मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हिरवी कोडी… वि. म. कुलकर्णी ☆ रसास्वाद – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ हिरवी कोडी… वि. म. कुलकर्णी ☆ रसास्वाद – श्री सुहास रघुनाथ पंडित

निष्कलंक, निरागस, बालपणातील आठवणी मनाच्या कोप-यात घर करून राहिलेल्या असतात. वर्षामागून वर्षे निघून जातील पण या आठवणी तिथेच अंग चोरून बसलेल्या असतात. मनाचा कोपरा कधी तरी साफ करावासा वाटतो आणि नकळत लक्ष जातं अशा कोप-यातल्या आठवणींकडे. शांत जलाशयावर एखाद्या धक्क्याने तरंग  उठावेत तसे मनोपटलावरही तरंग उठतात आणि आठवणींच्या लाटा हळुवारपणे एका मागे एक उमटू लागतात. मनच ते. जितक पुढ धावेल तितकंच मागे मागेही जाईल. मग बालपणातल्या टवटवीत आठवणी डोळ्यासमोर जाग्या व्हायला कितीसा वेळ लागणार?

कवीवर्य  वि. म. कुलकर्णी यांच्या ‘हिरवी कोडी ‘ या कवितेत हेच भाव व्यक्त झालेत असे वाटते. स्नेह भाव  व मनाची नितळता ही त्यांच्या फक्त स्वभावातच नव्हती तर कवितेतूनही दिसून येत होती. हिरवी कोडी मध्ये त्यांनी   जे प्रसंग चित्रित केले आहेत ते किती सौम्यभाषेत रंगवलेले आहेत ते समजून घेण्यासारखे आहे. आयुष्यतील कारकिर्दीची वर्षे ही शहरात व्यतीत झाली असली तरी मनातील गावाकडील बालपणीच्या आठवणींचा झरा बुजलेला नाही. शालेय जीवनातील सवंगडी आणि एखादी बालमैत्रिण दृष्टीआड झाली तरी स्मृतीआड होत नाहीय. ते गाव, तिथला ओढा, तिचं त्या गोड पाण्यात खेळणं, अंगावर उडणारे शिंतोडे , त्यामुळे होणारी जीवाची थरथर!शिंतोडे नव्हतेच ते, तो तर होता तिचा अप्रत्यक्ष स्पर्श. त्याशिवाय का जीवाची थरथर होईल?चवळीच्या शेंगांसारखा रानचा मेवा. त्या शेंगांनी भरलेली  ओंजळ याच्यासाठी रिकामी व्हायची, केवळ मैत्रीपोटी. आणि तो झोपाळा आजही झुलवतोय मनाला. झोका द्यायचा तिचा हुकूम हा मुकाट्याने कसा काय पाळायचा?केवळ मैत्री. जणू काहीनितळ मनाचे शीतल चांदणे.

आणि आज? ओढा गेला दूर देशी. शाळा झाली नजरेआड. घर म्हणजे फक्त आठवण. धुक्यामुळे धुसर दिसावे तसे काळाच्या पडद्याआडून पुसटसे दिसते आहे, थोडेसे स्मरते आहे. मन थरथरून उठते आहे. आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत राहतात मनात फुलणारी हिरवी कोडी! हो, कोडीच.  ज्यांची उत्तरं तेव्हाही मिळाली नव्हती आणि आताही मिळत नाहीत. किंवा उत्तरं मिळू नयेत असही वाटत असेल. कोडी मात्र हिरवी आहेत. तेव्हाही आणि आताही. हिरवेपणा न संपणारी, कधीच न उलगडणारी ! तुमच्या आमच्या मनातही असतातच ना अशी काही कोडी?

वि. मं. नी ती आपल्यालासमोर मांडली. आपणही उलगडूया आपल्या मनातली कोडी, हिरवी,

मन हिरवं गार राहण्यासाठी!

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈