श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आजीची माया… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(मुलं आता आपापल्या दुनियेत व्यस्त झाली. नोकरीही करत होते. कुणी सॉफ्टवेअर तरी कुणी कुठे. नात्यात ईर्ष्या आणि गैरसमजाचा कळी शिरला की त्यात दुरावा हा येतोच.) इथून पुढे —

दुपारची वामकुक्षी घेऊन संध्याकाळी सगळेच जण हॉलमध्ये चहाला एकत्र जमले. अनसूया एका टोकाला तर प्रियंवदा दुसऱ्या टोकाला बसते हे सरस्वतीच्या केव्हाच लक्षात आलं होतं. सगळेचजण गुपचूप बसले होते.

अनसूयेचा मुलगा चिन्मय लहानपणापासून भारी चुणचुणीत आणि चौकस. तो कुणालाही बोलकं करायचा. त्यानं सरस्वतीला विचारलं, “आज्जी, तुझी आणि आजोबांची भेट पहिल्यांदा कुठं झाली होती ग?” त्याचा हा प्रश्न अगदी अनपेक्षितच होता.

“तू कधीही काहीही विचारतोस रे? काय करणार आहेस ते ऐकून?” सरस्वतीनं दटावलं.

त्यानं हसतहसत सांगितलं, “अगं आता लवकरच माझं वधू संशोधन सुरू होईल ना! मग थोरामोठ्यांचा अनुभव नको का ऐकायला?” सगळ्याच मुलांनी सरस्वतीचा पिच्छा पुरवला.

सरस्वतीच्या डोळ्यांसमोर पंचावन्न वर्षापूर्वीचा तो प्रसंग उभा राहिला. ती म्हणाली, “आमच्या घराजवळच आमच्या दोन्ही कुटुंबियांचे परिचित असलेले एक शिक्षक दांपत्य राहत होते. पहिल्यांदा तुमचे आजोबा मला त्यांच्या घरीच पाहायला आले होते.

सुरूवातीची ओळखपरेड म्हणून त्या सरांनी उभयतांना नाव, शिक्षण आणि नोकरी याविषयी विचारून घेतलं. अर्थात त्यांनी आधीच एकमेकांविषयी ती जुजबी माहिती दिलेलीच होती.

 त्यानंतर सरांनी आम्हा दोघांना पेन आणि दोन चिठ्ठ्या दिल्या आणि ‘एका ओळीत तुमचा सर्वात चांगला गुण कोणता ते लिहून द्या’ असं म्हणाले.

तुमच्या आजोबांनी लिहिलं होतं, ‘मला कधीच कुणाविषयी असूया वाटत नाही कारण मी कधीच कुणाशी तुलना करत नाही. ’ आणि मी लिहिलं होतं, ‘माझ्याशी कुणीही कितीही वाईट वागलं तरी मी मनात काही न ठेवता त्यांच्याशी गोडच वागते, बोलते. ’ 

झालं, सर आनंदाने म्हणाले, ‘संसारात एकमेकांना सांभाळून घेण्यासाठी ह्यापेक्षा आणखी कसले गुण हवेत सांगा? छत्तीस गुणाने कुंडली जुळलीय, असंच समजायचं. ‘ त्यानंतर थेट लवकरच लग्नाची बोलणी झाली आणि लग्न ठरलं!” 

“वॉव, आजी तुझी स्टोरी खूप सिंपल आहे पण इंटरेस्टिंग आहे. मामांच्याविषयी, माझी आई आणि मावशीबद्दल काहीतरी सांग ना ग. ”

“आमचं लग्न झाल्यावर, तुझ्या मामांचा जन्म झाला. ‘आयुष्यात कसल्याही प्रसंगात न डगमगता धीर एकवटून राहणारा पुरुष यशस्वी होतो’, असं सांगत त्यांनी बाळाचं नामकरण सुधीर असं केलं. मामाने केलेली धडपड, कष्ट आणि त्याची प्रगती सगळ्यांच्या समोरच आहे. तुमचे आजोबा गेल्यानंतर तो किती धीराने आणि ठामपणे उभा राहिला. आज त्यानं त्याच्या कर्तबगारीवर आम्हा सर्वांना सुस्थितीत आणून ठेवलं आहे.

सुधीरच्या नंतर तुझ्या आईचा जन्म झाला. मी त्यांना म्हटलं की तुम्ही चिठ्ठीत लिहिलेला सदगुण आठवतोय का? तेच नाव हिला देऊ या. कुणाविषयी असूया वाटत नाही अशी ती ‘अनसूया’.

त्यानंतर दोन वर्षाने तुझ्या मावशीचा जन्म झाला. यावेळी त्यांनी सुचवलं, ‘सरस्वती, ह्यावेळी तू चिठ्ठीत लिहिलेल्या सदगुणावर हिचं नाव ठेवू या. कुणीही कितीही वाईट वागलं तरी मनात काही न ठेवता त्यांच्याशी गोड वागणारी, बोलणारी अशी ती ‘प्रियंवदा’.

आता आणखी काय सांगू? तुम्ही मुलं सूज्ञ आणि संस्कारी आहात. नेमकं काय घडतंय ते तुमच्या पुढ्यातच आहे. माझं कोण ऐकतो आता? जशी ईश्वरेच्छा!” सरस्वतीने सुस्कारा टाकला.

चिन्मयनं सांगितलं, “आजी, तुला एक सिक्रेट सांगू? अगं, आम्ही सगळीच मुलं एकमेकांच्या सतत संपर्कात आहोत. अधूनमधून फोनवरून बोलत असतो. आम्हा सगळ्यांना सरस्वती आज्जींच्या मायेच्या घट्ट धाग्याने बांधून ठेवलंय. तो सहजासहजी नाही तुटणार. ” 

सरस्वतीनं चिन्मयच्या गालावरनं हात फिरवून कानशिलावर कडाकडा बोटं मोडली. “किती गुणी आहेस रे राजा. माझी सगळीच नातवंडं गुणी आहेत, संस्कारी आहेत. कुणाला काहीही वाटो. मला खात्री होती. माझी नातवंडं मार्कांच्या पलीकडे जाऊन आपलं स्वत:चं स्थान निर्माण करतील म्हणून. ” तणावाचं वातावरण थोडंसं निवळलं.

इतका वेळ दुसऱ्या टोकाला बसलेली प्रियंवदा उठून अचानक अनसूयेसमोर हात जोडून उभी राहिली आणि भरल्या डोळ्यांने पुटपुटली “ताई, मला माफ कर, माझी चूक झाली. ” 

अनसूया प्रियंवदेला मिठीत घेत म्हणाली, “वेडाबाई, चूक माझीच आहे. मीच तुझी माफी मागते. ” सगळ्या मुलांना हे अनपेक्षित होतं. सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.

तितक्यात सुजाता ट्रे घेऊन बाहेर आली. गरम गरम लापशीचा घमघमाट सुटला होता. बाऊलमधला पहिला घास घेताच, प्रियंवदेचा मुलगा अभिराम बोलून गेला, “आजी, इतक्या वर्षानंतरदेखील तुझ्या हातच्या लापशीच्या चवीत काहीच फरक पडलेला नाही. व्वाह, मजा आ गया. थॅंक्स. ” 

 “तुझ्या मामीला थॅंक्स सांग. ती मला स्वयंपाकघरात पाऊलही टाकायला देत नाही. ” 

खरंतर, मामाची बायको सुजाता मामी सुगरण तर होतीच पण ती रोज रोज पोळी शिकरण करायची नाही. ती रोज वेगवेगळे पदार्थ करायची. महाराष्ट्रीयन पुरणपोळीपासून साऊथ इंडियन, गुजराती, पंजाबी, चायनीज असे एक ना अनेक पदार्थ बनवायची. 

मागच्या इतक्या वर्षात पडलेला गॅप विसरून मुलं एकमेकांच्या सहवासात रंगून गेली. कॅरम बोर्ड बाहेर निघाला. आता मामांनी खास मिनि-थिएटरच बनवून घेतलं होतं. अनेक वाहिन्यांवर अनेक चित्रपट हारीने मांडून ठेवलेले असतात. रोज एक दोन सिनेमे, कॅरम, पत्ते कुटणं ह्यात तीन दिवस भुर्र्कन उडून गेले. सुधीर आणि दोघ्या बहिणी पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाच्या नियोजनात मश्गुल होते.

दुधात साखर म्हटल्यासारखं, कार्यक्रमाच्या दिवशी दोन्ही जावईही येऊन दाखल झाले. घर मंगल तोरणांनी, पताकांनी सजवलेलं होतं. सनईचे मंद सूर आसमंतात विरत होते. सरस्वती आसनावर बसताच “शतमानं भवति शतायु:.. ” असा धीर गंभीर मंत्रध्वनी होत असताना उपस्थितांनी तिच्यावर फुलांच्या पाकळ्यांची बरसात केली. त्यानंतर सरस्वतीनं भला मोठा केक कापला. सगळ्याच नातवंडांनी मिळून ‘तुम जियो हजारो साल’ या गाण्यांवर नाचत धमाल उडवून दिली.

वसंतरावांच्या आठवणीने सरस्वती क्षणभर हळवी झाली. ‘सरस्वती, आपण भाग्यवान आहोत. आपली मुलं गुणी आहेत. महत्वाचं म्हणजे वडिलधाऱ्यांचा आदर करणारी आहेत. ’ त्यांचे हे शब्द तिच्या कानांत घुमत होते. दिवाणखान्यातल्या वसंतरावांच्या तसबिरीकडे पाहून तिने आपसूकच दोन्ही हात जोडले तेव्हा वसंतरावांचा आधीच हसरा चेहरा आणखीनच उजळून गेला होता.

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments