श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ युद्धग्रस्त आफ्रिकेतील भारतीय शांतिदूत ☆ श्री संभाजी बबन गायके 

War is not just a strong wind that blows into our lives; it is a hurricane that rips apart everything we hold dear.

अर्थात, युद्ध म्हणजे काही केवळ आमच्या आयुष्यांत सुटलेला जोराचा वारा नव्हे…हे तर वादळ असतं आमच्यापासून आमचं सर्वस्व हिरावून घेणारं! गांभिर्याने विचार केला तर हे निरीक्षण अत्यंत वास्तववादी म्हणावं लागेल. महिला आणि मुले युद्धात सर्वाधिक प्रमाणत बाधित होतात, असा जगाचा आजवरचा इतिहास आणि वास्तवही आहे. मागील पिढीला पाकिस्तान्यांनी त्यांच्याच देशबांधवांवर आणि विशेषत: भगिनींवर केलेल्या अत्याचाराच्या कथा माहित आहेत. वांशिक संघर्ष हा शब्द केंव्हातरी आपल्या वाचनात येऊन गेला असेल बहुदा! अफ्रिका खंडातील अनेक देश गेली कित्येक दशके वांशिक संघर्षात अडकून पडलेली आहेत. आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषद या देशांमध्ये विविध देशांतील सैन्यातील अधिकारी,सैनिक यांचा समावेश असलेली शांतीसेना पाठवून किमान शांतता राखण्याचा प्रयत्न करत असते. आपला भारत या १२४ देशांपैकी सर्वाधिक सैन्य पाठवण्या-या देशांत ९व्या क्रमांकावर आहे. या उपक्रमात भारतीयांची कामगिरी नेहमीच सर्वोत्तम ठरत आलेली आहे. सध्या सहा हजारांपेक्षा जास्त भारतीय सैनिक अफ्रिकेत कार्यरत आहेत. 

   भारताच्या युएन पीस किपींग फोर्से पथकात पुरूष सैनिकांसोबतच महिला सैनिकांचे एक छोटेखानी पथकही सहभागी असते. एप्रिल २०२३ ते मे २०२४ या कालावधीत मेजर राधिका सेन यांनी ३२ आंतरराष्ट्रीय महिला सैनिक असलेल्या पथकाच्या कमांडींग ऑफिसर म्हणून अतिशय अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. या पथकाला एंगेजमेंट प्लाटून (इंडियन रॅपिड बटालियन) असे नाव आहे. कांगो किंवा कॉंगो या देशात त्यांना कामगिरी सोपवण्यात आली होती. पुरुष सैनिकांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय सैन्य पथकासोबत आपल्या महिला सहका-यांसह हिंसाचार ग्रस्त भागांत गस्त घालणे, वेळ पडल्यास सशस्त्र प्रतिकार करणे ही त्यांची कर्तव्ये तर होतीच. पण या सैनिक महिलांकडून एक आणखीही कार्य अपेक्षित होते…ते म्हणजे युद्धमुळे बाधित झालेल्या महिला आणि मुलांना सर्वप्रकारचे साहाय्य करणे. 

   या संघर्षामध्ये प्रतिस्पर्धी वंशातील पुरूष सैनिकांची निर्दयी हत्या करणे ही तर सर्वसामान्य गोष्ट असते. मात्र महिला हाती सापडल्या तर त्यांची अवस्था अगदी जीणं नको अशी करून टाकली जाते. किंबहुना शत्रूचे मर्मस्थान म्हणजे त्यांच्या महिला. त्यांची जितकी जास्त विटंबना करता येईल तेव्हढी विजयी सैन्य करीत असते. दुर्दैवाने काही वंशातील सैन्यातील महिलाही यात मागे नसतात. अर्थात यात भरडल्या जातात त्या महिलाच. 

  या पिडीत महिलांना मानसिक आधार देण्याचं,जीवन प्रशिक्षण देण्याचं काम आपल्या मेजर राधिका सेन यांनी अत्यंत प्रभावीपणानं पार पाडलं. मेजर सेन यांनी या महिलांचा विश्वास जिंकून त्यांना एकत्रित केलं. त्यांच्यासाठी आरोग्य,मानसिक समुपदेशन यांसारख्या सुविधा उपलब्ध होतील याकडे लक्ष दिलं. बलात्कार पिडीत अल्पवयीन मुली, तसेच महिलांना आपलं मन मोकळं करण्यासाठी मेजर राधिका या हक्काचं स्थान ठरलं. 

  आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याची उर्मी त्यांच्यात जागृत व्हावी यासाठी मेजर राधिका यांनी प्रयत्न केले. त्यांच्यासाठी रात्री-अपरात्री त्या आपल्या पथकासह सज्ज असायच्या. इंग्लिश संभाषणाचे वर्ग सुरु करण्यात त्यांनी यश मिळवले. हल्ला होण्याच्या परिस्थितीत बचाव करण्याची तंत्रेही त्यांनी महिलांना,मुलांना शिकवली. गरज पडली तेंव्हा त्यांनी या महिलांना सशस्त्र संरक्षणही पुरवले..आपल्या जीवाची पर्वा न करता. त्याचबरोबर त्यांनी आपल्या वरीष्ठांच्या सहकार्याने संघर्षग्रस्त पुरुषांना व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधीही त्यांनी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी कांगोच्या उत्तर किवु या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. 

   हिमाचल प्रदेशात जन्मलेल्या राधिका सेन या ख-यातर आय.आय.टी. मुंबई येथे बायोटेक्नोलॉजी विषयात इंजिनियरींचे शिक्षण घेत होत्या, पण सैन्यदलात सेवा करण्याच्या त्यांच्या पूर्वीपासूनच्या इच्छेने उचल खाल्ली आणि हे क्षेत्र सोडून त्यांनी सैन्यात प्रवेश मिळवला आणि आठच वर्षांच्या सेवेनंतर त्यांची थेट यु.एन.पीस किपींग फोर्समध्ये मेजर म्हणून नियुक्ती झाली. केवळ एकाच वर्षाच्या कारकीर्दीत मेजर राधिका यांनी अतुलनीय कामगिरी करून प्रतिष्ठेचा मिलिटरी जेंडर अ‍ॅडव्होकेट ऑफ दी इअर पुरस्कार प्राप्त केला आहे. हा पुरस्कार प्राप्त करणा-या ह्या दुस-या भारतीय सैन्य अधिकारी आहेत. या आधी २०१९ मध्ये मेजर सुमन गवानी यांनी संयुक्तरित्या हा पुरस्कार पटकावला होता. 

३० मे २०२४ रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला आहे. चला,आपण सर्वजण मिळून मेजर राधिका सेन यांचे अभिनंदन करूयात.! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments