डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप…‘ – माहिती प्रस्तुतकर्ता : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

मागच्याच महिन्यात आठ तारखेला रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात अंजली हेळकर प्रसूतीसाठी दाखल झाली. चिरेखाणीवर काम करणाऱ्या अंजलीची हिमोग्लोबिन पातळी होती केवळ सहा. त्यामुळे प्रसूतीसाठी रक्त पुरवणे गरजेचे होतेच. लगेचच रक्तगटाची तपासणी केली गेली. आणि रिपोर्टमध्ये ‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगटाची नोंद झाली. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण खरी मेख पुढेच होती. ‘ओ’ गटाचे रक्त चढवण्यासाठी ‘मॅच’ करण्यात आले पण ते मॅच झालेच नाही. नेमका काय प्रकार झाला हे कळेना. मग पुन्हा एकदा लॅब टेक्निशियन आणि वैद्यकीय टीमच्या सल्ल्याने एक टेस्ट केली गेली. या टेस्टनंतर कळलं की हा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ आहे. आता मात्र सगळे हादरले. कारण हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट.

जगभरात केवळ 400 लोक या रक्तगटाचे आहेत. त्यातले भारतात केवळ 179. या रक्तगटाचा शोध मुंबईत लागल्यामुळे त्याला ‘बॉम्बे ब्लड’ ग्रुप हे नाव मिळाले.

आता रत्नागिरीत हा रक्तगट कुठे आणि कधी मिळणार हा प्रश्न होता. मग सोशल मीडियावर या रक्तगटाची गरज असल्याचा मेसेज फिरवण्यात आला.

योगायोगाने सांगलीच्या विक्रम यादव या तरुणाच्या हाती हा मेसेज पडला. विक्रमचा स्वतःचाच रक्तगट होता बॉम्बे ब्लड. मेसेज वाचताच विक्रमने चक्क दुचाकीवर रत्नागिरी गाठले. त्वरित रक्त मिळाल्याने आज अंजली आणि तिचे बाळ सुखरूप हाती लागले आहे. नंतर विक्रमचा जिल्हा शासकीय रूग्णालया मार्फत सत्कार देखील करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. आर. आरसुळकर सांगतात, हिमोग्लोबीन कमी असल्याने अंजलीची परिस्थिती नाजूक होती. तिला रक्त दिलं गेल्याने तिच्यात लवकरच सुधारणा होईल. बॉम्बे ब्लड ग्रुप असल्याचे लवकर कळत नाही. सुरूवातीला तो ओ पॉझिटीव्ह म्हणून दाखवतो, मात्र ओ पॉझिटीव्ह जेव्हा मॅच होत नाही तेव्हा तो बॉम्बे ब्लड ग्रुप आहे का, याची खात्री करावी लागते.

बहुतेकांना ओ, बी, ए पॉझिटीव्ह – निगेटीव्ह ब्लड ग्रुप माहिती असतात. पण यापलीकडे आणखी एक ब्लड ग्रुप असेल याची माहिती फारशी नसते. देशातील नाही तर संपूर्ण जगातील दुर्मिळ असा हा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’. या गटाचे रक्तदाते अत्यंत कमी असल्यामुळे हे रक्त उपलब्ध करणे ही मोठी समस्या आरोग्य यंत्रणेला भेडसावते.

आपला रक्तगट दुर्मिळ आहे हे विक्रमही जाणून आहे. स्वत:च्या दुचाकीमागे त्याने ठळक अक्षरात ‘बॉम्बे ब्लड ग्रुप मोफत सेवा’ असे लिहूनच ठेवले आहे. सामाजिक बांधिलकीतून विक्रम करत असलेले कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. विक्रम सांगतो, ‘माझा ब्लड ग्रुप जगातील दुर्मिळ गट असल्याची कल्पना असल्यानेच मी मदतीसाठी आलो. रक्तदान केल्याने माझे रक्त कमी झाले नाही तर वाढले आहे. तसेच आता मला एका मातेचे, बाळाचे आशिर्वाद लाभले आहेत’.

विक्रम यादव यांचा संपर्क क्र. – 9970018001

(जास्तीत जास्त शेअर करा.)

माहिती प्रस्तुतकर्ता : अज्ञात 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments