सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२८ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

श्रीजोगेश्वरी ते मुलींचे भावेस्कूल प्रवास..

1ते 4 थी नूतन मराठी शाळेतलं बालपण संपलं खरं, पण आता पुढचा प्रवास म्हणजे वनवास वाटायला लागला. कारण हायस्कूलची पदवी घेण्याकरिता नव्या मोठ्या हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता. प्रायमरीचा विरह जाणवायला लागला आणि हायस्कूलचा दाह वाटायला लागला. पण निर्णय शेवटी आईनानांच्याचं हातात होता. काही मैत्रिणी अहिल्यादेवीत पळाल्या तर कुणी हुजूरपागा गांठली. मला मात्र ति. नानांचा हात धरून मुलींचं भावेस्कूल अगदी रडत खडत पकडावं लागलं. रडकुंडीला येऊन शाळेचा रस्ता ओलांडताना मी वडिलांना म्हणाले, “नाना माझ्या मैत्रिणीच्या शाळेत जाऊ द्या ना मला! बुधवार पेठ कुठे, आणि ही सदाशिव पेठ कुठे चालत जायचा कंटाळा येतोय हो मला,! कां घातलतं तुम्हीं मला या शाळेतं? सांगा ना! कां नेताय तुम्ही मला या लांबच्या हायस्कूलला? ” माझं दप्तर सांवरत माझे डोळे पुसतं भावेस्कुलला शिक्षक असलेले माझे वडील, मला परिस्थितीची चालता चालता जाणीव करून देत होते, आहे ती परिस्थिती स्विकारून इतरांशी तुलना न करता परिस्थितीशी हात मिळवणी करण्याचा पहिला धडा लहान वयातच नानांनी मला दिला. घरी वडील आणि शाळेत गुरु झालेल्या माझ्या वडिलांनी शिक्षणाची दिक्षा मला दिली, आणि मी, पाचवीच्या वर्गाची पायरी चढले नाना म्हणाले होते, “अगं इतर शाळांची फी खूप आहे, ही शाळा मी येथे शिक्षक असल्याने खूप लांब असली तरी तुला फ्रीशिप मध्ये आहे. मलाही तुला कॅम्प मधल्या मोठ्या शाळेत घालावसं वाटतय पण –परिस्थिती! माझ्या तुटपुंज्या पगारात, दहा तोंड खाणाऱ्या संसारात माझी मजबुरी आहे ग बाळा! वडिलांचे हे बोलणं ऐकून माझे डोळे भरून आले. नानांना इतकं अगतिक झालेलं मी कधीच पाह्यलं नव्हतं आणि मग माझ्या लक्षात आलं, नाना शाळेत रोज पायी चालत जायचे ह्याच कारण, बसला पुरेसे पैसेच नसायचे. आणि मग त्यानंतर मात्र आमचा दिनक्रम ठरला. लांबलेला रस्ता जवळचा वाटावा म्हणून माझे वडील मला पुण्याच्या परिसरांतील माहिती सांगायचे. शाळेत पुस्तकातलेज्ञानाचे धडे आणि चालतांना चालण्याच्या व्यायामाचे संस्कार नानांनी माझ्यावर वयाच्या 10 व्या वर्षीच बिंबवले. बुधवारातून सदाशिव पेठेपर्यंतची आमची पदयात्रा, जुन्या नव्या पुण्याचा इतिहास ऐकण्यात केव्हां संपायची ते मला कळायचंच नाही. नानांनी सुरुवात केली ती सदाशिव पेठेपासून. ते म्हणाले, “आपण पर्वतीला जातांना भिकार दास मारुतीला गेलो होतो ना, आठवतय कां तुला? ” अय्या! खरंच कीहो नाना, किती छान मंदिर आहे ते! तिथे गणपती आहे मारुती आहे आणि नाना ती साधू बुवांची मूर्ती कसली आहे हो? आणि नाना, एक सांगा ना मला, असं काय नांव आहे हो त्या देवळाचं? काय तर म्हणे भिकारदास मारुती” माझा धबधबा थांबवत नाना म्हणाले, “सांगतो सांगतो! सगळं काही सांगतो पण आधी तू रस्त्याच्या कडे कडेनी चाल बरं! कान माझ्याकडे आणि डोळे रस्त्याकडे ठेव. ती बघ समोरून गाडी येतीय. रहदारी वाढलीय. अगं! पूर्वी हा रस्ता इतका वाहता नव्हता ईथे बाग होती. ” “अय्या ईथे बाग? नाना सांगा ना मग ती बागेची गोष्ट” नानांची आणि माझी पावलं शाळेच्या वाटेवरून भराभर पळत होती वडिलांच्या रसाळ वाणीने सांगितलेल्या आठवणी मी कान देऊन ऐकतं होते. भिकारदास मारुतीचा इतिहास नानांनी पुढे चालू ठेवला, ” प्रथम तुला पडलेलं नावाचं कोडं आपण आधी सोडवूया भिकारदास सावकाराने ह्या मारुतीची स्थापना केली म्हणून, त्यांचं नांव या मंदिराला दिले गेले. पुण्यात खूप बागा बखळी आणि ‘आळ्या’ होत्या, तांबट आळी, बोहरी आळी अशी नांवे असलेल्या गल्ल्या होत्या. बागांची रेलचेल असलेलं पुणे हिरवाईने नटलेलं होतं. आणि हो! याचं श्रेय नानासाहेब पेशवे व नाना फडणीसांना आहे बरंका बाळा! प्रदूषण मुक्त, स्वच्छ मोकळी हवा, वाहनांचा तेव्हा इतका सुळसुळाट नव्हता. पक्षांच्या मंजूळ आवाजानी, भूपाळीने, काकड आरतीने, वासुदेवाच्या आगमनानी पुणं जागं व्हायचं. पुणेकरांची मंगल प्रभात शुभ प्रभात व्हायची. त्यांचा सकाळचा प्रत्येक क्षण मांगल्यानी उत्साहाने भारलेला असायचा. भरपूर फळा फुलांनी लगडलेल्या भागांमुळे त्यांचा उपास पौष्टिक, सात्विक, मधुर फळांनी सुटायचा. जोडीला दुधातूपाची रेलचेल होतीच. त्यामुळे तालमीत, लाल मातीत, तरुणाई मदमस्तीत कुस्त्यांचा सराव करायची. मध्येच माझी शंका डोकावली, ” नाना म्हणजे! तालीम म्हणजे गुरुजी तालीमच काहो? मानाच्या तिसऱ्या गणपतीत मान पटकावणारी गुरुजी तालीम म्हणजे हीच होती ना? “हो गं बाळे तीच ती गुरुजी तालीम. त्यावेळी जिम हा प्रकारच नव्हता. तेव्हां आरोग्याचं वरदान मिळून, कामचुकार तरुण रांगडे पैलवान गडी झाले होते. आरोग्याचा मंत्र साध्य केल्यामुळे त्यांना आयुष्याचा प्रत्येक क्षण, कुठलंही आव्हान न घेता आनंदाने जगता आलं” “पण नाना अहो तो भिकारदास नावाचा मारुती मागे पडला की हो! ” शाळा जवळ आली होती म्हणून मी गाडी रुळावर आणली. हो! नाहीतर कथा अर्धवटच राह्यली असती. ” नाना खळखळून हंसले, “अरेच्चा खरंच की! मध्येच आपण तालमीकडे वळलो नाही का? नाना सांगायला लागले, “तेव्हां भिकारदास बाग होती. सिंहगड रोडला तर बाग बंगलाच होता, तर नारायण पेठेत गोड खोबऱ्यासारख्या भरपूर गराच्या पेरूंनी बाग डंवरली होती. सदाशिवपेठेचं पहिलं खरं नांव होतं, नृसिंह बाग, तिथून शुक्रवारपेठेला सांधणारी नातू बाग होती. आणि कमळांचं मोठ्ठ तळ असलेली सारस बाग, आणि ती तर तू पाह्यली आहेसच ना? या दोन्ही बागांच्या मधोमध फळांनी लगडलेली छोटीशी बाग होती, तिचं नाव होतं भिकारदास बाग गप्पांचाओघआंवरता घ्यावालागला. कारण आम्ही भावेस्कूलच्या पटांगणात आलो होतो. बापरे! गणू शिंदे घंटे कडे चाललाय तो घंटा बडवायच्या आंत 5 वी तुकडी अ च्या वर्गात मला पळायला हवं. कारण नाना वेळेचे, शिस्तीचे भोक्ते होते दप्तर, डबा, शाळेची बाटली सांवरत मी धूम ठोकली. आणि माझे शिक्षक पडील टीचर्स रूम कडे वळले. आता मी नानांची लेक नव्हते तर शिस्तप्रिय शिक्षक वडिलांची विद्यार्थिनी होते. मंडळी असं होतं माझं ते बालपणातलं शालेय जीवन, आणि असं होतं, त्यावेळेचं हिरवाईने नटलेलं, फळा फुलांनी डंवरलेलं, सुंदर पुणं. पुण्याला प्रदूषण मुक्त करणाऱ्या त्या कर्तुत्ववान पेशवाईला माझा मानाचा मुजरा.

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments