सुश्री शीला पतकी
इंद्रधनुष्य
☆ श्याम आणि त्याची आई… ☆ सुश्री शीला पतकी ☆
कै. माधव वझे
श्यामची आई या चित्रपटात काम करणाऱ्या माधव वझे यांचे काल दुःखद निधन झाले आणि श्याम गेल्याचे जाणवले….
श्यामची आई हा चित्रपट आमच्या पिढीसाठी आदर्श वागणुकीचा वस्तूपाठ होता. आयांसाठी श्यामची आई आदर्श होती आणि वागावे कसे यासाठी श्याम. साने गुरुजींनी आपल्या आईच्या सांगितलेल्या आठवणी.. त्याचे ते संकलन म्हणजे संस्कार पुस्तकच आहे. त्या पुस्तकांनी अनेक पिढ्यांवर संस्कार केले किती छोट्या छोट्या प्रसंगातून आई आपल्या मुलावर सहजपणे संस्कार करते याचे उदाहरण प्रत्येक पानावर होते. खंबीर आणि हळवी आई.. काळजी करणारी आई. मुलाचा आधार होणारी आई.. तीच्या कित्येक भूमिकांनी आणि त्यातील संवादाने मूल कसे घडते याचे ते प्रात्यक्षिकच होते. खरं पालकत्वाची जाणीव करून देणार ते पुस्तक त्याच्या इतकं सुंदर पुस्तक नाही…
मुक्या कळ्या तोडणाऱ्या शामला आई किती सुंदर सांगते किती सुंदर समजावते आई “शाम अरे ऊमलाईच्या आधी कुणाला खुडू नये त्याला पूर्ण फुलायचा अधिकार आहे त्याला सुगंध द्यायचा आहे मग आपण का बरं त्याच्या वाटेत यावे” आणखी एका प्रसंगात श्याम आंघोळ करून येतो आणि आई आपला पदर त्याच्यापुढे पसरते आणि या पदरावर पाय ठेवून ये म्हणते कारण श्यामला वाटत असते की आपल्या पायाला धूळ लागू नये आणि आईचे त्यानंतरचे वाक्य आहे, “श्याम पायाला धुळ लागू नये म्हणून जितका जपतोच ना तितक्याच मनाला धुळ लागू नये म्हणून जप बर”. आपले मन मलीन होता कामा नये ते स्वच्छ ठेवले पाहिजे हा एक उत्तम संदेश किती साध्या प्रसंगातून दिला होता….
पोहायला येत नसलेल्या शाम मुलांबरोबर जायला घाबरतोय मुलं धडाधड विहिरीत उड्या मारताहेत पण श्यामच्या अंगात ते बळ नाही तो घाबरून ओरडतोय तेव्हा खुद्द त्याची आई येऊन त्याला पाण्यात ढकलते आणि शिकायला प्रवृत्त करते कारण जीवनामध्ये पोहायला येणं हे खूप गरजेचे आहे हे शामला कळायला हवे यासाठी ती किती कठोर झाली आहे …
श्याम संस्कारक्षम सुंदर शिक्षण घेतलेला शिक्षित मुलगा व्हावा यासाठी आईचे अपार कष्ट… शेजाऱ्याच्या घरी जावून निवडण टिपण दळण कांडण.. प्रचंड कष्ट करणारी ती माऊली… कोकणात शाळेची सोय नसल्यामुळे दूर शहरात शिकायला गेलेल्या श्याम आईची आणि त्याची शेवटी झालेले ताटातूट सगळच कासावीस करणार आहे नात्यांचे सगळे बंध त्याच्यामध्ये अतिशय सुंदर आहेत घरी परतून आलेली विधवा आत्या तिलाही घरामध्ये किती सन्मान आहे आई आत्याच्या मांडीवर डोकं ठेवून उत्तम भजन गाणी ऐकणारे ती भावंड ते सगळच दृश्य मनाला चटका लावून जाते.
…. त्यातील चिंधीचे गाणे तर घराघरात गायले जात होते
“ भरजरी ग पितांबर दिला फाडून.. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण ।। “
पाठच्या बहिणीने, सुभद्रेने सगळे शेले शालू आहेत तर चिंधी कुठून आणू? असा विचार केला. प्रत्यक्ष नारायण जेंव्हा द्रौपदीच्या घरी गेले. तिने झटकन पितांबराची चिंधी फाडली आणि त्याच्या बोटाच्या जखमेला बांधली आणि ती म्हणते कशी… की काळजाचीही चिंधी करून बांधावे इतके ऋण माझेवर या भावाचे आहे आणि याच चिंधीच्या ऋणात राहिलेल्या परमेश्वराने नंतर तिला वस्त्रहरणात वस्त्र पुरवली. कृष्णाची गोष्ट एका गाण्यात किती सुंदर गुंफली आहे. चित्रपटातील ते गाणेही मुलांवर आपल्या धर्माचे, रामायण, महाभारत यांचे संस्कार गोष्टी रुपात करते हे नकळत सांगितले आहे.
– – मध्यंतरी पुण्याला एक गृहस्थ होते. ते श्यामच्या आईच्या प्रती रोज थोड्या तरी विकल्याशिवाय जेवण करत नसत कारण घरोघरी तो संस्कार रुजला जावा एवढीच त्यांची इच्छा होती.
श्यामच्या आईने इतिहास घडवला. चित्रपटाला सुवर्णकमळ प्राप्त झाले. शाळा शाळातून हा चित्रपट दाखवला गेला आणि अनेक पुढच्या पिढ्याना तो चित्रपट सिनेमा घरात दाखवला गेला
दूरदर्शन वर एकदा दुपारी हा चित्रपट दाखवला गेला तेव्हा माझ्या घरात मी माझ्या भाच्याना बळजबरीने बसवले चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होते आणि ते सगळे जण मला चक्क काहीतरी वेडपट सारखे रडते आत्या असे म्हणून उठून गेले….
…. त्या दिवशी मला जाणवलं आता श्याम संपला आहे… काल माधव वझे त्यांच्या जाण्याने प्रकर्षाने शामच्या आईची आठवण झाली. त्यातली श्यामची भूमिका अजरामर करून गेले वझे साहेब…
… शाम आता सगळ्याच अर्थाने संपला आहे इतके जाणवले…. माधव वझे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈