मराठी साहित्य – विविधा ☆ पुरणपोळी… अनामिक ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

?  विविधा ?

पुरणपोळी…अनामिक ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

पुरणपोळी ही भैरवीसारखी आहे. किमानपक्षी सूर नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की पुरणपोळीची वैगुण्यं क्षम्य आहेत !

पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा (जाणकारांसाठीच) आनंद आहे आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे.

डाळ निवडून घेणे इ. भूप, किंवा बिलावल आहेत. जास्त कसब गरजेचं नाही. कणिक मळणे हा खमाज आहे. रटाळ तरी थाटाचा असल्याने गरजेचा !

गूळ म्हणजे यमन!

यमन हा रागांचा राजा तसंच गुळाचं महत्व!

इथं तीव्र मध्यम श्रुतीमनोहरच लागायला हवा म्हणजेच गुळाचा हात नेमकाच पडायला हवा

(अन्यथा बट्ट्याबोळ!).

हां, आता ज्यांना जमत व गमतं

(‘प्रभू आजि गमला’ या अर्थाने) नाही ते दोन्ही मध्यम घेऊन त्याचा यमनकल्याण करतात म्हणजेच गुळात साखरही मिसळतात.

जायफळाची एखादी ठुमरी झाली की लगेच पुरण शिजवायचं ते अगदी देस रागाप्रमाणे. ‘गनिसा’ ही संगती देस ची ओळख (सिग्नेचर) तसंच, रटरट आवाजाबरोबर घमघमाट येणे ही पुरणाची सिग्नेचर मानावी. पुरण आणि देस हे ओघवते असावेत पण चंचल नकोत.

नंतर होरीप्रमाणे पुरणाचं वाटण करायचं. म्हणजेच लवकर आटपायचं …. ख्या ख्या

आता महत्वाचा ‘टप्पा’ ! पोळ्या करणे ! बिहागचा टप्पा साधायला कुण्या दिग्गज हाद्दूखान – हास्सूखान अशांचीच तालीम हवी. आणि सगळेच मालिनीताई होत नाहीत हे ही विनयशीलतेने मान्य करायला हवं. रागाला शरण जावं तशी निगर्वी शरणागती झाली तर हळूहळू जमेल. पण तपश्चर्या हवी.

आता अशा कमालीच्या रंगरस-संपन्न मैफलीत तराणा यावा तशी तुपाची धार!

तराणा मूळ आलाप-जोड यापासून वेगळा काढता येऊ नये अगदी तस्संच तुपानं पोळीशी अद्वैत करून असावं.

मग .. ‘जो भजे हरिको सदा’, ‘चिन्मया सकल ह्रदया”, “माई सावरे रंग राची” अशा विविध रूपांनी सर्वगुणसंपन्न भैरवीचं रसग्रहण करावं त्याप्रमाणे एकेक घास जिभेवर ठेऊन असीम आनंद घ्यावा. आणि मग “हेचि दान देगा देवा” अश्या थाटात ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणावं.

भैरवीचे सूर मनात दीर्घ काळ रेंगाळावेत तशी पुरणपोळीची चव जिभेवर रेंगाळावी. दिवस सार्थकी लागावा …… आयुष्य सार्थकी लागाव !!!

होळी पौर्णिमा आणि धुलीवंदनाच्या मनःपूर्वक  शुभेच्छा

।। ॐ नमःशिवाय ।।

संग्राहिका : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ किल्ल्या… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ किल्ल्या… ☆ सौ ज्योती विलास जोशी

एक वेळ आयुष्याची गुरुकिल्ली सापडेल…नव्हे! ती नाही सापडली तरी मिळालेलं आयुष्य सरत राहील पण एखादी महत्वाची किल्ली नाही सापडली तर तेच आयुष्य किल्ली सापडेपर्यंत थांबतं.अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा यक्षप्रश्न कधीतरी आयुष्यात एकदा सर्वांना पडतोच!

एका कुटुंबाचा विचार करता फ्लॅटची किल्ली, स्कूटरची किल्ली,कारची किल्ली, लॉकरची किल्ली, मोलकरणीला द्यायची डुप्लिकेट किल्ली, अशा अनेक किल्ल्या जपून ठेवाव्या लागतात. त्यातली एखादी जरी हरवली तर त्याची  संपूर्ण कुटुंबाला झळ लागते. आरोप दोषारोप यानं कुटुंबातलं वातावरण गढूळ होतं. छोटीशीच गोष्ट… परंतु लहान मोठ्याना तांडव करायला लावते. लपाछपीचा खेळ बराच वेळ चालतो आणि…… किल्ली सहजी सापडली तर मात्र ‘हुश्श्य’ असा उसासाचा सगळ्यांच्याच तोंडातून निघतो आणि नाट्याची इतिश्री होते.

समजा किल्ली नाहीच सापडली तर आपल्याकडे डुप्लिकेट किल्ल्या बनवणारी माणसं लगेच हाकेला ओ देतात. त्यांच्या किल्लीनं आपलं कुलूप खळकन उघडतं आणि थांबलेले क्षण लगेच पुढे सरकतात. कुठे हरवली असेल किल्ली? हा विचार करायला एका क्षणाचीही फुरसत आपल्याला नसते. योगायोगानं ती कधी नजरेला पडलीच तर. …. काय उपयोग आता? असं म्हणून लगेचंच  तिची किंमत शून्य होते..

क्षणभर मनांत विचार आला ….पूर्वीच्या काळी कधी किल्ल्या हरवत नसतील का? जानव्याला लावलेली, पोटाशी धरलेली, कमरेच्या केळात ठेवलेली, पदराच्या टोकाला बांधलेली, फडताळात बांधून ठेवलेली किल्ली जणू लाॅकर मध्येच असल्यासारखीच! कशी हरवेल बरं? लोकांची वृत्ती बदलली तसा कुलपाचा शोध लागला.जसे ते बेफिकीर झाले तसे किल्ल्या बनवणार्यांचा रोजगार वाढला.

या सर्वावर उपाय म्हणून लोकांनी स्वतःला एक शिस्त लावून घेतली की-होल्डर नावाची एक आकर्षक वस्तू घरात आली आणि सन्मानानं भिंतीवर विराजमान झाली. किल्ली कुटुंबातल्या कोणाचीही असो कितीही महत्त्वाची असो ती तिथेच असायची.क्षणभर ती तिथे दिसली नाही तरी हृदयाचे ठोके वाढायचे. ती किल्ली हरवू नये म्हणून आकर्षक की-चेन मध्ये तिला गुंफुन ठेवण्यात येऊ लागलं….

आताशा जसं जग हायटेक झालंय तशी कुलपाची संकल्पना बदलली. पर्यायानं किल्लीलाही पर्याय आले.चक्र आकडे वापरून तिजोऱ्या बंद होऊ लागल्या. दोन किल्ल्या असलेली कुलपं आली. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजेच विद्युत चुंबकीय किल्ल्या आल्या. पुढे किल्ल्यांच्या जागी बटनं आले. त्याही पुढे जाऊन आता पासवर्ड आला. प्रत्येकानं जपलेला पासवर्ड हाच त्याची किल्ली झाला. आता बाकी हद्द झाली.अंगठा, चेहरा यांच्या साह्यानेही कुलपे उघडू लागली.

अंगठा दाखवणे हा वाक्प्रयोगाचा अर्थच बदलला. नाहीं म्हणावयाचें झाल्यास, मूठ मिटून अंगठा किंवा नकार घंटा दाखवितात.दानाचं उदक देतांना सरळ तळहातावर पुढें बोटांवरून पाणी सोडतात पण पितरांस उदक देतांना वांकडा हात करून अंगठयावरून पाणी सोडतात त्यावरून, नाहीं म्हणणें, नकार देणें असा अर्थ होतो. अंगठा दाखवणे म्हणजे

फसविणें,ठकविणें,प्रथम आशा दाखवून शेवटीं धोका देंणें. पण आता अंगठा दाखवून काम फत्ते होऊ लागलं.’दिल सच्चा और चेहरा झुठा’ असही म्हणायची सोय राहिली नाही.नाही तर कुलूप रुसून बसायचं…….

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फिरूनी नवी जन्मेन मी.. ☆ सुश्री योगिता कुलकर्णी ☆

?विविधा ?

☆ फिरूनी नवी जन्मेन मी.. ☆ सुश्री योगिता कुलकर्णी ☆

 

अप्रतिम लिहिलंय हे गाणं सुधीर मोघेंनी…

“एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी….”

आयुष्य म्हटलं कि कष्ट आले, त्रास आला,

मनस्ताप आला, भोग आले आणि जीव जाई पर्यंत काम आलं…मग ते घरचं असो नाहीतर दारचं….

बायकांना तर म्हातारपणा पर्यंत कष्ट करावे लागतात…

८० वर्षाच्या म्हातारीने पण भाजी तरी चिरुन द्यावी अशी घरातल्यांची अपेक्षा असते….

हि सत्य परिस्थिती आहे…..

आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे रहाणारच……

त्यामुळे हि जी चार भांडीकुंडी आपण आज निटनिटकी करतो…ती मरेपर्यंत करावी लागणार…

ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्या सत्तरीतही करावा लागणार….

” मी म्हातारी झाल्यावर ,माझी मुलं खुप शिकल्यावर त्याच्या कडे खुप पैसे येतील मग माझे कष्ट कमी होतील” हि खोटी स्वप्न आहेत….

मुलं, नवरा कितीही श्रीमंत झाले तरी ..

“आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तु बनव..”

असं म्हटलं कि झालं…

पुन्हा सगळं चक्र चालु..

आणि त्या चक्रव्युहात आपण सगळ्या

अभिमन्यी….,😃

पण..पण ..जर हे असंच रहाणार असेल..

जर परिस्थिती बदलु शकत नसेल तर मग काय रडत बसायचं का ??

तर नाही…..

परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं…..

मी हे स्विकारलय…. खुप अंतरंगातुन आणि आनंदाने….

माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते….. खुप उर्जा आणि उर्मी नी भरलेली……

सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच उर्जेनी बोलु शकते आणि रात्री दहा वाजता ही…

आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असु देत….दुसरा दिवस हा नवाच असतो….

काहीच नाही लागत हो…

हे सगळं करायला…..

रोज नवा जन्म मिळाल्या सारखं उठा…

छान आपल्या छोट्याश्या टेरेस वर डोकावुन थंड हवा घ्या..आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा….

आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या..

इतकं भारी वाटतं ना….

अहाहा…..

सकाळी उठलकी ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो माझा…

अभंग एकत एकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला….ग्लास भरुन पाणी पिलं आणि मस्त…आल्याचा चहा पित…. खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना

कि भारी वाटतंं…..

रोज मस्त तयार व्हा….

आलटुन पालटुन स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करत रहा….

कधी हे कानातले ..कधी ते…..

कधी ड्रेस…कधी साडी….

कधी केस मोकळे…कधी बांधलेले….

कधी हि टिकली तर कधी ती….

सगळं ट्राय करत रहा….नवं नवं नवं नवं…

रोज नवं…..

रोज आपण स्वतःला नविन दिसलो पाहिजे….

स्वतःला बदललं कि…. आजुबाजुला आपोआपच सकारात्मक उर्जा पसरत जाईल……..तुमच्याही नकळत……

आणि तुम्हीच तुम्हाला हव्या हव्याश्या वाटु लागाल……

मी तर याच्याही पार पुढची पायरी गाठलेली आहे….

माझ्या बद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं कि माझे कान आपोआप बंद होतात….😃काय माहित काय झालंय त्या कानांना….😃

आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी असते….

मनातल्या मनात मस्त टुणटुण उड्या मारत असते…..

जे जसं आहे….ते तसं स्विकारते आणि पुढे चालत रहाते…

कुणी आलाच समोर कि..” आलास का बाबा..बरं झालं ..म्हणायचं…खिशात घालायचं कि पुढे चालायचं….

अजगरा सारखी…सगळी परिस्थिती गिळंकृत करायची….😃

माहीत आहे मला…

सोपं नाहीये….

पण मी तर स्विकारले आहे…

आणि एकदम खुश आहे….

आणि म्हणुनच रोज म्हणते….

” एकाच या जन्मी जणु…

फिरुनी नवी जन्मेन मी…

हरवेन मी हरपेन मी..

तरीही मला लाभेन मी…..”

#योगिता_कुलकर्णी…  यांच्या फेसबुक पेज वरुन साभार…🙏 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शेअरिंग… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ शेअरिंग… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

इतरांसह एकत्रितपणे काहीतरी  वस्तू वापरणं किंवा त्याचा आनंद घेणं म्हणजेच आजकालच्या भाषेत शेअरिंग. शेअरिंग ही एक प्रोसेस आहे. शेअर करणं म्हणजेच थोडक्यात एखाद्याला सरळ सरळ गिफ्ट देणं. हे शेअरिंग जागा, वेळ, पुस्तक, खेळ, खाऊ अशा कोणत्याही गोष्टींचं असू शकतं. तसं पाहिलं तर हा आजकलचा की- वर्ड झाला आहे. फाईल शेअरिंग, स्क्रीन शेअरिंग, मेसेजेस, फोटोज्, माहिती, व्हिडिओज् इ. इ. . . आजच्या न्यू ऑप्टिक युगात किंबहुना इंटरनेट कल्चर मध्ये हा एक अनेक कामं सुसंगत पणे पार पाडण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. आंतरजालाच्या म्हणजेच इंटरनेटच्या जाळ्यात गुरफटलेले आपण शेअरिंग शिवाय काम करूच शकत नाही. लॉकडाऊन च्या काळात; वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना तर  आंतरजालाच्या गुहेत संचार करण्यासाठी शेअरिंग खूपच महत्त्वाचं असतं. एवढंच नव्हे तर इंटरनेटचा वापर फारसा न करणारेही या आंतरजालात गुरफटलेले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर. . बघा हं. . .  काशी विश्वेश्वराचं जिर्णोद्धारामुळे बदललेलं भक्तीरस जागृत करणारं  रुप आपल्याला घरात बसून बघता येतं. . . . त्याचं नेत्रसुख मिळवता येतं, भाविकांना काशी दर्शनाचा लाभ मिळतो. हे शक्य होतं ते काशी विश्वेश्वराचा व्हिडिओ सोशल मेडियावर शेअर केल्यामुळेच ना!

इंटरनेट वर माहिती शेअर करणं हे आता फारच सामान्य झालं आहे. पण मुळात शेअरिंग करणं, एकमेकांना देणं, या आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग असलेल्या संकल्पनेला विसरत चाललो आहोत. आपल्या मागच्या पिढ्या शेअरिंग च्या बळावर वाढल्या, मोठ्या झाल्या. घरात बहिण भावंडांच्या बरोबर वह्या- पुस्तकं, रंगपेट्या, पोस्टर कलर्स, कंपास बॉक्स इतकंच काय कपडे देखील शेअर करुन वाढल्या या पिढ्या! आठवीत शिकणाऱ्या भावाचा भूमितीचा तास झाला की तो कंपास बॉक्स सहावीतल्या बहिणीकडं सुपूर्द केला जाई. केवढी सोय! केवढी बचत!! मोठ्या बहिणीचे कपडे घालण्यात लहान बहिणीला अपमान वाटत नसे.

मधल्या सुट्टीत डबा खाताना डब्यातील भाजी एकमेकांना दिली जाई. खिशातून आणलेल्या शेंगदाणे, फुटाणे, गोळ्या बिस्कीटं यांची देवाणघेवाण  नेहमीच होई. चिमणीच्या दातांनी रावळगाव आणि लिमलेटच्या गोळ्यांचा गोडवा वाढवला जाई.

आजच्या युझ ऍन्ड थ्रो च्या जमान्यात  मुलांना शेअरिंग शिकवावं लागतं. तेही जाणीवपूर्वक. न्युक्लिअर फॅमिलीच्या प्रॉब्लेम्सना तोंड देत वाढणारी ही पिढी, कोरोना व्हायरसनं त्रस्त झाली आहे. रंग रुप बदलतं, जगभर संचार करणाऱ्या या व्हायरसचं सोवळं पाळायलाच पाहिजे. ऑनलाईन शाळेमुळं एकत्र एका वर्गात, एका बाकावर बसून शिकणं जिथं नाही तिथं आपल्या दप्तरातल्या वस्तूंचं, डब्यातल्या खाऊचं शेअरिंग  केवळ अशक्य. चूकुन ही चूक झालीच तर . .बापरे. . शांतम् पापम्!!. किंबहुना मुलांना सुरक्षिततेसाठी शेअरिंग नको हेच नाईलाजानं शिकवावं लागतं. अर्थात सगळं माझंच आहे, एकट्याचंच आहे ही वृत्ती बळावली तर नवल नाही. एक तीळ सात जणांनी राहू दे, पण दोघांनी वाटून खाणं देखील दुरापास्त होऊन बसलंय. शेअरिंगमुळं केअरिंग वाढतं. असं जरी असलं तरी सध्या शेअरिंगचं फारसं केअरिंग न करणंच योग्य ठरेल.

कोरोना लवकरच गोठून जाऊ दे,  ‘केअरिंग’ करणारं माणसातलं खरंखुरं ‘शेअरिंग’ शेअर करता येऊ दे. . . तोपर्यंत टेक केअर.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! फेरा एकवीसचा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

💃 फेरा एकवीसचा ! 😅

“पंत हे तुम्ही काय चालवलंय ? “

“मोऱ्या अरे आज तुला झालंय तरी काय, नेहमी सारखा नमस्कार वगैरे करशील का नाही ?”

“नाही आणि करणार पण नाही,  कारण मी रागावलोय तुमच्यावर, म्हणून आज नमस्कार वगैरे विसरा !”

“ही तुला काही बोलली का मोऱ्या ?”

“काकू कशाला बोलतील मला?  मी तुमच्यावर रागावलो आहे म्हटलं ना !”

“अरे हो, पण मी पडलो साधा पेन्शनर, कुणाच्या अध्यात ना मध्यात, मग माझ्यावर रागावण्या सारखं मी केलय तरी काय, ते तरी सांग!”

“काय म्हणजे, परवा आपल्या वरच्या मजल्यावरच्या नितीनच्या मुलाचं बारस होत, तर…. “

“हो मस्त दणक्यात केलंन हो, आम्ही दोघे गेलो…. “

“ते बोलला मला नितीन, पण बाळासाठी अहेराच पाकीट… “

“न्यायला अजिबात विसरलो नव्हतो मोऱ्या, खरं सांगतो !”

“हो ते खरंय, पण पाकिटात पैसे… “

“सुद्धा आठवणीने एकवीस रुपये टाकले होते, पाहिजे तर विचार नितीनला !”

“बोलला मला नितीन त्याबद्दल.. “

“मग झालं तर !”

“तसच आठ दिवसापूर्वी केळकरांच्या मुलाची मुंज होती, तेव्हा पण….. “

“आम्ही दोघे जोडीने आवर्जून गेलो होतो बटूला आशीर्वाद द्यायला !त्याच्या लग्नाला आम्ही असू, नसू ! त्याला पण चांगला एकवीस रुपयांचा अहेर… “

“केळकर काका म्हणाले मला.”

“मग झालं तर, उगाच इतर काही लोकांसारखी रिकामी पाकीट द्यायची सवय नाही मला, कळलं ना मोऱ्या ?”

“ते ठाऊक आहे मला पंत, काही झालं तरी तुम्ही रिकामं पाकीट देणार नही ते. पण आता मला सांगा, गेल्या महिन्यात कर्णिकांच्या मंदाच लग्न होत, तर तिला सुद्धा….. “

“एकवीस रुपयाचाच आहेर केला होता आठवण ठेवून ! अरे लहान असतांना आमच्या राणी बरोबर खेळायला यायची आमच्या घरी. “

“पंत, मंदा लहानपणी तुमच्याकडे खेळायला यायची वगैरे वगैरे, ते सगळे ठीक आहे, पण तुम्ही बारस, मुंज आणि लग्न यात काही फरक करणार आहात की नाही ?”

“अरे मोऱ्या हे तिन्ही वेगवेगळे विधी आणि समारंभ आहेत, पूर्वी पासून चालत आलेले, त्यात मी फरक करण्या एव्हढा, कोणी थोर समाज सेवक थोडाच आहे ? हां, आता लहानपणी कुणाची मुंज राहिली असेल तर ती लग्नात लावता येते, पण बारस बाळ जन्मल्यावर बाराव्या दिवशी केल तर त्याला मुहूर्त बघायला लागत नाही असं म्हणतात, म्हणून लोक…. “

“पंत, मी त्याबद्दल बोलतच नाहीये !”

“मग कशा बद्दल बोलतोयस बाबा तू ?”

“अहो मी तुमच्या आहेराच्या रकमे बद्दल बोलतोय !”

“त्या बद्दल काय मोऱ्या ?”

“सांगतो ना पंत, तुमच्या दृष्टीने बारस, मुंज आणि लग्न यात  काही फरक आहे का नाही ? मग प्रत्येक वेळेस एकवीस रुपयाचाच आहेर, याच काय लॉजिक आहे तुमच, ते मला समजेल का ?”

“ते होय, त्यात कसलं आलंय लॉजिक ? त्याच काय आहे ना, अरे हल्ली, आपले आशीर्वाद हाच खरा आहेर, कृपया पुष्प गुच्छ आणू नयेत, अशा छापाच्या तळटीप प्रत्येक निमंत्रण पत्रिकेत असतात, तरी सुद्धा मी आठवणीने….. “

“सगळ्यांना एकवीस रुपयाच्याच आहेराची पाकीट का देता, हेच मला जणून घ्यायच आहे पंत आज !”

“मोऱ्या असं बघ, एकवीस या आकड्याच महत्व माझ्या दृष्टीनं फार म्हणजे फारच वाढलेलं आहे सध्या ! म्हणून मी सगळ्यांना एकवीस रुपयाचाच आहेर करतो हल्ली !”

“ते कसं काय बुवा पंत ?”

“सांगतो ना तुला. आपण या समारंभातून मिळणाऱ्या भोजनावर यथेच्छ ताव मारतो की नाही?”

“तसच काही नाही पंत, पण अशा समारंभात मी नेहमी पेक्षा थोडं जास्त जेवतो इतकंच !”

” बरोबर, तर त्याची अल्पशी परत फेड म्हणून…. “

“काय बोलताय काय पंत तुम्ही ? एकवीस रुपयाच्या पाकिटात कसली आल्ये परतफेड ? हल्ली अशा समारंभात माणशी जेवणाचे दर तुम्हाला…..”

“चांगलेच माहिती आहेत मोऱ्या ! हल्ली सातशे आठशेच्या खाली ताट नसतं ठाऊक आहे मला, पण म्हणून मी अल्पशी…. “

“पंत अहो तुमच्या अल्पला थोडा तरी अल्पार्थ आहे का सांगा बघू ?”

“आहे, नक्कीच आहे मोऱ्या !”

“हो का, मग म्या पामराला जरा तो समजावता का पंत ? “

“सांगतो ना मोऱ्या. आता असं बघ, सध्या शिवथाळी कितीला मिळते सांग बर मला ?”

“दहा रुपयाला !”

“बरोबर, म्हणजे सकाळी एक शिवथाळी आणि संध्याकाळी एक शिवथाळी या एकवीस रुपयात येवू शकते की नाही ?”

“हो पंत, म्हणजे एका माणसाचा एका दिवसाचा दोन वेळचा जेवणाचा प्रश्न सुटेल वीस रुपयात ! पण तुमच्या एकवीसच्या पाकिटातला एक रुपया शिल्लक राहतोच ना पंत ? त्याचे हल्लीच्या महागाईत खायचे पान सोडा, आपट्याचे एक पान पण येणार नाही पंत !”

“अरे पण माझ्या एकवीस रुपयाच्या आहेरातला तो उरलेला रुपया, पानासाठी वापरायचा नाहीच मुळी!”

“मग, त्या राहिलेल्या एक रुपयाचं करायच काय पंत ? पिगी बँकेत टाकायचा का ?”

“अरे नाही रे बाबा, पण जर का   शिवथाळी खाऊन तब्येत बिघडली, तर राहिलेल्या एका रुपयात सरकारच्या नवीन योजने प्रमाणे ‘आपल्या दारात आरोग्यचाचणी एक रुपयांत’ नाही का करता येणार ? म्हणजे लागला ना एकवीस रुपयाचा हिशोब !”

“धन्य आहे तुमची पंत !”

“आहे ना धन्य माझी मोऱ्या, मग कधी करतोयस लग्न बोल? म्हणजे

तुझ्यासाठी पण एक, एकवीसाचे अहेराचे पाकीट तयार करायला मी मोकळा !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

१७-०३-२०२२

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्विकार क्षणांचा..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ स्विकार क्षणांचा..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आपलं आयुष्य घडवत तरी असतो नाहीतर बिघडवत तरी ! वाचताना थोडं अतिशयोक्तीचं वाटेल पण हेच सत्य आहे.

रोजच्या धावपळीत आपण प्रत्येक क्षणी असणारी आपली मनोवस्था, आपली विचार करण्याची पद्धत आणि आपले स्वयंकेंद्री विचार यानुसारच येणाऱ्या प्रत्येक क्षणाला सामोरे जात असतो व त्यामुळे प्रत्येक क्षण समतोल मनाने येईल तसा स्वीकारायचं भान सहसा आपल्याला रहात नाही. त्यामुळे त्या त्या वेळी आपल्या उमटणार्‍या प्रतिक्रिया नेहमीच अस्वस्थता, नाराजी, रुखरुख निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असतात. कुणाच्याही आयुष्यात कधीही घडू शकेल अशा एका अगदी साध्या प्रसंगाचं एक प्रातिनिधिक उदाहरण घेऊ.

एका सकाळी थोडं लवकरच मी स्कूटरवरून रेल्वे-स्टेशनवर पाहुण्यांना रिसीव्ह करायला निघालोय.रस्त्यावरची नेहमीची वर्दळ अद्याप सुरु व्हायचीय. माझी स्कुटर बर्‍यापैकी वेगात आहे. गाडीची वेळ चुकू नये, आपण वेळेत पोचायला हवं हा एकच विचार मनात.आणि अगदी अचानक एका वळणावरून आत जाताना  समोरून सायकलवरून येणारा  आठ-नऊ वर्षाचा एक मुलगा माझ्या स्कूटरला धडकतो. पडतो. मी स्कूटर कशीबशी कंट्रोल करीत थांबतो.

त्या क्षणी येणाऱ्या माझ्या प्रतिक्रिया अर्थातच तो क्षण मी कसा स्वीकारलाय यावरच अवलंबून असणाराय हे ओघानं आलंच.

मी चिडून त्या मुलाकडे पहातो. तो दफ्तरातून बाहेर पडलेली आपली नोटबुक्स् गडबडीने गोळा करतो. दप्तरात ठेवतो.चोरट्या नजरेने माझ्याकडे पहातो.आपल्याला स्टेशनवर पोचायला उशीर होणार या विचाराने मला त्याचा प्रचंड राग येतो.माझं कपाळ आठ्यांनी भरुन जातं. आपण वेळेत पोचलो नाही तर पाहुण्यांना काय वाटेल हा विचार मन अस्वस्थ करीत असतो. तोवर कपड्यांवरची धूळ झटकून, आडवी झालेली सायकल कशीबशी उभी करुन तो मुलगा सायकल ढकलत चालत निघून जातो. त्या अस्वस्थ मनस्थितीत मी स्कूटर सुरू करतो. तरीही मनातला त्या मुलाबद्दलचा संताप काट्यासारखा सलतच असतो.  स्टेशनबाहेर घाईघाईने स्कूटर पार्क करून मी धावत आत जातो. ट्रेन आलेली नसते. घाईघाईने मी इंडिकेटरकडे धाव घेतो. पहातो तर ट्रेन थोडी लेट असल्याने ती यायला अद्याप दहा मिनिटे अवकाश असतो. मी थोडा निश्चिंत होतो.मनातला राग मग हळूहळू नाहीसा होतो.

मन थोडं स्थिर होताच जाणवतं की त्या प्रसंगात अचानक कांहीही घडू शकलं असतं हे खरं,पण जे घडलं त्यात तरी चूक त्या निष्पाप मुलाची होती की माझीच ? त्याच्या सायकलचा वेग तसा फार नव्हताच.पण स्कुटर वेगात असूनही लवकर स्टेशन गाठायच्या नादात मी वळणावर हाॅर्न न वाजवता स्कुटर तशीच रेटलेली असते.

अचानक समोर येऊन ठेपलेला तो क्षण आला तसा मी स्विकारलाच नव्हता.त्यामुळेच त्याक्षणी मी नेमकं काय करायला हवं ते मला सुचलंच नव्हतं. म्हणूनच स्टेशनवर वेळेत पोचण्याची निकड हा माझ्या जीवनमरणाचा प्रश्नच बनला होता जसा कांही.त्यामुळेच ‘त्या मुलाच्या जागी आपला मुलगा असता तर?’ हा प्रश्न मनात उभारलाच नव्हता.आपण त्याला ‘तुला लागलं कां रे?’ एवढंतरी विचारायला हवं होतं खरंतर.पण तेही त्यावेळी सुचलंच नव्हतं.

तो क्षण आठवला न् त्या लहान मुलाची चोरट्या नजरेने माझ्याकडे पहाणारी नजर मला त्रास देत राहिली.

अनपेक्षितपणे समोर येऊन ठेपलेला ‘तो क्षण’ आहे तसा न स्विकारल्याने माझ्या मनात निर्माण झालेल्या अस्वस्थतेला, माझ्या चुकलेल्या प्राधान्यक्रमांना, माझ्या चुकीच्या प्रतिक्रियांना मीच जबाबदार होतो.

तो क्षण समोर आला तसा स्विकारला असता तर परिस्थितीतलं गांभीर्य मला तत्काळ जाणवलं असतं.मी पटकन् स्कुटर स्टॅंडला लावून त्या मुलाकडे धाव घेतली असती. त्याला उठवून त्याला कांही दुखापत झालीय का हे पाहिलं असतं.त्याची सायकल उचलून उभी केली असती.त्या क्षणी कुणीही जे करणं अपेक्षित असतं तेच मी केलं असतं.

हा एक साधा प्रसंग.पण यापेक्षा कितीतरी विविध प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात सतत येतच असतात. यश, अपयश, संधी,संकटं कांहीही सोबत घेऊन येत असणारे क्षण असतात ते.ते येतील तसे स्विकारले तरच स्थिर मनाने त्या क्षणी आपण योग्य असे निर्णय घेऊ शकतो. अपयशाने खचून न जाता त्यामागची कारणं शोधून आपण त्यांचं निराकरण करु शकतो. यशाने बेभान न झाल्याने आपले पाय जमीनीवरच ठेवून आपल्याला त्या यशाचा आनंद घेणे शक्य होत असतं.संकट असेल तर त्यावेळी नेमकं काय करायला हवं याचा शांतपणे विचार करता येतो.संधी असेल तर ती हातून निसटण्यापूर्वी त्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा विचार आपण करु शकतो.

आपल्या आयुष्यातल्या निसटून गेलेल्या अशा असंख्य क्षणांचं आज स्थिरचित्ताने विश्लेषण केलं तर क्षण कसा स्विकारावा याचं प्रतिनिधीत्व करणारे क्षण अपवादात्मकच आढळतील हे खरं,पण ते यापुढील आयुष्यासाठीतरी नक्कीच दिशादर्शक ठरतील !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग पाहू,आस्वादक होऊ ☆ श्री ओंकार कुंभार ☆

?  विविधा ?

☆ निसर्ग पाहू,आस्वादक होऊ ☆ श्री ओंकार कुंभार ☆ 

सजगतेने निसर्ग पाहू.

निसर्गाचे आस्वादक होऊ.

एका बाजूला उन्हाळ्याचा दाह वाढत आहे आणि दुसरीकडे याच कालावधीत निसर्गात सुंदर अशी फुले फुलली आहेत. आपण आपल्या माना वर करून सजगतेने इकडे तिकडे पहायला हवे बस्स.

सुरुवातीला दिसू लागला तो निलमोहोर . सुंदर गडद निळसर असे झुबके संपूर्ण झाडावर पसरलेले आपणाला पहायला मिळतात. निलमोहराची मोहिनीच आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. पाहातच रहावे असे वाटते.

त्यानंतर दिसू लागला तो पळस . आहाहा…

हाताची बोटे एकत्र करून वरती केल्याप्रमाणे याचा आकार. तशी जाडसर पाने असलेली भरपूर फुले. पानच नसतं या कालावधीत पळसाला. इतरवेळी उघडा बोडका वाटणारा पळस उन्हाळ्याची चाहूल लागताच आग लागावी तसा बहरतो. जंगलात पळसाची अगदीच कुठेकुठे झाडे असतील तर संपूर्ण झाडाला आग लागल्यासारखा भास होतो. म्हणून याला Flame of the Forest संबोधले जाते. पळसात पण विविधता आढळते. पळसाला पाने तीनच. असे म्हंटले जाते. पळसाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळ्या केल्या जातात. काही ठिकाणी पळस गर्द लाल चुटुक, तर काही अबोली, फिकट लालसर, तर पिवळाही काही ठिकाणी. पळस फुलल्यावर पक्ष्यांना एक छान मेजवानीच असते. पळसावर विविध प्रकारचे पक्षी मधुपानासाठी आलेली आपणाला पहायला मिळतात. त्यातल्या त्यात सूर्यपक्षी, साळुंखी,मैना आणि बुलबुल जास्तीत जास्त काळ पळसाचा आस्वाद घेताना आढळतात. पळसही दिसायला देखणा दिसतो. झाडाखाली पळस फुलांचा सडा पडलेला पहायला मिळतो.

याच कालावधीत काटेसावर ही फुलते. पळसासारखेच इतर मोसमात रुक्ष असणारे हे झाड उन्हाळा जवळ येताच सुंदर फिकट लाल वा गुलाबी वा केशरी फुलांनी बहरते. याला कमी पण सुंदर फुले लागतात. हाताची बोटे वर करून पसरल्याप्रमाणे याचा आकार असतो. यातही विविधता आढळते. ही फुलेही सुंदर, डोळ्यांना आनंद देणारी वाटतात. काटेसावर फुलांच्या मकरंदाचा आस्वादही अनेक पक्षी घेतात.

यानंतर वर्षातून दोनवेळा बहरणारा सोनमोहोर ही आपले लक्ष वेधून घेतोच. याचे झाड मात्र मोठे असते आणि भरपूर पिवळाई या कालावधीत या झाडाला आलेली असते. या कालावधीत झाडाखाली पिवळा सडाच पडलेला असतो. हेही झाड रखरखत्या उन्हात डोळ्याना छान आनंद देणारे असते.

जरा उशिरा फुलणारा गुलमोहर . यातही विविध प्रकार पहायला मिळतात. काही गुलमोहोर लालभडक, तर काही फिकट लालसर, तर काही फिकट गुलाबी. तर काही अबोलीच्या जवळ जाणारी रंगसंगती असते. काही गुलमोहर वर्षभर उघडे बोडके असतात, काही वर्षभर हिरवळ धारण करतात. पण जसा उन्हाळा जवळ येईल तसे झाडाला शेंगा लागायला सुरुवात होते. नंतर हळूहळू शेंगा फुटून लाल फुलांचा बहर झाडभर पसरतो. काही पूर्ण झाडे लाल भडक दिसायला लागतात, तर काहींवर थोडी हिरवी पालवी आणि गुलमोहराची लालिमा पसरलेली दिसते. खरच विविध प्रकारचा गुलमोहोर अबालवृद्धांचे मन मोहून टाकतो.

याच कालावधीत उशीरा फुलणारे आणखी एक सुंदर झाड म्हणजे बहावा ( गोल्डन शाँवर ). याही झाडाला कुसुमसंभार येण्यापूर्वी लांबुळक्या शेंगा लागतात आणि काही कालावधी नंतर शुभ्र पिवळी फुले लागायला सुरुवात होते. पाहतापाहता काही दिवसातच शुभ्र पिवळ्या फुलांनी संपूर्ण झाड लगडते. याचे गोल्डन शाँवर हे नाव समर्पक आहे. कारण, झाडभर शुभ्र पिवळे झुबके लोंबत असतात. या झाडावरही भरपूर पक्षी मधुपानासाठी येतात. विशेषकरून भरपूर प्रमाणात विविध प्रकारचे भुंगे मधुपानाचा आस्वाद घेताना दिसतात. काय अप्रतिम नजारा असतो. आहाहा…

पाहतच रहावे असे वाटते.

रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करायला बाहेर पडावे आणि कोठूनतरी रातराणी चा सुगंध दरवळावा. सुगंध नाकात शिरताच एक क्षणभर समाधीच लागते. काय तो मोहक मंद सुगंध.     वाSSह.

 

© ओंकार कुंभार

📱9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उबुंटू….अनामिक ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

?  विविधा ?

उबुंटू….अनामिक ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

उबुंटू ही आफ्रिका देशातील एक सुंदर गोष्ट आहे.

उबुंटू हे प्रेरणादायी मानवतावादी तत्त्वज्ञान आहे.  

आफ्रिकेतील आदिवासी लहान मुलांचा एका तत्त्ववेत्याने एक खेळ घेतला.  त्या खेळामध्ये एका झाडाखाली एक मिठाई चे बास्केट ठेवले. सर्व मुलांना त्या झाडापासून 100 मीटर अंतरावर उभे केले. तिथून धावत जाऊन ते मिठाई चे बास्केट घ्यायचे, जो आधी पोहोचेल त्यास ती मिठाई मिळेल असे सांगण्यात आले. आता त्या व्यक्तीने खेळ सुरू करण्याची सूचना केली. परंतु त्या नन्तर जे घडले ते आश्चर्य वाटणारे होते. त्या सर्व मुलांनी एकमेकांचे हात हातात धरले आणि सर्वच्या सर्वजण एकत्रितपणे झाडाखाली ठेवलेल्या मिठाई च्या बास्केट कडे धावत सुटले. एकाचवेळी तिथे पोहोचले. ती मिठाई सर्वानी समान वाटून घेतली व सर्वानी मिळून त्याचा आस्वाद घेतला.

यावर त्या तत्त्वज्ञाने मुलांना असे करण्याचे कारण विचारले असता, उत्तर मिळाले…..उबुंटू.

उबुंटू चा अर्थ आहे… ‘I am because We are.’

म्हणजेच ‘मी आहे कारण आपण सर्व आहोत’.

इतर दुःखात असताना मी एकटा कसा सुखी होऊ शकतो ?? या प्रश्नाचे उत्तर उबुंटू आहे.

‘सर्वांचे सुखी असणे हेच मला सुखी बनविणारे आहे’

हा फार मोठा माणुसकीचा, समतेचा, एकीचा संदेश, सर्व च पिढ्यांना उबुंटू देत आहे.

चला तर मग आपण सर्वजण उबुंटू  जगूया अणि जिथे जाऊ तिथे सगळीकडे आनंद पसरवुया.

I am Because We are.

संग्राहिका : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 8 – आई ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 8 – आई ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आपल्या जीवनात आईचं अत्यंत महत्वच स्थान आहे. अनन्यसाधारण महत्व आहे.सोन्याच्या लंकेपेक्षा आणि स्वर्गापेक्षाही  माझी जन्मभूमी अयोध्याच श्रेष्ठ आहे असे श्रीरामचंद्र सांगतात. जन्मभूमीची तुलना ते आपल्या आईशी करतात.

आपल्या मुलाचं/मुलीचं भवितव्य घडविणारे आई आणि वडील दोघेही असतात. पण प्रत्येक व्यक्तिचं चारित्र्य घडविणारी आई असते.तिची भूमिका जास्त महत्वाची असते. जन्मल्यापासून त्याला भाषा शिकविणारी, पहिला घास भरवताना चिऊ काऊ सारख्या पक्ष्यांची ओळख करून देणारी, पहिलं पाऊल टाकताना नीट चालायला  शिकविणारी, शाळेत डबा खाताना सर्वांबरोबर वाटणी करून खाण्याचा, सामूहिक समानता मूल्यांचा संस्कार करणारी, भावंडांमध्ये एकमेकांना समजून घेण्याचे बीज पेरणारी, कुटुंबातली नाती सांभाळण्याचे आणि ती टिकविण्याचे ही संस्कार कळत्या वयात देणारी इथ पासून पुढील आयुष्यात येणार्‍या संकटांना धैर्याने तोंड द्यायला शिकविणारी आणि मुलाला घडवताना त्याच्यात साहित्य, कला, तत्वज्ञान, इतिहास यासाठी योग्य ते कष्ट घेणारी अशी आई असते.

आपला मुलगा ‘यथार्थ’ मनुष्य निपजावा असं प्रत्येक आईलाच वाटत असतं. पण असा माणूस घडवण्याची कला सर्वच मातांजवळ नसते, म्हणूनच स्वामी विवेकानंद यांच्यासारखे चारित्र्यवान व्यक्तिमत्व एखादेच घडत असते. कारण सुसंस्कृत आणि अभिजात माता भुवनेश्वरी देवी पण एखादिच असते.

नरेंद्रनाथांच्या  चारित्र्यात जे जे महान, जे जे सुंदर होतं ते ते सर्व त्यांच्या सुसंस्कृत मातेच्या सुशिक्षणाचं  फळ होतं  असंच म्हणावं लागेल. त्यांनी नरेंद्र ची योग्य ती जोपासना केली. आपल्या मुलांच्या चारित्र्यात कोणत्याही प्रकारचा हिणकसपणा येऊ नये म्हणून त्यांनी डोळ्यात तेल घालून जपले होते. मातृभक्त नरेन्द्रनेही आपल्या आईची आज्ञा कधीही मोडली नव्हती. स्त्री सुलभ गुणांपेक्षाही धैर्य, खंबीरता, असत्य आणि अविचाराचा प्रतिकार करण्याचा बेडरपणा भुवनेश्वरी देवींकडे होता. आपल्या मुलांना उच्च ध्येयं आणि व्रतं अंगिकारण्यासाठी त्या स्फूर्ति आणि उत्तेजन देत असत.

स्वामी विवेकानंदांच्या देहत्यागा नंतर सुद्धा ही माता पुढील नऊ वर्ष हयात होती. तिनं आपल्या लाडक्या नरेंद्रनाथाचे जगप्रसिद्ध ‘स्वामी विवेकानंद’ होताना पाहिले होते. भागीरथीच्या पवित्र तीरावर पुत्राच्या धडधडत्या  चितेजवळ अंतिम प्रार्थनेत सहभागी झालेल्या या दु:खी मातेच्या मनात आले की जर, ‘विवेकानंद आणखी काही दिवस इहलोकी राहिले असते तर, अखिल मानवजातीचे केव्हढे तरी कल्याण झाले असते’.  पुत्रवियोगपेक्षा मानवजातीचे कल्याण हीच भावना तिच्या मनात यावेळी होती.

ती विवेकानंन्दाची आई होती या गौरवाचा सात्विक गर्व तिच्या संयमित,गंभीर आणि शांत चेहर्‍यावर दिसत होता.

खाण तशी माती अशी म्हण आहे. आजकाल मुलांच्या आया म्हणजे माता घरगुती कलागतीत नको ते संस्कार करत असतात. अजाणतेपणी का असेना नको ते मुलांना शिकवीत असतात. (आज मालिका/माध्यमे  सुद्धा असे आदर्श घालून देण्यात अग्रेसर आहेत.)मूल घडविण्याच्या काळात, त्या मुलांमध्ये द्वेष, मत्सर, लोभ पेरत असतात. कौटुंबिक नाती तोडतात. त्यामुळे मोठे होऊन ती मुले दुसर्‍याच्या प्रगतीमुळे जळफळणारी, हलक्या मनाची व कानाची अवलक्षणीच निघातील याची त्यांना कल्पना नसते. त्याचा वाईट परिणाम त्या मुलांच्या भविष्यावर होणार असतो. म्हणून मुलांच्या आई /मातांनी सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे फार आवश्यक आहे. चारित्र्यवान मुलं घडवणं सोप्पं नाहीच मुळी !

क्रमशः ….

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक गंमत सांगू तुला …? ….अनामिक ☆ प्रस्तुती… श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

एक गंमत सांगू तुला …? ….अनामिक ☆ प्रस्तुती… श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

एक गंमत सांगू तुला …?

लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..

पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..

म्हातारपणी रुपयांनी खिसा भरला

पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला…

😗

 

एक गंमत सांगू तुला …?

लहानपणी वाटायचं,

नविन पुस्तके हवीत वाचायला..

पण चोरुन, लपुन,उसनी मित्रांची पुस्तके  घेवून अभ्यास पूर्ण केला..

म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला

पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाँटर झाला…

😍

 

एक गंमत सांगू तुला ….?

लहानपणी रिक्षातून आवडायचे फ़िरायला

पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..

म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फ़िरायला

पण जीना उतरेस्तवर

पाय लागतात लटपटायला…

😓

 

एक गंमत सांगू तुला …..?

लहानपणी 10✘10 ची खोली होती रहायला,

दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..

म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाँक घेतला,

पण एकेक खोली आ वासून येते खायला…

😵

 

एक गंमत सांगू तुला ……?

खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,

फ़ार फ़ार आनंद झाला पण भिती वाटते मनाला..

मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,

का

ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.

😰😒😭

 

म्हणून म्हणतो मित्रांनो……आताच जगणं शिका.

👆आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगा…💐

💎…ज्या क्षणी तुम्ही मरण पावता,👼

 

 त्या क्षणी तुमची ओळख एक बॉडी ” बनुन जाते

,”बॉडीला” 👽आणा , बॉडीला झोपवा ,😑

 

लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही.

 

म्हणूनआव्हाने स्वीकारा,😠

 

आवडत्या गोष्टीसाठी ख़र्च करा,💴

 

आवडत्या लोकांना वेळ दया,💑

 

पोट दुखेपर्यन्त हसा, कोणीबालीश

😂

म्हणाले तरी चालेल. 

 

मनसोक्त नाचा,लग्नात, वरातीत.जिथे भेटेल तिथे नाचा.

💃

अगदी लहान बाळासारख़ जगा.

कारण,👶

 

“मृत्यु” हा जीवनतला सर्वात मोठा लॉस नाहिये , लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला “जिवंतपणा”मेलेला असतो.🙏

 

प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares