सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ बॅटरी – भाग 1 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

भयंकर थंडी! पारा शुन्याहून वीस डिग्री खाली. नाकातली ओल बर्फाचा खडा बनून नाकात टोचत होती. बर्फाचे शुभ्र, लहान लहान कण एकत्र जमून सर्व ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करत होते. डांबरी रस्त्याचा काळेपणा शिल्लक नव्हता, की छताच्या कौलांचा कुठला रंग ! बर्फाच्या या कणांनी मिळून प्रत्येक रंग पांढऱ्या रंगात बदलून टाकला आहे. झाडा झुडुपांच्या फांद्या बर्फांनी लगडून जणू स्वागतासाठी झुकल्या आहेत. एखाद दुसरा चालत जाणारा माणूस बर्फाचं गाठोडं चालत जात असल्यासारखा दिसतोय. त्यांच्या गरम कपड्यांवर आणि जाडजूड बुटांवर सफेद बर्फकण हसत बसले आहेत असं वाटतंय. जमलेल्या बर्फावरही खारी, हिरव्या गवतावर जशा उड्या मारत, बागडत होत्या, तशाच बागडताना दिसताहेत. सुनसान रस्त्यांवर कधी  कधी जंगली प्राणीही दिसून येत असत.

निसर्गाच्या या रूपाला तोंड देण्यासाठी माणसाला फार तयारी करावी लागते. कधी कधी जर माणसाच्या मेंदूची काही चूक झाली, तर “आ बैल मुझे मार” च्या चालीवर “ ये बर्फा, मला गोठवून दाखव” अशा तऱ्हेने सोफीसारखी, जाणून बुजून या बर्फाळ  हवेला आव्हान देण्याची चूक घडून येते. सोफीचा हट्ट म्हणा, की नाईलाज, ती या वेळी, अशा जीवघेण्या हवेत हायवे वर गाडी चालवते आहे. उद्या तिला कामावर हजर व्हायचे आहे. जाणं आवश्यकच आहे. सगळी विमानोड्डाणं रद्द झाल्याने तातडीने तिला हा निर्णय घेणं भाग पडलं. धाडस करणंच भाग पडलं होतं. कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशात रात्रीचं गाडी चालवणं खूप सुरक्षित आणि सोपं असतं. आणि या   बर्फाळ हवेसाठी तिच्या गाडीला स्नो टायर्स पण आहेत. त्यामुळे हवा अधिक बिघडली, तरी ती सुरक्षित राहू शकते. दूरवरच्या ठिकाणी गाडी चालवत जायची क्षमता पण आहे तिच्यात. असा धोका पत्करणं रोमांचक वाटत होतं तिला. तरुण आहे ती, आत्ता नाही धाडस करायचं, तर काय पन्नाशी नंतर करायचं का? तसंही पेईंग गेस्ट म्हणूनच रहात होती ती. सामान म्हणजे, फक्त दोन सुटकेस आहेत, ज्यात तिचे कपडे आहेत. एवढ्या प्रचंड बर्फवृष्टीमधेही रोजचं आयुष्य काही थांबत नाही. टोरांटो पासून न्यूयॉर्क शहरापर्यंतचा प्रवास गाडीने करायचा उत्साह तिला खूप उर्जा देत होता. मधे एखादा स्टॉप घेतला तरी बास आहे. हॉटेलमध्ये सामान टाकून ती लगेच ऑफिसलाच जाईल. हवा कितीही खराब असली तरी सब वे रेल्वे असो किंवा रोजचं आयुष्य सगळं काही त्याच गतीने चालू रहातं.

अमेरिकेची सीमा पार केल्यावर एकाएकी जोरदार वारा आणि बर्फवृष्टीचा हल्ला होऊ लागला. बर्फाळ हवेच्या थपडा गाडीच्या काचेवर वारंवार आदळू लागल्या. अंधाराला चिरत वाऱ्याचा सों सों आवाज गुंजत होता. रस्त्यावर जमलेल्या बर्फाच्या घसरणीमुळे त्या भरभक्कम चाकांनाही धोका निर्माण होत होता. हवा आणखी बिघडू शकते, हे माहित तर होतं, पण अशी वादळी होईल याचा अंदाज नव्हता, बिघडत्या हवेची लक्षणं बघून, तिला वाटायला लागलं की आपला निर्णय चुकीचा होता. अशा प्रकारे धोका पत्करायची काही गरज नव्हती. आता ती मधेच अडकली होती, ना धड इकडे, ना तिकडे! परत जायचं म्हंटलं, तरी तेव्हढाच त्रास होणार होता. गाणी ऐकताना तिच्या लक्षात आलं, की फोन चार्जला लावायला पाहिजे. फोन जर बंद झाला, तर तिचं काही खरं नाही.

गाडीचा वेग सतत कमी होत होता. काळाकुट्ट अंधार आणि समोर सतत उडत असणारा बर्फ यामुळे निर्माण होणाऱ्या धुरकटपणामुळे समोरचं दिसायला त्रास होत होता. गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाशही कमी वाटत होता. रस्त्यावर जमा झालेला बर्फ साफ करायला या वेळी कोणी येणार नव्हतं. गाडीत हीटरची सोय असल्यामुळे बाहेर थंडीचा कहर असला तरी सोफीला त्याचा त्रास होत नव्हता. समोरच्या काचेवर पडलेला बर्फ आता घट्ट होऊन काचेवर त्याचा थर जमा होऊ लागला होता. ते साफ करण्यासाठी गाडीचे वायपर्स काहीतरी रसायन त्याच्यावर उडवत होते, पण समोरचा रस्ता काही दिसत नव्हता. तिने विचार केला, गाडी थांबवून पुढच्या-मागच्या काचा, हेडलाईट्स, बाजुच्या काचा आणि गाडीच्या चारी बाजुंना साठलेला बर्फ साफ करून घ्यावा. गाडी बंद करून तिने ब्रश काढला आणि सगळा बर्फ काढून टाकला. परत नव्याने बर्फ पडतच होता, पण तो काढून टाकण्यासाठी वायपर्स पुरेसे होते.

गाडीच्या सगळ्या बाजूंचा बर्फ काढून टाकून परत ती गाडीत येऊन बसली. पण गाडी चालू करण्याआधी हात गरम करण्याची आवश्यकता होती, सगळी बोटं आखडून गेली होती तिची. काही वेळ हातमोजे काढून हात एकमेकांवर घासायला सुरवात केली तिने. सगळं अंग पण गारठून गेलं होतं. हुडहुडी भरली होती. गाडी सुरु करून ती सुटकेचा निश्वास टाकणारच होती, तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, की गाडी सुरूच झालेली नाही! “अरे! हे काय?” परत सुरु करण्याचा प्रयत्न केला. परत तेवढाच हलकासा आवाज. इंजिन चालू होण्याचा कुठलाच आवाज नाही. परत परत ती बटण दाबत राहिली, पण गाडी एखाद्या हट्टी मुलाप्रमाणे ओठ बंद करून जागच्या जागी थटून उभी राहिली होती. सोफी एकटक त्या मूक झालेल्या बटणाकडे पहात राहिली. अनेक शक्यता तिच्या मनात एकदम घोंघावू लागल्या. असं गाडी सुरु न होणं म्हणजे, बॅटरी बंद पडली असणार. अशा वेळी बॅटरी डेड होणं म्हणजे एक प्रकारे सोफीचंच मरण होतं. हेल्पलाईनला फोन करावा म्हणून तिने फोन हातात घेतला, तर फोन पण डेड झालेला! त्याची बॅटरी चार्जच झालेली नव्हती. आता कोणाला मदतीला बोलावणं पण शक्य नव्हतं. आता काय करायचं? शंका कुशंकांनी तिला घेरून टाकलं. सगळ्यात मोठी धोक्याची घंटा तिच्या डोक्यात घण घालत होती, ती म्हणजे, “आज या थंड रात्रीत ही गाडीच तिची कबर बनणार आहे की काय?”

मागच्या सीटवर ठेवलेलं ब्लॅन्केट तिनं अंगभर लपेटून घेतलं आणि सुन्न होऊन बसून राहिली. या थंडीत शरीर काकडून त्याची बर्फकांडी बनत जाण्याचा अनुभव नरकमय यातना देणारा असणार होता, त्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने मृत्यू आला असता, तर तो ठीक असता असा विचार तिच्या मनात आला. असं वाटायला लागलं, की जणू तिने स्वतःच स्वतःला मृत्युच्या स्वाधीन केलं होतं. संपूर्ण शरीर ब्लॅन्केटमधे गुंडाळून घेतलेलं असूनही थंडीची तीव्रता वाढत होती. थोड्याच वेळात बाहेरच्या ओल्या, तीव्र, हाडं फोडणाऱ्या थंडीने गाडीचा हीटर बंद पाडला. हुडहुडी भरायला लागली होती, दात वाजायला लागले होते. हळुहळू हाताची बोटं गोठणं सुरु झालं. पायात बूट होते, त्यामुळे पाय थोडे उबेत होते. या निर्जन रस्त्यावर, या वेळी दूरवरही कुठे दुसरी कुठली गाडी येईल अशी शक्यता दिसत नव्हती.

मृत्यू पावला पावलांनी जवळ येत शरीर शिथिल करत चालला होता. आता वाचण्याची आशा सोडून देऊन ती आपल्या जवळच्या माणसांची आठवण येऊन हळवी होऊ लागली होती – “माझ्या मृत्यूची बातमी त्यांना केंव्हा कळेल, कोणजाणे! मला इथून कसं घेऊन जातील ते? की इथेच बर्फाखाली दबून, गाडलं जाईल माझं शरीर? मृत्यूची  एक मूक अशी चाहूल कानांना ऐकू येत होती. अरे! कानांना खरंच काहीतरी ऐकू येत होतं. ही चाहूल स्पष्ट होती. असा काही मृत्यूचा आवाज नसतो! पहिलाच अनुभव आहे, काय माहित, कसा असतो ते! कान आता सावध झाले. मेंदूला संदेश मिळाला—“हा तर कुठल्या तरी गाडीचा आवाज आहे”. नसानसात जीवनाशा फुरफुरू लागली. मागून आलेल्या गाडीच्या दिव्यांचा प्रकाश दिसू लागला. मनात आलं, थांबवून मदत मागावी, पण परत वाटलं, की कोणजाणे, कोण असेल? आत्ता तर नुसतं थंडीनीच मरायचं आहे, या गाडीला थांबवून आणि कुठल्या त्रासातून जाऊन मरायची वेळ येईल, कोणजाणे! मरणाची भीति तर होतीच, त्यात अजून एका संकटाच्या भीतीचं भूत मानगुटीवर येऊन बसलं. ती ब्लॅन्केटमधे अजूनच गुरफटून बसली, म्हणजे त्या येणाऱ्या गाडीतल्या माणसाला या गाडीत कोणीच नाहिये असं वाटून तो निघून जाईल. ती श्वास रोखून त्या गाडीच्या निघून जाण्याची वाट बघत होती. तेवढ्यात त्या गाडीचे ब्रेक जोरात दाबले गेले आणि चर्र करत ती थांबली.

– क्रमशः भाग पहिला    

मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments