सौ. वृषाली सहस्रबुद्धे
ओळख माझी
नाव – सौ. वृषाली आनंद सहस्रबुद्धे
शिक्षण – एम्. एस्सी. (गणित), बी. एड्.
वाचनाव्यतिरीक्त इतर छंद – विणकाम, पर्यटन, शिकवणे, शास्त्रीय संगीत ऐकणे, नाटक व चित्रपट बघणे.
वृत्तपत्रातून कविता, लेख, प्रवासवर्णन, चित्रपट समीक्षा प्रकाशित झालेल्या आहेत.
विविधा
☆ लग्नात आईकडून मिळणारा बाळकृष्ण… ☆ सौ. वृषाली सहस्रबुद्धे ☆
रामजन्मभूमीचा विवाद संपुष्टात आल्यानंतर आता कृष्णजन्मभूमीचाही विवाद संपविणार अशा बातम्या येत असतानाच एक लेख वाचनात आला. त्या लेखकाला कुणीतरी “तुला राम हवा की कृष्ण?’ असा प्रश्न विचारला होता. त्याने उत्तरात त्याला राम आणि कृष्ण दोघंही हवेत असं सांगून राम हवा असण्याची आणि कृष्ण हवा असण्याची कारणे विस्तृतपणे विशद केली होती. लेख तर छानच होता. पण तो वाचून एक प्रश्न पडला की जर राम आणि कृष्ण दोघंही आमच्यासाठी आवश्यक आहेत तर घरोघरी मूर्तिस्वरूपात जसा बाळकृष्ण असतो तसा राम का नसतो? दोघंही खरं तर विष्णूचेच अवतार ना!!
मग राम राजा म्हणून आपण त्याच्यापुढे आदराने फक्त नतमस्तक होतो, पण त्याला आपला जवळचा मित्र मानत नाही आणि कृष्ण, जो कधीच राजा झाला नाही, तो त्याच्या खोडकर, हसऱ्या स्वभावामुळे आपल्याला खूप जवळचा वाटतो असं तर काही नाही ना? अचानक मग लक्षात आलं की बाळकृष्ण तर आपण माहेरहून घेऊन येतो. मुलीची सासरी पाठवणी करते वेळी सगळ्यात शेवटी आई मुलीच्या हातात चूपचाप बाळकृष्णाची गुडघ्यावर बसलेली मूर्ती देते. मला वाटतं कृष्णाचे विविध पैलू याला कारणीभूत आहेत.
लग्न झाल्यानंतर मुलगी माहेरचं सारं काही: घरदार, आईवडील, आनंदाने जगलेली नाती, जमविलेले आणि जपलेले मित्र-मैत्रिणी या सगळ्यांना; मागे सोडून जाते. सासरी गेल्यावरही या सगळ्यांची आठवण तिला येणारच असते. पण फक्त या आठवणींमध्ये रमून तिने तिच्या सासरच्या कर्तव्यात चूक करणे, त्यांना पुरेसा वेळ न देणे, त्यांना काय हवं नको ते न पाहणे हे अयोग्यच असते. आणि आपल्याला काहीही सोडून द्यावं लागलं तरी चालेल, पण कर्तव्यात कसूर होता कामा नये हे कृष्णापेक्षा जास्त चांगलं कोण सांगणार? तो जितकं काही मागे सोडत कर्तव्य करत पुढे गेला तितकं कुणीही केलं नाही. जन्म झाल्या झाल्या आईवडील सुटले, जिथे बालपण गेलं ते गोकुळ मागे राहिलं, राधेला विसरावं लागलं, पुढे मथुरा, द्वारका सगळं काही कर्तव्यासाठी सुटत गेलं, पण त्यांच्या मोहपाशात न अडकता तो त्याचं काम अगदी अचूकपणे करत गेला. हेच तर प्रत्येक आई आपल्या मुलीला शिकवत असते ना कायम! म्हणूनच माहेरच्या मोहात अडकून राहून तू तुझ्या कर्तव्यात कसूर करू नकोस असंच कदाचित आई मुलीला बाळकृष्ण देऊन समजावून सांगत असावी.
कृष्णाचा आणखी एक ठळक पैलू आहे तो म्हणजे प्रेमाचा – अशरीरी आणि शरीरी दोन्ही. तो चांगला पुत्र, भ्राता तर आहेच, पण महत्त्वाचं म्हणजे तो एक अत्यंत चांगला सखा आहे. स्त्री-पुरुष मैत्रीचा उद्गाता आहे. त्याखातर सखीच्या केवळ धावा करण्याने तो वस्त्रहरणाच्या प्रसंगी तिच्या मदतीला धावून आला. राधाकृष्णाचं प्रेम तर अतिशय मनोहारी. त्याचा जनमानसावर इतका पगडा आहे की अजूनही कृष्णाचं नाव हे त्याच्या कुठल्याही पत्नी बरोबर न घेता ‘राधाकृष्ण’ असंच घेतलं जातं. या सर्वच नात्यांना त्याने नेहमीच योग्य न्याय दिला आहे. लग्नानंतर मुलीलाही सून, पत्नी, वहिनी, काकू, मामी, आई अशा अनेक प्रकारच्या भूमिका पार पाडायच्या असतात. त्यातील कुठल्याही नात्यावर अन्याय न करता तिला त्या सर्व भूमिका व्यवस्थित पार पाडता याव्या, ही जाण तिला असावी, तिनं प्रत्येक नातं प्रामाणिकपणे निभवावं, सगळ्यांना बरोबर घेऊन संसार करावा म्हणून हा बाळकृष्ण आई मुलीला देत असणार.
हा खोडकर, प्रेमळ, हसरा, सगळं सोसणारा कृष्ण प्रसंगानुरूप कठोरही होतो. तो युक्ती-प्रयुक्ती वापरून पूतना, कंस, जरासंध यांचा वध करतो, पण महाभारतातील युद्धाच्या वेळी मदत मागायला आलेल्या आपल्या मित्राला “न धरी शस्त्र करी, मी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार” असं म्हणून आपलं सारं सैन्य दुर्योधनाला देऊन टाकतो. कारण तो जी मदत करतो ती अप्रत्यक्षपणे. स्वतः हातात शस्त्र घेऊन तो त्याच्या प्रिय मित्रालाही वाचवत नाही, उलट त्याला गीतेचा उपदेश करून स्वतःचा लढा स्वतःच करायला प्रवृत्त करतो. हेच तर मुलीला सासरी करायचं असतं ना! शक्यतो न बोलता सहन करायचं असतं, पण जिथे चूक होत असेल तिथे खंबीरपणे लढायचंही असतं. कुटुंब सुखात, आनंदात रहावं म्हणून आनंदी खोडकरपणा बाळगावा लागतो तर कठीण प्रसंगात कृष्ण होऊन गीतेचं रहस्यही उलगडावं लागतं, जीवनाचा प्रत्येक टप्पा समर्थपणे ओलांडावा लागतो.
संसार जसजसा फुलायला लागतो तसतसा त्यात पदोपदी कृष्ण भेटायला लागतो. घरातल्या लहान मुलांना त्यांच्या एवढंच होऊन सांभाळणं म्हणजे गोकुळातील यशोदेचा खोडकर कृष्ण. मनावर दगड ठेवून मुलांना शिक्षणासाठी बाहेर गावी किंवा परदेशात पाठविणे म्हणजे सांदीपनींच्या आश्रमात शिकायला गेलेला देवकीचा कृष्ण. कुणाच्याही गरीब वा श्रीमंत असण्याचा विचार न करता सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहणे म्हणजे सुदाम्याचा कृष्ण. लग्नात शृंगार असावा पण वासना किंवा असूया नसावी म्हणजे रुक्मिणीचा कृष्ण. सगळ्यांची जेवणं झाल्यावर उरलेलं अन्न खाऊन तृप्त होणे आणि घरादाराला समाधानी ठेवणे म्हणजे द्रौपदीच्या सूर्यथाळीत उरलेले एकच पान खाऊन स्वतःबरोबर जगाला तृप्त करणारा कृष्ण. आपल्या माणसाला वळणावर आणण्यासाठी त्याला योग्य सल्ला देत खंबीर निर्णय घेऊन कठीण प्रसंगाचा समर्थपणे सामना करण्यास शिकविणे म्हणजे अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण.
असा विविध रूपातील कृष्ण उलगडायला लागला की मुलीला तिच्या आई मधील देवकी-यशोदा तर कळतातच, शिवाय रुक्मिणी-सत्यभामेच्या प्रेमाबरोबरच राधा व मीरेची कृष्णाबद्दलची ओढही कळते, तिला द्रौपदीचे सखाप्रेमही कळते. असा सखाच सासरी जाताना तिच्या आईने तिला दिलेला असतो. तो जेव्हा सगळ्यांपासून लपवून आई देते तेव्हा त्या युगपुरूषाच्या दर्शनाबरोबरच आईचा मायेचा स्पर्शही मुलीच्या हाताला होतो. त्या मायेच्या शिदोरीबरोबर तिने दिलेल्या विश्वासू सख्याच्या आधारानेच तिला तिचा संसार तल्लीन होऊन करायचा असतो. पण वेळ आल्यावर विरक्त होऊन आपण उभा केलेला संसार पुढच्या पिढीच्या हाती सोपवायचा असतो.
निर्लेप मनाने, कुणाचाही दुस्वास न करता, स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन, कर्तव्यात न चुकता संसार कर, वेळप्रसंगी खंबीर राहून निर्णय घे आणि त्यांच्यावर ठाम रहा, पण शेवटी सगळं सोडून मुक्त हो हा गुरुमंत्रच आई पाठवणीच्या वेळी गुपचूप बाळकृष्ण देऊन मुलीला देत असते. आणि गुरुमंत्र तर कानातच देतात ना; तोही हळूच. हेच सगळ्यांपासून लपवून आईने मुलीला बाळकृष्ण द्यायचं प्रयोजन असणार, नाही का?
© सौ. वृषाली सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈