मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सहृदय— भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ सहृदय— भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(त्यांना काय हो कल्पना, की पोटचा मुलगा असा वागेल. मी मात्र एका क्षणात रस्त्यावर आले.)  इथून पुढे ——-

“तो मला वृद्धाश्रमात ठेवून निघून गेला तो गेलाच. मला  अगदी थोडे पेन्शन आहे, पण मला काय लागते हो?

याने दहा वर्षाचे पैसे भरून टाकलेत— मला आश्चर्य वाटते,हा माझाच का मुलगा? कुठे कमी पडलो आम्ही त्याच्यावर संस्कार करायला? जाऊ दे. नशिबाचे भोग म्हणायचे.” सुधाताई खिन्न होऊन म्हणाल्या– “ तुम्ही त्याच्याच वयाचे ना?

काल तुमची आई येऊन सगळ्या पेशन्टची किती मायेने चौकशी करून गेली. किती अभिमान आहे त्यांना तुमचा.

माझा मुलगा इतका विख्यात सर्जन असूनही, मी या सुखाला कायमची पारखी झाले आहे. एकदा विचारले सुद्धा,की अरे,असे का वागतोस बाबा ? काय चुकलंय आमचं? “ तर म्हणाला, “ काही नाही ग.पण आता मलाच काही इंटरेस्ट नाही, नाती उगीच जपत बसण्यात. माझा व्याप खूप वाढलाय, आणि मी  करतोय ना कर्तव्य?  मला अजिबात वेळ नाही सतत भारतात फेऱ्या मारायला. “ .. “आता यावर काय बोलणार सांगा.” डॉक्टरही अवाक् झाले हे ऐकून.

सुधाताई वृद्धाश्रमात गेल्या. एक महिन्याने चेकअप साठी आल्यावर, डॉक्टर विश्वास त्यांना म्हणाले, “ ताई, एक सुचवू का? आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही व्यवस्थापक म्हणून काम बघाल का?  वर्षाची एकटीची खूप धावपळ होते. सगळा स्टाफ सांभाळायचा, पेशन्टचे जेवणखाण, आणि इतर सगळीच  मॅनेजमेंटबघावी लागते..  खूप काम करावे लागते तिला. “

जरासा विचार करून सुधाताई म्हणाल्या, “ बरं. करुन बघते एखादा महिना.” 

दोन महिन्यांनी सुधाताईंनी काम बघायला सुरवात केली. त्यांनी हॉस्पिटलच्या किचनपासून सुरवात केली. मुळात त्या शिक्षक असल्याने त्यांना व्यवस्थापनाची उत्तम सवय होतीच ! गोड बोलून,नीट लक्ष देऊन, त्यांनी सगळा नोकरवर्ग  आपलासा केला. एका डायरीत त्यांना रोजचा खर्च, बिले,  लॉंन्ड्री ,सर्व लिहून काढायला लावले. चार महिन्यांनी वर्षाला ती डायरी दाखवली.

व्यवस्थितपणे लिहिलेली ती डायरी पाहून वर्षा थक्क झाली. सगळी उधळमाधळ थांबली होती. वेळच्यावेळी सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ लागल्या होत्या. जेवणाचा दर्जा कितीतरी सुधारला होता. जवळजवळ चाळीस हजार रुपये वाचले होते चार महिन्यात. रोज सुधाताई सकाळी ९ ला हजर असत, ते संध्याकाळी  सातला,सर्व मार्गी लावूनच जात.

डॉक्टर विश्वास आणि वर्षाने, सुधाताईना बोलावून घेतले. “अहो, काय हा चमत्कार करून दाखवलात तुम्ही !

केवढा खर्च होत होता पूर्वी ! आम्ही इतकं लक्ष देऊ शकत नव्हतो हो. केवढी बिले यायची किराण्याची, लॉन्ड्रीची. आणि स्टाफला किती सुंदर शिस्त लावलीत तुम्ही. पेशन्टही, जेवणावर खूष आहेत पूर्वीपेक्षा. सुधाताई, किती गुणी आहात तुम्ही. मी तुम्हाला ऑफर देतो, नाकारू नका. तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापक म्हणून रहायलाच या. आम्ही तुम्हाला अति होईल असे काम कधीच सांगणार नाही. फक्त देखरेख करायची तुम्ही. आम्ही तुम्हाला छान खोली देतो रहायला. आणि काम होईनासे झाले, तरी आम्ही तुम्हाला कायम सांभाळू— अगदी माझ्या आईसारखेच. मान्य आहे का? दरमहा तुम्हाला आम्ही पगार देऊच, तो तुमच्या बँकेत जमा होईल.”

सुधाताई थक्कच झाल्या. ही अपेक्षाच कधी केली नव्हती त्यांनी—

“ अहो डॉक्टर,मला कशाला पगार? आणि मी  राहीन की वृद्धाश्रमात. आणि तिथूनच येत जाईन ना रोज.” 

“ नको नको,ताई, तुम्ही इथेच राहा. माझ्या आईलाही तुमची छान सोबत होईल. तुम्हाला सांगू का, ही सूचना तिचीच आहे खरं तर. ती बघतेय ना तुम्ही केलेला बदल. परवा तुम्ही सिस्टरला चादरीचा हिशोब विचारला तेव्हा किती गडबडून गेली होती ती. निमूट सर्व चादरी मोजून जमा केल्या तिने. पूर्वी हे आम्हाला शक्य होत नव्हते हो.

माझ्या आईनेच हे बघितले आणि म्हणाली, ”अरे,तुम्ही सुधाताईंनाच विचारा की, त्या काम बघतील का ते.” 

सुधाताईंच्या डोळ्यात अश्रू आले.

“ जे काम माझ्या मुलाने करायला हवे, ते काम तुम्ही परकी मुले करताय, काय बोलू मी ? मी नक्की करीन हे  काम.

त्यात अवघड काय आहे ? पण डॉक्टर, एक शब्द द्या. या वयात आता पुन्हापुन्हा धक्के सहन होत नाहीत हो.

मला पुन्हा वृद्धाश्रमात नाही ना पाठवणार? नाही तर मी आहे तिकडेच बरी आहे.” 

डॉक्टर वर्षाच्या डोळ्यात पाणी आले. “ नाही हो सुधाताई,असं कसं करू आम्ही? एवढे मोठे हॉस्पिटल आहे आपले, तुम्ही आम्हाला कधीही जड होणार नाही. उलट तुमची केवढी मदतच होतेय आम्हाला. आणि आम्ही आणखी नोकर देऊ की तुमच्या मदतीला.”  सुधाताई तयार झाल्या या ऑफरला.

त्या गेल्यावर डॉक्टर विश्वासच्या आई म्हणाल्या, “ तुम्ही दोघांनी किती छान काम केलेत रे. शाबास. एका कर्तबगार बाईचा आत्मसन्मान तिला परत मिळवून दिलात. असेच कायम सहृदयतेने वागा रे पोरांनो ! विश्वास, तो अभय– मुलगा म्हणून अपात्र ठरला. पण तू आज नुसता डोळ्यांचा नाही तर मनाचाही डॉक्टर झालास बघ.” 

— विश्वास, वर्षा आणि त्यांच्या आईच्या डोळ्यातलं पाणीच खूप काही सांगून गेलं.

— समाप्त —

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈