मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दगडांना बोलतं करणारा माणूस ! – लेखक : श्री अभिजित घोरपडे  ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆  ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ दगडांना बोलतं करणारा माणूस ! – लेखक : श्री अभिजित घोरपडे  ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सासवडजवळ काहीतरी वेगळं पाहण्यासाठी चाललो होतो. आम्ही दोघेच होतो. मी आणि डॉ. शरद राजगुरू. पुण्यावरून मोटारसायकलवरून निघालो. दिवे घाट चढून माथ्यावर पोहोचलो. तसेच पुढे सासवड गाठले. या ऐतिहासिक गावाला वळसा घातला आणि पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याच्या दिशेने निघालो. तिथले प्रसिद्ध संगमेश्वर आणि त्यानंतर वटेश्वर ही मंदिरे ओलांडली. पुरंदरच्या रस्त्याने जात असताना डाव्या बाजूला कोरडं पात्र असलेला एक ओढा समांतर जात होता. काही अंतर गेल्यावर सरांनी थांबायला सांगितले आणि ते ओढ्यात उतरण्यासाठी वाट शोधू लागले.

त्या वाटेने काही अंतर गेल्यावर त्यांनी एक दगड उचलला. तो पाहून त्यांचा चेहरा उजळला आणि मलासुद्धा ते काहीतरी वेगळे असल्याचे जाणवले. ‘हा जांभा आहे…’ राजगुरू सरांचे शब्द. ते पाहून मी अतिशय रोमांचित झालो. कारण आतापर्यंत जांभा खडकाचा संबंध किनारपट्टीवरील कोकण आणि धो धो पाऊस पडणाऱ्या घाटमाथ्यांशीच लावला जात होता. त्यामुळे माझ्या मनात स्वाभाविक प्रश्न होता- जांभा इथं कसा?

तो दगड जाता-येता कदाचित कोणी टाकून दिलेला होता का?… तसेही नव्हते. कारण त्या ओढ्याच्या पात्रात आतमध्ये घट्ट रोवून बसलेले काही गोटे सापडले. ते सुद्धा गोल गरगरीत आणि गुळगुळीत. याचा अर्थ ते त्या ओढ्याच्या पात्राचा भाग होते. वरच्या बाजूला कुठेतरी त्यांचा मूळ स्रोत होता आणि ते तिथून निघून पाण्यासोबत वाहत वाहत इथवर पोहोचले होते. पण या ओढ्याचा उगम फार दूरवर नव्हतो, तर तो पुरंदर किल्ल्याच्या जवळपासच होता. म्हणजे त्या परिसरातच जांभा खडक तयार झाला होता. या खडकाची निर्मिती होण्यासाठी भरपूर काळ धो धो पाऊस पडावा लागतो. पण ज्या परिसरात आता हा जांभा सापडला, तो तर कोरड्या हवामानाचा भाग आहे. याचाच अर्थ पूर्वी त्या भागात भरपूर पावसाचे आर्द्र हवामान होते… राजगुरू सरांकडून हे समजून घेणं हे अतिशय आनंददायी असे. कारण त्यांच्या बोलण्यात, समजावण्यात, वावरण्यात कमालीचा साधेपणा असे. म्हणूनच मोठ्या अभ्यासकापासून ते विद्यार्थी आणि सर्वसामान्य माणूससुद्धा त्यांच्याशी सहजपणे जोडला जाईल.

त्यांच्यासोबत जांभा पाहिला, तशी वीस-पंचवीसच वर्षांपूर्वी कऱ्हेच्या पात्रातील ज्वालामुखीची राख पाहिली. दिवे घाटाच्या माथ्यावर सापडणारी आदिमानवाने तयार केलेली छोटी-छोटी दगडी हत्यारं (सूक्ष्मास्त्र / Microliths) पाहिली. त्यांचा अर्थ समजून घेतला… असा हा खडकांना बोलायला लावणारा, त्यांचा अर्थ शोधणारा आणि तो इतरांपर्यंत पोहोचवणारा माणूस!

त्यांचे वेगळेपण म्हणजे, त्यांनी भूविज्ञान (Geology) आणि पुरातत्त्वविज्ञान (Archaeology) या दोन विषयांची उत्तम सांगड घातली. त्यामुळेच भूविज्ञानातील काही गोष्टी वापरून पुरातत्त्वविज्ञानातील काही घटनांचा अर्थ लावला किंवा उलटे सुद्धा! याचे उदाहरण म्हणजे आपल्याकडे मोरगाव आणि बोरी या ठिकाणी नद्यांच्या पात्रात सापडणारी इंडोनेशियामधील ज्वालामुखीची राख (Tephra). ही राख इथे कधी येऊन पडली याची कालनिश्चिती करण्यासाठी या थराच्या खाली सापडलेल्या दगडी हत्यारांचा उपयोग झाला. हे करणाऱ्या टीमध्ये राजगुरू सरांचा प्रमुख वाटा होता. अशी अनेक उदाहरणे आहेत.

सरांनी वयाची ऐंशी ओलांडली तरी त्यांचा उत्साह प्रचंड होता. कोणतीही नवी गोष्ट पाहिली, त्याबाबत ऐकले किंवा काही वाचले तरी ते समजून घेण्याचे कुतूहल एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे असे. कोविडच्या काळात बाहेर पडणे कमी झाले, अन्यथा ते फिल्डवर जाण्यासाठी सदैव तत्पर असत. गेल्याच महिन्यात त्यांनी वयाची नव्वदी पार केली होती. त्या वेळी शंभरी गाठणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ती पूर्ण झाली नाही. काल सायंकाळी त्यांचे निधन झाले.

योगायोग असा की दगडांची भाषा ऐकवणारी आणि त्यांचा अर्थ लावणारी  #Wonders_of_Geology# ही तीन दिवसांची इको-टूर ‘भवताल’च्या वतीने उद्यापासून सुरू होत आहे. ज्यांच्यामुळे खूप पूर्वी कधीतरी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे बीज मनात पेरले गेले, त्यापैकी एक म्हणजे डॉ. शरद राजगुरू. त्यामुळे त्यांचे आता जाणे ही अतिशय दु:खद बाब.

त्यांना व्यक्तिश: तसेच, “#भवताल” तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

लेखक : श्री अभिजित घोरपडे 

संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈