सुश्री सुलू साबणे जोशी
इंद्रधनुष्य
☆ ‘‘डॉ. जयंत नारळीकर…… अत्यंत साध्या जगण्याची गोष्ट!’’ – लेखिका : सुश्री कल्याणी गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
आकाशगंगा या आयुकाच्या (म्हणजे Inter University Centre for Astronomy and Astrophysics – IUCAA) हाउसिंग कॉलनीमध्ये राहायला गेले तेव्हा डॉ. जयंत नारळीकर व सौ. मंगला नारळीकर यांच्या समोरचेच घर माझ्या भाग्याने मला मिळाले. असा दुर्मिळ शेजार आम्हाला लाभला होता. डॉ. नारळीकरांची एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी म्हणून सुमारे दहा वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांचे शेजारी म्हणून राहण्याचीही. सरांचे नाव आणि कीर्ती इतकी मोठी की नव्याने कामाला सुरुवात केली तेव्हा त्याचे दडपणच मनावर अधिक होते. पण सर वागायला इतके साधे की कित्येकदा त्यावर विश्वासच बसत नसे.
ऑफिसमध्ये ते वेळेआधी दहा मिनिटे पोहचलेले असत. घड्याळाच्या काट्याबरहुकूम मेल पहाणे, मेलला उत्तरे म्हणून डिक्टेशन, पत्रे टाइप झाली की सह्या, रोज कोणत्यावेळी कोण येणार यासंबंधीचा दिवसाचा आराखडा त्यांच्यासमोर दिला जाई. त्यानुसार ते त्या त्या संबंधीचे कागदपत्र मागवून स्वत:जवळ ठेवून घेत.
सरांच्या भेटीला येणार्या लोकांमध्ये देशोदेशीचे शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी, विद्यापीठातील मान्यवर, देशी- परदेशी विद्यार्थी, त्यांच्या हाताखाली शिकणारे विद्यार्थी, आयुकातील अधिकारी यांच्याबरोबरच खेडेगावातून आलेले विद्यार्थी व त्यांचे पालक अशी विविधता असे. पण सर्वाना सारख्याच सन्मानाने वागविले जाई.
एकदा एका खेडेगावातल्या विद्यार्थ्याला भेटायला पाच मिनिटे उशीर झाल्याने अस्वस्थ होऊन एक एक पायरी गाळून भराभर वर आलेले सर मला अजून आठवतात.
विविध वर्तमानपत्रे, मासिके इत्यादि ठिकाणी त्यांचे लेख छापून येत. त्यांनी लेख देण्याचे कबूल केले की ठरलेल्या तारखेच्या आधी सुमारे 15 दिवस लेख पूर्ण झालेला असे व तो हस्तलिखित लेख पाठविण्यासाठी मजकडे येई. अक्षर इतके सुंदर आणि लेखात एकाही ठिकाणी – अक्षरश: एकाही ठिकाणी- कधीही खाडाखोड नसे. खरे तर कित्येकदा वाटे लेख मराठी असो वा इंग्रजी – टाइप करण्याऐवजी त्यांच्या अक्षरातच छापावा!
उत्तरे डिक्टेट करताना त्यांचे बारकाव्यांकडे असलेले लक्ष मला चकित करीत असे. एकदा त्यांनी मला सांगितले कोणताही शब्द संक्षिप्त स्वरूपात वापरण्यासंबंधीचा एक नियम आहे. उदा. Professor या शब्दाचे संक्षिप्त रूप Prof. करताना त्याच्यापुढे पूर्णविराम दिलाच पाहिजे कारण त्या संक्षिप्त रूपात त्या शब्दाची पहिली काही अक्षरेच घेतली आहेत; पण Doctor या शब्दाचे संक्षिप्त रूप Dr करताना पुढे पूर्ण विरामाची गरज नसते कारण त्यात Doctor या शब्दातील पहिले D शेवटचे r हे अक्षर वापरलेले आहे. हे मी शाळेत किंवा पुढे विद्यापीठातही कधीच शिकले नव्हते.
सरांना कामासाठी देशी-विदेशी दौरे करावे लागत. त्यावेळी त्यांचे संपूर्ण वेळापत्रक तारखेनुसार व त्या त्या दिवसाच्या वेळेनुसार टाइप केले जात असे. त्यातही त्यांनी केलेली एक अप्रतिम सोयीची गोष्ट विसरणे केवळ अशक्य. जिथे जिथे भेट ठरलेली आहे त्या त्या संस्थेचा पत्ता, फोन क्रमांक, इ-मेल पत्ता, गावाचे पूर्ण नाव व पिनकोड तसेच ज्या व्यक्तीला भेटायचे आहे त्या व्यक्तीचेही पूर्ण नाव, अधिकारपद, कार्यालयाचा तसेच असल्यास घरचा फोन क्रमांक, इ-मेल इत्यादी गोष्टी टाइप करून ते सर्व कागद एका आकारात कापून त्याला जरासे जाड कागदाचे कव्हर करून त्याचे शर्टाच्या खिशात किंवा पाकिटात सहजपणे मावेल अशा आकाराचे लहानसे पुस्तक त्यांनी मला करायला सांगितले होते. त्याची नंतर सवयच होऊन गेली. कोणताही पत्ता, फोन शोधण्यात विलंब लागू नये म्हणून ही खबरदारी. गंमत म्हणजे ते प्रवासाहून परत आले की पत्त्याच्या संदर्भातील काही बदल असेल तर त्यांच्या छोटेखानी पुस्तकात तो टिपलेला असे व त्यामुळे माझ्याजवळ असलेल्या पत्त्यात त्यानुसार बदल करणेही सोपे जाई व सर्व माहिती अद्ययावत राहात असे.
प्रवासाच्या वेळी कधी विमान किंवा ट्रेन उशिरा निघणार आहे म्हटले तर सर त्यांच्याकडे असलेल्या पोस्टकार्डावर किंवा आंतर्देशीय पत्रांवर त्यांना आलेल्या विद्यार्थ्याच्या प्रश्नांना उत्तरे लिहायला सुरुवात करीत.
विद्यार्थी सरांना भेटले की त्यांची स्वाक्षरी मागत. सर त्यांना सांगत ” नुसती सही देण्यापेक्षा तुम्ही पत्राने एखादा प्रश्न विचारा. त्याचे उत्तर मी तुम्हाला पाठवीन आणि त्यावर माझी सही असेल ” हा शास्त्रशुद्ध विचारांचे बीज लहानपणापासून रुजविण्या संदर्भात केलेला सततचा आग्रहच!
आयुकासारख्या संस्थेचे डायरेक्टर म्हणून काम करणे, सकाळी दणकून टेनिस खेळणे, शिकविणे, विविध ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून जाणे, स्वत:ची पुस्तके लिहिणे, लेख लिहिणे, मराठी विज्ञान परिषदेचे काम पहाणे, समाजात विज्ञानदृष्टी यावी यासाठीचे अव्याहत प्रयत्न, – पंचमहाभूते – यांसारख्या विषयावर आयुकात शिबिर घेणे, व्याख्याने देणे. सतत इतके बिझी असूनही सर कधी ‘ओव्हर टाइम’ करत ऑफिसात थांबल्याचे मला आठवतच नाही. क्वचित कधी इतर आलेल्या अधिकार्यांमुळे विलंब झाला तरच!
आयुकामध्ये असताना आमच्या ‘आकाशगंगे’त होळी, दिवाळी असे सण साजरे होत. सरांना गुलाल माखताना संकोचल्यासारखे होई पण ते मात्र एकदम शांतपणे उभे रहात असत. दिवाळीचे जेवण आयुकाच्या कॅण्टीनमधून तयार होऊन येई. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ते असल्यामुळे ताटे-वाटी-पेले ज्याचे त्याचे घरून आणणे आवश्यक होई. कारण भांडी धुवायला कॅण्टीनमधली मुले नसत. 8 वाजता जेवणाची वेळ ठरलेली असेल तर 8ला पाच कमी असतानाच सर हातात ताट-वाटी घेऊन इतर सर्वासारखे हजर.
आयुकात काम करणार्या लोकांच्या व्यक्तिगत छंदांविषयीसुद्धा ते जागरूक असत. त्यांना देशोदेशीहून येणार्या पत्रांवर परदेशी तिकिटे असत. त्यातील तिकिटे ते न विसरता कापून आणून माझ्याकडे देत व ‘अमुक अमुक व्यक्तीला हे द्या’ असे आवर्जून सांगत. एखाद्याचे एखाद्या वाचनासंबंधीचे वेड त्यांना ठाऊक असे व त्यासंबंधी काही लेख, माहिती आल्यास ते ती त्या व्यक्तीपर्यंत न विसरता पोहचवीत.
एकदा त्यांच्या घरी निरोप सांगायला गेले तेव्हा सर किंवा मंगलाताई दोघेही घरी नव्हते. सरांच्या सासूबाई स्वयंपाकघरात होत्या. त्यांच्याकडे निरोप दिला. तेव्हा त्या भांडी जागेवर लावण्यात गुंतल्या होत्या. मला म्हणाल्या, ‘पाहिलीत का आमच्या जावईबापूंची करामत? ’ म्हटले, ‘काय झाले? ’ तर त्या म्हणाल्या, ‘काल आमच्या घरी 15-20 माणसे जेवायला होती. सरांना कामानिमित्त बाहेर जावे लागल्यामुळे त्यांना मंगलाला कोणतीच मदत करता आली नाही. म्हणून रात्री जेवणे उरकल्यानंतर त्यांनी ही सगळी काचेची नाजूक भांडी, प्लेट्स धुवून ठेवली आहेत. ’ ‘एल’ आकाराच्या दोन ओट्यावर केवढी मोठी भांडी, प्लेट्स इत्यादी धुवून ठेवलेली होती! आपला कामाचा वाटा चुकवू नये हे त्यांच्या रक्तातच भिनलेले! आपला कामाचा काही वाटा घरकामातही असतो हे मन:पूर्वक मानणारे सरांसारखे किती मान्यवर पुरुष तुम्हाला भेटतील?
सरांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांना कोणतीही शंका – अगदी कोणतीही शंका विचारली तर त्यासंबंधी उपहास न करता ते अत्यंत सोप्या पद्धतीने त्याचे उत्तर देत. गणपतीने म्हणजे गणेशमूर्तीने दूध प्यायल्याची अफवा देशभर पसरली होती तेव्हाचा प्रसंग. सरांना यासंबंधी प्रश्न विचारण्यासाठी आयुकामध्ये एकावर एक फोन येऊ लागले. शेवटी सरांनी मूर्तीच्या सोंडेने प्रत्यक्ष दूध कसे खेचले जाऊ शकते यासंबंधीची शास्त्रोक्त माहिती सांगणारे छोटेखानी भाषण केले व ते लोकांर्पयत पोचवले. वैज्ञानिक विचारांचा अखंड पाठपुरावा जणू रक्तात भिनलेला!
आयुकाच्या इमारतीचे बांधकाम चालू असताना आयुकाच्या आवारात न्यूटन, आइनस्टाइन, आर्यभट्ट, गॅलिलिओ इत्यादी पुतळे ठेवण्यात आले. फूको पेंडय़ूलम (foucault pendulum) सौरघड्याळ इत्यादी शास्त्रीय माहिती देणारी उपकरणेही ठेवली गेली. अनेक विद्यार्थ्याच्या ज्ञानात या गोष्टी पाहण्यानेसुद्धा भर पडते. या सर्वांमध्ये सरांनी दाखवलेली खरी रसिकता म्हणजे आयुकाच्या कॅण्टीनमध्ये लावलेला एक बोर्ड – ‘The discovery of a new dish does more for human happiness than the discovery of a star! ’ – by Brillat Savarin – हे ते वाक्य, जीवनाबाबतीतले सत्य सांगणारे!
कॅण्टीनमध्ये लावण्यासाठी हे वाक्य निवडणारा माणूस स्वत: आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शास्त्रज्ञ आहे, हे विशेष!
अंतराळ विज्ञानातल्या सरांच्या अजोड कामगिरी खेरीजचे हे किती विविध गुण!
माणसे मोठी होतात ती उगीच नाही!!
लेखिका : सुश्री कल्याणी गाडगीळ
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खरंच डॉक्टर नारळीकरांच्या बद्दल लिहिलेल्या प्रत्येक लेखांमधून काही ना काही नवीन माहिती मिळाली व त्यांच्या बद्दलचा आदर आणखीनच दुणावला.