? जीवनरंग ❤️

☆ रूप्या…भाग 1 ☆ मेहबूब जमादार ☆

शामूतात्यानं सकाळी अकरा वाजता जसा गवताचा भारा गोट्याम्होरं टाकला तसा सारा गोटा जागा झाला. दोन म्हसरं टूणदिशी उभी राहीली. सोन्या रूप्यातला एक बैल चटदिशी उभा राहीला. पण रूप्याला काय लवकर ऊटता आलं नाय. त्यांचं वय झालवतं. बरीच वर्ष त्यानं तात्याबरोबर काढलीवती. शेतात घालीवलीवती. पेरायला तर ही जोडी एका लायनीत पेरायची. जाणारा येणारा नुस्ता बघतच रहायचा. एखादा तात्याला सजागती म्हणायचा,

“आरं तात्या पेरतानां रानांत दोरी- बीरी मारलीवती का रं?”

“का बरं आबा?”

“एका लायनीत कुरी दिसत्या.कुठं इकडं नाय की तिकडं नाय”

“खरं सांगू ही सारी सोन्या रूप्याची किरामत,मी काय नुस्ती दावं धरतो अन बापू आमचा पेरतो.”

रूप्याचं वय झालंवतं. तात्यानं त्याच्या तोंडावरून हात फिरवला तसा तो चटदिशी ऊटला.

तात्यानं जनांवरामागचं शेणाचं पू उचलून उकिरड्यात टाकलं.खराट्यानं गोटा झाडला.गोटा साफ झाल्यावर त्यानं आडावरनं दोन चार घागरी पाणी आणलं.पहिल्यांदा बैलानां पाजलं. पुन्हा म्हसरानां पाजलं. बैलानां कोवळं लुसलुशीत गवत टाकलं. म्हसरानां गवत टाकलं. तात्याचं एक गणित होतं ‘मला काय कमी पडलं तर चालंल पण माझ्या बैलानां काय कमी पडू नये’.

बैलं औत ओढायची. गाडी ओढायची. प्रसंगी मोटपण ओढायची. तात्याला बैलाला चाबकाने मारलेलं खपायचं नाय. तो निस्ता बैलाच्या अंगावर मायेने हात फिरवायचा, बैलं आपोआप चालू लागायची़. एवढी माया‌ तात्याची‌ बैलावर होती.बैलांचीपण माया तात्या वर होती. अगदी मुलांसारख़ं त्यानं बैलानां सांभाळ होतं. एकवेळ तो म्हसरानां हिडीसफिडीस करायचा, बैलापुढची शिल्लक वैरण म्हसरानां टाकायचा.

तात्या चा दिवस जेवणापुरताच घरी जायचा. नायतर सारा वेळ तो एकतर सका़ळी वैरण का़ढायचा. उरलेल्या वेळांत तो गोटा साफ करायचा,पाणी पाजायचा. जनांवर खातील तशी वैरण‌ टाकायचा. कवा काम असलं तरच बैलं शेतात असायची.तात्या ची मशागत बैलानां हात न लावता चालू असायची. एवढं बैलानांही तात्या ला काय हवं, काय नको ते कळत होतं.तात्याच्या शेतात औत चालू हाय का नाही ते शेजारच्या शेतमालकाला ही कळून येत नसे.

शेजारचा राघूआबा तर तात्याला नेहमी म्हणायचा,

“आर!तात्या घरात कवा जातूस का नाय,पाहील तवा गोट्यातच‌ दिसतूस?”

“आर!घरांत बसून काय करायचं,जनावरांची सेवा केली तर तेवढंच पुण्य लागलं”

“तूझं  बेस हाय बाबा,तूझी बैलं तू जाशील तिथं मागणं येत्यात.तू दावं नाही धरलस तरी चालतंय.आमचा चित्र्या बघितलास का?घरातल्या सगळ्यांच्या अंगावर येतोय.काय करावं ते कळतच नाही बघ.”

“हे बघ त्येला मारू तेवढा नगस.बघ आपोआप त्येचा राग थंड होतोय का नाय ते”

“तात्या तुझ्याकडं काय तरी जादू हाय बघ.तुला कुठलंही जनावर लई लबूद”

असं बरचं बोलण व्हायचं.पण तात्या नं कुठल्याच जनांवरावर केंव्हा चाबूक उगारला नाय.उलट एखादा बैलाला मारत असेल तर तो सोडवायला जायचा.

त्यामूळं गोटा अन तात्यातं एक प्रेमाचा धागा तयार झालावता.हे सारं पाहून त्याचा मोठा भाऊ बापू म्हणायचा,

“तूला भूक तरी लागते का नाय?का रोज घरातनं माणूस पाटवून द्यायचा तुला जेवायला बोलवायला?”

तात्याची गोट्याशी मैत्रीच होती तशी. तात्या भूक लागली तरच जेवायला घरी जायचा नायतर त्या मचाणावर पडून असायचा.

सकाळी वैरण आणायची. विहीरीवर आंघोळ करायची की परत गोट्यात. भूक लागली की तात्या घरांकडं जायचा. एखादवेळी तेभी विसरायचा. मग तात्याची बायकू धडप्यातनं जेवाण घेवून याची. तात्याचं घर अन गोटा फार लांब नव्हता. सारं काम झालं तरी तात्या उगाच गोट्यात बसून असायचा हे बायकोला ठावं होतं.

आज नेहमीप्रमाणेच तात्याची बायको जेवाण घेवून आली.

“न्हवं!”

“काय गं?”

“आता तूमाला काय बोलायची सोय राहीली नाय.लगीन माझ्याबरं लावलयं का त्या गोट्याबरं?”

ह्या प्रश्नानं तात्या खरंच हसला.

“अगं!मी आलो नाय म्हणून रूसलीस व्हय! बरं झालं आल्यास ते.ये दोघं भी जेवू”

“जेवा तुमी,पण एक सांगाया आलेवते?”

तात्यानं कान टवकारले.

“बोल की?”

“आवं बापूसाब म्हणत्यात त्यो रूप्या आता म्हातारा झालाय.त्येला विकून टाकूया.”

हे ऐकल्यावर तात्याच्या डोळ्यांत पाणी आलं.त्यानं पुढली भाकरी बाजूला सारली.

क्रमश: …..

  – मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments