छा … भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(किती अल्प संतुष्ट आहे ग हं विशाल. नुसता स्वभाव चांगला असून काय उपयोग? महत्वाकांक्षा नको का काही ?” ) इथून पुढे —-

“ बरं वैदेही, ते जाऊ दे आता. किती पैसे लागतील ते सांग मला. मी चेक देते तेवढ्या रकमेचा “ .वैदेही आणि ऋचाला रडू आलं. आपल्याला वाटलं तशी आजी कठोर आणि आपमतलबी नाही हे ऋचाला समजलं. “ किती व्यवहारी आहे आपली आई ! तिचं ऐकलं असतं तर आपणही ताई माई सारखे पैसा गाठीला लावून राहिलो असतो.”   वैदेहीला ऋचाचं लग्न केवळ आईच्या मदतीमुळे  चांगलं करता आलं. ऋचाला छान नेकलेस,  व्याह्यांचे मानपान, सगळं हौसेने करता आलं. 

ऋचा सासरी जाताना आजी सांगायला विसरली नाही, “ ऋचा, बाईला आपली आयडेंटिटी जपता आली पाहिजे बरं ! तुझी नोकरी तू काहीही झालं तरी सोडू नकोस. तुझ्या आईची फरपट कायम लक्षात ठेव. इतकी गुणी आणि हुशार माझी वैदेही, पण बघ ना, एक चुकीचा निर्णय आणि जन्मभर पश्चाताप आला बघ नशिबाला. माझा जीव तुटतो तिच्यासाठी ! तुझ्या दोन्ही मावश्या पण लबाड आहेत बरं का ग! जपूनच अस हो त्यांच्यापासून !”

ऋचा हसली आणि आजीला मिठी मारून म्हणाली,”आज्जी, कित्ती ग हुशार होतीस तू ! अशीच आहेस का ग पहिल्यापासून?” आजी हसली आणि म्हणाली, “नको  का अशीच मी ऋचा? तुझे आजोबा भोळे सांब ! मी खमकी होते म्हणून नीट संसार केला बरं ! अग, संसाराला बाई चतुर धोरणी हुशार  लागते बाळा! कायम लक्षात ठेव !अग पैसा असेल तरच सगळं खरं बरं ! नाहीतर सगळे गुण मातीमोल होतात. कायम लक्षात ठेवा. आणि ए रोहित ठोंब्या,तू सुद्धा !” रोहितने आजीला उंच उचलले आणि गरगर फिरवले. “ अरे हे काय मेल्या, मरेन ना मी !”– “ छे ग आजी,अजून मी डॉक्टर कुठे झालोय? मी डॉक्टर झालो की मग मरायचं ! आत्ता नाही !” – “ बाई गं वैदेही,अफाट आहे बरं पोरगं तुझं.”  आजी खुदुखुदु हसत आत गेली.  

ऋचा सासरी गेली आणि वैदेहीला घर सुनंसुनं झालं. आईला म्हणाली, “आई यावेळी नको ना जाऊ माईकडे ! थांब माझ्याजवळ ! मला माहीत आहे, तिकडे तुझी आबाळच होते, पण तू बोलत नाहीस.  दोघींकडे सुना मुलं नातवंडे असा धबडगा असतो. मला समजतं ग ! माझी जागा मोठी असती तर मी कायम तुला संभाळले असते बघ !”  आई उदास झाली.  म्हणाली, “चालायचंच वैदेही ! त्यानाही करू दे जरा आईची सेवा !तरी मी तुझ्याचकडे राहते जास्त, आणि ते पथ्यावरच पडलंय त्यांच्या ! यावेळी राहीन बाळा, पण दरवेळी नको आग्रह करू हं !” दोघींचे डोळे भरून आले. आजी खूप थकली आणि मग मात्र ती जास्त जास्त वैदेहीकडे राहू लागली. ताई माई लहर लागली तर फिरकत,, नाही तर येतही नसत. रोहित सुंदर मार्क मिळवून डॉक्टर झाला आणि त्याला हवी तशी सर्जरीला ऍडमिशन मिळाली  आजीला अतिशय आनंद झाला.आजी म्हणाली,” रोहित, माझं एक काम करशील? आपल्या नगरकर वकिलांचा मुलगा वकील झालाय ना? त्याला बोलावून आण.उद्याच.” रोहितने वकिलांना बोलावून आणले. आतल्या खोलीत बराच वेळ चर्चा चालली होती, पण ती कोणीच ऐकली नाही. दुसऱ्या दिवशी नगरकर वकील गाडी घेऊन आले आणि आजींचे मृत्युपत्र रजिस्टर झाले सुद्धा ! आजींना फार समाधान झाले. ” रोहित, मला वचन दे.तू वैदेहीला नीट संभाळशील. कधीही अंतर देणार नाहीस “ .. .” नाही ग आजी, मी असं कसं करेन? मी आईला कायम संभाळणारच ! आणि तुला सुद्धा ! माझं लग्न नाही का बघणार तू?” रोहित लाजला. “ अरे लबाडा ! आत्ता सांगतोस होय? ये बघू घेऊन तिला उद्या !” 

दुसऱ्याच दिवशी रुचिराला घेऊन रोहित घरी आला. “आजी, ही बघ तुझी नातसून ! अगदी ढ आहे, काहीही येत नाही स्वयंपाक ! नुसतीच आहे डॉक्टर ! तूच शिकव हं हिला सगळं ! “ रुचिरा हसत होती. “आजी, मला सगळं येतं हो !काहीही सांगतो हा गाढव !”— “आजी, सर्जन नवऱ्याला गाढव म्हणत का ग तुमच्या वेळी?” सगळे हसण्यात सामील झाले.

वैदेहीला,आजीला ही गोड रुचिरा अतिशय आवडली. त्याच रात्री, काहीही हासभास नसताना आजी झोपेतच गेल्या. रोहितला अतिशय वाईट वाटले. त्याची आजी म्हणजे तर त्याची जिवाभावाची मैत्रीण– ती  गेली ! पण सगळ्यानी समजूत घातली, “अरे किती जगायचे रे त्यांनी ! चौऱ्याण्णव हे काय कमी झालं का वय? सगळं बघितलं त्यांनी !अगदी नातसून सुद्धा !आणखी काय हवं रोहित? झोपेत किती छान शांत मृत्यू आला त्यांना !” 

दिवस कार्य झाल्यावर नगरकर वकील आले. “ सगळ्याना बोलावून घ्या,आजीचं मृत्युपत्र वाचायचं आहे तुमच्या समोर ! “— ‘आईनं  मृत्युपत्र केलं होतं? आम्हाला नाही बोलली काही कधी !’ ताई माई म्हणाल्या. अतुलही अमेरिकेतून आला होता.

नगरकर वकीलानी सगळ्यांसमोर मृत्युपत्र उघडले. मृत्यूपूर्वी आठच दिवस आजीने रजिस्टर्ड मृत्युपत्र केले होते. आजींनी त्यात लिहिले होते,— “ माझा  जुना वाडा रोहितला द्यावा. तिथे त्याने हॉस्पिटल काढावे. हवे तर पाडून नवीन  हवी तशी इमारत  बांधावी.  आमच्या वास्तूचा असा  सदुपयोग दुसरा कशाने होणार?  माझ्या ताई माईना मी माझ्या फिक्स डिपॉझिट रिसीट निम्म्या निम्म्या देऊ इच्छिते. माझा दुसरा फ्लॅट वैदेहीला देण्यात यावा. माझे दागिने अतुलला मिळावेत. तसाही त्याला पैशाचा, घराचा उपयोग नाही. आणि माझी सगळ्यात जास्त सेवा वैदेहीने निरपेक्षपणे केली आहे, म्हणून तिला माझा फ्लॅट मी देतेय. बाकी माझे आशीर्वाद तर कायम तुम्हाला आहेतच. विल वाचून संपले. .सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. अतुल म्हणाला,  “ हे काय असलं विल ! मी एकुलता एक मुलगा !माझा हक्कच आहे दोन्ही घरांवर !” ताईमाई म्हणाल्या, “ हे काय आईचं वागणं !आम्ही काही कमी नाही केलं आईचं ! या रोहितला सगळा वाडा ! आणि वैदेहीला फ्लॅट पण ! आम्हाला हे मान्य नाही.”

नगरकर हसायला लागले. तुमच्या मान्य-अमान्यचा प्रश्नच येत नाही. आजींनी हे सगळं ओळखून रजिस्टर विल केलंय. त्यात कोणालाच बदल करता येणार नाहीत. तुम्हालाही पुष्कळ पैसे मिळाले आहेत. आजींच्या एफ डी मला माहीत आहेत किती रकमेच्या आहेत ते ! अतुलराव, उगीच वाकड्यात शिरू नका. किती वेळा आलात हो गेल्या पाच वर्षात आईकडे बघायला, भेटायला ? कधी तिला अमेरिकेला चल, असं तरी म्हणालात का ? मिळालंय तेही खूप आहे. कमी नाहीये. आजी हुशारच होत्या. मला जास्त तोंड उघडायला लावूच नका. मी, माझे  बाबा असल्यापासून तुमच्या घरी येतोय. तुमच्या वडिलांचे वकील होते माझे बाबा.  मी ओळखतो सर्व मंडळींना ! आजींनी फार विचारपूर्वक छान, आणि कोणत्याही कायदेशीर त्रुटी न ठेवता विल केलंय. तुम्हाला माहीत नसणार म्हणून सांगतो, त्यांनी लिव्हिंग विल पण केलेय. म्हणजे, त्यांना वेळ आलीच तर कोणत्याही कृत्रिम उपायांनी जगवू नये, व्हेंटिलेटरवर अजिबात ठेवू नये असे ! नेत्रदान करावे. ते तर आपल्या रोहितने केलेच म्हणा ! किती हुशार होत्या आजी बघा. त्यांच्या अंतिम इच्छेला मान देणं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कोणालाही काहीही कमी मिळालं नाही आणि असलं तर ज्याने त्याने त्यांनी असं का केलं ते समजून  घ्यावे ! माझी जबाबदारी सम्पली.” — नगरकर वकील निघून गेले.  

चेहरे पाडून ताईमाई आणि अतुल, तिथून चहासुद्धा न घेता निघून गेले. पैसा माणसात वाकडेपणा आणतो हे वैदेहीला पुन्हा एकदा समजले. तिला अतिशय वाईट वाटले. रोहित म्हणाला,”आई, तू का वाईट वाटून घेतेस? आजीला माणसांची  चांगलीच पारख होती. आला वाईटपणा तर येऊ देत. तू शांत रहा आणि आजीच्या इच्छेला आपण मान देऊया.  तू  किंवा मी, काहीही मागायला गेलो नव्हतो आजीकडे ग !  आपल्याला  तिचे विल माहीत तरी होते का? नाही ना? मग बस झाले.” रोहितने आईची समजूत घातली आणि तो रुचिराला फोन करायला वळला.

– समाप्त – 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈