डाॅ. निशिकांत श्रोत्री
कवितेचा उत्सव
☆ अखेर… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
डिसेंबर २०२४ मध्ये मेढे सर्वस्व माझी प्रिय पत्नी अपर्णा हिचे दुःखद निधन झाले आणि मी अंतर्बाह्य पूर्णतः कोलमडून गेलो. आता यातून काही मी परत उभा राहू शकेन असे मला वाटत नव्हते. काही जिवाभावाच्या मित्र-मैत्रिणींच्या आग्रहाने पुन्हा लिहायला सुरुवात केली. त्यातल्या बर्याचश्या कविता या माझ्या वियोग दुःखाच्या होत्या. अन् अचानक मनात विचार आला, या सगळ्या माझ्या भावना मी व्यक्त केल्या; पण माझ्या अपर्णाच्या काय भावना असतील, तिला काय वाटत असेल?
आणि माझ्याकडून प्रसविली गेली ‘अखेर’ ही कविता!
☆ अखेर ☆
*
अखेर झाली सहवासाची जाते सोडून तुला
दुःखाश्रुंच्या पाशाने ना बांधून ठेवी मला ||ध्रु||
*
आनंदाचा काळ जगलो अधिक अर्ध्या शतकाचा
उपवन फुलविले संसाराचे घेउनी वसा नंदनवनाचा
पुष्करिणीने तृप्त जाहलो स्पर्श नव्हता यातनेचा
जपून ठेवी क्षणा-कणांना आमोदाने आनंदाच्या ||१||
*
तुझ्या नि माझ्या एकत्वाची जाणिव जोपासली
दुजेपणाचा भाव त्यागुनी प्रीतबाग फुलविली
विश्व अपुले सारे होते आपण ही होतो विश्वाचे
हात घेउनी हातामध्ये जपले पावित्र्य नात्याचे ||२||
*
पुढे कधी ना गेले होते मी सोडून तुजला मागे
बद्ध करुनीया रश्मीने प्रेमाच्या नेले मज संगे
आत्मा अपुला एकची होता जीवन दोन देहाचे
मोहक किती होते अद्वैत दोघांच्या त्या जगण्याचे ||३||
*
काय करू मी आता जाते पुढे मीच एकली
फाशांनी निष्ठुर दैवाच्या साथ कशी संपली
अश्रू येतील तव नयनी ते असू देत अभिमानाचे
सुखी स्मृतींच्या समाधानी तृप्त सहजीवनाचे ||४||
*
होते माझे जीवन आहे तुलाच ना अर्पण
स्मृति पूर्तीच्या कर्तव्याच्या हृदयी कवटाळुन
पुन्हा कधी ना भेट व्हायची देहांची जाणून
निरोप देई अखेरचा मज एकदाच हांसून ||५||
*
आठवूनिया सहवासाचे सुखद आपुल्या क्षण
नयनांतुनिया आनंदाची ढाळी आंसवे दोन
वियोग अपुला शाश्वत झाला काळाची ही किमया
दुःखाश्रूंना अविरत गाळुन नको घालवू वाया ||६||
☆
कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम. डी. , डी. जी. ओ.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈