श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ देव कुठे असतो ? — भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(“अग पण आपली जागा एव्हडीशी.. त्यात देवींची पूजा.. ”
“ मी करीन ऍडजस्ट बरोबर… आणि तुमच्या म्हातारीला आपल्या घरी नको हा… आता त्यांच्या म्हातारपणात कोण बघणार त्याचेकडे? “) – इथून पुढे —-
उत्सवाची तयारी जोरात सुरु होती, आधल्या रात्री लाईटची तोरणे पेटली तसेच आंब्याचे टाळ सगळीकडे लागले. वाडीतील प्रत्येक घरातील तरुण उत्सवाच्या तयारीसाठी हजर होता. घरात वाडीतील बायका जेवणाच्या मदतीसाठी आपल्या काखेत विळी घेऊन हजर झाल्या. काही बायका तांदूळ वेचत होत्या, काही पीठ मळत होत्या.. काही भाजी चिरत होत्या… काही नारळ फोडत होत्या.. खोबरे किसणे सुरु होते…
देवघरात देवीचा मुखवटा पूजेसाठी तयार होता. फुलांनी सुशोभीत करणे सुरु होते. गंध, फुले, अगरबत्ती, कापूर सर्व तयार होते. फुले, वेण्या, तुळशी, बेल, दुर्वा सर्वकाही होते.
सर्व तयारी करून मंडळी रात्री उशिरा झोपली. सकाळी लवकर ब्राम्हण मंडळी येणार होती.. म्हणून सर्वाना पहाटे उठायचे होते.. पूजा आणि घरात जेवणाची तयारी.
पहाटे घरातील सर्व मंडळी उठली. जगदीशमामा पूजेच्या तयारीसाठी देवखोलीत तयार होता. मोठया भावाने अनंताने आंघोळ करून तो पूजेचे सोवळे नेसत होता, लहान भाऊ वसंताने पण आंघोळ केली आणि तो पण सोवळे नेसायला आला. चारही भटजी हजर झाले आणि पूजेची तयारी करू लागले. सर्व तयारी मनासारखी झाली, तसे मुख्य भटजी बोलले “यजमान..
तसा सोवळे नेसलेला अनंता देवखोलीत आला, तेवढ्यात वसंतांची बायको वनिता देवखोलीत आली आणि जगदीशमामाला म्हणाली..
“मामा, पूजा हे करतील.. यांना पण अधिकार आहे ना?
मामा तसेच भटजी तिच्याकडे पहात राहिले.
“अधिकार दोन्ही भावांका आसता.. पण ज्येष्ठ भाऊ असताना..
हे बोलणे ऐकून मोठया भावाची बायको अंजली आत आली..
“मामा, पूजेला माझा नवरा बसेल, कारण वडिलांनंतर मोठया भावाचा अधिकार.. त्याला शक्य नसेल तर दुसरा.. पण इथे मोठा भाऊ सोवळे नेसून तयार आहे, काय हो भटजी?
भटजी गडबडीने म्हणाले “हो.. हो.. बरोबर आहे.. म्हणजे मोठा भाऊ..
“भटजीना काय विचारतेस? तू मोठी पैसेवाली ना.. त्याना मोठी दक्षिणा देत असशील म्हणून..
“मी भटजीना कधी दक्षिणा देत नसते.. हे मामाच देतात.. भटजी शास्त्राप्रमाणे बोलणार..
हे मोठयामोठ्याने बोलणे ऐकून त्त्यांची आई बाहेर आली.
“जगदीश, काय झाला?
“दोन्ही भावांनी पूजेक बसण्याची तयारी केल्यानी.. वनिता म्हणता माझो नवरो पूजेक बसतलो..
“मोठया भावान पूजा करुची आसता.. तेव्हा अनंता तूच पूजेक बस.. सावित्रीबाई म्हणाली. तशी वनिता आणि वसंता रागाने बाहेर गेले.
पूजा सुरु झाली.. आत वाडीतील पंधरा बायका जेवण करण्याच्या गडबडीत होत्या.. एक एक पदार्थ शिजत होता.. सावित्रीबाई सर्व गोष्टीवर लक्ष ठेऊन होत्या.. बाहेर जगदीशमामा पूजेच्या ठिकाणी काय हवे काय नको ते पहात होते. हळूहळू गावकरी जमू लागले.
एवढ्या बायका पुरुष घरी आले होते पण वसंता आणि त्याची बायको वनिता कशात नव्हते. त्याना राग आला होता… पूजेला बसायची इच्छा होती. पण सर्वांनी मोठा भाऊ म्हणून…
“म्हणून त्त्यांची भरभराट होत असते, कळले काय? त्याना मोठया कंपनीत नोकरी.. ती मास्तरीण.. तिचा पोरगा हुशार… म्हणून ती भांडत आली.. माझा नवराच पूजेला बसणार.. पण यावेळी मागे हटायचे नाही.. देवी आपल्यच घरी न्यायची.. ती परत हट्ट करेल.. पण ऐकायचे नाही..
वनिता आपल्या नवऱ्याला सांगत होती.
घरी पूजा झाली.. मग महा आरती.. मग महाप्रसाद… सायंकाळ पर्यत लोक जेवत होती आणि आपसात बोलत होती..
” या देवीचो या गावातलो शेवटचो उत्सव.. आता देवी मुंबईक जातली.
आता यापुढे उत्सव मुंबईक..
गावातल्या स्त्रिया भावुक झाल्या होत्या… मंदा काकू सांगत होती
“माजा चेडू अभ्यासात मागे व्हता.. या देवीक नवस बोललयय.. पुढच्या वरसा पासून कधी नापास झाला नाय..
संध्या सांगत होती”माझो नवरो दारू पी, मी देवीक नवस बोललंय.. तेची दारू सुटली.
प्रत्येक बाई आपला अनुभव सांगत होती. सावित्रीबाईना नमस्कार करत होती.
सावित्रीबाई पण भावुक झाल्या होत्या.. आता देवी मुंबईला चालली, म्हणजे आपण पण मुंबईक.. पुढचे देवीचे उत्सव मुंबईत. आपण लग्न करून आलो या गावात त्या दिवसापासून या गावात आणि या घरात राहिलो.. आता देवी आणि आपण.. दोघेही…
देवीचा उत्सव झोकात पार पडला.. आता देवी चालली मुंबईला म्हणून अनेकांचे डोळे पाणावले.
दुसऱ्यादिवशी विसर्जन करून उत्सव संपला.
सावित्रीबाई, जगदीशमामा, दोन भाऊ आणि त्यान्च्या बायका एकत्र बसल्या. मामा म्हणाले
” तुमी दोघांनी देवीचा रुपडा मुंबईक न्यायचा असा ठरविलात.. पण मुबंईत खय? दोघांची दोन घरा आसात आणि तुमची आई.. तिका पण न्हेवक व्हया.
“मी मागेच सांगितले आहे, देवी माझ्याकडे आणि आई वसंताकडे.. माझी मोठी जागा..
“तुजी मोठी जागा.. मोठी जागा.. देवीला जागा कितीशी लागते.. एक फूट फळी ठोकली की देवी राहते.. बाबा गेल्यापासून तू देवींची पूजा करत राहिलास म्हणूंन तुला दिवस बरे आले.. आता मला तिची सेवा करू द्या.. माझे पण दिवस बरे येउदे.
तेवढ्यात अनंताची बायको मध्ये बोलली “देवी आम्हीच नेणार.. तिचा वार्षिक उत्सव करावा लागतो.. त्याचा खर्च किती होतो माहित आहे काय? काल उत्सव झाला, त्याला तीन लाख खर्च आला.. दरवर्षी आम्हीच खर्च करतो.. एक रुपया तरी देता काय देवीला? नुसती देवी नेतो.. देवी नेतो..
काय चालवलंय.. त्यापेक्षा आईला न्या तुमच्याकडे.
वनिता आता चिडली आणि बोलू लागली “म्हातारी आई आमच्या कपाळी आणि देवीचा मुखवटा तू नेणार.. कशी नेतेस ते बघते मी.. हात लाऊन बघ त्या मुखवट्याला….
“अग जा ग.. तुझा बाबा खाली आला तरी मला कोण थांबवू शकणार नाही.. चला हो.. घ्या तो मुखवटा.. अनंता आणि अनिता पुढे झाले आणि मुखवटा उचलू लागले तसा वसंता पुढे झाला आणि त्याने मोठया भावाला ढकललं… वसंता खाली पडला आणि देवीचा मुखवटा खाली पडला आणि मुखवटा मोडला.
मघापासून दोन्ही मुलांचे बोलणे ऐकणारी त्त्यांची आई भडकली. चिडून म्हणाली..
“, चालते व्हा.. चालते व्हा.. माझ्या डोळ्यासमोर रवा नकात..
आई खाली वाकली आणि तिने खाली पडलेल्या देवीच्या मुखवट्याला उचलले. आता जगदीशमामा बोलू लागले..
“मघापासून गप्प रवान बघतय.. तुमका दोघांका देवीचो मुखवटो होयो कारण कोणी तरी सांगितलं म्हणे ज्या घरात देवींची पूजा होता, त्या घराची भरभराट होता.. म्हणून दोघांका देवी होई पण म्हातारी आई नको.. अरे मुर्खानो.. तुमका देव.. देवी म्हणजे काय कळलाच नाय.. अरे अशी तांब्याची नायतर पितळेच्या देवी साठी भांटतात आणि ही रक्तामासाची आई ही देवी तुमका नको? चालते व्हा.. चलत रवा.. ह्या देवीचो मुखवटो तुमका दोघांका मिळाचो नाय.. जा..
आईने आणि मामानी पण देवीचा मुखवटा मिळणार नाही, हे सांगताच दोघे आपल्या पत्नीसोबत बाहेर पडले.
सावित्रीबाई डोक्याला हात लाऊन बसल्या होत्या. जगदीश मामा तिला म्हणाले
“ताई, तूझ्या झिलंका खरी देवी कोण ह्या कळलाच नाय… अरे मेल्यानू.. खरी देवी तुमी विसरलास.. आणि त्या मुखवट्याचो मुको घेवंक धावतास.. ताई, घाबरा नको.. तुजा हक्काचा माहेर आसा.. तुज्या माहेरक काय कमी नाय.. धान्यगोटो आसा.. दूधदुभाता आसा.. मानसा आसात.. उचल तो देवीचो मुखवटो आणि चल माझ्याबरोबर….
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈