सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? जीवनरंग ❤️

☆ सदमा.. . भाग  2 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

 “शू.. ना. आता झोपली . हळू.. . आई. हळू बोल. परी उठेलती. उठायला नको. “या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. समोरच्या  बाळाला अंगाई म्हणत झोपवत होती. पुन्हा पुन्हा पांघरूण घालत होती. तोंडावरून हात फिरवत होती. तिच्या लेखी त्या खोलीत अजून कोणी नव्हतेच. फक्त ती आणि तिचे बाळ.. .

” दादा आला का?त्याला म्हणाव फाईल काढून ठेव. आज रिपोर्ट दाखवायला जायचं आहे. परीला औषध बदलून देणार आहेत. तो आला की पाठव माझ्याकडे. जा आता. आवाज करू नको. परी उठल्यावर मऊ वरणभात घालते. मला जायला पाहिजे मी आवरते. जा.. . तू.. “

“तुझी सखी.. . दिपा आली आहे. बघ तर खरं. “आई सांगत होती तिचे लक्ष नव्हते. हे रुप पाहून आईचे डोळे पाणावले. वेगळी वेदना दिसली डोळ्यात. काहीच उलगडत नव्हते. न कळत माझ्या ही डोळ्यात पाणी आले. दोघीनी ते लपवले. दरवाजा पुढे करून आम्ही दोघी खाली आलो. नि:शब्द. काय बोलावे सुचत नव्हते. मला हे सहन होत नव्हते. ” हे सगळे असे कसे झाले?”हा माझा मुक प्रश्न काकूनी  ओळखला त्या म्हणाल्या”हे.. असं  दोन महीन्यापासून सुरू आहे बघ. तिची परी तिचे विश्व होते. परी झाली तेव्हा गोरीपान,   गुटगुटीत होती,काळेभोर जावळ,इवलीशी जिवणी, गोड हसायची ,ती गोड परी सारखी दिसायची. तिला ती परी म्हणू लागली. तिच परी सोडून गेली,हे दुःख सहन झाले नाही. मोठा सदमा बसला तिच्या मनावर . फुलपाखरा सारखी घरभर फिरभिरणारी परी एकदम अबोल झाली. तिच्याखुप पोटात दुखे. गडबडा लोळायची. सहा सात वर्षांची लहान पोरं ती. तिचे दुःख बघवायाचे नाही. खुप दवाखाने झाले, खुप उपाय केले पण यश आले नाही. तिचा शेर संपला. ती गेली. विजूचे विश्व हरवले. जगण्याची उमेद संपली. हा धक्का ती पचवू शकली नाही. ती रडलीच नाही. त्या दिवसांपासुन आज पर्यंत परी आहे, हे समजून जगत आहे. पोरीची ही घालमेल बघवत नाही. “

” तुम्ही डाॅक्टरांचा सल्ला घेतला नाही? औषधपाणी केले नाही?”

“फाॅमिली डॉक्टराचे औषध सुरू आहे. खर तर काळ हेच औषध मोठे आहे. होईल बरी. वाट बघायची. “

“माफ करा ‘लहान तोंडी मोठा घास घेते’ मला वाटते तिची ट्रीमेंट चूकीची आहे. तिला मानसोपचारतज्ज्ञाकडे दाखवले पाहिजे. ती निश्चित बरी होईल. “

” ती वेडी नाही. तिला वेड लागले नाही. जरा भ्रमात आहे. हळूहळू येईल मार्गावर. लोक काय म्हणतील?”

” तुम्ही कसे ही वागा. लोक काय नेहमी बोलत असतात. त्यांना फक्त निमित्त हवं असतं. काकी तुम्ही झाडे लावता, ती निरोगी रहावीत, चांगली फुलावीत म्हणून त्यांची काळजी घेता,त्यावर जंतूनाशक फवाराता. माणसाच्या मनाचे ही तसेच आहे ते निरोगी रहावे म्हणून हे मानसोपचारतज्ज्ञ उपचार करतात. आपल्या मुलीचे भविष्य महत्त्वाचे. ‘

” मला तर काही सुचत नाही. विजूचे बाबा तर स्वत:ला दोष देत आहेत. एकसारखे ढसाढसा रडतात. माझ्यामूळे वाटोळे झाले पोरींचे म्हणतात. मी तर काय काय बघू? नवऱ्याची समजूत घालू, की लेकीला धीर देवू,का लेकाचे भविष्य सांभाळू?माझे दुःख मला व्यक्त ही करता येत नाही. काय करू मी?”हुंदका फुटला त्यांना. मी  सावरले.

” तिचे मिस्टर.. . त्यांची मदत.. झाली नाही. “

” ते मोठे रामायण आहे. “ती काहाणी सांगते ऐक. सविस्तर कथा सांगितली. ती ऐकूण मी हदरले. आता त्या माऊलीची दया येऊ लागली.

” मी आहे ना? काळजी करु नका. चार दिवसात भेटते. बघू काय करता येते. तुम्ही खंबीर व्हा. येते मी. “

क्रमशः…

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments