सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ. राधिका भांडारकर
💐 अ भि नं द न 💐
‘आम्ही सिद्ध लेखिका संस्था‘ पुणे जिल्हा शाखा यांच्यातर्फे ‘१ मे २०२५ – महाराष्ट्र दिना’ निमित्त घेण्यात आलेल्या कथा स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री राधिका भांडारकर यांना त्यांच्या “पराधीन” या कथेसाठी प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
आपल्या समूहातर्फे राधिकाताईंचे हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.💐
आजच्या व उद्याच्या अंकात वाचूया ही पुरस्कारप्राप्त कथा पराधीन – दोन भागात.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
जीवनरंग
☆ पराधीन… भाग – १ ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
शोभाला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीने प्रयत्न चालू होते. तिच्या हृदयाची क्षमता दहा टक्क्यावर आली होती. मॉनिटरवरच्या आलेखावरून फिरणारा तो हिरवा प्रकाशाचा ठिपका धोक्याच्याच सूचना देत होता. शोभाचे सारे चैतन्यदायी घटक हळूहळू उतरत होते. व्हेंटिलेटर वर असूनही तिला श्वास घेणं प्रचंड त्रासदायक होत होतं आणि तिची छाती जोरजोरात उडत होती.
ताईला कळुन चुकलं होतं की शोभाला आता निरोप द्यायची वेळ आली आहे, या यातनांमधून शोभाला फक्त मृत्यूच सोडवू शकत होता. ताईला हे सत्य पटत होतं पण कितीही झालं तरी धाकट्या बहिणीने आपल्या आधी जावे हे सत्य स्वीकारणे तिला कठीण जात होते. शिवाय शोभाच्या जाण्याने काही नवीन प्रश्न उपस्थित होणार होते ते वेगळेच. सायलीचे काय?
खूप दिवसांपूर्वी शोभा ताईला म्हणाली होती, ” आयुष्यभर देवाने माझ्या पदरात नकारात्मक दानच टाकले. आता मात्र देवाजवळ माझं एकच मागणं आहे. माझं काही बरं वाईट व्हायच्या आधी सायलीने या जगाचा निरोप घ्यावा. कोण करेल ग तिचं? कोण जबाबदारी घेईल तिची? आणि सायली ही माझीच जबाबदारी नाही का? ती मी अशी कशी कुणावर सोपवू शकेन? ”
बोलता बोलता तिला हुंदके आवरत नव्हते.
कोपऱ्यात एका टेबलावर सायली बसली होती. स्वतःशीच हसत होती, काही बडबडत होती. जणू काही आईचं दुःख, तिचं अश्रू गाळणं या साऱ्यांच्या पलीकडे तिचं वेगळं जग होतं.
त्यादिवशी ताईने शोभाला समजावले. मोठ्या बहिणीच्या मायेने तिला जवळ घेतले. पाठीवर थोपटले.
“अग! असं का म्हणतेस आणि तुला कशाला काही होईल? तू असे विचार करू नकोस. शेवटी आपल्या हातात काय आहे? माणूस हा पराधीन आहे. जे ईश्वराच्या मनात असेल तेच घडेल पण एक लक्षात ठेव जो चोच देतो तो चाराही देतो. तू विश्वास आणि श्रद्धा ठेव. ”
भैय्यासाहेब गेल्यानंतर ताई, शोभा आणि सायलीला स्वतःच्या घरी घेऊन आली होती.
“आता तुम्ही इथेच रहा. मीही तर एकटीच असते. विनयला मी सांगितलं आहे आणि त्याची काहीच हरकत नाही. ”
तसं पाहिलं तर सगळ्यांचीच आयुष्यं एकमेकात गुंतलेली. स्वतंत्र तरीही गुंतलेली. काही वर्षांपूर्वीच ताईच्या पतीचे निधन झाले होते. ताईला एकच मुलगा. विनय. तो अमेरिकेत स्थायिक. बाबा गेल्यानंतर ताई काही महिने विनय सोबत अमेरिकेत राहिलीही पण तिने जाणले की असे इथे परदेशात कायम राहणे मानसिक दृष्ट्या तिला शक्य नव्हते. विनयला तिने न दुखवता पटवूनही दिले
खरं म्हणजे जो तो आपापले आयुष्य जगत असतो. टप्प्याटप्प्यावर बदललेल्या आयुष्याची घडी सावरत असतो. पुढे जात असतो. भविष्यात काय घडणार हे कुठे ज्ञात असतं?
भैय्यासाहेब गेले. शोभा आणि सायलीचा आधार ढासळला. तशा त्या अनाथ नव्हत्या, शोभाच्या सासरची माणसं तशी जबाबदार आणि समंजस होती. जरी ती नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने विखुरलेली होती तरी कुणीही सायलीला आणि शोभाला नाकारलं नव्हतं, डावललं नव्हतं. पण ताईने आपणहून शोभाला मदतीचा म्हणण्यापेक्षा मायेचा, अपार विश्वासाचा, आधाराचा हात दिला. त्या दोघींचं एक प्रकारचं केविलवाणेपण ताईच्या काळजाला कुठेतरी चिरून जात होतं.
तेव्हापासून ताई, शोभा आणि सायली यांचं एकत्र जीवन सुरू झालं.
सोपं नव्हतं. प्रत्येकाचे आपापल्या आयुष्याचे कम्फर्ट झोन होतेच. आता एका निराळ्या समूहात आयुष्याची नवी सुरुवात करताना त्रास हा होणारच होता. शिवाय सायलीची स्वमग्नता हा त्यातला सर्वात दुबळा भाग होता. शोभाला सायलीची सवय झालेली होती. तिच्या वागण्या बोलण्यातला विचित्रपणा, तिचे कधी घसरणारे तर कधी प्रखर झालेले मानसिक कल, शोभाला सायलीच्या जन्मापासून तसे अंगवळणी पडले होते. आणि शेवटी शोभा एक “आई” होती. सायली तिच्या रक्तामांसाचा गोळा होता.
मावशी या नात्याने ताईला सुद्धा सायलीचा ऑटिझम ज्ञात होताच पण दूर असणं आणि सहवासात राहणं यात खूप फरक होता.
सायलीला तिच्या कुठल्याही वस्तुंना हात लावलेला चालत नसे. तिचे कपडे, तिच्या वस्तू, चपला अगदी केसाला लावायच्या पिना सुद्धा कोणी जागेवरून हलवल्या तर ती प्रचंड क्रोधित व्हायची. तिला सतत टीव्ही लागायचा. तिने लावलेला चॅनल कोणीही बदलायचा नाही. आवाज सहन न झाल्यामुळे तिला न विचारता जर टीव्ही बंद केला तर तिचा पारा चढायचा. शेवटी ती असाधारण आहे, वेगळी आहे, तिला कळत नाही, विचार करण्याची क्षमता तिच्यात नाही असा विचार करून, सायलीलाच केंद्रस्थानी ठेवून सारे व्यवहार करणं क्रमप्राप्त होतं.
एक दिवस ताई शोभाला म्हणाली,
“शोभा चूक तुझी आहे. अगं! अशा मुलांसाठी वेगळ्या शाळा असतात तिथे का नाही तू तिला घातलेस? तिथे ती काही शिकली असती. वेळीच तुम्ही दोघांनी हा विचार का नाही केला? ”
“ताई तिच्यासाठी जे जे करता येईल ते सगळं आम्ही केलं होतं ग! तिच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून आम्ही दुसऱ्या मुलाचाही विचार केला नाही पण नशिबाचे फासे उलटेच पडले. ”
शोभाचा आवाज रडवेला होत गेला, डोळे वहायला लागले.
सायली भिंतीला टेकून ताठ उभी होती, तिचे डोळे वटारलेले होते. चेहऱ्यावर विचित्र भाव होते. तिला पाहताच ताईने संवाद तोडला. विषय बदलला.
ताईला का माहित नव्हत्या शोभाच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटना?
भैय्यासाहेबांना लोकल गाडीत चढताना झालेला तो भयाण, जीवघेणा अपघात! त्यातून ते वाचले तरीही पूर्ववत कधीच झाले नाहीत. कायमचे अपंगत्व आले, नोकरी सोडावी लागली.
थोडीफार सेव्हींग्ज, साचलेले प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे, घरून शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा आणि पुढे उरलेलं लांबलचक आयुष्य.
शोभा साठी तर साराच अंधार होता. स्वमग्न सायली आणि अपंग नवरा.
देव एकाच माणसाला इतकी दुःखं का देतो?
– क्रमशः भाग पहिला
© सौ. राधिका भांडारकर
वाकड, पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈