इंद्रधनुष्य
☆ आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे… – लेखक : श्री आनंद प्रकाश देवतरसे ☆ प्रस्तुती – सुश्री कालिंदी नवाथे ☆
एकदा नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला गेला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृध्द महिला आली. म्हणाली, ‘‘प्रसाद कधी मिळेल?”
सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, ‘‘थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला!” वृध्देला आनंद झाला.
बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, ‘‘पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं! परसाद जीव निवण्यासाठी पायजे… पोट भरण्यासाठी नाय्!”
मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी! मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही, कणानेही समानाधा लाभते हे त्या वृध्देच्या संवादातून उलगडले.
परमार्थ वेगळे काय शिकवतो? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणा कणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन. शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणता ना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो!
देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे.
लेखक : श्री आनंद प्रकाश देवतरसे
संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈