मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #214 ☆ चंदन झालो… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 214 ?

चंदन झालो… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

तारुण्याच्या बागेमधल्या हिरव्या वेली

भुंगे आले जेव्हा होती फुले लागली

फुलात नाही, खोडच आहे इथे सुगंधी

खोड चंदनी म्हणजे आहे कोरी हुंडी

झाडाला या म्हणून आहे दृष्ट लागली

मोल तयाचे मोठे आहे त्यास न कळले

काळोखाचा घेत फायदा लुच्चे वळले

सळसळ होता या झाडाला भिती वाटली

दुनिया करते पसंत मजला बरे वाटले

चांगुलपण हे मला भोवले पाय छाटले

चंदन झालो याची मजला सजा भेटली

ईश्वर करतो माझी येथे अशी घाटणी

तुकड्यामधली काया आहे तरी देखणी

झिजून मरणे याची मीही शपथ घेतली

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – अभिव्यक्ती स्वातंत्र्य… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – अभिव्यक्ती स्वातंत्र्य… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला गेलो होतो. जेव्हा प्रमुख वक्त्यांचे भाषण सुरु झाले तेव्हा त्यांनी मर्यादा सोडून बोलणाऱ्या आजच्या राजकारण्यांवर टीका केली. खरोखरच राजकीय नेते म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे. पण त्याचे भान काही अपवाद सोडले तर आज कुठेही दिसत नाही. ते उपरोधिकपणे म्हणाले ‘ विद्या विनयेन शोभते ‘ असे एक संस्कृत सुभाषित आहे. पण बोलणाऱ्यानी एवढी खालची पातळी गाठली आहे की ते म्हणतील, ‘ ही कोण आणि कुठली विद्या ? कुठला विनय ? ‘ रोजच्या बातम्या पाहिल्या आणि त्यात राजकारण्यांनी केलेली विधाने पाहिली की याचे प्रत्यंतर येते. बातम्या सुद्धा बघू नये असे सुजाण नागरिकांना वाटत असल्यास नवल नाही.

याच व्यासपीठावरून आणखी एक वक्त्या बोलल्या. त्यांनी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक विधान केले. त्या म्हणाल्या, ‘ सुरुवातीला मला सावरकरांबद्दल प्रचंड आदर होता पण आता तो कमी झाला आहे. ‘ त्याचे कारण त्यांनी सांगितले की राहुल गांधी जर सातत्याने सावरकरांवर टीका करत असतील, तर त्यांच्या हातात काहीतरी पुरावे असल्याखेरीज ते तसे बोलणार नाहीत.  आणखी एक वक्ते उभे राहिले ते म्हणाले की या बाई बोलल्या त्यात नक्कीच तथ्य आहे. आपल्याला सावरकरांच्या विरोधात कोणी बोललेलं आवडत नाही कारण तशा प्रकारची विधानं त्यांच्याबद्दल आपण ऐकलेली नसतात. पण म्हणून ते खोटं आहे असं मानायचं कारण नाही. महात्मा गांधींनी आपण केलेल्या चुकांची कबुली ‘ माझे सत्याचे प्रयोग ‘ या पुस्तकात दिली आहे. अशी कबुली देण्यासाठी फार मोठे मन लागते. याच व्यासपीठावरून मग दाभोलकर, पानसरे आणि गौरी लंकेश यांनी विरोधाची भूमिका घेतली म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का ? देश धार्मिक हुकूमशाहीकडे, फॅसिस्ट वादाकडे झुकतो आहे अशी विविध विधाने केली गेली.

दाभोळकर, पानसरे किंवा गौरी लंकेश यांच्या हत्येचे समर्थन कोणीच करणार नाही आणि करू नये. कोणी वेगळी भूमिका मांडली तर त्यांची हत्या करणे हे कधीच समर्थनीय ठरू शकत नाही. ती निषेधार्हच गोष्ट आहे.

विशेष म्हणजे सावरकरांबद्दल वरीलप्रमाणे विधाने करणाऱ्या  व्यक्ती या जेष्ठ साहित्यिक किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या होत्या. त्यांच्याकडून अशा प्रकारची विधाने ऐकणे हे आश्चर्यचकित करणारे आणि धक्कादायक वाटले. उथळ विधाने करणारी आणि सावरकरांच्या जीवनकार्याचा फारसा अभ्यास न करणारी एखादी व्यक्ती सावरकरांच्या विरोधात बोलते म्हणून तिचे म्हणणे खरे मानून सावरकरांचा त्याग, देशभक्ती या सगळ्याच गोष्टींवर बोळा फिरवायचा का याचा बोलणाऱ्यांनी विचार करायला हवा. महात्मा गांधींनी आपल्या ‘ माझे सत्याचे प्रयोग ‘ या आत्मचरित्रात आपण केलेल्या चुकांची कबुली दिली आहे म्हणून ते महान होत नाहीत किंवा सावरकरांनी स्वतःच्या चुकांबद्दल असे काही लिहिले नाही म्हणून ते लहान होत नाहीत. सावरकर,गांधी, नेहरू, सरदार पटेल, डॉ आंबेडकर, म. फुले  यांच्यासारख्या व्यक्ती मुळात महान आहेत. या सगळ्या महापुरुषांनी आपल्या जीवन कार्यातून काय संदेश दिला हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हल्ली कोणीही काहीही बोलावे असे झाले आहे. ज्यावेळी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात किंवा समारंभात आपण भाषण करतो, तेव्हा लोकांपुढे कोणता आदर्श ठेवायचा हा खरंतर ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ज्यावेळी आपण महापुरुषांबद्दल बोलतो, त्यावेळी त्यांचे दोषदिग्दर्शन न करता त्यांच्या गुणांवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मला वाटते. गुणग्राहकता आपल्याजवळ असली पाहिजे. महापुरुष हे देखील शेवटी माणसेच असतात. त्या त्या परिस्थितीत निर्णय घेताना त्यांच्या हातून कदाचित काही चुका होऊ शकतात. पण म्हणून त्यांच्या महत्वाच्या कार्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे दोष किंवा चुकाच आपण दाखवत राहायच्या हे कितपत योग्य आहे ? अलीकडे महापुरुषांच्या कार्याचे, गुणांचे गुणगान करण्यापेक्षा त्यांच्यातील दोष दाखवण्याचा जो पायंडा पडत चालला आहे, तो भविष्यकाळाच्या दृष्टीने घातक आहे. पुढच्या पिढ्यांसमोर आपण आदर्श ठेवायचा की दोष दिग्दर्शन करायचे ? स्वा. सावरकर असोत, गांधी किंवा नेहरू असोत या सगळ्या महापुरुषांनी देशासाठी प्रचंड त्याग केला आहे, अपार कष्ट, तुरुंगवास सोसला आहे. अमुक एका महापुरुषावर टीका केली म्हणजे तो लहान होत नाही किंवा त्याच्या कार्याचे महत्व कमी होत नाही.

पुलं हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. पुलंनी अवघ्या महाराष्ट्राला सुसंस्कृत विनोद कसा असतो हे दाखवून दिले. नाट्य, संगीत, अभिनय, दिग्दर्शन, लेखन इ कलेच्या विविध प्रांतात सहज संचार करणारा अवलिया म्हणजे पुलं. याच पुलंवर मध्यंतरी एक चित्रपट येऊन गेला. ‘ भाई -व्यक्ती आणि वल्ली ‘ या नावाचा. आपल्यापैकी बऱ्याच पुलं प्रेमींनी तो पाहिला असेल. पण या चित्रपटातून पुलंचे अष्टपैलू व्यक्तिमत्व समोर येण्याऐवजी सतत धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे पुलं अशीच व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येते. कदाचित वस्तुस्थिती तशी असेलही आणि दिग्दर्शकाला काय दाखवायचे याचे स्वातंत्र्यही नक्कीच आहे. पण इथे पुन्हा माझ्यातील शिक्षक जागृत होतो. समाजापुढे आपण काय ठेवतो आहोत याचा विचार नक्कीच करायला हवा असे मला तीव्रतेने वाटते. वाईट गोष्टी लगेच उचलल्या जातात. चांगल्या गोष्टी रुजवायला वेळ लागतो. उतारावरून गाडी वेगाने खाली येते. वर चढण्यासाठी कष्ट पडतात. आपल्याला समाजाची गाडी प्रगतीच्या दिशेने न्यायची असेल तर योग्यायोग्यतेचा विवेक ठेवायलाच हवा. अर्थात  माझे हे विचार आहेत. सगळ्यांनाच आवडतील असेही नाही याची जाणीव मला आहे. प्रत्येकाला  अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच !

पण जाता जाता आणखी एक सुदंर सुभाषित सांगून समारोप करू या. या सुभाषितात सुभाषितकार म्हणतो

 विद्या ददाति विनयं, विनयाद याति पात्रतां ।

 पात्रत्वात धनमाप्नोति, धनात धर्मं तत: सुखम ।।

ज्या व्यक्तीला खरोखरीच ज्ञानप्राप्ती झाली आहे, अशी व्यक्ती विनयशील म्हणजे नम्र असते. कुठे कसे वागावे हे अशा व्यक्तीला सांगावे लागत नाही. विनम्रतेतून योग्यता किंवा पात्रता अंगी येते. त्यातूनच मग धनाची प्राप्ती करण्यायोग्य व्यक्ती होत असते. धनाचा उपयोग करून मनुष्य धार्मिक कार्य संपन्न करू शकतो आणि त्यातूनच त्याला आनंद प्राप्त असतो. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. यात अर्थातच ज्ञानप्राप्तीचे आणि त्या खऱ्या ज्ञानप्राप्तीतून अंगी येणाऱ्या गुणांचे महत्व अधोरेखित केले आहे.

© श्री विश्वास देशपांडे,

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देवपंगत – भाग – २ ☆ श्री सचिन मधुकर परांजपे ☆

🌸 जीवनरंग 🌸

☆ देवपंगत – भाग – २ ☆ श्री सचिन मधुकर परांजपे ☆

(मागील भागात आपण पहिले,- पहिली पंगत बसण्याआधी एका बाजूला अंगण सारवून तिथे छान बैठक मांडून, सजवून चौघा देवांसाठी चार पानं मांडली जात. तो नैवेद्य मात्र गायीला अर्पण केला जाई. पंगत संपवून माणसं घरोघरी जाताना सोबत प्रसादाचे लाडू दिले जात. हरिभाऊंच्या वेळी द्रोणातून प्रसाद वाटला जाई आता झीपलॉकच्या पिशवीतून… इतकाच काय तो फरक.  )

विराज आणि मालिनी या भावाबहिणींचा एकमेकांवर प्रचंड जीव. मालिनी आता लग्न होऊन जोगळेकरांकडून करमरकरांची सून झाली असली तरी तिच्यावर संस्कार सगळेच सुरेख होते. जगावर प्रेम करायची ती. कोणालाही खायला देणं, आवडीचं काही करुन देणं तिच्या खास आवडीचा विषय होता….देवपंगत दोन महिन्यावर आली तशी विराजने गावाकडे एक चक्कर टाकली. जुन्या वाड्याची साफसफाई करुन झाली. ग्रामपंचायतीचं पटांगण देवपंगतीसाठी नक्की झाले. भावकीतील मंडळींशी भेटीगाठी झाल्या. यंदा तब्बल आठशे पानांचा अंदाज होता. कॅटरर्सशी बोलणं झालं. तारखा ॲडवान्स…दोन दिवसाच्या विधीसाठी नेहमीप्रमाणे रत्नागिरीहून आठल्ये गुरुजी, फडके गुरुजी येणार होते…आणि ….

कोरोनाची साथ आली…. विराज हादरला.. आजवर कधीही म्हणजे अक्षरशः कधीही न आलेली अडचण समोर ठाकली. आजवर आलेल्या प्रत्येक अडथळ्यांवर आणि विघ्नांवर त्याचा आजापणजांनी मात केली होती. गांधींच्या हत्येनंतर आसपासच्या गावात जाळपोळी झाल्या तेव्हा यांच्या गावकऱ्यांनी मानवी साखळी करुन जोगळेकर वाडा वाचवला होता. “बामणाच्या नखाला पण हात लागू देणार नाई” अशा निर्धाराने शेंबडं पोरही छाती पुढे काढून आलं होतं. वाडा जाळपोळीपासून सुरक्षित राहिला होता. अशा कठीण परिस्थितीतही देवपंगत उठली होती पण आजचा प्रसंग अवघड होता. इंटरनॅशनल फ्लाईट्स तातडीने बंद करण्यात आल्यामुळे मालिनीचं येणं अशक्य होतं. देवपंगत झाली असती पण नियमानुसार पंगतीला घरातल्या बायकांसोबत बहिणीने वाढणं आवश्यक होतं… आता काय करायचं? मोठाच यक्षप्रश्न होता…

“दादा… मला व्हिडिओ कॉल कर. परिस्थितीच अशी आहे की आपला नाईलाज आहे.” विराज हो म्हणाला. यंदाच्या देवपंगतीला मालिनी नाही म्हणून राधिकाकाकू पण थोडी नाराज होती. विराजची बायको म्हणजे अनिताही थोडी बावरली होती. मालिनी असली की तिला जरा आधार वाटे यंदा सगळंच तिच्यावर आलं होतं. नाही म्हणायला भावकीतील स्नेहाकाकू, दस्तुरखुद्द राधिकाकाकू म्हणजे तिच्या सासूबाई, गोखल्यांची नमिता, पावसकरांची सून या सगळ्या असल्या तरी मालिनी असली की तिला बरं वाटे. दोघी नणंदाभावजयींचं रिलेशन छान होतं. तू अजिबात काळजी करु नकोस….देव काय ते बघून घेईल असं मालिनीने अनेकदा सांगितले…

सगळी तयारी जय्यत झाली. आसपासच्या परिसरात आमंत्रणे गेली आणि दोन दिवस आधी मालिनीचा फोन आला “अरे दादा, मी नेमकी देवपंगतीच्या दिवशी एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी एकेठिकाणी जातेय. निनादचं एक काम आहे रे. तो एरिया लो नेटवर्कचा आहे. मीच कॉल करेन जमेल तसं”  देवपंगतीच्या आधीचे दोन दिवस सतत विधी सुरु होते… विराजला श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती… आज पदोपदी मालिनीचं नसणं खटकत होतं… पहिली पंगत घेण्याची वेळ आली. लोकं स्थानापन्न झाले. आपटे गुरुजींनी खड्या आवाजात त्रिसुपर्ण म्हणायला सुरुवात केली. भावकीतील नातेवाईक आणि स्त्रीया पंगत वाढायला सज्ज होत्या. विराज तूपाचं भांडं आणि अनिता मसालेभात घेऊन तयार होते….आज मालिनीची पुरणपोळी वाढण्याची जबाबदारी राधिकाकाकूंनी घेतली होती… आणि अचानक एका कार मैदानात येऊन थांबली आणि त्यातून लगबगीने मालिनीच उतरली… हे दृश्य बघून सगळेच थक्कं झाले…

“मालिनी? हे कसं शक्य आहे?” सगळेच म्हणाले. “दादा तुला नंतर सांगते डिटेल…” त्रिसुपर्ण संपलं आणि आईकडचं पुरणपोळ्यांचं ताट घेऊन मालिनी नेहमीप्रमाणे पदर खोचून वाढू लागली. इतक्या मोठ्या लांबच्या प्रवासाहून आली असली तरी तिच्या चेहर्‍यावर थकवा नव्हता. लख्खं गोऱ्यापान वर्णाची, सुंदर चेहऱ्याची एक लक्ष्मीकन्याच जणू काही पंगतीत वाढते आहे असं विराजला वाटलं… आज नेहमीप्रमाणे वरणभात, तूप, लिंबू, बटाट्याची भाजी, पुऱ्या, आम्रखंड, पुरणपोळी, चटणी, कोशिंबीर, कोथिंबीर वडी, पापड, मसालेभात, कुरडया, पंचामृत आणि अळूवडी हा बेत होता…. फक्कड बेत झाला. आठेकशे लोक तृप्त झाले. ओळखदेख नसणारे मोठमोठे तालेवार जसे जेवत होते तसेच आसपासच्या गावचे गोरगरीब जेवत होते. आपल्या शेजारी कोण बसलंय? याची खंत कोणाला नव्हती. कराडच्या नगराध्यक्षांच्या मांडीला मांडी लावून एक गरीब शेतकरी बसला होता तर आमदारांच्या शेजारी पानाची टपरी असलेला विठोबा माने जेवत होता…. मोठी छान मैफिल जमली होती. दक्षिणा घेऊन शुभेच्छा देऊन आणि प्रसाद घेऊन जो तो आपापल्या घरी गेला… मंडपात मालिनी, विराज, राधिकाकाकू, अनिता आणि थोडी इतर नातेवाईक मित्रमंडळी असताना मालिनीने जे सांगितले ते ऐकून सगळेच थक्क झाले…

इंटरनॅशनल फ्लाईट्स ताबडतोब बंद झाल्यावर मालिनीचे इथे भारतात येण्याचे मार्ग बंद झाले. तिने आणि निनादने अक्षरशः आकाशपाताळ एक केलं पण जाणं इंपॉसिबल होतं. इतक्यात चार दिवस आधी निनादच्या मित्राचा फोन आला. त्याचा एक इंडस्ट्रीएलिस्ट मित्र जो बिगशॉट होता तो दोन दिवसात स्पेशल परमिशन घेऊन स्वतःच्या चार्टर्ड विमानाने भारतात, मुंबईत चालला होता. मालिनीने स्वतः त्या मित्राला फोन केला… मला नेऊ शकता का? असं विचारलं… त्याने सांगितले “ताई, अशा प्रसंगी मी उपयोगी पडलो नाही तर देव मला क्षमा कशी करेल” तडकाफडकी सर्व अत्यावश्यक टेस्ट्स केल्या आणि स्पेशल परमिशन्स काढली गेली. आणि देवपंगतीच्या एक दिवस आधी मालिनी संध्याकाळी मुंबई एअरपोर्टला उतरली. तिला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं… आणि पंगतीच्या अगदी वेळेवर ती पोहोचली… आणि पंगतीत तिला नियमानुसार वाढता आलं…

तिला ज्यानं सुखरुप भारतात आणलं तो इंडस्ट्रीएलिस्ट म्हणजे कैवल्य…कैवल्य भोसले. त्याला दुसरीकडे जायचं असल्याने देवपंगत अटेंड करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्याला प्रसादाचे लाडू ताबडतोब कुरियर केले गेले. आणि पुढच्या वर्षीपासून तोही आवर्जून येणार होता असं त्याने मालिनीला वचन दिले होते. ही सगळी स्टोरी ऐकून उपस्थित सगळेच गहिवरून गेले. इच्छा तिथे मार्ग म्हणतात ते उगाच नाही…

विराज शांतपणे उठून शेजारच्या वाड्यातील माजघरात गेला. हरिभाऊ, कावेरी, विष्णुआजोबा, गंगाआजी, भाऊकाका आणि मंदाआत्या सगळ्यांच्या फोटोला हात जोडले. मनोमन प्रार्थना केली…. परंपरा म्हणजे काय नेमकं? एक आनंदप्रवाह. देवी पार्वतीची आज्ञा हो… पंगतीत वाढायला बहीण हवीच… विषयच संपला. नियती काय ठरवायचं ते ठरवू दे… पंगतीला माझी बहीण येणारच. जगाच्या पाठीवर कुठेही असो…

विराजच्या खांद्यावर मालिनीचा हात विसावला… “देवाची इच्छा देव कशीही पूर्ण करतो ना दादा? आज मला एक गोष्ट पटली. प्रवाहाचा प्रवास असाच सोपा सुरु असतो… आपण फक्त विश्वस्त. तो प्रवाह पुढच्या पिढीला सुपूर्द करणारे त्रयस्थ…” दोघा बहिणभावांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

 – समाप्त –

© श्री सचिन मधुकर परांजपे 

(पालघर)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्रकाराचे भूत – भाग – १ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ चित्रकाराचे भूत – भाग – १ ☆ श्री सुनील काळे 

पाचगणी हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शैक्षणिक केन्द्र आहे. पण आज जी पाचगणीची खरी प्रगती  दिसत आहे ती खूप हळूहळू झाली आहे. उदा. पाण्याची सोय. ब्रिटीशांनी ज्यावेळी येथे शाळा बांधल्या, विद्यार्थी आणि पर्यटकांचे येण्याचे प्रमाण वाढू लागले तसतसे पाण्याचे संकटदेखील मोठे होत गेले. चाळीस पन्नासवर्षांपूर्वी पाचगणीत पाण्यासाठी फक्त विहिरींचाच वापर व्हायचा. गावात आणि खाजगी बंगल्यामध्ये आजही काहीजण विहिरीचे पाणी वापरतात पण त्यावेळी विहिरीनां दुसरा पर्यायच नव्हता. लाल दगडांमध्ये बांधलेल्या या विहिरींचे पाणी आयर्नयुक्त आणि चवदार असल्याने सर्वानां ते आवडायचे. वाईला धोमधरणाची निर्मिती झाली आणि नंतर धरणाचे पाणी पाचगणीला येवू लागले. सिडने पाईंटच्या तळमाळ्याजवळ पंपींग स्टेशन बांधले होते. तेथून पाणी प्रथम गार्डनच्या शेजारी शुद्धीकरणासाठी येई व नंतर  टेबललॅन्डच्या पायऱ्याजवळच्या टाकीतून संपूर्ण गावाला नळाने पाणीपुरवठा होई. पण हे सगळे प्रकार विजेच्या पुरवठ्यावर अवलंबून असायचे. कधी कधी वीजपुरवठा नसला की पाण्याचा तुटवठा व्हायचा व स्थानिक रहिवाशानां परत विहिरीवरुन पिण्याचे पाणी आणायला लागायचे व कपडे धुवायला टेबललॅन्डचे तळे किंवा गावविहीरीवर जावे लागत असे. (आता मात्र पाचगणीला महाबळेश्वरच्या वेण्णा लेक मधून पाणी पुरवठा होतो.)

माझ्या लहानपणी मोठे कुटूंब असल्याने कपडे धुण्यासाठी सगळे बहिणभाऊ गावविहिरीवर जायचो. तेथे भरपूर हुंदडायला मिळायचे म्हणून मदत करण्याचा, अभ्यास करण्याचा बहाणा करून कपड्यांच्या बादल्या घेऊन विहिरीवर जाणे हा माझा आवडता कार्यक्रम असायचा. एका रविवारी मी गावविहिरीच्या परिसरात दप्तर घेऊन मनसोक्त टाईमपास करत होतो.

गावविहारीचा पूर्वेकडेचा रस्ता चालत गेलो की रेशीम केन्द्र व ओक्स हायस्कूल लागायचे. या ओक्स हायस्कूलच्या बाजूचा उताराचा रस्ता जरा मस्त वाटला म्हणून मी सहज चालत गेलो तर तेथे एक पत्र्याचे शेड मारलेले होते. आणि त्यामध्ये लोखंडी बीडाच्या बारचे चौकोनी पिलर्स उभे केले होते.

त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच जात होतो. हे ठिकाण स्मशानभूमीचे आहे हे लहान असल्यामूळे मला माहीतच नव्हते. कारण लहान असल्यामूळे मला कोणी नेले नव्हते.मी तेथे गेल्यावर मंत्रमुग्धच झालो. कारण त्या ठिकाणावरून समोर कमळगड, मांढरदेवीचा डोंगर व अफलातून दिसणारे कृष्णा व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसत होते. त्या डोंगरावर नुकतीच पूर्वेकडचे सकाळची कोवळी उन्हे पडल्यामुळे डोंगराच्या रांगा व त्यावरील चढउतार, डोंगरांच्या सावल्या, घड्या,पाण्यात पडलेली प्रतिबिंबे. छोटी छोटी घरे, भाताची हिरवीगार शेती त्यातच चिखली व बारा वाड्यांचे खोरे, ती छोटी घरे पाहून मी परदेशातील स्वित्झर्लंडचा देखावा पाहतोय असे मला वाटू लागले व मी मनाने पूर्णपणे भारावूनच गेलो. हे दृश्य आपण कागदावर चित्तारायलाच पाहिजे असे मला खूप मनातूनच वाटू लागले. पाठीवरचे दफ्तर बाजूला ठेऊन त्यातील चित्रकलेची वही काढून त्या स्मशानभूमीच्या जाळण्याच्या लोखंडी चौकानावर बसून  पेन्सीलने चित्र काढण्याच्या कृतीत आणि त्या शांत वातावरणात मी इतका तल्लिन झालो की माझे दोन तास कसे गेले ते मला कळलेच नाहीत.

माझी चित्रसाधना अचानक झालेल्या नानांच्या आरडाओरड्यांमुळे भंग पावली. मी पाचगणीत एस.टी.स्टॅन्ड समोर जेथे राहायचो त्या इमारतीच्यावर लिंगाण्णा (नाना) पोतघंटे राहायचे, त्यांच्या एकत्र कुटुंबाचा शाळेचे कपडे धुण्याचा, इस्त्रीचा  ‘ दिपक ड्रायक्लिनर्स ‘ नावाचा व्यावसाय होता. पाण्याचा तुटवडा असल्याने ते स्मशानभूमीच्या डाव्या बाजूला असलेल्या एका जिवंत झऱ्याच्या घाटावर नेहमी कपडे धुवायला यायचे.मला स्मशानभुमीत चित्र काढताना पाहून ते आश्चर्यचकीत झाले व घाबरले देखील  त्यांच्या आरडाओरड्यामूळे मी तेथून पळ काढला व उशीरा घरी पोहचलो.

नानांनी घरी आईला तुमचा मुलगा मसणवट्यात चित्र काढत बसला होता ही घटना सांगितली आणि त्यामूळे सगळे वातावरण तंग झाले. अशा या तंग वातावरणात मी घराच्या पाठीमागच्या दरवाजातून हळुवारपणे घुसत असतानाच माझे जंगी स्वागत झाले. माझी आई अशिक्षित व अडाणी होती. ती मनातून खूप घाबरली होती,तीला पक्की खात्री झाली होती की कोणत्या तरी चित्रकाराच्या भूताने मला धरले असणार. ते भूत माझ्या अंगात घुसल्यामूळेच मी सतत भटकत सारखी सारखी  चित्र काढत असतो. त्यामूळे आईने घरात दरवाजात प्रवेश करण्यापूर्वीच थांबवले आणि मग माझ्या चेहर्‍यावरून भाकरीचा तुकडा,मीठ, मोहरी, मिरच्या ओवाळून ईश्वराला मोठ्याने साकडे घातले की इडापीडा टळो आणि चित्रकार भूताच्या तावडीतून माझ्या लेकाची सुटका होवो.

पण माझ्यावर काही फरक पडलाच नाही. या उलट दिवसेंदिवस वेळ मिळेल तसे कृष्णा व्हॅली, पांडवगड, कमळगड, नवरानवरीच्या डोंगरांच्या रांगा, चमकणारे धोम धरणाचे पाणी, यांची चित्रे काढण्याचे माझे प्रमाण वाढले. तासनतास त्या प्रदेशाची चित्रे काढणे त्या परिसरात फिरणे हा माझा आजही आवडीचा छंद आहे. एकंदर आईच्या दृष्टीने चित्रकाराच्या भूताने मला आंतरबाह्य पछाडलेले होते, झपाटले होते. मी एकदम वाया गेलो असे सर्वानां वाटायचे.

एकदा मात्र मोठ्ठीच गंमत झाली. ती कायम लक्षात राहण्याजोगी आहे म्हणून आज तुमच्याशी शेअर करतोय. पाचगणीत आर्ट गॅलरी करण्याचा माझा उद्देश होता,  त्या गॅलरीच्या दरवर्षी जागा बदलत असल्यामूळे  मी वेळोवेळी त्यात अपयशी ठरलो.सन २००० साली मी खूपच निराश झालो होतो कारण माझ्या  आयुष्याची वाताहात झाली होती. मोठी आर्थिक कुचंबणा झाली व नाईलाजाने मला पाचगणीच्या बिलिमोरीया  शाळेत कलाशिक्षकाची नोकरी पत्कारावी लागली. तेथे शाळेतच राहत होतो.

शाळेत शिकवत असलो तरी चित्रकाराचे भूत डोक्यातून जात नव्हतेच.बिलिमोरीया स्कूलचे लोकेशन  टेबललॅन्डच्या पायथ्याशी व सिडनेपॉईंटच्या (सध्याचे रविन हॉटेल )जवळ असल्याने मी जमेल तशी तेथून दिसणाऱ्या कृष्णा व्हॅलीची, शाळेच्या परिसराची, शाळेची मुख्य इमारत, डायनिंग हॉलची इमारत, प्राचार्यांचे, शाळेच्या मालकांचे निवासस्थान, रस्त्यांच्या वडांच्या झाडाची चित्रे रेखाटने सतत करत असायचो.

एकदा बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनाचा एक कॅटलॉग पोस्टाने आला होता. त्यात एका चित्राला जलरंगाचे पारितोषक मिळाले होते. त्या चित्रात रस्त्याच्या बाजूला एक खांबावरचा दिवा प्रकाशित होऊन छान पिवळा प्रकाश सर्वत्र पडला होता व त्या प्रकाशात इमारत, झाडे, माणसे खुपच छान दिसत होती.ते चित्र मला मनापासून खूपच आवडले. मग आपणही असे काही तरी रात्रीचा खांबावरून सुंदर पिवळा प्रकाश व सावल्या पडलेल्या आहेत, हा विषय घेऊन जबरदस्त ‘ नाईटस्केप ‘ करायचेच हा मी पक्का निर्धार केला व मग स्पॉटची पहाणी करत मी रात्रीचा फिरायला लागलो. त्यावेळी मी शाळेच्याच परिसरातच राहत होतो.अगदी कसून पहाणी केल्यानंतर माझ्या हे लक्षात आले की बिलीमोरिया शाळेच्या प्रवेश करण्याच्या मुख्य रस्त्यालगत असा  म्युनिसिपालीटीचाच एक उंच खांब आहे. तेथुन झाडांच्या रस्त्यावर पडलेल्या पिवळ्या प्रकाशामुळे छान सावल्या पडतात व तो परिसर चित्रित करण्याजोगा आहे. म्हणून मी त्याचा अभ्यास सुरु केला. रात्रीच्या ११ वाजल्यानंतर थोडा उशीरा गेलो तर गाड्यांची व माणसांची गर्दी देखील खूप कमी असते व निवांतपणे चित्र पुर्ण करता येईल हे माझ्या लक्षात आले.

– क्रमशः भाग पहिला

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आंदोलनं  झोक्याची–झेप फिनिक्सची –  भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

आंदोलनं  झोक्याची–झेप फिनिक्सची – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(मागील भागात आपण पाहिले- माहेरचे लोक त्यांना “आता इकडेच रहा ” म्हणत होते. तेव्हा सीताबाईंनी निक्षून सांगितलं , “मुंबईचं माझं घर हक्काचं होतं , ते काळानं हिरावून नेलं .आता मी कोल्हापूरच्या घरात राहिले तर, सासर आणि माहेर अशी मला दोन घर मिळतील. दोन्हीकडे मी राहू शकेन. पण माहेरीच राहिले तर सासर तुटेल “. एक बुद्धिमान स्त्रीच इतका विचार करू शकेल. आता इथून पुढे )            

मौजमजेच माहेरपण आठ-दहा दिवसाच छान असतं. पण अशा अवस्थेतलं माहेरपण त्यांना नकोसं वाटायला लागलं . सीताबाईंचे सासरे केशवराव, आपल्या सुनेच्या अंगातली हुशारी कर्तबगारी ओळखून होते. अंबू त्यांची लाडकी नात होती . एके दिवशी घरात तसे सांगून, सुनेला आणि नातींना  माहेरून आणायला  ते स्वतःच गेले. सीताबाईंना यावेळी सासरी आल्यावरच बरं वाटलं. सासूबाई सावत्र. त्यांना मनापासून ही जबाबदारी नको होती. पण त्या काही बोलू शकत नव्हत्या. सीताबाईंवर अनेक बंधन आली. काळच तसा होता तो. स्वयंपाक सोळ्यातला . तेथेही त्यांना मज्जव. पाणी हवं असलं तरी पाण्याला शिवायचं नाही. मुलींकडून मागून पाणी घ्यायचं. कोणी आलं तरी तिने पुढे जायचं नाही.  केर- वारे,  चूल ,पोतेरे, दळण, कांडण , निवडण हीच काम त्यांनी करायची. 19 –20 वर्षांची , ऐन तारुण्यातली विधवा असा डाग लागला होता तिला. कोणीही सीताबाईंना तिरकस बोललेलं सासऱ्यांना मात्र आवडायचं नाही.

मुली कधी मोठ्या होणार ? या सतत पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर सीताबाईंना हळूहळू मिळायला लागलं. सगळेच दिवस सारखे नसतात. कोणी , कोणी मदतीसाठी, कोणाच्या बाळंतपणासाठी, कामासाठी सीताबाईंना बोलवायचे. पण सासरे स्पष्टपणे नकार द्यायचे. आता मुलीही थोड्या मोठ्या झाल्या. आजोबांच्या लाडक्या होत्या त्या. आता झोका हळूहळू दुरुस्त झाला. त्याला ऊर्जा मिळायला लागली . वेळ मिळेल त्यातून सीताबाई मुलींचा अभ्यास घ्यायला लागल्या. शिकविण्यातली आत्मीयता आणि मुलींची हुशारी सासऱ्यांच्या नजरेतून  सुटली नाही. एके दिवशी त्यांनी सीताबाईंना सांगितलं, ” फक्त काम काम आणि घर अशा कुंपणात राहून, तू तुझं आयुष्य खर्ची घालू नको. शेजारची आणखी चार-पाच मुलं आली तर त्यांनाही शिकव. आणि तसंच झालं. आणखी चार-पाच मुलांना शिकवणं सुरू झालं. आता झोक्याला आणखी ऊर्जा मिळायला लागली . सीताबाई मुलांना, अभ्यासाबरोबर स्तोत्रं, नैतिकतेचे धडे, सणांच महत्व, त्या सणांशी जोडल्या गेलेल्या आख्यायिका अगदी रंगवून रंगवून सांगायच्या. मुलांबरोबर पालकही खुश होते. त्यांच्या शिकवण्याची ख्याती सर्वत्र पसरायला लागली. मुलांची संख्या वाढायला लागली. सीताबाईंना शिकविताना हुरूप वाटायला लागला. शिकविताना त्या रंगून जायला लागल्या. दुःखातलं मन दुसरीकडे वळायला लागलं. सर्वजण त्यांना बाई ,बाई म्हणता म्हणता       ” शाळेच्या आई ” असंच म्हणायला लागले. आता त्या खऱ्या अर्थाने “शाळेच्या आई”, झाल्या. घरातल्या सोप्याचं  रुप पालटून त्याला शाळेत स्वरूप आलं. ” नूतन ज्ञानमंदिर “, अशी पाटी लागली. आता एक मदतनीसही त्यांनी घेतल्या. आता झोका उंच उंच जायला सुरुवात झाली . शिकवत असताना, सीताबाईंना नवनवीन कल्पना सुचायला लागल्या .संक्रांतीला मुलांना हातात तिळगुळ देण्यापेक्षा, अगदी दीड दोन इंचाच्या, वेगवेगळ्या आकाराच्या रंगीत रंगीत कापडी पिशव्या, कल्पकतेने शिवून, त्यातून मुलांना त्या पिशव्यातून तिळगुळ द्यावा, अशा कल्पनेला त्यांनी मूर्त स्वरूप दिलं. वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या बघून मुलं ही खुष व्हायची. शाळेचं  गॅदरिंग म्हणजे पर्वणी असायची. पालक, विद्यार्थी उत्साहाने, आनंदाने भारून गेलेले असायचे. शिवणकाम , विणकाम , संगीत, काव्य लेखन,  नाट्य लेखन या सर्वांबरोबर कार्यक्रमाचे नियोजन, यात सीताबाईंचा हातखंडा होता. सीताबाई –शाळेच्या आई, स्वतः गाणी तयार करून, मुलांकडून बसवून घेत. स्वतःच्या गोड गळ्यातून म्हणत असत. मुलांना स्वतः सजवत असत. कृष्णाचा एक पोषाख तर त्यांनी कायमचा  शिवून ठेवला होता . ध्रुव बाळ, भरतभेट,  राधाकृष्ण,  हनुमान, राम सीता यांच्या नाटिका स्वतः लिहून, मुलांकडून उत्तम अभिनयासहित करून घ्यायच्या. “कृष्णा sss मजशी बोलू नको रे, घागर गेली फुटून”,असा नाच करताना  छान ठेका  धरला जायचा. ” बांधा उखळाला हो, बांधा उखळाला, या नंदाच्या कान्ह्याला बांधा उखळाला.” गाणं चालू झालं की मुलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून पालक आणि प्रेक्षक यांनाही आनंद व्हायचा . सगळं झालं की मुलांना खाऊ दिला जायचा. छोटी छोटी बक्षीस दिली जायची. हसत हसत मुलं घरी जायची . गोड स्वप्न बघत झोपी जायची. दुसरे दिवशी पालक, शाळेच्या आईंचं कौतुक करून खूप छान छान अभिप्राय द्यायचे. ते ऐकून सीताबाईंना आनंद आणि स्वतः विषयी अभिमान वाटायचा. नवनवीन कल्पनांचा उदय व्हायला लागला. झोक्याला ऊर्जा मिळायला लागली .आणि झोका उंच उंच जायला लागला. सुट्टी सुरू झाली की  त्या माहेरी जात. तेथेही आलेल्या भाचरांचं नाटक, गाणी , नाच तयार करून ,अगदी पडदे लावून, शेजार  पाजार्‍यांना बोलावून गॅदरिंग घ्यायच्या. वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन बक्षीस द्यायच्या . भाचरं आनंदात असायची. त्यांना आत्या हवीहवीशी वाटायची . कोणावरही येऊ नये असा प्रसंग सीताबाईंवर आला. आईचीच दोन बाळंतपणं त्यांना करावी लागली. एका तरुण विधवा मुलीला आईचे बाळंतपण करताना आणि आईला करून घेताना मनाला काय यातना झाल्या असतील त्या शब्दात सांगणे कठीण आहे.

बघता बघता सीताबाईंनी समाजकार्यालाही सुरुवात केली. प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षणाची आता पहाट व्हायला लागली होती . अनेक स्त्रियांना साक्षरतेचा आनंद त्यांनी मिळवून दिला. स्वदेशीचा पुरस्कार आणि परकीय कपड्यांवर बहिष्कार म्हणून टकळीवर सुतकताई त्यांनी सुरू केली.

सासर्‍यांचा भक्कम आधार, धाकट्या जावेची मदत, शाळेतल्या गोड चिमुकल्यांच्या सहवासाचा विरंगुळा आणि आनंद, स्वतःची ध्येयनिष्ठा आणि कष्ट , श्री अंबाबाईचा वरदहस्त आणि अखेर नियती या सर्वांच्या एकत्रित ऊर्जेने  झोक्याचे आंदोलन उंच उंच होत गेले . त्या उंच गेलेल्या झोक्याकडे सगळेजण आश्चर्याने पाहत राहिले. अरे वा ss वा, वा ss वा खूपच कौतुकास्पद ! सीताबाईंना आनंदाची आणि उत्साहाची ऊर्जा मिळाली. आणि त्या, ” घरात हसरे तारे असता sas, ”  या गाण्याचा चालीवर स्वतःच्या शब्दात  गाणे गुणगुणायला लागल्या.

मी पाहू कशाला कुणाकडे, मी पाहू कशाला जगाकडे.

घरात ज्ञान मंदिर असता, मी पाहू कशाला कुणाकडे.

    गोड चिमुकली गोजिरवाणी.

    हसती खेळती गाती गाणी.

     मला बिलगती आई म्हणुनी.

उंच माझा झोका पाहता, आनंदाचे उडती सडे.

मी पाहू कशाला कुणाकडे , मी पाहू कशाला जगाकडे.

– समाप्त –

(सत्य घटनेवर आधारित कथा)

  ©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलीची आई… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

🍃 मुलीची आई… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)  

मुलीची आई असणं किती भाग्याचं!!

आई ग्ग.. चटका लागून जीव कळवळला..

इवलीशी पावलं स्टूल वर चढून बर्नोल घेऊन आली..

आई भाजलं ना तुला..

फुंकर घालत क्रीम लावली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

आई ,आई, थांब ती पिशवी दे माझ्याकडे..

तू पिल्लूला घेतलंय ना..

ओझं होईल तुला..

छोटासा का होईना पण भार हलका करून पळाली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

पिल्लू रडू नको ना..

आई येते आत्ता… अले अले..

गप बश..गप बश..

माझ्या माघारी ती आई झाली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

चप्पल नाही घातलीस आई तू?

राहू दे.. मी जाईन स्कूल बस पर्यंत..

वजनदार दप्तर इवल्या खांद्यांवर चढवून तुरुतुरु गेली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

‘बाबा, आई चा बर्थडे आहे उद्या..

तिला मायक्रोव्हेव हवा आहे..

बुक करून ठेव हां..

आणि साडी आन.. पिकॉक ग्रीन कलरची.. तिला हवी होती कधीची..’ 

आईची आवड तिला कळाली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

आई ग, लग्नाला जायचंय ना तुला, साड्या प्रेस करून ठेवते आणि उद्या बॅग भरून देते..

शाळेच्या अभ्यासातही आई ची लगबग तिला लक्षात आली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

मामी, आईला ना सतरंजी नाही चालणार, गादी लागते, नाहीतर पाठ धरते तिची..

लेक्चर्स प्रॅक्टिकल, सबमिशनच्या धामधुमीत

आईची गरज तिने ओळखली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

दादा, तू फराळाचं सामान न्यायला हवं होतं.. किती आनंदाने केलं होतं तिने..

तेवढ्याचं ओझं झालं तुला. पण आई किती हिरमुसली.

आईची माया तिला उमजली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

दुपारच्या निवांत क्षणी टीव्ही पाहताना अलगद डोळा लागला,

 ऑफिसच्या लंच ब्रेक मध्ये आलेली ती, मला पाहून पाय न वाजवता अंगावर पांघरूण घालून गेली,

शाल नव्हे, लेकीने मायची मायाच पांघरली,

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

लग्न, संसार, मूलबाळ, जबाबदाऱ्या, करिअर, सारं सारं सांभाळून ‘ गोळ्या घेतल्यास का, बरी आहेस का, डॉक्टरांकडे जाऊन आलीस का, दगदग करू नकोस, मी किराणा ऑर्डर केलाय..घरी येऊन जाईल, प्रवासाची दमलीयेस स्वयंपाक करू नको.. डबा पाठवतेय दोघांचाही, अजून काय काय अन् काय काय..

लेक होती ती माझी फक्त काही दिवस..त्यानंतर तिच्यात उमटली आईच माझी.. 

मीच नाही, आम्हा दोघांचीही आईच ती..

लोक म्हणतात, देव सोबत राहू शकत नाही म्हणून आई देतो,

आई तर देतोच हो, पण आईला जन्मभर माय मिळावी म्हणून आईची माया लावणारी लेक देतो..

मुलगा हा दिवा असतो वंशाचा पण मुलगी दिवा तर असतेच, सोबतच उन्हातली सावली, पावसातली छत्री, आणि थंडीत शाल असते आईची.. किंबहुना साऱ्या घराची…

हे शब्द तर नेहमीच वाचतो आपण, पण जाणीव तेव्हा होते जेव्हा आपलंच पिल्लू कोषातून बाहेर पडून पंख पसरू बघतं आपल्याला ऊब देण्यासाठी,

परी माझी इवलीशी खरंच कधी मोठी झाली कळलंच नाही……

सर्व आईना व लेकीना समर्पित

लेखक : अनामिक 

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ काळ आला होता पण… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– काळ आला होता पण…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

देशाची प्रगती | श्रमिकांचे काम |

तेच  पुण्यधाम  | त्यांच्यासाठी ||१||

बोगदा बनला | मृत्यूचा  सापळा |

आमंत्रण काळा | देण्यासाठी ||२||

एक्केचाळीस ते  | कठोर श्रमिक |

मृत्यू अनामिक | वाटेवर ||३||

थरथरे भूमी  |  अडकले जीव |

मृत्यूची जाणीव  | मजुरांना ||४||

सेवेला तत्पर | बचाव पथक !

प्रयत्न अथक | देवदूत ||५||

प्रत्येक चेहरा | सुटकेचा भाव |

पुनर्जन्म  ठाव | याची देही ||६||

संकट मोचन | आला होता काळ !

नाही आली वेळ  | बिब्बा म्हणे ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 165 – गीत – और अब क्या चाहिये… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका भावप्रवण गीत –और अब क्या चाहिये।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 165 – गीत – और अब क्या चाहिये…  ✍

मिल गया मोती सरीखा मन

और अब क्या चाहिये।

 

कुसुम कुसुमित रूप के, रसके

सैकड़ों इस बाग में देखे

सुमन सुरभित कब कहाँ किसने

पलझरों के भाग में लेखे ।

सुमन ने सादर बुलाया है और अब क्या चाहिये।

 

अनगिनत है लोग जिनके

पास तक कोई भी जाता नहीं

एक टूटे गीत के मानिन्द हैं

कोई भी गाता नहीं।

खुद बाँसुरी आई अधर तक और अब क्या चाहिये।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 164 – “शायद आज पूर्ण हो पाये…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत  शायद आज पूर्ण हो पाये...)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 164 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “शायद आज पूर्ण हो पाये...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी

सुबह-सुबह उसके घर की

छप्पर धुंधुआती है –

जबभी ,भोजन मिलने की

आशा जग जाती है

 

लगती चिडियाँ खूब फुदकने

छपर पर सहसा

ताली खूब बजाता पीपल

जैसे हो जलसा

 

सारे जीव प्रसन्न तो दिखें

मुदित वनस्पतियाँ

पूरे एक साल में ज्यों

दीवाली आती है

 

घर के कीट पतंग सभी

यह सुखद खबर पाकर

एक दूसरे को समझाने

लगे पास जाकर

 

यह सुयोग इतने दिन में

गृहस्वामी लाया है

जिस की सुध ईश्वर को

मुश्किल से आपाती है

 

यों सारा पड़ोस खुश होकर

आशा में डूबा

शायद आज पूर्ण हो पाये

अपना मंसूबा

 

जो रोटीं उधार उस दिन

की हैं,  वापस होंगीं

ठिठकी यह कल्पना,

सभी की , जोर लगाती है

©  श्री राघवेन्द्र तिवारी

07-10-2023

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈



हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – इस पल ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि –  इस पल  ? ?

काश जी पाता फिर से वही पुराना समय…! समय ने एकाएक घुमा दिया पहिया।…आज की आयु को मिला अतीत का साथ…बचपन का वही पुराना घर, टूटी खपरैल, टपकता पानी।…एस.यू. वी.की जगह वही ऊँची सायकल जिसकी चेन बार-बार गिर जाती थी.., पड़ोस में बचपन की वही सहपाठी अपने आज के साथ…दिशा मैदान के लिए मोहल्ले का सार्वजनिक शौचालय…सब कुछ पहले जैसा।..एक दिन भी निकालना दूभर हो गया।..सोचने लगा, काश जो आज जी रहा था, वही लौट आए।

काश भविष्य में जी पाऊँ किसी धन-कुबेर की तरह!…समय ने फिर परिवर्तन का पहिया घुमा दिया।..अकूत संपदा.., हर सुबह गिरते-चढ़ते शेयरों से बढ़ती-ढलती धड़कनें.., फाइनेंसरों का दबाव.., घर का बिखराव.., रिश्तों के नाम पर स्वार्थियों का जमघट।..दम घुटने लगा उसका।..सोचने लगा, काश जो आज जी रहा था, वही लौट आए।

बीते कल, आते कल की मरीचिका से निकलकर वह गिर पड़ा इस पल के पैरों में।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 मार्गशीर्ष साधना 28 नवंबर से 26 दिसंबर तक चलेगी 💥

🕉️ इसका साधना मंत्र होगा – ॐ नमो भगवते वासुदेवाय 🕉️

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈