कवितेचा उत्सव 
☆ ज्येष्ठांशी कसे वर्तणे…… ☆ सुश्री मेधा सिधये ☆
श्री समर्थ रामदास स्वामींची क्षमा मागून ज्येष्ठांशी कैसे वर्तणें।
ज्येष्ठांशी कैसे चालणें तें युवकें जाणोनि घेणे। नीटपणे।।
ज्येष्ठ असती बालकासम। मनें निर्मळे निष्पाप।
जग वाटे शुद्ध नगर। शिवसुंदराचे माहेरघर।।
देह असती थकलेले। मन मृदुमवाळ फुलपांकळे।
जाणौनि असावे पुत्रपौत्रे। ढका लावो नये कठोर वाचे।।
ज्येष्ठांसंगे चालावे मंदगती। फरफट करू नये कधी।
पाऊले असती श्रमलेली। जीवनवाट तुडवोनी।।
आहार द्यावा सात्विक। ताजा, गरम, सुग्रास।
चित्त त्यांचे व्हावे प्रसन्न। भोजनथाळी देखोनिया।।
दवापाणी वेळे द्यावे। खर्चवेंच जिव्हे न काढावे।
प्रेम माया सुखवी जीव। याचे स्मरण राखावे।।
ज्येष्ठ मने अति कांतर। जिवाची होय थरथर।
मंद ज्योत वार्यासवें। जेवीं थरथरे।।
आपुल्या संसारचिंता। ज्येष्ठां सांगो नये वृथा।
प्रेमभरले अश्राप जीव। असती असहाय, अगतिक।।
देह थकले, मन थकले। कार्यशक्ती उणावली।
जगणे केवळ साक्षीभूत। कसली आस न उरली।।
ज्येष्ठां द्यावा उत्साह, आनंद।उरल्या दिनीं समाधान।।
हे वागणें तुम्हां पुण्यप्रद। इयें जीवनीं।।
नसता ‘ अर्थ’ ज्येष्ठांपासीं। रचो नये अपमानाच्या राशी।
उभे आयुष्य आहे समोरी। तुमच्या, पैका मिळवावया।।
जें जें साधलें तें तें त्यांनी केले। जीव वोवाळिला तुमच्यासाठी।
स्मरण तयाचे राखावे ह्रदयीं। तारुण्याचा मद न करावा।।
अहंकार,क्रोध मोठेच रिपू। त्यांना बाळगू नये जवळी कदापीहि।
एक उणा शब्द करी रक्तबंबाळ मन। संध्यावेळीं तयां जराही न साहवे।।
ज्येष्ठही होते कष्टाळू, कर्तृत्ववान। संसारनौकेचे कप्तान।
म्हणौनि सेवाभाव, कृतज्ञता। सदैव चित्ती राखणें।।
ज्येष्ठांचे आशीष ईश्वरी प्रसाद। त्यास डावलू नये वांकुड्या वर्तनें।।
चूकभुलीं व्हावे सानुलें लेकरूं। लाजो नये कधी क्षमायाचने।।
ज्येष्ठांसंगे तुमचे वर्तन। खरी समजशक्तीची पारख।
शिक्षणाचा अर्क । तोचि होय।।
© सुश्री मेधा सिधये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈