सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन माहेरं… भाग-१ – मूळ गुजराती लेखिका : सुश्री गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : श्री रजनीकांत शाह ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

मी घराला कुलूप लावतच होते, इतक्यात, मागून आवाज ऐकू आला, ‘दीदी, तुम्हाला बाहेर जायला उशीर होणार नसेल, तर मी थोडा वेळ येऊ?

मी वळून मागे बघितलं. बेला होती आणि तिच्या बरोबर एक अपरिचित तरुणी होती.

मी म्हंटलं, ‘या. या. उशीर कसला? मी काही खास कामासाठी बाहेर पडत नव्हते. सहजच चक्कर मारायला चालले होते. आरामात बसू या. ’ 

घरात येताच बेला म्हणाली, ‘दीदी, ही मेघा आहे. मेघा देसाई. आपल्या गुजराती समाजात काही दिवसांपूर्वी तुषार देसाई येऊ लागले आहेत ना, त्यांची ही पत्नी. मेघा, ही आमच्या सगळ्यांची दीदी. खूप वर्षापासून इथे आहे आणि समाजासाठी खूप काही करते. योग शिकवते. मुलांना गुजराती शिकवते. संस्कृत श्लोक शिकवते. आणखीही खूप काही करते. बेंगलोरमध्ये जे कुणी नवीन गुजराती येतात त्या सगळ्यांना मदत करते. आणि…. ’

‘बस, बस, बेला, ’ मी थोड्या संकोचाने म्हंटलं, ‘आता तर मेघा इथेच रहाणार आहे ना, आपोआप ओळख वाढत जाईल. ’

मेघाने वाकून मला नमस्कार केला. आता मी तिच्याकडे नीट बघितलं. सडसडीत कमनीय बांधा, चमकता गव्हाळ रंग, ‘मीनाक्षी’ नाव ठेवावं, असे मोठ्या मोठ्या पापण्या असलेले डोळे, चेहर्‍यावरील कोवळेपणा, नाजुकपणा असा ओघळत होता, की खाली ओंजळ धरून तो धरून ठेवावा, असं वाटत होतं.

‘अच्छा, आज अचानक कसं येणं केलंत? ’ मी दोघींच्या हातात पाण्याचे ग्लास ठेवत म्हंटलं.

‘दीदी, मेघा राजकोटहून आलीय. आपल्या दोन्ही मुलांचं शाळेचं वर्ष संपेपर्यंत ती तिथे राहिली होती. बदली झाल्यामुळे तुषारभाई एकटेच इथे आधी आले होते. आमच्या समोरच्या फ्लॅटमधेच भाड्याने रहातात.

बेलाने मेघाची पूर्वपीठिका मला सांगितली. पण यात माझं काय काम आहे, हे मला कळेना.

‘छान झालं, आता तुला चांगली कंपनी मिळेल! ’

‘मेघाचा मालव सातवीमध्ये आहे, आणि तोरल सहावीत आहे. शाळेत अ‍ॅडमिशन घेतलीय. तसे दोघेही अभ्यासात हुशार आहेत. राजकोटमध्ये इंग्लिश मीडियममधेच होते, पण इथलं शिक्षण थोडं वेगळं आहे. त्यामुळे त्यांना समजायला थोडं कठीण जातय. आपण थोडी मदत केलीत, तर त्यांना शाळेत काही अडचण येणार नाही. ’ 

माझी दोन्ही मुले शिक्षण पूर्ण करून विदेशात स्थायिक झाली होती. पतिदेव ऑफिसच्या कामात हरवून गेले होते. त्यामुळे माझ्याकडे वेळच वेळ होता. गुजरातहून आलेल्या अनेक मुलांना मी अशा प्रकारची मदत करतच होते. तीन-चार महिन्यात त्यांची गाडी रुळावर येत असे आणि मलाही, कुणासाठी काही तरी चांगलं केलं, याचा आनंद मिळत असे.

मी होकार दिला. दिवस, वेळ सगळं ठरलं. मग मालव आणि तोरलला सोडायला आणि न्यायला येणार्‍या मेघाशी माझी खूप जवळीक झाली. तोरल अगदी मेघाची प्रतिकृती होती आणि मालव आपल्या वडलांवर गेला होता. दोन्ही मुले हुशार होती. थोड्याच दिवसात तयार झाली. मग मेघाही बंगलोरमधील गुजराती समाजाच्या कामकाजात व्यस्त झाली. बघता बघता ती माझा उजवा हात बनली.

मेघा आणि तुषार यांच्याबरोबर माझा जसजसा परिचय वाढत गेला, तसतसा माझ्या मनातला त्यांच्याबद्दलचा सन्मानभावदेखील वाढत गेला. एकदम आदर्श जोडी. त्यांचे डोळे, बोलणं यातून एकमेकांविषयीचा प्रेमभाव प्रगट व्हायचा. पण ते प्रेम दिखाऊ नव्हतं. एकमेकांचा सन्मान राखणारं प्रेम. काही सांगितल्याशिवायच एकमेकांच्या मनातली गोष्ट समजून घेण्याची आंतरिक शक्ती त्यांच्यात होती. दोघेही मुले शहाणी आणिक सर्वसाधारण घरात असतं, तसंच इथेही घडत होतं. तोरल तुषारच्या मागे-पुढे फिरत असायची आणि मालव ‘मम्मी मम्मी’ ची माला जपत राह्यचा. या वयातली मुलं अशीच असतात. मालव थोडा चंचल होता, पण मेघा सांगेल ते ऐकायचा. मेघादेखील दिवसभर ‘मालव… मालव… ’ म्हणत राह्यची. या सुखी, आनंदी परिवाराकडे बघताना मला माझ्या मुलांचं बालपण आठवायचं.

त्या दिवशी रविवार होता. भाद्रपद चालू होता. आदल्या दिवशी रात्री खूप पाऊस झाला होता. त्यामुळे मी आज गुजरातीचे वर्ग कॅन्सल केले होते. माझे पती कामासाठी मुंबईला गेले होते. मी माझी कामं शांतपणे आवरत होते. एवढ्यात मेघाचा फोन आला.

‘दीदी आपण फ्री आहात?’

‘हो! काही काम होतं?’ मला वाटलं मुलांना अभ्यासासाठी पाठवायचं असेल. पण ती म्हणाली, ‘आपण तासाभरात माझ्या घरी येऊ शकाल? ’

तिचं अचानक माझ्याकडे काय काम लागलं असेल, मला कळलं नाही. तरी पण मी ‘हो’ म्हणून टाकलं.

‘ठीक आहे. स्वैपाक करते आणि येते. पण काय काम आहे, ते तर सांग.’

‘नको दीदी! स्वैपाक करू नको. आपण सगळे इथे बरोबरच जेऊ या. आपण या फक्त. मग बोलू या.‘

मला वाटलं, कदाचित मालव किंवा तोरल यांचा वाढदिवस असेल. मी भेट वस्तू घेऊन जाऊ नये, म्हणून सांगितलं नसेल. मी चॉकलेटचा डबा घेऊन मेघाच्या घरी पोचले. तिथलं दृश्य पाहून मी अगदी चकित झाले.

मालव आणि तोरल पूजा करायला बसले होते. मालवच्या पुढे एक छोटा चौरंग होता. त्यावर कुणा तरुणीचा आणि तोरलच्या पुढील चौरंगावर कुणा तरुणाचा फोटो ठेवलेला होता. समोर गुरुजी ( भटजी), जे विधी करायला सांगत होते, त्यावरून लक्षात आलं, की श्राद्ध विधी चालू आहे. पण श्राद्ध विधी ही दोन मुले का करताहेत? कुणाचं श्राद्ध? हे फोटो कुणाचे? मेघा गुरुजींना काही हवं असेल, तर देण्यासाठी तिथे जवळच बसली होती. या सगळ्यात विचारू तरी काय? माझ्या अतृप्त जिज्ञासेतून निघणार्‍या धुरामुळे मला गुदमरू लागलं होतं. एकदा माझी आणि तिची नजरानजर झाली, तेव्हा तिने नजरेच्या इशार्‍यानेच ‘नंतर सांगते’, असं म्हंटलं.

सर्व विधी झाले. दक्षिणा घेऊन गुरुजी निघून गेले. ते दारापर्यंत पोचले असती, नसतील, एवढ्यात माझ्या कंठातून किती काळ कैद असलेले शब्द मोठ्या व्याकुळतेने बाहेर पडले, ‘हे सगळं काय आहे मेघा? हे फोटो कुणाचे आहेत?’ 

मेघाने जसा बॉम्ब फोडला. तिने दोन्ही फोटोंकडे आळी-पाळीने निर्देश करत संगितले ‘हा मिनेश आहे, माझा पहिला पती. तोरल त्याची आणि माझी मुलगी आहे. आणि ती आहे हेमा दीदी. मालवची आई. म्हणजे तुषारची पहिली पत्नी.’

मी जशी काही पुतळाच झाले. ओठ हलत होते, पण शब्द हरवले होते. एकच वाक्य बोलून मेघाने त्या चौकोनाच्या संबंधात असं जाळं बनवलं होतं, की मी त्या जाळ्यात अडकले. काहीच कळत नव्हतं. मला त्याच दशेत तसंच सोडून मेघा उभी राहिली. ‘दीदी, मुलांना भूक लागली असेल. प्रथम जेवण करू या. नंतर आपल्याला सगळं सांगते. आपल्याला हे सगळं सांगितलं नसतं, तरी काही फरक पडला नसता. पण आज मी आणि तुषारनी ठरवलं, की दीदीला सगळं काही सांगून टाकूयात. आपल्यापासून काय लपवायचं? ’

त्या दिवशी मी काय जेवले, मला आठवत नाही. माझं मन ते रहस्य जाणण्यासाठी उतावीळ झालं होतं. जेवण झाल्यावर तुषार मुलांना घेऊन बेडरूममध्ये गेला. आम्ही सोफ्यावर बैठक जमवली. मेघाने हळू हळू पडदा सरकवला. त्या दिवशी तिच्या जीवनाचे जे दृश्य माझ्या काना-डोळ्यासमोर प्रगट झालं, ते कुठल्याही कथा-कादंबरी-नाटकापेक्षा अधीक रसमयी होतं.

मेघाने सुरुवात केली, ‘दीदी आपल्या लक्षात आले असेलच की हा माझा आणि तुषारचा दुसरा विवाह आहे. मिनेशबरोबर माझा विवाह झाला, तेव्हा मी वीस वर्षांची होते. एक वर्षांनंतर तोरलचा जन्म झाला. तिचा पहिला वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच एका दुर्दैवी क्षणी मिनेशच्या ऑफिसमधून फोन आला, की तीव्र हार्ट अ‍ॅटॅकमुळे मिनेश खुर्चीवरच कोलमडला होता.

त्यानंतरचं वर्ष कसं गेलं, मला कळलंच नाही. माझा मेंदू वर्षभर जसा काही मूर्छित अवस्थेतच होता. मला इतकंच आठवतं, माझे आई-बाबा मला घरी नेण्यासाठी वारंवार येत असत आणि माझ्या सासू-सासर्‍यांचे दु:खी चेहरे बघून मी त्यांना येत नाही असं म्हणत असे. आपल्याला आश्चर्य वाटेल, की तोरलच्या दुसर्‍या वाढदिवसानंतर, त्यांनीच माझ्या दुसर्‍या लग्नासाठी मला तयार केले. मलाही वर्षाभरात लक्षात आलं होतं, की एका तेवीस वर्षाच्या विधवेसाठी एकटीने पूर्ण आयुष्य घालवणं किती मुश्कील आहे. माझे मोठे दीर आणि जाऊबाई तोरलला दत्तक घायला तयार होते, पण मीदेखील एक अट घातली, ‘जो माझ्यासोबत तोरलचाही स्वीकार करेल, त्याच्याशीच मी लग्न करेन.’

— क्रमश: – भाग १

मूळ गुजराती कथा – त्रण पियर

मूळ गुजराती लेखिका – सुश्री गिरिमा घारेखान 

मो. – ८९८०२०५९०९

हिन्दी अनुवाद – तीन मैके

अनुवादक – श्री रजनीकांत शाह

मो – 9924567512 

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन माहेरं… भाग-२ – मूळ गुजराती लेखिका : सुश्री गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : श्री रजनीकांत शाह ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले – त्यानंतरचं वर्ष कसं गेलं, मला कळलंच नाही. माझा मेंदू वर्षभर जसा काही मूर्छित अवस्थेतच होता. मला इतकंच आठवतं, माझे आई-बाबा मला घरी नेण्यासाठी वारंवार येत असत आणि माझ्या सासू-सासर्‍यांचे दु:खी चेहरे बघून मी त्यांना येत नाही असं म्हणत असे. आपल्याला आश्चर्य वाटेल, की तोरलच्या दुसर्‍या वाढदिवसानंतर, त्यांनीच माझ्या दुसर्‍या लग्नासाठी मला तयार केले. मलाही वर्षाभरात लक्षात आलं होतं, की एका तेवीस वर्षाच्या विधवेसाठी एकटीने पूर्ण आयुष्य घालवणं किती मुश्कील आहे. माझे मोठे दीर आणि जाऊबाई तोरलला दत्तक घायला तयार होते, पण मीदेखील एक अट घातली, ‘जो माझ्यासोबत तोरलचाही स्वीकार करेल, त्याच्याशीच मी लग्न करेन.’) आता इथून पुढे —- 

एके दिवशी माझ्या सासर्‍यांनी, तुषारने दिलेली, ‘जीवनसाथी हवा’, ही जाहिरात वाचली.

त्यात लिहिलं होतं, एका मुलाचा बाप, तरुण विधुर, याला जीवनसाथी हवा आहे. माझ्या सासर्‍यांनी शोध घेतला. मालवच्या जन्मानंतर हेमा दीदीचा मृत्यु झाला होता. मी व तुषार भेटलो. तो मला तोरलसह स्वीकारणार होता. तो म्हणाला, ‘आईशिवाय मूल कसं कासावीस होतं, ते मला माझ्या मालववरून लक्षात येतय. आई असताना तोरलला आईपासून दूर कशाला ठेवायचं?’

माझ्या आई-वडलांना समजावत, माझ्या सासू-सासर्‍यांनीच माझं कन्यादान केलं. माझे मोठे दीर माझे भाऊ बनले. मी आणि तुषार प्रेमाच्या बंधनात बांधलो गेलो. आमचा चतुष्कोनी परिवार पंचकोनीय बनवायचा नाही, हा निर्णय आम्ही दोघांनी घेतला. मालव आणि तोरल थोडे मोठे झाले, तेव्हा आम्ही सगळं त्या दोघांना सांगितलं. बाहेरून कुठून तरी कळलं असतं, तर आपली फसवणूक करताहेत, असं त्यांना वाटलं असतं. म्हणूनच हेमा दीदी आणि मिनेशच्या मृत्युनंतर दहा वर्षांनी त्यांच्याकडून श्राद्धविधी करवला. वातावरण शांत होतं आणि मी अगदी स्तब्ध. ‘सावत्र आई’ आणि ‘सावत्र बाप’ या शब्दांना आपल्या समाजाने केवढं भयंकर रूप दिलय! ते जीवतोड प्रेमही करू शकतात, हे तोरलला तुषारबरोबर आणि मालवला मेघाबरोबर पाहिलं, तरच कळेल.

त्या दिवशी तुषार आणि मेघा माझ्या आदराच्या सर्वोच्च शिखरावर आरूढ झाले. मला वाटू लागलं, ती दोघे नि:स्वार्थ प्रेमाचे साक्षात उदाहरण आहेत. या संसारात कुणी तरी दुसर्‍यासाठी थोडंसं जरी केलं, तरी त्याचा गवभर डांगोरा पिटतात. इथे सावत्र मुलांना आपल्या पापण्यांच्या सावलीत ठेवत हे दोघे आई-वडील जगाला याची खबरदेखील लागू देत नव्हते. माझ्या आणि मेघाच्यामध्ये जो स्नेहबंध निर्माण झाला होता, तो या घटनेनंतर अधीकच दृढ झाला. माझ्या इथल्या अनेक जबाबदार्‍या तिने आपल्या शिरावर घेतलेल्या होत्या. त्यामुळे मालवच्या व्रतबंधासाठी ती जेव्हा महिनाभर राजकोटला गेली, तेव्हा मला वाटलं, मी माझा उजवा हातच गमावलाय. महिनाभराच्या सुटीनंतर जेव्हा ती परत आली आणि मला फोन केला, तेव्हा मला हुश्श्य झालं. माझी खूप काही कामे राहिली होती. पण तिच्या बोलण्यातून वाटत होतं, की महिन्याची सुट्टी तिला खूप कमी पडली आणि कुणाकडेही मनसोक्त रहाता आलं नाही.

यानंतर जानेवारीत ओणमच्या पार्टीत आम्ही वारंवार भेटत राहिलो. दर वेळी ती नव्या साडीत नटून- थटून येत होती. एकदा तिला सहज विचारलं, ‘राजकोटहून खुपशा साड्या खरेदी करून आणलेल्या दिसताहेत!’

‘नाही दीदी! या सगळ्या साड्या मालवच्या मुंजीच्या वेळी माझ्या माहेरून मला आलेल्या आहेत.’

‘इतक्या?’

‘का बरं? आपल्याला तर माहीतच आहे ना, मला तीन तीन माहेरं आहेत. ’

मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघत राहिले. मला काहीच कळत नव्हतं. मी म्हंटलं,

‘तीन माहेरं? असं कधी ऐकलं नव्हतं. ’

‘दीदी’, लहान मुलाला समजावावं, तसं मेघा म्हणाली, ‘पहिलं म्हणजे, माझ्या आई-वडलांचं

घर माझं माहेर आहे ना! ’

‘हो! पण मालवचा…’

‘अरे, माझ्या मुलाच्या मुंजीसाठी आजी, आजोबा, मामा यांच्याकडून मामेरा (मामाकडूनआलेली भेट) नाही का होणार? ‘ अगदी सामान्य गोष्ट बोलते आहे, अशा सुरात मेघा म्हणाली. मेघाचे आई-वडील, तिच्या नवर्‍याच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाला मामेरा करतील? मी माझं आश्चर्य लपवत तिला विचारलं, ‘आणि दुसरं माहेर? ’

‘अरे दीदी, हेमा दीदीची जागा मी घेतलीय, तेव्हा, तिच्या आई-वडलांची मुलगीच झाले की नाही मी? मी जेव्हा राजकोटला जाते, तेव्हा त्यांच्याकडे जाऊन रहावंच लागत. त्यांनी तर आत्तापासून तोरलच्या लग्नासाठी सोनं खरेदी करायला सुरुवात केलीय आणि मालव तर त्यांचा नातूच आहे ना! आपल्याला सांगू का दीदी, चार-पाच दिवसात माझा फोन झाला नाही, तर त्या लोकांना माझी काळजी वाटू लागते. पुढच्या महिन्यात दोघेही आमच्याकडे राहायला येणार आहेत, तेव्हा मी तुमची भेट घालून देईन. “

मला कळेना, की कोण जास्त वंदनीय आहे? पतीच्या पहिल्या बायकोचे आई-वडील…. त्यांना इतका सन्मान देणारी मेघा की आपल्या मृत मुलीच्या जागी आलेल्या स्त्रीला इतकं प्रेम देणारी ती वृद्ध दंपती?

पण तिसरा धक्का तर आता बसणार होता. जेव्हा मी मेघाला विचारलं, ‘आणि तिसरं माहेर? ’ मग हसत हसत म्हंटलं, ‘वाटतय, तुझे सासू-सासरे खूप चांगले असणार. त्यामुळे तुषारचं घर तुला माहेरच वाटत असेल! होय ना! ’

माझी थट्टा समजून मेघाही हसली. माझा हात धरून म्हणाली, ‘हो! ती दोघे चांगलीच आहेत. पण आपण विसरलात, माझं कन्यादान कुणी केलं? ‘

‘पण ते तर मिनेशचे आई-वडील ना! ते का….? ’

‘आपल्या लक्षात येत नाही दीदी! माझं कन्यादान त्यांनी केलं. म्हणजे मी त्यांची पण मुलगीच झाले ना! मग ते घर पण माझं माहेरच की! मला आणि तुषारला आमच्या दोन्ही मुलांना घेऊन, माझ्या त्या माहेरीही रहायला जावं लागतं. मालवसाठी मामेरा तिथूनही झाला.

‘पण मालव तर तुषारचा….. ’

‘अरे दीदी, आपण माझ्या नणंदेला यशोदेला ओळखत नाही. आमच्या विवाहाच्या वाढदिवसाला सगळे इथे येतील, तेव्हा तिला भेटा. मला दुसरा जन्म तीनेच तर दिलाय. कारण, मिनेश गेल्यानंतर मी जिवंत कुठे होते? फक्त श्वास हेत होते, एवढंच! ’

अश्रुभरल्या डोळ्यांच्या मेघाच्या गळ्यातलं, चांदीच्या घंटेच्या किणकिणाटासारखं हसू तितकच मधुर होतं. माझ्या डोळ्यांच्या मेघातून स्नेहवर्षाव झाला.

मी विचार करू लागले, या तरुणीला, तिच्या पतीला, पुर्‍या परिवाराला काय नाव देऊ? प्रेमाचं मेघधनुष्य? आपल्या जगात सख्खी भावंडसुद्धा छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडतात. ईर्षा आणि अहंकारासाठी दुसर्‍याच्या विरुद्ध षडयंत्र रचतात. प्रपंचाच्या भिंती तुटतात आणि दगड ढासळतात. अशा जगात असाही एक संसार वसतोय.

त्यावेळी मला मेघाला साष्टांग दंडवत घालावं, असं वाटू लागलं. मी तिच्या कपाळाचा मुका घेतला आणि तिचे दोन्ही हात हातात घेऊन अवाकशी उभी राहिले.

— समाप्त —

मूळ गुजराती कथा – त्रण पियर

मूळ गुजराती लेखिका – सुश्री गिरिमा घारेखान 

मो. – ८९८०२०५९०९

हिन्दी अनुवाद – तीन मैके

अनुवादक – श्री रजनीकांत शाह

मो – 9924567512 

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments