सौ.अंजली दिलिप गोखले

☆ जीवनरंग ☆  गंमत ब्लड डोनेशनची – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

स्टडी टूर मधल्या मुला-मुलींच्या दंग्याला बहार आला होता. तरुणाईला निसर्गाच्या सान्निध्यात उत्साहाचे उधाण आले होते. डोंगर चढता चढता गप्पा गाणी यांना ऊत आला होता. आणि अचानक ग्रुप लीडरचा पाय घसरला, बघता बघता गटांगळ्या खात तो डोंगरावरून दरीत कोसळला. क्षणभर काय झाले, ते कोणालाच समजले नाही. पण लक्षात आल्यावर घाबरून सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. खाली बघायचे धाडस कोणाला होईना.

दोन-चार मित्रांनी शांतपणे विचार करून आणि आपल्या सरां बरोबर चर्चा करून या कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याचे ठरवले. ड्रेस वाल्या मैत्रिणींकडून त्यांच्या ओढण्या मागून घेतल्या आणि त्या सगळ्या एकमेकांना घट्ट बांधून मोठा दोर तयार केला. दोघांनी तो दोर वरती गच्च पकडून धरला आणि त्याच दोराच्या सहाय्याने दोघेजण खाली उतरायला लागले. सगळीकडे निशब्द शांतता पसरली होती. पुढे काय होणार? मित्र सापडेल ना? कोणत्या अवस्थेत असेल काहीच अंदाज बांधता येत नव्हता. अन अचानक त्या दोघांना, झाडाच्या फांद्यांवर अडकलेला आपला मित्र दिसला. फरपटत फरपटत खाली आल्यामुळे त्याचा शर्ट पूर्ण फाटला होता. चेहरा पाठ रक्तबंबाळ झाली होती. त्याचा  कण्हण्याचा आवाज येत होता. त्याही परिस्थितीत दोघांना आनंद झाला. जोरात शिट्टी वाजवून आपण जिंकल्याचा इशारा त्याने वरच्या मित्रांना दिला.

त्या परिस्थितीत त्याला हळूहळू वर ने अतिशय अवघड अन् जिकिरीचे काम होते. पण आता निम्मा गड सर केला होता. ओढणीच्या दोराने त्याच्या कमरेला करकचून बांधून दोघेजण त्याच्या हातापायांना सावरत कसेबसे वरपर्यंत आले. वरच्या मुलांनी त्याला अलगद उचलून घेतले आणि सगळ्यांनी निश्वास सोडला. जबरदस्त मानसिक धक्का आणि शरीराला झालेल्या जखमां मुळे तो बेशुद्ध पडला होता. चेहऱ्यावर पाणी मारून सरांनी त्याला सावध केले आणि कसाबसा तो जागा झाला. त्याच्या एकुण भेदरलेल्या चेहऱ्यावरून आणि जखमां वरून त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेणे गरजेचे होते.

दोन मित्रांनी आपले शर्ट काढून त्याची झोळी तयार केली आणि त्याला उचलून पळत पळत गावाकडे जाण्यास सुरुवात केली. डोंगर कपाऱ्या तले गाव ते. तिथे कुठला दवाखाना? की हॉस्पिटल? पण एकाची चार चाकी गाडी मिळाली आणि त्यामधून त्याला जवळच्या गावी लवकरात लवकर नेण्यात मित्रांना यश आले.

गावातल्या दवाखान्यात पटापट उपचार सुरू झाले. जखमा पुसून ड्रेसिंग झाले. त्याला सलाईन लावले आणि रक्त जास्त गेल्यामुळे रक्तही लवकरात लवकर देण्याचे ठरले.  आदल्या दिवशी गावातल्या मुलींच्या कॉलेजमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प झाला होता. त्यावेळी गोळा केलेल्या बाटल्यांमधून योग्य ब्लड आणले गेले. ताबडतोब ब्लड देणेही सुरू झाले.

क्रमशः….

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments