श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके 

पुरूष असूनही तो एके दिवशी दोन जीवांचा झाला. पण त्याचे गर्भाशय पोटाऐवजी हृदयात वसलं होतं. आई बालकाला जन्म देण्यापूर्वी पोटातल्या गर्भात वागवते. याचं मात्र बाळ त्याच्या बुद्धीत आकार घेत होतं आणि हृदयात नांदत होतं….जन्माची प्रतिक्षा करीत! त्याच्या हृदयगर्भात बालक श्रीराम वाढत होते….आणि या बालकाचं त्याच्या गर्भातलं वय होतं साधारण पाच-सहा वर्षांचं!   

मानवाला नऊ महिने आणि नऊ दिवसांचा प्रतिक्षा काल ठरवून दिला आहे निसर्गानं. पोटी देव जन्माला यायचा म्हणून दैवानं या मनुष्याला प्रतिक्षा कालावधीत मोठी सवलत दिली. 

ग.दि.माडगूळकर गीत रामायण लिहित असताना प्रत्यक्ष श्रीरामजन्माचं गाणं लिहिण्याचा प्रसंग आला. त्यांनी खूप गाणी लिहिली पण त्यातलं त्यांना एकही पसंत होईना. गाणं मनासारखं उतरलं नाही तर ते गाणं लिहिलेला कागद चुरगाळून तो मेजाशेजारी टाकून देण्याची त्यांना सवय होती. त्यांच्या पत्नी विद्या ताई हे सर्व पहात होत्या. शब्दप्रभू गदिमांच्या बाबतीत एकदा गीत लिहिलं की ते पुन्हा बदलण्याचा विषय फारसा उपस्थित होत नसे. एकदा तर त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या गडबडीत असताना, त्या ऐन लग्नाच्या दिवशी संगीतकाराला एक अत्यंत लोकप्रिय गीत लिहून दिल्याचं वाचनात आलं…लळा जिव्हाळा शब्दचि खोटे…मासा माशा खाई…कुणी कुणाचे नाही! स्वत:च्या मुलीच्या लग्नाच्या मंगलदिनीसुद्धा मानवी जीवनावर ठसठशीत भाष्य करणे गदिमांसारख्यांनाच शक्य होते! तर….रामजन्माच्या पसंतीस न उतरलेल्या गाण्यांच्या कागदांचा एवढा मोठा ढीग पाहून त्यांच्या पत्नी विद्याताई आश्चर्यचकित झाल्या…त्यावर गदिमा या अर्थाचं काहीसे म्हणाले होते….जगाचा निर्माता,प्रभु श्रीराम जन्माला यायचाय…कुणी सामान्य माणूस नव्हे!

हा माणूसही गदिमांसारखाच म्हणावा. यालाही श्रीरामच जन्माला आणायचे होते…मात्र ते कागदावर नव्हे तर पाषाणातून. ज्यादिवशी त्याला ही गोड बातमी कळाली तेंव्हापासून तो कुणाचाही उरला नाही. एखाद्या तपोनिष्ठ ऋषीसारखी त्याच्या मनाची अवस्था झाली…जागृती..स्वप्नी राममुर्ती….ऋषी-मुनी तरी कुठं वेगळं काही करतात…सतत देवाच्या नामाचा जपच! याला मात्र नाम स्मरण करण्याची आवश्यकता नव्हती. त्याची बोटं राम राम म्हणत पाषाणावर चालत होती….त्याच्या हातातल्या छिन्नीच्या रूपात. त्याच्या घराण्याची मूर्ती निर्माणाची परंपरा थोडीथोडकी नव्हे तर अगदी तीनशे वर्षांची. देव त्यांच्या रक्तातच भिनला म्हणावा. दगडांतून निर्माण होणा-या आणि अमरत्वाचं वरदान लाभलेल्या मुर्तीच त्यांचे उदरभरणाचे स्रोत झाले होते. त्यातून मिळणारा सात्विक आनंद तर त्यांना न मागताही मिळत होता. हा मूर्तिकार अगदी तरूण वयातला. त्याचे वडीलच त्याचे गुरू. त्यांच्या हाताखाली शिकत शिकत त्याने छिन्नी हातोड्याचा घाव घालून दगडाचा देव करण्याची हातोटी साधली होती. 

आपल्याला बालकरूपातील श्रीराम घडवायचे आहेत हे समजल्यापासून त्याची तहानभूक हरपली. आई जसं पोटातल्या गर्भासाठी अन्न घेते, श्वास घेते, निद्रा घेते आणि डोहाळे मिरवते तशीच याची गत. तीन शतकांच्या पिढीजात अनुभवाच्या जोरावर त्याने जगातला सर्वोत्तम पाषाण निवडला. 

पहाटे अगदी तनमनाने शुचिर्भूत होऊन राऊळात दाखल व्हायचं….आणि त्या पाषाणाकडे पहात बसायचं काहीवेळ. त्यातील मूर्तीला वंदन करायचं मनोमन. आणि मग देव सांगेल तशी हातोडी चालवायची…छिन्नीलाही काळजी होती त्या पाषाणातील गर्भाची…जराही धक्का लागता कामा नये. यातून प्रकट होणारी मूर्ती काही सामान्य नव्हती…आणि बिघडली…पुन्हा केली..असंही करून भागणार नव्हतं. आरंभ करायला लागतो तो मसत्कापासून. जावळ काढून झाल्यानंतरच्या चार-पाच वर्षांत विपुलतेने उगवलेले काळेभोर,कुरळे केश. कपाळावर रूळत वा-यावर मंद उडत असणारे जीवतंतुच जणू. केसालाही धक्का न लागू देणे याचा हा ही एक अर्थ व्हावा,अशी परिस्थिती. पण गर्भातलं बालकही या आईला पूर्ण सहकार्य करीत होतं…कारण त्यालाही घाईच होती तशी….पाचशे वर्षापासूनची प्रतिक्षा होती! 

काहीवेळा तर हे बालक मुर्तिकाराच्या छिन्नी-हातोड्यात येऊन बसायचं….आणि स्वत:लाच घडवू लागायचं! देव जग घडवतो…देव स्वत:ला घडवण्यात कशी बरे कुचराई करेल? 

मुर्तीत संपूर्ण कोमल,निर्व्याज्य बाल्य तंतोतंत उतरावे, यासाठी त्याने या वयोगटातील बालकांची हजारो छायाचित्रे न्याहाळली. त्यातील भावमुद्रा, भावछ्टा डोळ्यांत साठवून ठेवल्या आणि आपल्या मुर्तीत त्या कशा परावर्तीत करता येतील याची मनात शेकडो वेळा उजळण्या केल्या. कागदावर ते भाव रेखाटण्याचा नेम सुरू केला. मनाचं समाधान झालं तरच छिन्नी चालवायची अन्यथा नाही. 

मुर्तिकारालाही स्वत:ची मुलं होती. दीड-दोन वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची कन्या. ही आई आपल्या ह्या लेकीला त्याने पाषाणात कोरलेल्या बाळाच्या मुर्तीचा फोटो दाखवायची…आणि विचारायची….हे मूल किती वर्षांचं वाटतंय? लहान वाटतंय की मोठ्या मुलासारखं दिसतंय? जो पर्यंत मुलगी म्हणाली नाही की ..हो हे मूल खरंच चार-पाच वर्षांचं दिसतंय…तो पर्यंत मुर्तिकारानं काम सुरू ठेवलं….आणि पूर्ण होकार मिळताच त्याच्या छिन्नी हातोड्याचा वेग वाढला! 

या कामात त्याला अनेकांनी साहाय्य केलं. हो…गर्भारशीची काळजी घेतातच की घरातले. पण आता त्याचं घर तर खूप मोठं होतं. अयोध्या या घराचं नाव. काम सुरू असताना काही माकडे आतमध्ये घुसायची…आणि तयार होत असलेल्या मूर्तीकडे काही क्षण पाहून निघून जायची…कुठेही धक्का न लागू देता. त्यांचा उपद्र्व होईल या शक्यतेने त्यांनी मूर्ती घडवण्याच्या कक्षाची दारे पक्की बंद करून घेतली तर ही माकडे त्यांची पूर्ण ताकद लावून ते अडथळे दूर सारायची! लंका जाळणा-या हनुमानाचे वंशज ते….त्यांना कोण अडवणार? त्यांना कुणी तरी पाठवत असावं…हे निश्चित…अन्यथा ज्या जागी केवळ पाषाणाचे तुकडेच पडलेले आहेत..अशा जागी त्यांना येऊन काय लाभ होणार होता?

प्रसुतीकळा सुरू झाल्या! आणि शुभ घडीला शुभ मुहूर्ती या पाच वर्षीय बालकाने हृदयगर्भातून बहेर डोकावले…आणि प्रकट झाले स्वयं बाल श्रीराम! केवढंसं असतं ना अर्भक….किती वेगळं दिसत असतं. आईला जसं आहे तसं प्राणापलीकडं आवडत असतं…कुणी काहीही म्हणो. मात्र हे बालक पाहणा-याच्या मनात कोणताही किंतु आला नाही. श्रीकृष्ण नावाच्या बालकाला पाहून जसं गोकुळच्या नारींना वाटलं होतं…तसंच या बाळाला पाहून वाटलं सर्वांना….रामलल्ला पसंद हैं…प्रसन्न हैं! बाळ-बाळंतीण सुखरूप..त्यातील आईतर सर्वोपरी सुखी. सा-या भारतवर्षांचं लक्ष होतं या प्रसुतीकडे…काळजाच्या वंशाचा दिवा पुन्हा प्रज्वलीत व्हायचा होता मुर्तीरूपात…एवढं लक्ष तर असणार होतंच….याचा ताण प्रत्यक्ष आईवर किती असतो…हे फक्त बाळाला जन्म दिलेल्या माताच सांगू शकतील. बाकीचे फक्त दे कळ आणि हो मोकळी! असं म्हणू शकतात फार तर! 

ही आई आता शांत…क्लांत! कर्तव्यपूर्ती करून घेतली श्रीरामांनी. हे भाग्य म्हणजे गेल्या कित्येक पिढ्यांच्या आशीर्वादांचं फलित. कोट्यवधी डोळे ही मुर्ती पाहतील…आणि शुभाशिर्वाद मिळवतील….माझ्या हातून घडलेली ही मूर्ती…आता माझी एकट्याची राहिलेली नाही! 

या बालकाला नटवण्याची,सजवण्याची,अलंकृत करण्याची जबाबदारी आता इतर सर्वांनी घेतली…अनेक लोक होते…वस्त्रकारागीर,सुवर्णकारागीर…किती तरी लोक! देवाचं काम म्हणून अहोरात्र झटत होते…हे काम शतकानुशतकं टिकणारं आहे…ही त्यांची भावना! आपण या जगातून निघून जाऊ…हे काम राहील! 

मुर्ती घडवणारी आई हे कौतुक पहात होती…मग तिच्या लक्षात आलं….बालक आपलं रूप क्षणाक्षणाला पालटते आहे…अधिकाधिक गोजिरे दिसते आहे. संपूर्ण साजश्रुंगार झाला आणि लक्षात तिच्या लक्षात आलं…..हे मी घडवलेलं बालक नाही….मी तर फक्त पाषाणाला आकार देत होते..आता या पाषाणात चैतन्याचा प्रवेश झाला आहे! नेत्रांतले,गालांवरचे,हनुवटीवरचे भाव मी साकारलेच नव्हते…ते आता प्रत्यक्ष दिसू लागलेत…..ही माझी कला नाही…ही त्या प्रभुची किमया आहे…स्वत:लाच नटवण्याची. त्याची लीला अगाध…मी निमित्तमात्र! यशोदेसारखी! …देवकीला तरी ठाऊक होतं की अवतार जन्माला येणार आहे…पण यशोदा अनभिज्ञ होती? तिला पुत्रप्राप्तीचा आनंद पुरेसा होता! कृष्णाची आई ही उपाधीच तिचा जन्म सार्थक करणारी होती. 

जसे अवतार जन्माला येतात, तसे कलाकारही जन्माला येतात. अवतारांच्या मुर्ती साकारण्याचं भाग्य नशिबात असणारे कलाकारही जन्माला यावे लागतात…कलाकार योगी असावे लागतात…यांच्यातर कर्मातही योग आणि नावातही योग….अरूण योगिराज या कलाकाराचे नाव. यांनी रामलल्लांच्या मुर्तीचं आव्हान पेललं! सात महिने आपल्या हृदयात श्रीरामांना अक्षरश: एखाद्या गर्भार स्त्रीसारखे निगुतीने सांभाळले आणि कोट्यवधी श्रीरामभक्तांच्या ओटीत घातलं ! 

अरूण योगिराजजी…तुम्हांला सामान्यांच्या आशीर्वादांची आता खरोखरीच गरज नाही…..पण तुम्ही आम्हां सामान्यांचे धन्यवाद मात्र अवश्य स्विकारा….या निमित्ताने आमचेही नमस्कार तुम्ही साकारलेल्या रामलल्लांच्या चरणी पोहोचतील !     

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments