सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ एका रेषेच्या पलिकडे..भाग 1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

आज सकाळपासून आक्कांचं बिनसलंय्..त्या एक सारखी चिडचीड करताहेत..जो दिसेल त्याला फटकारताहेत.त्यांना काहीच पटत नाहीय्. आवडत नाहीय्.सारं काही त्यांच्या मनाविरुद्ध होतंय्.कारण कळत नाही पण त्या अत्यंत अस्वस्थ आहेत.कदाचित त्यांनाही समजत नसेल ते.पण जणू त्यांच्या भोवतालचं सारंच वातावरण त्यांना इतकं कडवट वाटतंय् की समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी त्या आडून,वाकडं,आडवं बोलत आहेत.जणू सर्वच त्यांच्या शत्रु पक्षातले.नानांशी सुद्धा त्या आज टाकून बोलल्या होत्या.

गेले सहा अठवडे नाना हाॅस्पीटलमध्ये आहेत. एक्एकीच त्यांना दुखणं आलं.त्यांना सकाळपासून थोडं मळमळत होतं.अतिसार जाणवत होता.अशक्तपणाही वाटत होता.

“भाऊला फोन कर.त्याला बोलावून घे.असे ते सारखे आक्कांना सांगत होते.पण आक्कांनी जरा दुर्लक्षच केले.

“कशाला बोववायचं भाऊला. तो त्याच्या कामाच्या व्यापात.त्याला का सवड असते? आणि आहोत ना आम्ही सारे घरात.त्या मोहन माधवना कुट्ठे जाऊ देत नाही तुम्ही.जरासं काही झालं की सारे लागतात तुम्हाला तुमच्याभोवती..मुलं का रिकामी आहेत..बसा गुपचुप.काही होत नाहीय् तुम्हाला आणि होणारही नाही.

आता वयोमानाप्रमाणे तब्येत नरम गरम राहणारच.झोपा जरा वेळ.मी आहेच इथे.”

नाना गप्प बसले. विकल होऊन, अगतिकपणे,न बोलता शांत पडून राहिले.

संध्याकाळी काठी घेऊन अंगणात फेर्‍या मारल्या.घरात आले.कॉटवर बसले आणि एकदम त्यांनी आरोळी मारली.

“अग् ए आक्का..आक्का ग..हे बघ मला कसं होतंय्..

उठता येत नाही.हातपाय हलत नाहीत..बघ अंग कसं बधीर..ताठर झालंय्.मला आधार दे ग..पाय जवळ करुन दे..”

मग आक्काही घाबरल्या.धावाधाव.डॉक्टरना बोलावणी.

शेजारी आले.वाड्यात गर्दी  झाली.

डाॅक्टर म्हणाले,जिल्ह्याला घेऊन जा.भाऊंना कळवा.इथे आपल्या खेड्यात उपचार होणार नाहीत.तिथे सारी यंत्रणा आहे.स्पेशालिस्ट्स आहेत.ऊशीर करू नका..”

नानांना इथे आणलं. भाऊने आणि सुनेने खूप धावपळ केली.दहा डॉक्टर अर्ध्या तासात उभे केले.एक्स रे,ब्लड टेस्ट आणि इतर अनेक टेस्ट्स…तीन दिवस तर नुसत्या डाॅक्टरमधे चर्चा चालू होत्या.

नाना सुनेला विचारायचे,”मी बरा होईन ना..मला पुन्हा चालता येईल ना..ऊभे राहता येईल ना..?

सुन प्रेमळ. समंजस, नानांचे हात धरुन म्हणायची

“तुम्ही अगदी पूर्ण बरे व्हाल.ऊद्यापासून ट्रीटमेंट सुरु होईल. निदान झालंय्.  तुमच्या स्पायनल काॅर्ड मध्ये व्हायरल ईनफेक्शन झाले आहे. गोळ्या  इंजेक्शन आणि फिजीओथेरेपीने  तुम्ही पूर्ववत व्हाल. तुम्ही फक्त निगेटीव्ह विचार करु नका..”

आक्का सार्‍यांचे संवाद लक्ष देउन ऐकायच्या.काही समजायचे काही नाही समजायचे.पण त्या नानांच्या भोवती सदैव असत.

त्या नानांना म्हणायच्या,”डाॅक्टर काहीही सांगतात.कालपर्यंत तर चांगले होतात.मनाचं बळ वाढवा.

प्रयत्न करा. हातपाय हलवा.उठा पाहू…”

आता नानांचं सारं गादीमध्ये..आक्कांना खूप पुरायचं..

त्यांचंही उतरतं वय.ब्लडप्रेशर..दवाखान्यातले वास..नानांच्याच खोलीत दुसर्‍या लहानशा बेडवर अवघडून बसायचे…बाहेर जाऊन थोडा मोकळा श्वास घ्यावासा वाटे. पण नाना त्यांना नजरेसमोरुनही हलु द्यायचे नाहीत.

“मला सोडून जाऊ नकोस.कंटाळलीस का मला?

परावलंबी झालोय् ग मी….”

आक्कांना आतून कळवळायचं.नानांची स्थिती पाहून तुटायचं.अट्ठेचाळीस वर्षं ज्या व्यक्ती सोबत संसार केला, मुलंबाळं वाढवली, ऊनपाऊस पाहिले.. वयाच्या चौदाव्या वर्षापासून. नाकळत्या वयात., एका अनोळखी व्यक्तीच्या हातात हात देऊन इतकी वर्ष चाललो..

मग त्या ऊठत. नानांजवळ जात.त्यांच्या छातीवर एक हात आणि मानेखाली एक हात ठेऊन मोठ्या प्रयासाने,नानांना झोपवत.नानांचं जड शरीर त्यांना पेलवायचं नाही.त्यांच्या अंगावर  प्रेमाने शाल ओढत..

डोळ्यांतून गळलेले अश्रु हातानं निपटत…!

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments