मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मुक्तगंध ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ मुक्तगंध ☆ श्रीशैल चौगुले ☆

फुलवीत जावे   मनात आनंद

विसरुन दुःखी   हृदयाचे स्पंद.

 

भावना आवेग  आवरीत जावे

आवेशी न व्हावे   जगणेचा छंद.

 

प्रारब्धाचे भोग   जन्मांतरी योग

नको भवरोग    इंद्रिये आक्रंद.

 

भक्तियाचा नाद  अंतरीत साद

परमात्म  बोध    कायेशी संबंध.

 

स्मरावेत  शब्द   संतश्लोक  ऋणा

त्या पाऊलखूणा  मृत्यू मुक्तगंध.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवन यात्रा ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ जीवनयात्रा ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

रोज थोडा पथ नवा

जीवन एक तीर्थयात्रा

सुखदुःख “थांबे” असे

प्रवासात या सतरा

 

भान ठेवू, चालताना

अवघड – सोपी वाट

वळणावळणा वर

आशा निराशेचा काठ

 

भावनांचा कल्लोळ तो

भार आता साहवेना

काय खरे,काय खोटे

माया मोह तो, सुटेना

 

पाप पुण्याच्या राशी तू

ओलांडून जात रहा

जन्म मरणाची वेळ

तटस्थ, पाहात रहा

 

पैलतीर खुणावतो

दोन क्षणांचा विसावा

सत्कर्मी त्या सेवाधर्मी

हृदयीचा राम दिसावा.

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

२९/३/२०२१

विश्रामबाग, सांगली.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काय करतील गांधीजी ? ☆ प्रा. अशोक दास

प्रा. अशोक दास

 ☆ कवितेचा उत्सव ☆ काय करतील गांधीजी ? ☆ प्रा. अशोक दास ☆ 

महात्मा गांधी म्हणायचे

सर्वांनी सत्याने वागायचे

इथे सारेजण सत्य सोडलेले

असत्याचे पाठीराखे झालेले

            काय करतील गांधीजी?

 

      गांधीजी अहिंसेचा संदेश देती

      इथे दगड प्रत्येकाच्या हाती

      एकमेकावर सारे तुटून पडती

      स्व अस्तित्व  टिकवण्यासाठी

             काय करतील गांधीजी ?

 

गांधीजी म्हणायचे त्याग करा

इथे भोगवाद हाच खरा

सारेच घ्यायला हावरट झालेले

घरे भरण्यासाठी आसुसलेले

       काय करतील गांधीजी ?

 

आता तरी बदलूया

 महात्म्याला आठवूया

देश नवा घडवूया

अभिमान वाटेल असे वागूया

नाहीतर काय करतील गांधीजी ?

 

          सत्य,अहिंसा, स्विकारुया

          भ्रष्टाचाराला त्यागूया

          इतरांसाठी थोडे झटूया

         आणि अभिमानाने म्हणूया

         आमचे राष्ट्रपिता म.गांधीजी

 

© प्रा. अशोक दास

..इचलकरंजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 74 – माय माझी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 74 – माय माझी ☆

माय माझी बाई।

अनाथांची आई।

सर्वा सौख्यदाई।

सर्वकाळ।

 

घरे चंद्रमौळी।

स्नेह शब्दावली।

दारी रंगावली।

प्रेमस्पर्शी।

 

पूजते तुळस।

मनी ना आळस।

घराचा कळस।

माझी माय।

 

पै पाहुणचार।

करीत अपार।

 देतसे आधार।

अनाथासी।

 

संस्काराची खाण।

कर्तव्याची जाण।

आम्हा जीवप्राण ।

माय माझी।

 

गेलीस सोडूनी।

प्रेम वाढवूनी।

जीव वेडावूनी।

 माझी  माय।

 

लागे मनी आस।

जीव कासावीस।

सय सोबतीस।

सर्वकाळ।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मेघदूत ☆ महाकवी ग.दि. माडगूळकर ☆

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

Best Bhojpuri Video Song - Residence w

जन्म – 1 ओक्टोबर 1919  मृत्यु – 14 डिसेंबर 1977 ☆

☆ कवितेचा उत्सव ☆ मेघदूत ☆ महाकवी ग.दि. माडगूळकर ☆  

मेघदूत

जा घेऊन संदेश !

मेघा,जा घेऊन संदेश!

उल्लंघुनिया सरिता,सागर,नानापरिचे देश

 

रणांगणावर असतील जेथे

रणमर्दांची विजयी प्रेते

गगनपथाने जाऊन तेथे

प्राणसख्याच्या कलेवराचा निरखून घे आवेश

 

हाडपेर ते थेट मराठी

हास्य अजूनही असेल ओठी

शवे शत्रूंची असतील निकटी

अंगावरती असेल अजूनी सेनापतीचा वेष

 

अर्धविलग त्या ओठांवरती

जलबिंदूंचे सिंचून मोती

राजहंस तो जागव अंती

आण उद्याच्या सेनापतीला जनकाचा आदेश

 

डोळ्यांमधली तप्त आसवे

थांबच देत्ये गड्या तुजसवे

पुढे न आता मला बोलवे

सांग गर्भिणी खुशाल आहे पोटीचा सेनेश

 

ज्योतीसाठी जगेल समई

भिजविल तिजला रूधिरस्नेही

वाढत जाईल ज्योत प्रत्यही

नकाच ठेऊ आस मागची,इतुके कुशल विशेष

 

जा घेऊन संदेश !

मेघा,जा घेऊन संदेश!

उल्लंघुनिया सरिता, सागर,नानापरिचे देश.

 

गीतकार- महाकवी ग.दि. माडगूळकर

चित्र : साभार Gajanan Digambar Madgulkar – Wikipedia

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈




मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 91 – प्रगल्भ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 91 – विजय साहित्य ?

☆ ✒ प्रगल्भ ✒  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

आयुष्यात  नाजूक वळणावर

जरा पाऊल घसरले

किंवा चुकून वाकडे पडले की

काजवे चमकावेत तशी चमकते

वेदनेची दिशा. . . . !

जगण्याची   आशा

मरू देत नाही

मनाला झालेल्या जखमा

धड जगूही देत नाहीत

जातील हेही दिवस जातील

धीराचे बोल कानी पडतात

यातनांची कूस पुन्हा  उजवते

भाकरीचा चंद्र दिसताच लागते

प्रगल्भ तेची आच.

वर्षानुवर्ष कपाळावरचा लाल सूर्य

माये वेदनेला प्रसवीत चाललाय

अन तू करतेस प्रवास

आम्हा लेकरांचे कारण सांगून. . .

अजून किती दिवस, किती वर्षे

बघायची रात्र

बघायचा दिवस

नव्या नव्या वेदनांनी

नशीब बडवत चाललेला.

माये,  चुलीतला जाळ

मनाची  आग

स्वतःच स्वतःवर काढलेला राग

चालूच देत नाही नवीन वाट.

पावलही आता फितूर झालीत

पुन्हा पुन्हा घसरतात.

वाकडी पडतात

मनाला वंचित करतात

इवल्याशा सुखापासून.

तरीही  स्वतःला घडवायचं

प्रगल्भ बनवायच. . . .

जीवनवाटेवर चालताना

वाट सरळ असली  नसली तरीही. . . . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – काव्यानंद ☆ नाच नाचुनी अति मी दमले – गदिमा ☆ कवितेचे रसग्रहण – डॉ सौ सुषमा खानापूरकर

Best Bhojpuri Video Song - Residence w

?  काव्यानंद  ?

 ☆ नाच नाचुनी अति मी दमले – गदिमा ☆ कवितेचे रसग्रहण – डॉ सौ सुषमा खानापूरकर ☆

नाच नाचुनी अति मी दमले

थकले रे नंदलाला

 

निलाजरेपण कटिस नेसले, निसुगपणाचा शेला

आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला

उपभोगांच्या शतकमलांची कंठी घातली माला…

थकले रे नंदलाला….१

 

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला

अनय अनीती नूपूर पायी, कुसंगती करताला

लोभ-प्रलोभन नाणी फेकी मजवरी आला गेला…

थकले रे नंदलाला…२

 

स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला

तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठून गेला

अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला….

थकले रे नंदलाला…..३

 

रचनाकार गदिमा

 

माणूस जन्माला येतो त्या क्षणापासून त्याला सतत काहीतरी हवं असतं. जन्मल्याबरोबर श्वास घेण्यासाठी हवा पाहिजे असते. त्यासाठी तर तो रडतो.  या जगण्याची सुरुवातच तो काहीतरी हवंच आहे आणि त्यासाठी रडायचे अशी करतो. हे हवेपण (आसक्ती) आणि त्यासाठी रडणे आयुष्यभर सोबतीला घेतो. सुखाच्या शोधात दाहीदिशा वणवण भटकतो. सुखाची साधने गोळा करतो. पण नेमके सुख तेवढे हातातून निसटून जाते आणि दुःख अलगद पदरात पडते. सुखाशी लपंडाव खेळून खेळून शेवटी थकून जातो. पण पूर्वसुकृत म्हणा किंवा पूर्वपुण्याई म्हणा काही बाकी असेल तर जरा भानावर येतो. त्याला  समजतं की अरे सुखाचा शोध घेण्यात माझं काहीतरी चुकतंय!

जीवाच्या या भावभावनांची मानसिक आंदोलने गदिमांनी (कलियुगातील ऋषीमुनी) अगदी अचूक टिपली आहेत. लहानपणापासून तारुण्यापर्यंत दारिद्रय दुःख अवहेलना यांचे आतोनात चटके गदिमांनी सोसले.  अंतःकरण होरपळून निघाले पण म्हणतात ना, आंबट तुरट आवळ्याचा मधूर मोरावळा करायचा असेल तर त्याला उकळत्या पाण्यात टाकून नंतर टोचे मारुन मग कढत कढत पाकात घालतात. पण त्यामुळेच हा पाक अगदी आतपर्यंत झिरपतो आणि मग मधूर चवीचा औषधी गुणधर्म युक्त मोरावळा तयार होतो.

गदिमांच्या बाबतीतही अगदी हेच घडले. आणि मग भगवत् भक्तीच्या पाकात हे दुःखाने घरे पडली आहेत असे अंतःकरण घातल्याबरोबर त्यातून इतक्या सुंदर अक्षर अभंग रचना बाहेर पडल्या की त्या अगदी संतवाङमयाच्या पंक्तीत जाऊन बसल्या. जग हे बंदीशाला, विठ्ठला तू वेडा कुंभार, गीतरामायण अशी काव्ये लिहून त्यांनी स्वतःबरोबरच रसिकांना सुद्धा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

आयुष्यात सुखाचा शोध करुन करून थकलेला हा जीव! जीव हा प्रकृतीच्या आधीन म्हणजे प्रकृतीच. ती स्त्रीलिंगी,  आणि परमात्मा पुल्लिंगी! (ही भाषा सुद्धा मायेच्या प्रांतातीलच! बाकी जीवाशिवाला व्याकरणाशी काय देणे घेणे?) म्हणून हा जीव, ही प्रकृती त्या श्रीकृष्ण परमात्म्याला कळवळून सांगतेय की ..

नाच नाचुनी अति मी दमले थकले रे नंदलाला

निलाजरेपण कटिस नेसले निसुगपणाचा शेला

आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला

उपभोगांच्या शतकमलांची कंठी घातली माला

थकले रे नंदलाला

आयुष्यभर स्वतःची वासना तृप्त करण्यासाठी नको नको ती सगळी कर्मे केली. तेंव्हा जीवाला (प्रकृतीला) जराही लाज वाटली नाही. हे निलाजरेपण कमरेला वस्त्राप्रमाणे घट्ट बांधले होते. निसुगपणाचा निरुद्योगीपणाचा आळशीपणाचा शेलाही त्यावरुन गुंडाळून घेतला. कधीही कुठलेही सत्कृत्य, मानवतेची सेवा, ईश्वरसाधना करण्याचा आळस मी कधी  सोडला नाही. इतके दुर्गूण अंगी असूनही स्वतःच स्वतःची स्तुती करणे, मोठेपणा मिरवणे आणि इतरांकडूनही स्वतःची वाहवा ऐकणे यातच धन्यता मानली. या आत्मस्तुतीने माझा अहंकार सुखावला, मला गर्व झाला, घमेंड आली. पाखंड माजले. तेच या भाळावर कुंकवाचा टिळा लावावा तसे लावून मिरविले.  त्या मस्तीतच सगळ्या भौतिक गोष्टींच्या उपभोगात रममाण झाले, सुखावून गेले. खूप नाच नाच नाचले. अखेरीस थकून गेले. या मायिक भौतिक सुखांना आतून दुःखाचे अस्तर, दुःखाची झालर लावलेली आहे याचे भान मला फार उशिरा आले.

नंदलाला,  मी थकले रे

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला

अनय अनीती नूपूर पायी, कुसंगती करताला

लोभ-प्रलोभन नाणी फेकी, मजवरी आला गेला

विषयवासनेची वीणा कानाशी वाजत होती. मनातील वासना तृप्त होण्याचे नाव घेत नव्हती. या अतृप्तीच्या तालावर या वासनेच्या वीणेची तुणतण ऐकत मी बेभानपणे नाचत राहिले. अन्यायी वर्तणूक

अनीतीचे आचरण  यांचे जणू पायांत  नूपूर बांधले होते. कुमार्गावर पावले नाचत नाचत वेगाने चालली होती. माझ्यासारख्याच दुर्वर्तनी मंडळींची कुसंगती हातांवर टाळ्या देत होती. माझ्याकडून काही हवे असेल तर माझी स्तुती गाऊन ही मंडळी ते ओरबाडून घेतच होती. माझ्यावर लोभ-प्रलोभनांचा वर्षाव करुन मला त्यातून बाहेर पडूच देत नव्हती. विषयोपभोग, खोटी स्तुती, घमेंड, ढोंग/पाखंड या साऱ्या मोहनिद्रेत मी स्वतःलाच विसरून गेले.

नंदलाला, मी थकले रे

स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला

तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठून गेला

अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला

नाचता नाचता स्वतःभोवती गिरक्या घेत होते. ह्या गिरक्यांनी मला भोवळ आली. डोळ्यांपुढे अंधारी आली. आपलं काय परकं काय काहीच दिसेना, काहीच कळेना. या बेताल वागण्याने, नाचण्याने माझा तोल जाऊ लागला. जगण्याचा ताल चुकला, लय चुकली. जीवनसंगीत बेसूर बेताल झाले. माझे कान बधीर झाले. इतके की मला माझ्याच अंतर्मनाची साद, हाकही ऐकू  येईना. तो साद गोठून गेला.

भगवंता, आता समजतंय की सुख देण्याची या विषयोपभोगांची क्षमता फार कमी आहे आणि उपभोग घेऊन त्यातून सुख घेण्याची माझ्या इंद्रियांची क्षमता, ताकद सुद्धा फार तोकडी, फार फार अपुरी आहे . खरे सुख कुठेतरी हरवून, हरपून गेले आहे. शोध घेता घेता मी फार थकून गेले,. या अज्ञानाच्या अंधःकारात  डोळे असूनही मोहाची पट्टी डोळ्यांवर बांधल्यामुळे आंधळ्याप्रमाणे चांचपडू लागले, ठेचकाळू लागले. जीव आता जगण्याला भ्यायला. जगण्याचीच भीती वाटू लागली. जीवातील चैतन्य हे सत् म्हणजे निरंतर अस्तित्वात असणारे चैतन्य

आहे, तेच साक्षात सुखस्वरूप आहे याचा विसर पडला आणि थकून गेले रे!

नंदलाला मी थकले रे

© डॉ सौ सुषमा खानापूरकर

भुसावळ

मो 8600939968

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – काव्यानंद ☆ एक धागा सुखाचा – गदिमा ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. विद्या वसंत पराडकर

सौ. विद्या वसंत पराडकर

?  काव्यानंद  ?

Best Bhojpuri Video Song - Residence w

 ☆ एक धागा सुखाचा – गदिमा ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. विद्या वसंत पराडकर ☆

मराठी‌ सारस्वतांच्या आकाशातील एका दैदिप्यमान  ता-याप्रमाणे असणारे,महान‌ लेखक, कविवर्य,गीत रामायण कार ग. दि. माडगुळकर यांच्या

जन्म दिवशी  आदरांजली म्हणून त्यांनी च लिहिलेल्या एका अमर कलाकृतीचे म्हणजेच चित्रपट गीताचे रसग्रहण करीत आहे.

हे गीत १९६० च्या  “जगाच्या पाठीवर” या चित्रपटाने अजरामर केले आहे.पडदयावर  हे गीत “राजा परांजपे” या अष्टपैलू कलाकाराने  गायले असून सुधीर फडके यांच्या सुरेल गळ्यातून  स्वरबद्ध झाले आहे.हे गीत मराठी मनावर एखाद्या शिल्पा सारखे कोरल्या गेले आहे.

भारतीय संस्कृतीत त्रिवेणी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.हेच महत्त्व साहित्य,कला, संगीत या क्षेत्रालाही आहे. कविवर्य ग.दि.मा. ; संगीतकार गायक सुधीर फडके, जेष्ठ अभिनेते राजा परांजपे या त्रयीनी एका नाविन्यपूर्ण कलाकृतीची म्हणजे  एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे म्हणजे हे गीत होय. म्हणून हे गीत मराठी मनावर‌ अधिराज्य करीत आहे. या गीतांवर आजही प्रशंसेचा पाऊस पडत आहे.

“एक धागा सुखाचा”

एक धागा सुखाचा, शंभर  धागे दुःखाचे

जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे

एक धागा सुखाचा…||धृ||

 

पांघरसी जरी असला कपडा

येसी उघडा, जासी उघडा

कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे

एक धागा सुखाचा…

 

मुकी अंगडी बालपणाची, रंगित वसने तारुण्याची

जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे

एक धागा सुखाचा….

 

या वस्त्राते विणतो कोण? एकसारखी नसती दोन

कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे

एक धागा सुखाचा….

                                  – ग.दि.मा.

हे काव्य १५ ओळींचे आहे . ३ कडवे व धृवपद आहे . मानवी जीवनातील एक कटू सत्य कविवर्याने जगा समोर मांडले आहे .

एक धागा सुखाचा , शंभर धागे दुःखाचे” हे त्रिकालाबाधित सत्य आहे . हे सत्य कविवर्यांनी  निरनिराळ्या दाखल्यातून स्पष्ट केले आहे . सुख व दुःखाच्या आडव्या व उभ्या धाग्यांनी हे जीवन वस्त्र विणले आहे . प्रत्येकाला या जीवनानुभवाला सामोरी जावे लागेल . प्रत्येक  वस्त्र एक सारखे नसते . यात विभिन्नता असते .

मानवी आयुष्यावर तीन अंकी नाटकाचे  रूपक केले आहे . नाटकात साधारणतः तीन अंक , तीन प्रवेश असतात . पहिला बाल्य- नैसर्गिक अवस्थेचे वर्णन  उदा. “येसी उघडा” अंगडी , “टोपडी” या शब्द सौंदर्याने बालपण संपते .

त्या नंतर जीवन रूपी नाटकाचा दुसरा अंक सुरू होतो . तारुण्याच्या वसंत बहराने . या अवस्थेत शृंगाराला बहर आलेला असतो . उदा.- रंगीत वसने – हे शब्द सौंदर्य स्थल .जीवन रुपी नाटकाचा तिसरा अंक सुरू होतो . “वार्धक्याने” – शब्द प्रयोग – “वार्धक्याची शाल घेऊनच” . वृद्धत्वाच्या विदीर्ण सत्याचे केलेले वर्णन मोठे हृदयभेदक आहे . जीवनाचा शेवट शेवटी “जासी उघडा” या कटू सत्याने केला आहे.

प्रस्तुत काव्यातील उच्चतम बिंदू climax म्हणजे वस्त्रातील विविधता हे तर आहेच , परंतु विणक-याचे वस्त्र विणतांना हात दिसत नाही . कर्ता असून अकर्ता राहतो . ज्या प्रमाणे सूत्रधार , परमेश्वर हा जग चालवतो पण दिसत नाही , पपेट शो मध्ये सूत्रधार दिसत नाही . पण बाहुल्या नाचतात . या सुंदर त्रिकाल बाधित सत्याने काव्याला विराम दिला आहे .

इंग्रजी साहित्यातील प्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपिअर म्हणतो ; “जग ही रंगभूमी आहे .”   ग.दि.मा  म्हणतात “मानवी जीवन हे नाटक आहे”. प्रसिद्ध अभिनेता , दिग्दर्शक राज कपूर ह्याने “मेरा नाम जोकर” मध्ये असेच जीवनाचे तत्वज्ञान मांडले आहे .

वर वर बघता हे चित्रपट गीत वाटत असले तरी मानवाला अंतर्मुख करण्याचा प्रयत्न ह्यातून केला गेला आहे . या गीताद्वारे दिलेला संदेश वास्तविक सत्याची ओळख करून देणारा वाटतो . सारस्वताच्या उद्यानातील हे एक “evergreen” पुष्प आहे असे म्हंटल्यास अतिशयोक्ती होणार नाही . मराठी सारस्वताच्या मंदिरातील नंदा दीपा प्रमाणे हे गीत भविष्यातही प्रकाशमय होईल . “झाले बहू , होतीलही बहू , परंतु यासम नसे , या उक्ती प्रमाणे ते मैलाचा दगड ठरो . याच अपेक्षेत लिखाणाला विराम देते .

© सौ. विद्या वसंत पराडकर

पुणे  

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निसर्ग माझा सखा ☆ सौ. मनिषा रायजादे – पाटील

सौ. मनिषा रायजादे- पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ निसर्ग माझा सखा ☆ सौ. मनिषा रायजादे – पाटील ☆

सूर्याचे ते तेज l चंद्राचे ते ओज l

लखलखे साज l स्वर्गासम ll१ll

 

निळा निळा झुलाl पृथ्वीवर खुला l 

सुंदरशी माला l नभांगणी ll२ll

 

ऋतू नटवर l सोन्याची ती सर l

सजला शृंगारl चराचरी  ll३ll

 

गंध फुलवरा l उगवला तारा l

तेज निलांबरा l हिऱ्यासम ll४ll

 

निसर्ग सोबती l वनरानी मोती l

पाचू विखुरती l वसुंधरी ll५ll

 

हरित बिलोरी l वेलबुट्टीवरी l

तार ती झंकारी l मातीतून ll६ll

 

खळखळे झरा lअमृताच्या धारा l

सुगंधीत वारा lअद् भूत ll७ll

 

पाखरांचे स्वर l नाचे रानी मोर l

सुख धरेवर l फुलवीत ll८ll

 

तरुलता धुंद l भ्रमराला छंद l

चाखी मकरंद l मोहरून ll९ll

 

सागराच्या लाटा l ओथंबल्या वाटा l

इंद्रधनु छटा l उधळीत ll १०ll

 

वसुंधरा गीत lजीवनी अमृत l

जीव सुखावित l विश्वब्रम्ही ll११ll

 

विश्व पाठीराखा l निसर्ग हा सखा l

महती ओळखा l विधात्याची ll१२ll

 

© सौ.मनिषा रायजादे पाटील

ओंकार निवास, नवजीवन कॉलनी, मिरज, जि-सांगली

फोन नं-9503334279

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 80 – गाणं..! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #80 ☆ 

☆ गाणं..! ☆ 

आज इतके दिवसं झाले पण

पाखरं काही घरट्याकडे परतून आली नाही

जेव्हा पासून ह्या गर्द हिरव्या

पांनानी माझी साथ सोडली ना

तेव्हा पासून ह्या पाखरांनी ही

माझ्याकडे पाठ फिरवलीय

की काय कळत नाही…!

आता पहाटेचं कुणी

माझ्या तळहातावर बसून गाण

गात नाही…. आणि

आपल्या मनातलं काहीच

कुणी आता माझ्या कानात

कुजबुजत नाही…

इतक्या दिवसांत

सवय झालीय म्हणा आता

ह्या गोष्टींची

पण तरीही वाटतं

म्हातारपणात कुणाचा तरी

आधार असलेला बरा..!

सतत वाटतं राहतं

पाखरांनी यावं माझ्या तळहातावर

बसावं हवं तेवढा वेळ

गाणं म्हणावं…,

आता..! सावली देण्याइतके माझे

हात मजबूत राहीले

नसतील कदाचित…

पण इतकी वर्षे

सावली दिलेले,हे हातचं तुम्हाला

बोलावतायत ‘या… या…’

निदान ह्या हातांनी

माझी साथ सोडायच्या आत

मला एकदातरी भेटून जा…. !

माझ्या तळहातावर बसून

माझ्या साठी एखादं तरी गाणं गाऊन जा…!!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈