श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ पाठवणी… (भावानुवाद) – श्री मोहनलाल पटेल ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

‘ऐकलत? ही मूर्ख, पुन्हा परत आली.’  घराच्या परसातून सरला आपल्या पतीला म्हणाली.

एक उंची पुरी धिप्पाड म्हैस आवाराच्या छोट्याशा फाटकापुढे उभी होती. फाटक बंद होतं.

सोहनालालने ती मोतीरामला सहा हजाराला विकली होती. पण ती म्हैस या घराशी इतकी एकरूप झाली होती की आता दुसर्यां दा पळून आली होती. 

रागारागाने सरला म्हणाली, ‘मी तिला आवारात घुसू देईन, तर ना! मी आत्ता तिला मोतीरामच्या घरी घेऊन जाते’ आणि सोहनालाल आवारात येताच ती म्हणाली,   

‘यावेळी तिला असं पळवून लावा की ती आपल्या घराचा रस्ताच विसरली पाहिजे.’

‘असं कसं पळवून लावता येईल?’

‘मग… मग तर ती इथून जाणारच नाही.’

‘तू तिच्या डोळ्यात बघ. किती दयनीय दृष्टीने पाहते आहे. तिच्यासाठी तर हेच तिचं घर आहे. जन्मली, तेव्हापासून इथेच आहे. हे आवार , हे लिंबाचं झाड…’

काय बोलावं, हे सरलाला उमगत नव्हतं. ती काही वेळ म्हशीकडे बघत बसली आणि मग आवाराचं फाटक उघडलं.

म्हैस पळत आपल्या खुंटीपाशी जाऊन उभी राहिली. सोहनालालने तिच्या पाठीवर हात  ठेवला मग म्हणाला, ‘बिचारी भुकेजलेली असेल.’

मोतीराम पुन्हा म्हशीला न्यायला आला, तेव्हा सरला आणि सोहनालाल यांनी एकमेकांकडे पाहिलं. सोहनालाल खोलीतून पैसे घेऊन आला आणि मोतीरामला म्हणाला, ‘हे तुझे पैसे. नीट मोजून घे.’

मोतीरामने पैसे घ्यायला प्रथम नकार दिला, तेव्हा सोहनालाल म्हणाला, ‘ती नाही राहणार तुझ्याकडे. जे झालं, ते झालं. म्हैस घरी आली, आमच्याही जिवाला शांती  मिळतेय.’

थोडी बोलाचाली झाल्यानंतर मोतीराम पैसे घेऊन गेला. तो गेला आणि घरात एकदम शांतता पसरली.

सरला म्हशीच्या पाठीवरून हात फिरवू लागली. नंतर तिला पदराला डोळे पुसताना सोहनालालने पाहिले. त्याच्या मनात आलं, ‘केवळ म्हशीसाठीती असं करणार नाही. तिच्या  मानात आणखी काही तरी आहे. हे सगळं मुलीसाठी तर नाही? ’

तो सरलाजवळ आला, आणि म्हणाला, ‘वेडी, जुन्या गोष्टी आठवून काय उपयोग? आपलंच नशीब फुटकं..’ आणि सरला मोठमोठ्याने रडू लागली. ‘एका जनावराचा विचार करतोय. तितका मुलीसाठी नाही केला. तीन वेळा ती घर सोडून आश्रयासाठी आली होती. पण आपण तिला भीती दाखवून, धमक्या देऊन परत पाठवलं.’   

’ सासरचे लोक मारेकारी झाले. … तिच्या आत्म्याला काय वाटलं असेल?’

मारेकरी आपण आहोत सरला… ‘ सासर घर हेच तिचं घर म्हणत पुन्हा पन्हा तिची पाठवणी केली. तिला घरात घेतलं नाही….’

मग गप्प बसून दोघेही बराच वेळ म्हशीची पाठ कुरवाळत राहिले.

मूळ गुजराती कथा – ‘विदाई’  मूळ लेखक – श्री मोहनलाल पटेल   

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments