मराठी साहित्य – विविधा ☆ जीवधन गड आणि नाणेघाट…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆ विविधा ☆ जीवधन गड आणि नाणेघाट…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

३० जानेवारी २०२१ रोजी मी रात्री १०:३० वाजता ‘गिरीदर्शन’ च्या ‘जीवधन’ गड ट्रेक साठी ‘व्याडेश्वर’ समोर पोहोचलो. परंतु नेहमीची बस आलेली नव्हती आणि त्याऐवजीची ठरवलेली बस उशिरा येत आहे असे शुभवर्तमान कळले. पुढे जवळजवळ तासभर मागील ट्रेकच्या एकमेकांच्या रंजक गप्पा मारण्यात / ऐकण्यात वेळ कसा गेला ते मात्र कळले नाही. बदली बस मात्र छोटी होती त्यामुळे सर्वजण सामानासह जेमतेमच मावले. नारायणगाव येथे रात्री १:३० ला चहा घ्यायला थांबली तेवढीच नंतर एकदम पायथ्याच्या घाटघर गावातील मुक्कामाच्या घरीच थांबली.

घराबाहेर हवेतून एक “चर्र चर्र” असा आवाज ऐकू येत होता तो कुठून येतोय हे कळेना.  परंतु तेव्हा पहाटेचे ३:३० वाजलेले असल्याने आधी मिळेल तेवढी झोप घ्यावी आणि आवाजाचे कोडे सकाळी सोडवूयात असे ठरवून पथारी पसरल्या. पण थोड्याच वेळात मी जिथे झोपलो होतो त्याशेजारील बंद दरवाजाच्या फटीतून थंड हवा झुळुझुळू यायला सुरुवात होऊन थंडी वाजायला लागली. सकाळी तारवटलेल्या चेहेर्‍याने उठलो पण खिडकी उघडल्याउघडल्या ‘गुलाबी’ सूर्यदर्शन झाले आणि थकवा पार पळून गेला.  गरमागरम पोहे आणि काळा चहा प्यायल्यावर सर्व तेवीस जण ट्रेकसाठी सुसज्ज होऊन निघालो. त्याआधी थोडे जीवधन गडाबद्दल…

सातवाहन काळात म्हणजे इ. स. पू. पहिले शतक ते तिसरे शतक ह्या काळात बांधलेला हा एक अतिप्राचीन गड आहे. ह्यांच्या काळातच ‘नाणे घाट’ हा व्यापारी मार्ग बांधून काढण्यात आला. घाटाच्या माथ्याशी गुहा असून त्यात ब्राह्मी लिपीत मजकूर कोरला आहे. गुंफेत काही प्रतिमाही होत्या ज्यांचे आज फक्त पायच पहायला मिळतात. जीवधन हा ह्या नाणेघाटचा संरक्षक दुर्ग! चला तर पुढे… बघूयात वर्तमान काळात काय काय पाहायला मिळतंय जीवधन गडावर!

आमच्या आजच्या चमूमध्ये एक मनाने तरुण, गड-इतिहास-प्रेमी तसेच मोडी लिपी तज्ञ असे लळींगकर काका खास नवी मुंबईहून ट्रेकसाठी आले होते. मुक्कामच्या ठिकाणाहून गडाच्या पायथ्याजवळ बस आम्हाला घेऊन निघाली तेव्हापासूनच त्यांनी उत्साहाने आजूबाजूला दिसणार्‍या गडांची माहिती द्यायला सुरुवात केली होती.

त्यांनी बोट दाखवलेल्या दिशेला पहिले तर आम्हाला ‘नवरा-नवरी-करवली-भटोबा’ सुळके दिसले आणि त्यामागे काही ‘वराती’ सुळके दिसले. ह्या सगळ्यांना मिळून  ‘वर्‍हाडी  डोंगर’ असे गमतीशीर नाव आहे.

जंगलातील चढाई सुरुवातीला वाटली तितकी सोपी नव्हती. दगड घट्ट नसल्याने व उंच असल्याने त्यावर पाय जपून ठेवावे लागत होते. तरी बर्‍याच ठिकाणी दगडांवर पाय ठेवायला लोखंडी जाळ्या लावलेल्या दिसल्या.

साधारण ८० टक्के चढाई झाल्यावर श्वास चांगलाच फुलला होता. हयामागे कोरोना लोकडाऊन पोटी घ्यावी लागलेली अनेक महिन्यांची ‘सक्तीची विश्रांती’ कारणीभूत होती. पुढील २० टक्के वाटचालीत दगडी पायर्‍या चढून जाणे होते तसेच एका प्रस्तरावरून पुरातत्वखात्याने टाकलेली शिडी चढून जाण्याचा रोमांचक अनुभवही सर्वांना मिळाला.

साधारण अडीच तासात वर चढून आल्यावर उजव्या हातास थोडे खालच्या अंगास लपलेली धान्याची एक दगडी कोठी दिसते. आतमध्ये पायर्‍या उतरून जवळजवळ चार खोल्या असलेले अंधारे कोठार बघायला तुम्हाला टॉर्चच्या प्रकाशाचा आधार घ्यावाच लागतो. आत पायाला सर्वत्र मऊ माती लागते. कोरलेले  दरवाजे आणि कोनाडे असलेले व प्रवेशद्वाराच्या उंबरठावजा पायरीखालून पाण्याची पन्हाळ असलेली ही जागा “पूर्वी एखादे मंदीर असावे का?” अशी एक शंका मनात आल्यावाचून रहात नाही.

क्रमशः ….

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – खेळताना रंग बाई होळीचा होळीचा… ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆ विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – खेळताना रंग बाई होळीचा होळीचा … ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

होळी म्हणजे रंगाचा सण.एक रंगोत्सव..भारतात सर्वत्र उत्साहाने साजरा होणारा लोकोत्सव.. होळी सणाची अनेक नावे… होलिकादहन, शिमगा, हुताशनी महोत्सव, फाल्गुनोत्सव तसेच दुसर्‍याच दिवसापासून वसंत ऋतुचे आगमन होते म्हणून वसंतागमनोस्तव किंवा वसंतोत्सव!!

खरं म्हणजे या रंगोत्सवाशी लहानपणापासूनचं केवळ गमतीचं नातं.!! सुकलेला झाडाचा एखादा बुंधा खड्डा खणून रोवायचा. सुकी लाकडं, पेंढा, पालापाचोळा गोळा करुन बांधायचा… आजुबाजुवाल्यांकडून वर्गणी गोळा करायची.. होळी पेटवायची.. ऊसळणार्‍या ज्वाला, तडतडणार्‍या ठिणग्या, कलशातून पाणी ओतत, अग्नीला अर्पण केलेले नारळ अन् नैवेद्य.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मारलेल्या बोंबा… दुसर्‍या दिवशी धूळवड… ऊधळलेला गुलाल, रंगीत पाण्याच्या पिचकार्‍या,होळीतून काढलेला भाजका नारळअन् होळीच्या धगीवर तापवलेल्या पाण्याने केलेली आंघोळ.. या सामुहिक आनंदाचा मनसोक्त आनंद आम्ही लहान थोरांनी मिळून ऊपभोगला… मनात तेव्हा. नव्हता विचार पर्यावरणाचा.. तेव्हा नव्हते रासायनिक हानीकारक रंग… नव्हतं राजकारण, गुंडागर्दी लुटमार वर्गणीच्या नावाखाली… एकमेकांवर रंग ऊडवण्याचा एक फक्त मैत्रीचा, स्नेहाचा मनमोकळा मजेचा खेळ असायचा.. राधाकृष्णाच्या रासक्रीडेची प्रचलित गाणी निष्ठेनी गायली जायची… पण कुठलाच फिल्मीपणा नव्हता…. होता फक्त आनंद, गंमत सोहळा….. पण आता मनात विचार येतात. का हे सण साजरे करायचे?.

काय महत्व यांचं? कसे साजरे करायला हवेत, कसे नकोत.. वगेरे वगैरे.. पण आपल्या अनेक पारंपारिक सणांमधे, पूजनाबरोबर दहन, ताडन, मर्दन, नादवर्धन असते. दसर्‍याला रावण जाळतो, बलीप्रदेला काठी आपटत ईड जावो पीड जावो.. अ से ऊच्चारण असते.. चिराटं चिरडून नरकासुराचे प्रतिकात्मक मर्दन असते… शंख घंटा ढोल ताशे सारखे नाद असतात.. आणि एक पारंपारिक काहीशी मनोरंजक,फँटसी असलेली ऊद्बोधक कहाणी असते.

फाल्गुन पौर्णीमेला साजरा केल्या जाण्यार्‍या होळी ला होलिका दहन असते.. हिरण्यकश्यपु नावाचा आसुर, त्याची बहीण होलिका जिला अग्नी जाळू शकणार नाही याचे वरदान मिळालेले.. आणि त्याचा विष्णुभक्तपुत्र प्रल्हाद.. विष्णुभक्तीचा अनादर असलेला हिरण्यकश्यपु प्रल्हादाचे भस्म करण्यासाठी, त्याला होलिकेच्या स्वाधीन करतो. पण घडते निराळेच.. अग्नी प्रल्हादाचे रक्षण करतो अन् होलीकेचेच दहन होते.

म्हणून होळी पौर्णिमेला आपण प्रतिकात्मक होलिकादहन करतो.. खरं म्हणजे हा सत्वाचा तामसावरचा विजय आहे!! या निमीत्ताने मनोविकार जाळून टाकायचे. भस्म करायचे.. वाईटाची होळी आणि चांगल्याची पुनर्गुंफण…. बोंबा मारायच्या.. शिव्याही द्यायच्या.. का? हे असभ्य असंस्कृत अमान्य तरीही…?? यामधे मनोविश्लेषणाचे कारण आहे… मनांत खूप कोंडलेलं असतं.. प्रतिष्ठेच्या नावाखाली… समाजाच्या भीतीने.  हे जे काही कुलुपात बंद असते, त्याला या माध्यमाने मुक्त करायचे.. तशी या दिवशी परवानगी  असते… थोडक्यात ही एक थेरेपी आहे… मनातले ओंगळ बाहेर काढण्यासाठी.

शिवाय निसर्ग तर प्रत्येक सणाच्या केंद्रस्थानी असतोच.

शिशीर ऋतुची शुश्कता संपून वसंताचे आगमन होणार आहे… जुनं गळून नवं अंकुरणार… यौवन फुलणार.. सृष्टीच्या प्रणयाचे रसरंग फवारणार.. म्हणून हा रंगोत्सव… वसंतोत्सव… करुया साजरा… कोरोनाच्या कृष्णछायेतील बंधने पाळून या हर्षोत्सवात सामील होवूया… सुकलेली शुष्क चेतना नसलेली काष्ठे वापरु..त्यासाठी वृक्षतोड नको…रासायनिक रंग नाही ऊडवायचे… बोंबा मारु शिव्या देऊ पण केवळ गंमत… कुठलाही हिंसक प्रकार नसेल…. आणि कुणा गलगले मास्तरांनी नाहीच दिली वर्गणी तरीही त्यांना होळीत भाजलेल्या नारळाचा प्रसाद मात्र नक्की देऊ..

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – आमचा शिमगा …. ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 ☆ विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – आमचा शिमगा ….? ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(जून्या लेख/ चारोळींची  काही बदलांसह संग्रहित आहुती ?)

होळी म्हणले की ‘ बोंबलणे ‘ आणि ‘ टिमकी ‘ वाजवणे ( या दिवशी स्वत:ची सोडून)  याचे बाळकडू आम्हाला घाटावरच (सांगली) मिळाले. मात्र मुंबईत आल्यावर या दोन्ही गोष्टींना मुकलो. दरवर्षी सोसयटीच्या आवारात अगदी पारंपारिक पध्दतीने होळी साजरी होते मात्र या दोन्ही गोष्टी बघायला ( करायला ) मिळत नाहीत.

मात्र या वर्षी होळी पेटली की ठरवलय ,प्रसादाचा नारळ होळीत सोडायचा आणि मग होळी भोवती प्रदक्षिणा मारत बोंब ठोकायची. ‘ (हा काय करतोय येड्यासासारखा ? ‘? असे सोसायटीतील लोकाना वाटले तरी चालेल .)

वर्ष भरात ज्या गोष्टींमुळे त्रास झाला/ होतो त्यांचा उध्दार करायचाच म्हणून यादी तयार करायला घेतली ती अशी…..

१) पहिली फेरी करोना विषाणूच्या  नावे – ६ वर्षानंतर संधी आलेली बाहेर जायची. साडेसातीचा परिणाम …. ?

२) पर्यावरणवादी – या(ना) लायकांना फक्त होळी आणि दसरा या दिवशीच झाडे, पर्यावरण -हास यांची आठवण होते. ?

३) मुंबईकर – मराठी अस्मितेचा अभिमान बाळगत धुळवडीच्याच दिवशी रंगमंचमी साजरी करणा-या मुंबईकरांसाठी ( आणि यात आता सुसंस्कृत पुणेकर ही आले) तिसरी फेरी.

४) खास ‘ती’ च्या साठी – ती हो आमची , ८.२१ ची  – ठाणे लोकल. एक दिवस जरी वेळेवर आली तर शप्पथ…। ?

५) आम्हाला खोट्या प्रकरणात अडकवून पोलीस चौकीची फेरी घडवून आणणाऱ्यांच्या नावे ?

६) समुहात राजकारणाच्या पोस्ट नको असा ‘शिमगा’ करुन इतरांच्या मजेशीर पोस्टवर स्वत: बोंब मारणाऱ्यांच्या नावे एक फेरी

७) गाण्यातील सूरांसह,  लेखनाची ही वाट लावणाऱ्या सर्व आमच्या सारख्या फ्यूजन कलाकारांच्या नावेही एक फेरी

बास ! बास ! दमलो, याच्या पुढे फे-या मारता येणार नाहीत ( आणि जास्त बोंबलूनही उपयोग नाही ?)

अरे हो सोशल मिडिया सोडायचा असा सल्ला देणाऱ्यांसाठी? विसरलोच की.

नाही नाही हा मात्र सल्ला आपल्याला आवडला. आणि हा सल्ला यांच्यापर्यंतही पोहोचला , लगेच तयारीतच आल्या

नो व्हॅाट्स अप, नो फेसबुक

साजरी करू या होळी….

शब्दांना सोबत घेऊन लगेच

आल्या चार ओळी ?….बोंबला सौख्य भरे❗?

बोंब मारायची ही झाली माझी कारणे

काय तुमची टार्गेट्स तयार  आहेत का ?

कळूदे आम्हाला ही ?

( टीपः वरील यादीत बुडणाऱ्या बँका, ऑफीस , महागाई , भ्रष्टाचार, ट्रॅफिक  जाम यांना मुद्दाम स्थान दिले नाही. यांच्या नावाचा शिमगा रोजचाच आहे. त्यांच्या बद्दल बोंबलणे जाऊ दे त्यांच्या करामतीने आमची बोबडी वळु नये हीच ‘ होळी’ चरणी प्रार्थना  ?)

? अमोल केळकर ?❗

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – कोकण – रत्नागिरी ची होळी.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे 

 

☆ विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – कोकण – रत्नागिरी ची होळी.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 होळीचे दिवस, परीक्षांचे दिवस आणि कैऱ्यांचे दिवस या तिन्ही गोष्टी रत्नागिरीच्या आठवणींशी निगडीत आहेत. लहानपणी मार्च महिना आला की अभ्यासाचे पडघम वाजायला घरात सुरुवात व्हायची आणि अभ्यासाबरोबर कैरीचे तुकडे तिखट मीठ घालून खाण्याची आमची सुरुवात असायची! कोकणात होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्यामुळे मुंबईचे चाकरमानी या दिवसात सुट्टी घेऊन कोकणात यायचे. मग खरी  होळीच्या उत्सवाची मजा सुरू व्हायची! रोज रात्री अंगणात ‘खेळे’ यायचे!’खेळे’ म्हणजे वेगवेगळे  गाण्याच्या तालावर नाच करणारी ठराविक लोकं असायची. पारंपारिक गाण्याबरोबरच नवीन नवीन सिनेमाच्या गाण्यांवर नाचत केले जायचे. ते काही शास्त्रशुद्ध नाच नसायचे, पण त्यात उत्साह, जोश इतका असायचा की ते बघायला वाड्यातील सर्व लोक उत्सुकतेने, उत्साहाने गोळा व्हायचे.तेव्हा टीव्ही नव्हता, त्यामुळे ही जिवंत, उत्साहाची करमणूक सर्वांना फार आवडायची! या सगळ्या सांस्कृतिक  होळीच्या काळात पुरणाची पोळी लज्जत आणत असे ती वेगळीच!

होळीचा खुंट म्हणजे होळी उभी करायची जागा ठरलेली असते. दरवर्षी एखाद्याच्या बागेतील सुरमाड होळीसाठी निवडला जाई.सुरमाडाला नारळ येत नाहीत. तो सुरमाड तोडून त्या ठिकाणाहून वाजत गाजत होळीच्या ठिकाणी आणला जाई. मुख्य म्हणजे ते झाड माणसे वाहून आणत. त्यासाठी चार पाच तास लागत असत. आमच्या घरापासून जवळच होळीचा खुंट असल्याने आम्ही दुपारपासून ते बघण्यात दंग असायचो! एकदा का होळी उभी राहिली की पाच दिवस तिथे जत्राच असे. तसेच देवीची पालखी ही तिथे आणली जाई.जुगाई देवीच्या मंदिरापासून मिरवणुकीने देवीची पालखी येत असे. तेव्हा खूपच गर्दी उसळत असे.रोज दुपारी आणि रात्री वाजत गाजत देवीची पालखी मंदिरापासून खुंटा पर्यंत येते. कोकणात सगळीकडे होळीचा उत्सव थोड्याबहुत प्रमाणात असाच असतो. काही ठिकाणी होळी लहान असते पण उत्साह तेवढा जास्तच असतो.

देवीच्या पालखी चे पाच दिवस असत पण देवीची पालखी उठली तरी होळी पंधरा दिवस उभी असे. पाडव्याला होळी उतरवतात.होळी उतरवतात म्हणजे उभा केलेला सुरमाड खाली पाडून त्याचे तुकडे करून बाजूला ठेवतात. खुंटावर होळी जाळण्याची पध्दत तेथे नाही. लोकांनी नवसाचे म्हणून बांधलेले अगणित नारळ असतात. होळी खाली आली की ते प्रसादाचे नारळ घेण्यासाठी झुंबड उडते. दरवर्षी लोक श्रद्धेने देवीकडे मागणे मागत असतात. तिचा कौल मिळाला की ते काम होते असे लोकांना मनापासून वाटत असते. मग पुढच्या वर्षी नारळाची तोरणे नवस पुरा करण्यासाठी बांधली जातात.

होळी च्या पाचव्या दिवशी रंगपंचमी येते. मुलांच्या आवडीचा हा सण विविध रंगाचे पाणी उडवून साजरा होतो. पुढे येणाऱ्या उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी ही सगळी तयारी असते. थंड पन्हं, कैरीची डाळ यांचे स्वाद येऊ लागतात. देशावर धुळवड साजरी केली जाते पण कोकणात मात्र रंगपंचमीची जास्त असते. परीक्षा तोंडावर आलेली असते पण अभ्यासाबरोबरच हे रंगीबेरंगी दिवसही मनाला खूप आनंद देतात. रत्नागिरीची, कोकणातील होळी माझ्या डोळ्यासमोर अशीच येते. इतकी वर्षे झाली, काळ बदलला पण सणवार, प्रथा आहे तशाच आहेत. काळानुसार त्यात थोडे बदल झाले असतीलही, पण ती पालखी, होळीचा खुंट, तो लोकांचा उत्साह हे सगळं तसंच असणार आहे. पुन्हा एकदा मनाने मी रत्नागिरी फिरून आले. तेथील होळीचा सण अनुभवायचा योग पुन्हा कधी येतो पाहू या!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अनुकंपा…सहृदयतेतून उमटलेला हुंकार…!!☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ अनुकंपा…सहृदयतेतून उमटलेला हुंकार…!! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

‘परदु:ख शितल असतं’ असं म्हणतात.सर्वसाधारण अनुभवांती यात तथ्य आहे हे मान्य करावं लागतंच. तरीही या वास्तवाला छेद देणारे अपवादही आहेत आणि म्हणूनच त्या अपवादांच्या सत्कृत्यांच्या पायावरच हवेतीलच नव्हे, तर वैचारिक पातळीवरील प्रदूषणापश्चातही जग अजून अस्तित्त्वात आहे आणि जगणं आनंदी होण्यासाठीचा आशावाद सुध्दा..! हा आशावाद जागता ठेवलाय तो मानवी मनातल्या अनुकंपेने..!!

दुसऱ्याचं दु:ख, वेदना पहाताच स्वतः सुरक्षित अंतरावर न थांबता एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखी तात्काळ मदतीला धावून जाण्याची मनात निर्माण होणारी असोशी ही अनुकंपेची जन्मदात्री..! त्या असोशीतून निर्माण झालेल्या सहवेदनेतूनच पाझरत रहाते तीच अनुकंपा! अशा सहवेदनेच्या स्पर्शानेच परदु:ख परकं न रहाता ते स्वतःचंच होऊन जातं. ते शितल नसतंच. चटके देणारं, कासावीस करणारच असतं. त्या कंपनांमधून परदु:खाला कवटाळण्याची जी ऊर्मी झेपावते तीच अनुकंपा..!

या अनुकंपेला त्या त्या वेळी,त्या त्या परदु:खाच्या तीव्रतेनुरुप पहाणाऱ्याच्या सहृदयतेतूनच अनेक वेगवेगळ्या भावना निर्माण होतात, ज्या करूणा, कळवळा, आस्था, कणव, कळकळ, अशा कोणत्याही रंगरुपाच्या असल्या, तरी सहानुभूती हा या सर्व भावनांमधला समान धागा असतो. कृपा, किंव, दया, या सारख्या तत्कालिक भावनांमधेही उपकाराची भावना ध्वनित झाली, तरी मूलत: असते ती सद्भभावनाच..!

अनुकंपा जगणं आणि जगवणं दोन्हीला पूरक असते. विध्वंसक विकृतीला परस्पर छेद देणारी अनुकंपा हा जगाच्या अस्तित्वाचाच मूलभूत भक्कम पाया असते. लहानपणा पासून कौटुंबिक पातळीवरुन होणारे संस्कार आणि शैक्षणिक पातळीवरील मूल्यशिक्षणातून अशा अनेक मूल्यांचे बिजारोपण होत असे आणि ती बिजं माती ओली असल्यामुळे खोलवर रुजतही असत.पण कालानुरुप वेग वाढवत सुरु असणाऱ्या कुटुंबसंस्थाच नव्हे तर शिक्षण आणि सामाजिक पार्श्वभूमीवरील सर्वदूर पडझडीमुळे खिळखिळी होत चाललेली मूल्यव्यवस्था पुन्हा पूर्ववत करणं ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी आवश्यक आहे ती थोडी जागरुकता आणि जाणवायलाच हवी अशी निकड!

अनुकंपेसारख्या सहवेदनांच्या हुंकाराला आवर्जून प्रतिसाद द्यायची सजगता ही आता काळाची गरज आहे एवढं खरं!!

© श्री अरविंद लिमये 

सांगली

९७२३७३८२८८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 91 ☆ आठवणी – जाहल्या काही चुका ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 91 ☆

 ☆ आठवणी – जाहल्या काही चुका  ☆ 

काही चूका शेअर केल्याने हलक्या होतात असं मला वाटतं,

मी माझी ऑक्टोबर 2020 मधली चूक सांगणार आहे. ती चूक कबूल करणं म्हणजे confession Box जवळ जाऊन पापांगिकार करण्याइतकी गंभीर बाब आहे असे मला वाटते.

गेले काही वर्षे माझ्या पायाला मुंग्या येत होत्या, डाॅक्टर्स,घरगुती उपाय करून झाले, पण मागच्या वर्षी मी बाहेर चालत जाताना पाय जड झाला आणि मला चालता येईना, ऑर्थोपेडीक,फिजिओ थेरपी सर्व झाले तरी बरं वाटेना, स्पाईन स्पेशालिस्ट ला दाखवलं,एम आर आय काढला, मणक्याची नस दबली गेली ऑपरेशन करावं लागेल असं डाॅक्टर नी सांगितलं, मार्च/एप्रिल मध्ये ऑपरेशन करायचं ठरलं, पण बाबीस मार्च ला लाॅकडाऊन झालं, कामवाली बंद, माझी सून लाॅकडाऊन च्या काळात आमच्या मदतीसाठी आली घरची आघाडी तिनं उत्तम सांभाळली! तीन महिन्यानंतर ती परत तिच्या फ्लॅटवर गेली……

माझ्या पायाच्या तक्रारी होत्याच ऊठत बसत स्वयंपाक करत होते, नव-याने घरकामात खुप मदत केली, माझी सून आणि नवरा यांना खुपच कष्ट पडले.

एक मैत्रीण म्हणाली मणक्याचं ऑपरेशन टळू शकतं मी स्पाईन क्लिनीक ची ट्रिटमेन्ट घेतेय मला बरं वाटतंय, तिथे जायचं धाडस केलं कारण कोरोना च्या काळात मी मला मधुमेह असल्यामुळे कुठेच बाहेर जात नव्हते कुणाकडे जात नव्हतो,कुणाला घरी येऊ देत नव्हतो!पण दोन  महिने माझा नवरा मला स्पाईन क्लिनीक मध्ये फिजिओ साठी घेऊन जात होता.घरी आल्यावर आम्ही अंघोळ करून वाफ घेत होतो, पण माझं दुखणं कमी होईना, शेवटी ऑपरेशन ला पर्याय नाही हे समजलं सेकंड ओपिनिअन घ्यायचं म्हणून डाॅ भणगेंची रूबी हाॅलची वेळ घेतली तिथे दोन अडीच तास वाट पाहिली डॉक्टरांची! मला तिथे निवर्तलेले आप्तेष्ट आठवले खुप अस्वस्थ झालं, नव-याला म्हटलं आपण उगाच इथे आलो…माझी मानसिकता समजणं शक्य नव्हतं त्याला..मग  भांडण झाल्यामुळे डॉक्टरांना न भेटता घरी ! काही काळ अबोला, मी पुन्हा पहिल्या डॉक्टरांना फोन केला त्यांनी चार वाजता बोलवलं व पाच दिवसांनी दीनानाथ मध्ये ऑपरेशन करायचं ठरलं, सर्व टेस्ट झाल्या, दीनानाथ ची भीती वाटत होती, माझी पुतणी म्हणाली काकी वॅक्सिन घेतल्यानंतर ऑपरेशन कर,दीनानाथ मध्ये जाऊ नको,कामवाली पण म्हणाली, “आई रूबी लाच ऑपरेशन करा!” मला ऑपरेशन ची भीती वाटत होती पण त्या काळात कोरोना ची भीती  वाटली नाही, माझं ऑपरेशन म्हणून सून आणि नातू आमच्याकडे सोमवार पेठेत रहायला आले, कोरोना ची तीव्रता कमी झाल्यामुळे कामवालीला  परत बोलवलं होतं, ऑपरेशन करणा-या डॉक्टरांनी “दीनानाथ मध्ये आता अजिबात भीती नाही, नाहीतर मी तुम्हाला सांगितलं नसतं तिथे ऑपरेशन करायला ” अशी ग्वाही दिली! गुरुवारी ऑपरेशन झाले,हॉस्पिटल मध्ये माझ्याजवळ “हे” राहिले. आम्ही सोमवारी घरी आलो, आमची सून कार घेऊन  आम्हाला न्यायला आली हॉस्पिटल मध्ये,  घरी आल्यावर नातू म्हणाला “आजी मला तुला hug करावंसं वाटतंय पण तुझं ऑपरेशन झालंय!”……..

माझे दीर आणि जाऊबाई मला भेटायला आले त्याचदिवशी!

……..आणि चार नोव्हेंबर नंतर आमचं सर्व कुटुंब “पाॅझिटीव” एक दोन दिवसांच्या अंतराने गोळविलकर लॅबचे रिपोर्ट….. मी, हे, दीर, जाऊ केईएम ला एडमिट, सूननातू घरीच होते होम क्वारंटाईन पण सुनेला ताप येऊ लागला, म्हणून ती आणि नातू मंत्री हॉस्पिटल मधे एडमिट झाली, ऐन दिवाळीत आम्ही कोरोनाशी लढा देत होतो…….

या सर्वाचा मला प्रचंड मानसिक त्रास झाला. असं वाटलं  हे सगळं होण्यापेक्षा मी मरून गेले असते तर बरं झालं असतं, ऑपरेशनला तयार झाले ही माझी चूक, रूबी हाॅल मधून परत आले ही पण चूकच ! संपूर्ण कुटुंबाला माझ्या ऑपरेशन च्या निर्णयाने बाधा झाली, मला सतत रडू येत होतं, सारखी देवाची प्रार्थना करत होते…..आपण कुणीतरी शापीत, कलंकित आहोत असं वाटत होतं! आयुष्यभराची सर्व दुःख या घटनेपुढे फिकी वाटायला लागली, सर्वजण बरे होऊन सुखरूप घरी आलो ही देवाची कृपा! मुलगा म्हणाला “आई तू स्वतःला दोष देऊ नकोस, ही Destiny आहे,”

पण हे शल्य सतत काळजात रहाणारच!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रिय कवितेस.. ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक उमराणी

☆ विविधा ☆ प्रिय कवितेस.. ☆ श्री मुबारक उमराणी ☆

प्रिय कवितेस,

सप्रेम नमस्कार

अलीकडे आधुनिकीकरणामुळे पत्र म्हणजे दुर्मिळ. म्हणून मी ठरवलं मेसेज वगैरे कारण्यापेक्षा सरळ पत्र पाठवावे!  आणि हे पत्र पहिलचं आहे. मला जसं जमलं समजलं तसं लिहिलं, चुकलं तर माफी असावी. शारदेच्या पदकमली रममाण होणा-या विणेच्या झंकारातून शब्द बद्ध होणा-या, कधी आसवातून बरसणा-या, कधी हास्यातून फुलणा-या, कधी मुक्त विहार करणा-या, कधी कारण नसतांना निराशेच्या गर्द खाईत नेणा-या  शब्दात तूच लपलिस. तू कशी आहेस माहित नाहीस, हवेततरंगणाऱ्या, सळसळणा-या झाडांच्या पानात तूचआहेस, वेळूच्या बेटात मस्तपैकी शिळ घालत कान्हांच्या बासरीतून मंत्रमुग्ध विहार करणा-या वनराईच्या गाईच्या गळ्यातील घुंगुर माळांच्या नादमयी सुरात, मेंढपाळ्यांच्या काळ्या गर्द घोंगडीत त्याच्या दिडक्या चालीत आणि त्या रानभर चरणा- या मेंढरांच्या आवाजातील नाद मोहून टाकतो. सुंबरान मांडताना ढोलाच्या, टाळांच्या, कैताळाच्या नादमयी पायातील हालचाल, अंग अंग हेलकावे खाणारे त्यांचे देह पटक्याचा  सोगा वा-यावर भूरभूरताना अबीर गुलालात माळून गेलेल्या चेह-यावरील हास-या भावात तूच आहेस.

सकाळच्या काकडं आरतीत गाव सारं जागं करतांना अंग अंग प्रत्येकाच्या मनात देवत्वाचा भास तूच निर्माण करून, दिवसभरात काम करणा-याची उमेद, जि्द्द त्यातून निर्माण होणारी स्नेहरूपी वात्सल्यातही तूच आहेस. घमानं चिंब निजलेला हमाल पाठीवर असह्य वजन असतांना चालताना त्यांच्या तोंडी “जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणांचा वाजतो” म्हणता असह्य वजन कुठल्या कुठे पळून जाते अन् तो हवेत तरंगल्यासारखा चालायला, पळायला,हसायला लागतो. हे सर्व कविते, तुझ्यामूळेचं नाही का?

पण कधी कधी सुन्न करणा-या घटना घडतात तेंव्हा “रक्ताळले शरीर भडका जीवात झाला आईस सोडवाया येणार कोण बोला”.अशी आर्त हाक मारणारी तूच असतेस. तूच असतेसं होनाजी बाळा, आण्णाभाऊ साठे, बहिणाई, पी.सावळाराम, पठ्ठे बापूराव, ज्ञानेश्वर, मुक्ताई, जनाई, संत नामदेव, तुकारामाची गाथा, एकनाथांचे भारूड शाहिरांची ललकारी,  केशवसुतांची तुतारी, कवीच्या कवितेत, लेखकांच्या लेखनित तुच,फक्त आम्ही नाममात्र असतो.

आभाळभर गरजणा-या काळ्या ढगातील वीज तूच असतेस ढगांना बोलके करणारा “मेघदूत” आम्ही कसे विसरेन? काळ्याकुट्ट अंधारात. रात किड्यांच्या रातभर गुजंन करण्यात तूच सूरमयी होतीस. चंद्राचा प्रकाश शितलतेचा स्पर्श करतांना होणारी शितलतेची जाणीवात तूच नाही का असतेस. सकाळी  क्षितीज फुटते तांबडे तेंव्हा आभाळभर पसरून प्रकाश गीत गायेस, किती रूपे!  हळूवार रंग बेरंगी फुलणा-या पाखरांच्या चिवचिवाटात तूच जन्म घेऊन जगण्याची खुद्द देतेस. तुझे कितीही कसेही वर्णन केले तरी अपूर्णच! !

हिरव्यागार माळरानात रानफुलांच्या रंगात रंगून दवबिंदूच्या मोत्यांची रास रचून सर्वाचं परिसर मोतीमय करतेस. पतंग उडविणा-या निरागस मुलांत, वा-यावर उडणा-या पतंगाच्या मांज्यात आगळाच स्वर तूच निर्माण करतेस. माळभर आनंदाची उधळण होते. त्यातून गीत निर्माण होतात हे माणसाला, निसर्गाला जगण्याची जिद्द, प्रेरणा, उमेद अन् माणसाला गीत गात गात जगण्याचे शास्त्र शिकवतेस, सागराच्या तळापासून ते आकाशाच्या अनंता पर्यत फक्त तूझेचं गीत घुमत असते.

ज्यांनी ज्यांनी तुझी सेवा केली त्यांना तू अजरामर करून सोडलेस किती हे कार्य माणसांच्या पदी भरभरून देतेस, जो गातो तो तरतो, गानकोकिळा लता पासून आजच्या सोनू निगम पर्यताच्या मुखातून लयबद्ध. होऊन त्यांना प्रसिद्धिच्या अती उच्च पदी नेऊन त्यांचा उध्दार करतेस.

गौतमबुध्द, भगवान महावीर, मं. पैंगबर, गुरू नामक, प्रभू येशू, यांच्या मधूर वाणीतून धर्माची शिकवण देणारी तूचं होतीस.

देश भक्ताच्या, सैनिकांच्या, शेतक-याच्या कामगार, साधू संताच्या, कबिराच्या भक्तीत, मीरेच्या तल्लीनतेत, सुरदासच्या भक्तिभावात सा-या, सा-यात तुझाचं जयजयकार होतो.

किती वर्णावे तुज पहाडाच्या गिरीशिखरावर स्थैर्याची,सागर गार्भियांची, नदी, झरे चैतन्य पुष्प जीवनाला सुगंधित बनविण्याची प्रेरणा तूच दिलीस. पक्षी प्राणी यांच्या कंठातून येणा-या आवाजातून सप्तस्वरांची निर्मिती करायला लावलीस. मोरापासून षड्ज, बैलापासून ऋषभ, बोकडापासून गंधार, करकोच्या पासून मध्यम, कोकिळ पंचम, घोडा धैवत, हत्ती निषाद, या सारख्या स्वरांची निर्मिती तुच करून आपलं आगळवेगळ अस्तित्व दाखवलीस या स्वरांना भारतीयांचं दैवत म्हणून आळवतो.

सा- सांब सरस्वती, रे- रघुपति राघव, ग- गणपती, म- महादेव महेश्वर,प- परमेश्वर पशुपतीनाथ, ध- धनेश्वर, नि- निराकार नीळकंठेश्वर आणि संगीत ही मन प्रसंन्न करणारी अद्भूत जादू तुझ्यामुळेचं ऐकतोय आणि या निसर्गातील रंगसंगतीत अधिकचं खुलून दिसतेस. षड्ज होतो कमळासारखा, ऋषभ हिरवा मिश्रित पिवळा, गंधार सोन्यासारखा पिवळा, मध्यम कंद फुला सारखा, पंचम काळी, धैवत पिवळा तर निशाद ठिपक्यांची टिपक्याचा सगळा निसर्गचक्रांत तुझ्यासोबत मग काय कमी आहे बावीस रागांची रचना तर बघा प्राण्यांच्या पायाशी तुलना, धरती मातेला त्या पायांचा स्पर्श, चालताना होणारा एक नांदमय आवाज व्हावा  ऐकावा आणि सारे आयुष्य मंगलमय व्हावे म्हणूनचं असेल मोर दोन पाय, बैल चार, बोकड चार, करकोचा दोन, कोकिळ दोन घोडा चार, हत्ती चार असे बावीस रागांची निर्मिती म्हणूनच कविता तू कोणत्याही भाषेत ये तुला नाद, लय, ताल, स्वर, झंकार आहेचं सारी वाद्ये तुझा नाद मधुर करण्यासाठी स्वतःला शिक्षा करून घेत आहेत. त्या वेळीस संगीताच्या बरोबरीत आम्ही सारे वेडे होतो. थयथय नाचतो. कशाचे भान उरत नाही तू आहेस म्हणूनचं जगण्याला अर्थ आलाय!

आकाशाचा कागद समुद्राची शाई, झाडांची लेखणी  केली तरी तुझे गोडवे लेखन करता येणार नाही ते अपूर्णच राहील आणि अपूर्णतेतचं खरं जगणं आहे नाही का? कळत न कळत काही लिहायचे राहून गेलंतर राग मानू नकोस, समजून घे, मला तुझी सेवा करण्याची प्रेरणा दे!

हिचं इच्छा! तुझ्याकडे  काही मागणार नाही कारण न मागता तू नेहमीचं मला भरभरून देतेस, हा ओघ असाचं राहो हीच मनोमन कामना!

पुन्हा एकदा त्रिवार वंदन करतो. तुझा जयजयकार सा-या आसमंतात घुमो!

मी सदैव तुझाचं ऋणी राहीन हे ऋण मी कसे फेडू!

तुझाचं सेवक

© श्री मुबारक उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘ताळतंत्र’..सुखी जीवनाचा मूलमंत्र! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ ‘ताळतंत्र’..सुखी जीवनाचा मूलमंत्र! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

‘ताल’ आणि ‘ताळ’ हे सख्खी भावंडं शोभावेत असे दोन शब्द. यांच्यात अक्षरसाध्यर्म तर आहेच आणि अर्थसाध्यर्मही. ‘ताल’म्हणजे लय. उदाहरणार्थ द्रूत, मध्य, विलंबित, किंवा एकताल, झुमरा, दादरा यासारख्या संगीताशी संबंधित अर्थाचा हा ताल आहेच.

शिवाय ताल या शब्दाचे ‘तट’ ‘बांध’ असेही अर्थ आहेत. ताल हा असा नियमबद्धता,नियमितपणा यांच्याशी संबंधित शब्द. म्हणूनच त्याची तालबद्ध तालशुद्ध अशी इतर बारकावे ध्वनित करणारी रूपे सुद्धा आहेतच.

‘ताळ’ या शब्दाच्या विविध अर्थांमध्ये ‘ताल’या शब्दार्थातला नियमितपणा ध्वनित होतोच.ताल आणि ताळ यांना मी सख्खी भावंडे म्हणतो ते यासाठीच.

‘ताळ’हा मेळ,मिलाप, सुसंगती, एकवाक्यता,नियंत्रण, मर्यादा अशा विविध रंगछटांचे अर्थ ध्वनित करणारा शब्द! ताळमेळ, ताळातोळा, ताळतंत्र हे सगळे ‘ताळ’ या शब्दाचेच सगेसोयरे.

पूर्वी गणिताचा पाया पक्का करणारे पाढे, पावकी, दिडकी, नेमकी,अडीचकी अशा आकड्यांच्या अनेकपटींची घोकंपट्टी हा शाळापूर्व अभ्यासाचा घरगुती रिवाजच असायचा. त्या काळात मूल सात वर्षाचं होऊन पहिलीसाठी प्रवेशयोग्य होईपर्यंत हा पाया घरीच अतिशय भक्कम करून घेतला जात असे. विविध शोध लावून सोईस्कर, सहजसोपे मार्ग शोधता शोधता हे सगळे हिशोब चुटकीसरशी करु शकणारा ‘कॅलक्युलेटर’ हाताशी आला आणि सगळे चित्रच पालटले. पालटलेच नाही फक्त तर ते चित्र काहीसे ‘विचित्र’ च होऊन बसले. हे सगळं ‘ताळ’या शब्दाचं विवेचन सुरु असताना आठवायचं कारण म्हणजे आमच्या बालवयात  सोडवलेली गणिताची उत्तरे अचूक आहेत का याची शहानिशा करून घेण्यासाठी गणित सोडवून झाले की त्याचा ताळा म्हणजे उलटा हिशोब करून पाहायला आम्हाला शिकवलं जायचं. ताळ म्हणजे जुळणी. त्याप्रमाणे गणितातला हा ताळा म्हणजे, आलेल्या उत्तराशी जुळणी करुन पहाणेच असे. हल्ली हे सगळं कालबाह्य झालंय हे खरं. त्यामुळे हा गणितातला ताळा आता अस्तित्वातच नाहीये.

हिशोबासाठी आलेल्या कॅल्क्युलेटरचा वापर सोपा वाटतो खरा पण हे वाटणं एक भासच ठरतं कधीकधी. कारण यामुळे ‘तोंडी हिशोब’ ही संकल्पना कालबाह्य झालेली आहेच शिवाय कॅल्क्युलेटर वापरताना आकडे किंवा चिन्हे प्रेस करण्यासाठी बोटे वापरावी लागतातच. आणि त्याचा कितीही सराव झाला, तरीसुद्धा बटणं प्रेस करण्यात कणभर जरी चूक झाली, तरी लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागत नाही. आणि ताळा करुन पहाण्याची सोय नसल्याने ती चूक चटकन् लक्षातही येत नाही. यंत्राचा असा सोयीसाठी उपयोग करता करता आपण त्याच्या किती अधीन होत होत परस्वाधीनही झालो आहोत याचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण! जगण्यातलं ताळतंत्र हरवून बसायला निमित्त ठरणारी कॅल्क्युलेटरच्याच मोबाईल, टीव्ही यासारख्या इतर भाऊबंदांची अशी अनेक उदाहरणेही देता येतील.

काळानुसार बदल अपरिहार्य असले तरी ते किती आणि कसे स्वीकारायचे याचं ‘ताळतंत्र’ न राहिल्याने आपण सर्वार्थाने ‘परतंत्र’होत जातोय याचे भान आपण हरवून बसलो आहोत. विकासात लपून बसलेला विनाशही आपण आपल्याच नकळत  कवटाळतो आहोत.

‘ताळतंत्र ‘म्हणजे जीवन शैलीतल्या असंख्य घटकांच्या अचूकतेचे मंत्र’अशीही मांडणी करता येईल. जीवनपद्धतीतल्या पहाटे उठणे, मुखमार्जन, व्यायाम, खेळ, लेखन-वाचन, आपला पेहराव, आहारपद्धती,  संवाद,आदरातिथ्य, स्वयंपाक, पूजाअर्चा, विश्रांती, झोप अशा असंख्य घटकांबाबतचे कृतीनियम म्हणजेच हे मंत्र! त्यांच्या विविध पद्धती काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरलेल्या असल्यामुळे त्या जाणीवपूर्वक नियमित, काटेकोर पद्धतीने पाळण्याचा प्रयत्न सर्वांनीच करायला हवा खरंतर. पण हेच ताळतंत्र न राहिल्याने निर्माण होणारे आरोग्य, स्वास्थ्य, मन:शांती समाधान, शरीर आणि मनाच्या क्षमता अशा अनेक बाबतीतले जटिल प्रश्न आता नित्याचेच होत आहेत. याची पुसटशी जरी जाणिव झाली आणि आपल्या जीवनशैलीतील शिस्त, आत्मसंयमन, नियंत्रण, मर्यादा, सुसंगती, एकवाक्यता अशा अनेक ‘ताळ’ अर्थांचे अचूक भान आपल्याला आले तरच नकळतही ताळतंत्र कधीच सूटू न देण्याची अत्यावश्यक सजगता आपण दाखवू शकू अन्यथा…?

© श्री अरविंद लिमये 

सांगली

९७२३७३८२८८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चादर… अंथरतांना आणि पांघरतांना ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

परिचय 

नाव – सुश्री गायत्री हेर्लेकर
शिक्षण – M.Com., M.Phil.
मुळची कोल्हापूरची, सध्या वास्तव्य पुणे
कॉमर्स कॉलेज कोल्हापुर – 30-32 वर्षे प्राध्यापिका.
वाचन लेखनाची आवड

☆ विविधा ☆ चादर… अंथरतांना आणि पांघरतांना ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

दार किलकिले करुन, …हळुच आत डोकावुन सुनेने सांगितले, “आई, बेडशीटस मळलेल्या दिसतात. बदलता का आज? मशीनला लावुन टाकेन.”

खरंच की. केंव्हा बदलल्या तेही आठवत नव्हते, खरं तर पुर्वी असे होत नसे. नियमीत बदलणे व्हायचे.

अधेमधेही, काहीतरी कारण काढुन घरातील यच्चयावत कॉटवरच्या चादरी बदलायची सवय,  आवड.. हौस किंवा सोसच होता, खुप वेळा त्यासाठी बोलुन पण घेत होते. पण हल्ली कंटाळा, आळस किंवा कोण येतंय माझ्या खोलीत बघायला … काहीतरी निमित्त काढुन चालढकल होते.

आता मात्र मोबाईल बाजुला ठेवुन, ताडकन… वयाला झेपेल इतपत… उठले. चादरी…. हो माझ्या भाषेत चादरीच.. काढाव्यात म्हणुन कपाट उघडले. बेडस्प्रेड, बेडकव्हर, बेडशीट, नाहीतर अगदी पलंगपोस काहीही म्हणा, मला मात्र “चादर”च जवळची वाटते.

चादरींचा हा ढीगच होता कपाटात.

रंग गेलेल्या थोड्याशा विटलेल्या पण जुन्या आठवणी आवडत्या म्हणुन ठेवलेल्या, काही २, ४वेळा धुऊनही खळ न गेलेल्या, टरटरीत वापरायला टाळाटाळ होणार्या, तर काही” “निमित्त्याने काढु”, “फारशी आवडली नाही, द्यायला होईल कुणालातरी ऐनवेळी” म्हणुन कोर्याकरकरीत लेबल ही न काढलेल्या, तर काही नेहमीच्या वापरातल्या. विविध प्रकारच्या रंगबेरंगी पानाफुलांच्या, जॉमेट्रिक डिझाईनच्या, बाटीक प्रिंट, वारली प्रिंट, पॅचवर्क,  दोरीवर्क, विणलेल्या, हौसेने पेंट केलेल्या, आणि हो काही अगदी प्लेन सौम्य रंगांच्या. राजस्थान, गुजराथ, सौराष्ट्र, बंगाल, आसाम, काश्मीर, दक्षिण भारत, मध्य प्रदेश,अशा आसेतु हिमाचलातील अनेक प्रांतातील वैशिष्टे असलेल्या, काही तर परदेशी जन्मस्थान, आणि काही अगदी ओसरी पडवीतल्या ईचलकरंजी, सोलापुरच्या सर्वजणी सुखाने नांदत होत्या माझ्या या संग्रहात.

ही कोलकत्ता ट्रीपमधली,तर ती मैत्रिणीने बडोद्याहुन पाठवलेली.

नवर्याने कधीनाही ते एका लग्नाच्या वाढदिवसाला आणलेली, आणि आईला चादरींची आवड म्हणुन लेकीने वेळोवेळी आणलेल्या. लग्न_मुंजीत मिळालेल्या, नॅपकिन टॉवेल आणायला गेल्यावर खुपच आवडल्या म्हणुन घेतलेल्या, अन् हो नातींनी online मागवून दिलेल्या. प्रत्येक चादरीची वेगवेगळी आठवण. डबल, सिंगल, दिवाणावरच्या, अंथरायच्या, पांघरायच्या… किती प्रकारच्या आहेत.

कुठली जोडी सॉरी सेट काढावा हे ठरवतांना विचाराच्या धाग्यांत गुंतत च गेले.

काय म्हणाली सून, “”बेडशीटस मळल्यात, “आपल्या भाषेत “चादर मळली आहे,” डोक्यात काहीतरी चमकले, मनात आले, आपल्या आयुष्याची चादरही मळायला लागली, नव्हे मळली च आहे. नकळत तोंडातुन शब्द बाहेर पडले,

“चदरिया झिनी रे झिनी

राम नाम रस भिनी रे..”

एक छान भजन. मला आवडणारे. संत कबीरदासांचे. संतमंडळींची जीवनाकडे बघायची दृष्टीच किती वेगळी असते ना? अशी भजने, कोणत्याही गायकाच्या आवाजात, कोणत्याही शैलीत, डोळे मिटून, शांतपणे ऐका. शब्द कानावर पडतात पण मन गुंतते ते शब्दाशब्दातुन प्रतित होणार्या भावार्थातच. शरीराला दिलेली चादरीची उपमा मनात कुठेतरी खोलवर जाऊन रुजते. कमलपुष्पाच्या चरख्यावर ९, १०महिने विणायला लागलेली ही चादर, आपल्याला मर्यादित काळापुरतीच, कबीराच्या भाषेत “दो दिन”च मिळालेली असते.

आपल्या कर्माने “मैली” होते. मग संतांना वाटते, अन् ते भगवंतांना विचारतात अशा अर्थाचे एक भजन,

“मैली चादर ओढ के कैसे

द्वार तिहारे आऊं?”

कारण त्यांनाच माहित असते की भगवंताच्या भक्तीने, नामस्मरणाने ती निर्मल करता येते. अनेक भक्तशिरोमणींनी असे केल्याचे दाखले आहेत.

चादर म्हणजे कापड, वस्त्र. गीतेत, भगवंतांनी मनुष्यदेहाला दिलेले वस्त्राचा रुपक सर्वपरिचित आहे. संदर्भ, दुसरा अध्याय, २२वा श्लोक, “वासांसि जीर्णानि”.

आपण सामान्य माणसेही, चादर आणि वस्त्राचा संबंध शरीराशीच जोडतो. ऊपयोग जाणतो तो संरक्षणाचा. शरीराला इजा पोहचू नये, दुखापत होऊ नये याच हेतूने वापर करतो. अंथरुणात आणि पांघरुण म्हणुन. ती मळु नये म्हणुन काळजी घेतो.तरीही मळतेच. मग पाणी, साबण वापरुन स्वच्छ करतो, या शरीररुपी चादरीबाबत तसे करता येणार नाही का?

भगवंतनामावर विश्वास आणि सत्विचार, सत्संगती, सत्कर्म ही त्रिसुत्री लक्षात ठेवली पाहिजे, चादर अंथरतांना आणि पांघरतांना.

 

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोरोनाबरोबरचं वर्ष – २०२० -२०२१ ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ कोरोनाबरोबरचं वर्ष – २०२० -२०२१ ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय १२ मार्च २०२१ ला! मागील वर्षी 12 मार्चला आम्ही दुबई पुणे ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ने पुण्याला येण्यासाठी निघालो. त्याआधी तीन-चार दिवसच आम्हाला ‘कोरोना’ म्हणजे काय ते कळू लागले होते. नातवंडांना शाळेला सुट्ट्या दिल्या गेल्या. आमचं बाहेर फिरणं बंद झालं होतं. तिथल्या न्यूज पेपर ला येणाऱ्या बातम्यांवरून ब्राझील,इटली, इंग्लंड आणि युरोप मधील कोरोनासंबंधी ची माहिती थोडीफार कळली होती, पण  त्याची तीव्रता अजून जाणवली नव्हती. जावई दुबईला एमिरेट्स एअर्वेज मध्ये असल्याने त्यांना बदलती परिस्थिती लक्षात येत होती. दहा तारखेला त्यांनी आम्हाला भारतात जायचे असेल तर लवकर निघावे लागेल, कदाचित् फ्लाइट्स बंद होण्याच्या शक्यता आहेत आणि एकदा बंद झाल्या की पुन्हा कधी सुरू होतील याची शाश्वती नाही याची कल्पना आली, त्यामुळे आम्ही लगेच 12 तारखेला निघायचा निर्णय घेतला. एअरपोर्टवर आलो तेव्हा नेहमीचे आनंदी, उत्साही वातावरण नव्हते. सर्वजण एका भयाण शांततेत, गंभीर चेहऱ्याने मास्क वापरताना बघून आमच्याही मनावर दडपण आले. आम्हीही मास्क घेतले होतेच, बरोबर सॅनिटायझर ही होते पण या सगळ्याची इतकी काय गरज आहे, असंच वाटत होतं! पहाटे पुणे एअरपोर्ट ला पोहोचलो. तिथेही टेंपरेचर घेतले गेले, बाकी काही त्रास नाही ना, याची चौकशी झाली. आम्ही अगदी ‘ओके’असल्याने हे सर्व कशासाठी? अशीच भावना मनात होती. आम्हाला घेण्यासाठी मुलगा एअरपोर्ट वर आला होता, त्याच्या गाडीतून घरी जाताना त्याने आम्हाला परदेशातून आल्यामुळे लागण झालेले काही कोरोनाचे पेशंट पुण्यात आले आहेत हे सांगितले, त्यामुळे बऱ्याच लोकांना क्वाॅरंटाईन मध्ये ठेवल्याचे ही सांगितले.आम्ही तेव्हा मनानेच निर्णय घेतला की आपणच स्वतःला क्वाॅरंटाईन करून घ्यावे! त्याप्रमाणे घरात एकदा जे पाऊल टाकले ते जवळपास एक महिना बाहेर आलोच नाही! अर्थात मुलगा समोरच राहत असल्याने त्याचा पूर्ण सपोर्ट होता!

ते दिवस अक्षरशः स्थानबद्धतेचे  होते. पोलीस येऊन चौकशी झाली. कॉर्पोरेशन कडून लोक येऊन गेले. हातावर क्वाॅरंटाईनचा शिक्का मारला! शिवाय आसपासच्या लोकांच्या ‘हेच ते दुबई हून आलेले लोक’ असे दाखवणार्या नजरा, या सगळ्या गोष्टींचा नकळत मनावर परिणाम होत होता. त्यावेळचे ते दिवस आठवले की,  मला पूर्वीच्या काळी समाज बहिष्कृत लोकांना कसे वाटत असेल याची जाणीव सतत मनाला होत असे! त्यामुळे मन अधिकच अंतर्मुख झाले!त्रस्त असलेल्या मनाला व्यक्त होण्यासाठी शब्द सापडू लागले आणि नकळत अनेक लेख आणि कविता लिहिल्या गेल्या. तो एकांतवास एका दृष्टीने फारच फायदेशीर ठरला! स्वतःच्या मनाशी संवाद घडू लागला! मोबाईल वरून जवळच्या व्यक्तींशी बोलता येत होते एवढाच फक्त माणसांची संवाद!

त्या काळात कोरोनाचे पेशंट वाढले, मधेच लॉकडाउन चालू होता, दूध, भाजी, किराणा या गोष्टी वेळच्या वेळी मिळतील ना अशी साशंकता  सतत मनात असे!आयुष्यात कधी न पाहिलेले अशा प्रकारचे दिवस होते ते! जगात सगळीकडे कोरोनाचा प्रभाव दिसत होता. दुःखात सुख म्हणजे आम्ही परदेशातून स्वदेशात वेळीच आलो होतो! आम्ही आलो आणि दुसर्‍या दिवसापासूनच दुबईहून येणाऱ्या फ्लाईटस् बंद झाल्या. तिथे मुलगी,जावई यांच्या घरीच होतो, तरीसुद्धा आपला देश, आपलं घर हे वेगळेच असते! गेले पूर्ण वर्ष या कोरोनाच्या छायेतच चालले आहे, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही द्रुष्टीने त्रासदायक च गेले.

अजूनही कोरानाचे संकट पूर्णपणे गेलेले नाही. कोरोनाच्या लसीचा एक डोस पार पडला आणि एका मोठ्या दिव्यातून बाहेर आल्या सारखं वाटले. अजून 28 दिवसांनी दुसरा डोस!’कोव्हिशिल्ड’ चे शिल्ड वापरून पुन्हा एकदा जीवनाला नव्याने सामोरे जायचेय! जगावर आलेल्या या संकटाला माणसाने धीराने तोंड दिले आहे. नकळत एक वर्ष डोळ्यासमोर उभे राहिले! कोरोनाच्या २०२० सालाने तसं माणूस बरेच काही शिकला! निसर्ग आणि माणसाने एकमेकाशी संलग्न राहिले पाहिजे हे कोरोनाने शिकवले! प्रगतीच्या नावाखाली माणसांकडून मानवी मूल्यांची जी घसरण चालली होती, ती थोपवण्याचे काम या कोरोनाने केले आहे एवढे मात्र नक्की!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

१० मार्च २०२१

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print