मराठी साहित्य – मराठी आलेख – * कुठलाही निर्णय घेताना मुलांना विश्वासात घ्या * – सुश्री रंजना लसणे

सुश्री रंजना लसणे 

कुठलाही निर्णय घेताना मुलांना विश्वासात घ्या

(आदरणीया सुश्री रंजना लसणे जी के शिक्षिका/लेखिका हृदय का अभिनंदन।  इस अत्यंत शिक्षाप्रद एवं हृदयस्पर्शी कथा के लिए सुश्री रंजना जी को सादर नमन)

जून महिना म्हणजे प्रवेशाची गडबड नवीन येणाऱ्या मुलांची ओळख करून घेणे, त्यांच्या आवडी निवाडी जाणून घेणे, एकदम उत्साहाचे वातावरण, मी मुलांशी छान गप्पा मारत होते  एवढयात  एक नवीन विद्यार्थी प्रवेश झाला. नाव ऋषीकेश नावा प्रमाणे  दिसायला सुंदर  गोरागोमटा स्मार्ट  अभ्यासातही चांगला  होता. पाहताच मनात भरावा असं व्यक्तीमत्व, वरकरणी पाहता सर्व काही ठीकठाक वाटायचे, परंतु  दिसतं तसं अजिबात नव्हते. मुलांच्या रोज नवीन तक्रारी,  “मेम याने मला मारलं”. कधी दगड कधी छडी तर कधी लाताळी, बर विचारलं तर एकही शब्द न बोलता गप्प उभा राहायचा समजावून पाहिलं  चिडून पाहिलं एकदोन वेळेस  मारून ही पाहिलं. मुख्याध्यापकांकडे नेऊन टी.सी. देईन असे सांगितले, परंतु काहीच बदल  नव्हता.

एक दिवस तर त्याने एका मुलाचं चक्क  दगड मारून डोके फोडलं. मला या मुलाचं काय करावं खरंच कळत नव्हतं  तीस वर्षाची नोकरी करून मला एका मुलाला समजावून सांगता येतं नव्हतं. मी पुरती हतबल झाले होते. घरच्यांना सांगून पाहावे म्हणून, मुलांना पाठवून “त्याच्या घरून कोणालातरी बोलावून आणा,” असे सांगितले. मुलानी त्याच्या काका म्हणजे मावशीचा नवरा, यांना बोलावून आणले. बहुतेक येताना मुलांनी  काय घडले ते सांगितले असावे.

शाळेत आल्याबरोबर त्यांनी तोंडाने अर्वाच्य शिव्या देत हातातल्या  छडीने बेदम झोडपायला सुरूवात केली. मला ते पहाणे असह्य होऊन “आहो, सोडा त्याला ही काय पद्धत झाली समजावून सांगण्याची, ” म्हणत मी चक्क त्याला त्यांच्या तावडीतून सोडवून घेतले . आणि त्यांना

जायला सांगितलं.  “माजलाय साला,” म्हणत तावातावात ते निघून गेले अन्  मला चक्क चपराक मारल्यासारखं झालं. “सॉरी बेटा” म्हणून त्याला जवळ घेताच, एवढा वेळ मुकाटयाने मार खाणाऱ्या ऋषीला भरून आलं आणि चक्क  मला घट्ट घरून एवढा रडला की अक्षरशः पूर्ण वर्ग रडला.

जवळजवळ पंधरा वीस मिनिटांनी तो शांत झाला.  बाकी मुलांना बाहेर पाठवून त्याची चौकशी केली तेव्हा कळलं की, खरं तर त्याला एकट्या आईला पुण्याला सोडून इथं राहायचं नव्हतं.

त्याचे वडील  सहा महिन्या पूर्वी लाईटचे काम करताना शॉक लागून मरण पावले. आई मामाकडे पुण्याला राहते मामा मामी पण काका सारखेच वागायचे. आई आणि बहिणी यांचे हाल त्याने पाहिलेले होते. दोन मोठ्या बहिणी आई एवढे एकत्र शिवाय याच्या  शिक्षणाचा खर्च एवढे  एकाच ठिकाणी नको म्हणून मावशी उदार अंतःरणाने याला घेऊन आलेली. परंतु सर्वांनी असं अलग अलग राहावे  हे त्याला मान्य  नव्हते . तसेच त्याला आई आणि बहिणींची   काळजी वाटत होती.  “तू नकोस काळजी करू, मी तुझ्या  आईशी नक्की बोलेण, पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच एकत्र राहाल, असे मधेच पुण्याच्या शाळेत तुला कोणी घेणार नाही तुझे वर्ष वाया जाईल पुन्हा चौथीत बसायला तुला आवडेल का ? ”  असे म्हटल्यावर त्याला चे पटले . मी आईला सांगते असे म्हणताच तो खूष झाला . चॉकलेट खाऊन खेळायला गेला  आईचा नंबर मिळवून   त्यांना, “ताई, बाळापूरला  आल्यानंतर मला भेटा आणि तो छान अभ्यास करत आहे,” असे ही सांगितले. हे सर्व सगळ्या मुलांच्या  समोर घडल्यामुळे मुलांनी त्याची तक्रार करणे  नुसते बंद  केले असे नाही, तर तो नेहमी  खूष कसा राहील यासाठी ती सारी न सांगताच प्रयत्न करू लागली . वर्षभरात अप्रतिम  अभ्यास केला, एवढेच नव्हे, तर काका सोबत राहून दाढी कटिंग चे कामही शिकला. त्याच्यातील हा बदल पाहून मलाही समाधान वाटलं मधेच दोनचार वेळा तू पुढच्या वर्षी माझ्याकडे राहातोस का विचारलं परंतु स्वारी जागेवरच अडलेली. शेवटी  त्याच्या आईलाच मी घडलेला सर्व प्रकार समजावून सांगितला, ” ताई कुठेही राहिलात तरी काम तर करावेच लागणार कुणीही सगळ्या कुटुंबाला बसून खाऊ घालणार नाही, मग सगळेच गावी राहा सासरच्या लोकांशी गोड बोलून त्यांची मदत घ्या त्याच्या आधाराने जमलं तर एकत्र किंवा वेगळं का असेना राहा. तुम्हाला त्यांची  मदतच  होईल तिथेच राहून काम बाहेर करण्या पेक्षा त्यांची कामे करा, हेही दिवस जातील.” त्यांनाही ते पटले असावे कांही दिवसातच  त्या राहायला गावाकडे आल्या आणि सगळं व्यवस्थित झालं.

चौथी पास झाल्यावर  सुट्टी नंतर तो परत आला तेव्हा म्हणाला, “आम्ही सर्वजण आमच्या गावीच राहतो. आम्हाला  असलेली शेती  करतो मीही सुट्टीत आणि सकाळ- संध्याकाळी दुकानात काम करून  आईला मदत करतो.” असे सांगताना  त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता.

त्याचे गाव जवळच असल्यामुळे आला की भेटतो “आजी काका पण मदत करतात, ” असे सांगत असतो.

तात्पर्य : एखाद्या निर्णय जरी आपण तो त्यांच्या भल्यासाठी घेत असलो तरीसुद्धा तो घेताना मुले लहान आहेत म्हणून त्यांना गृहीत धरण्यापेक्षा त्यांच मत सुद्धा विचारात घेणे आवश्यक असते. अन्यथा त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.

*रंजना लसणे .*

आखाडा बाळापूर

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कथा / लघुकथा – * दुर्दम्य * – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

दुर्दम्य

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी   की  एक भावुक लघुकथा दुर्दम्य। )

एssss सुनंदाsss अत्यंत चिरक्या आणि घोगऱ्या आवाजातली हाक आणि त्या पाठोपाठ दणदण पायऱ्या उतरणारी मोंगोल वळणाची , उमलू घातलेली, घट्ट दोन वेण्यांचे हेलकावे मिरवणारी मुलगी आणि तिच्या उतरण्याकडे अनिमिष नजरेने बघणारा जिन्याच्या पहिल्या पायरीवर असलेला पूर्ण पुरूषाच्या वाटेवरचा मोंगोल चेहरेपट्टीचा मुलगा ..काळजात चर्रर्र झालं ते दृष्य बघून ! मतिमंद म्हंटलीत तरी निसर्गाने आपलं काम चोख बजावलं होतं. शारीरिक बदलाची चाहूल आणि प्रीतीची कोवळीक नजरेत उतरली होती. पण ह्या साऱ्याचं रूपांतर कशात होणार ह्या जाणीवेने मात्र माझं मन सुन्न झालं, आणि झर्रकन् भूतकाळात गेलं.

माझ्या कळत्या वयात एक कुटुंब आमच्या घराशेजारी राहायला आलं होतं. त्या कुटुंबात एक छोटा मुलगा आजूबाजूच्या समवयस्क मुलांच्या टिंगल टवाळीचा विषय झाला होता. त्याला आपल्यात खेळायला घेणं तर दूरच पण त्याच्या बोलण्यावर हंसणं, त्याच्यावर उगाचच दादागिरी करणं, त्याला चिडवणं हा त्या मुलांचा दिनक्रम ठरलेला. शेवटी वैतागून आईचं त्याला घरात डांबून ठेवणं आणि त्याने आसुसून खिडकीतून मुलांचे खेळ बघणं हे त्याने स्विकारलं होतं. काहीच दिवसांत त्यांची परत दुसऱ्या गांवी बदली झाली आणि माझ्याही मनातून हळूहळू त्याची खिडकीतली आसूसलेली नजर, आणि लाळभरला चेहरा पुसट तर झाला. पण मतिमंद मुलांच्या आयुष्याबद्दल एक प्रकारचं कुतूहल मात्र निर्माण झालं.

मतिमंद मुलांची शाळा आणि लागून असलेलं वर्कशाॅप नेहमीच खुणवायचं मला. आतल्या जगाबद्दल एक प्रकारची उत्सुकता मनात असायची. कसं असेल ते जग, काय वय असेल त्या जगाचं, काय चौकट असेल तिथल्या शिस्तीची, आपसात खेळत वाढत मैत्रीचे धागे गुंफले जात असतील का, की कुठलीही गोष्ट आकलनाच्या अल्याड अथवा पल्याडचा टप्पा गाठता न आल्यामुळे सारं जगच गोठल्यासारखं झालं असणार ?

खरंच बधीर व्हायला झालं होतं मला असंख्य विचारांनी !

मुख्य प्रवाहात आपलं मूल न सोडता त्याचं वेगळं स्वतंत्र अस्तित्व समर्थपणे जपत, दुर्दम्य आशावादाचं खतपाणी घालून त्या अस्तित्वाला अर्थ देण्याचा प्रयत्न करणारे कितीतरी पालक त्या शाळेत मी बघितले. त्या दुर्बल मनस्क मुलांना शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी राबराब राबणारे, आपुलकीने त्यांच्याशी वागणारे कितीतरी स्निग्ध चेहरे मला चकित करून गेले. थोड्याफार फरकाने एकसारखाच बुद्ध्यांक असलेली केवळ आकाराने वाढलेली लहान-मोठी मुलं काळजात एक कळ उमटवून गेलीत. त्यांचे आपसातले खेळ, विशिष्ट आवाजातलं न कळणारं आपसातलं संभाषण, निर्विकार चेहऱ्यावरचे शून्यातले डोळे, लाळेची संततधार, सारं मुख्य प्रवाहाच्या अगदी विरूद्ध दिशेने जाणारं भासत होतं. पण त्याच वेळी मुख्य प्रवाहात त्यांना मिसळता यावं, ह्या जगाचा एक भाग आपणही आहोत ह्याचं आत्मभान त्यांना यावं, समर्थपणे आपल्या पायावर उभं राहण्याइतपत सक्षमता त्यांच्यात यावी म्हणून विविधांगांनी कसून मेहनत घेण्याची तिथल्या संस्थेची जिद्द बघितली आणि मनोमन हात जोडले मी त्यांच्या चिकाटीला ! आणि मनोमन हात जोडले मी पालकांच्या दुर्दम्य आशावादाला आणि अंगभूत सजग पालकत्वाला!!

थोडा वेळच त्यांच्या सान्निध्यात मी राहिले पण मन अगदी विषण्ण झालं. उदास झालं . नैराश्यानं घेरलंच मला. आयुष्याची ही बाजू कधी मी फारशी जवळून बघितलीच नव्हती, पुसटशी ओळख ह्या जगाशी कधीतरी झाली होती पण काळाच्या प्रवाहात ती कधीच मागे पडली होती. खरंच त्या क्षणी नियती माणसाला हातचं बाहुलं करून ती त्याच्याकडे बघत विकट हास्य करतेय असा भास झाला मला आणि त्याचक्षणी तिच्या कचाट्यातून झुंजारपणे स्वत:ची सुटका करून विजयी स्मित करणाऱ्या शूर माणसाचा साक्षात्कारही झाला मला ! पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे जरी खरं असलं तरी वाट्याला न आलेल्या उजव्या दानाने हताश न होणारा ‘पुत्र मानवाचाही’ तितकाच खरा ! आयुष्याची घडी नीट नेटकी बसविण्यासाठी अविरत झटणाऱ्या  माणसाच्या ह्या झुंजार वृत्तीला लाख लाख सलाम !

© ज्योति हसबनीस

नागपूर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कथा / लघुकथा – *ऊस डोंगा परी……..* – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

ऊस डोंगा परी……..

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी   की लघुकथा ऊस डोंगा परी……..। )

रात्रीची फ्लाईट घेतांनाच मनावर एक प्रकारचं दडपण आलं होतं. एयरपोर्टपासून घर बरंच दूर होतं. रात्रीच्या वेळी पायाखालचा रस्ता, सवयीची वळणं देखील अनोळखी भासू लागतात, रस्त्यावरचे दिवे बऱ्याचदा काळोखच उजळ करतायत की काय असा भास होत असतो. पण वेळेचं आणि पैशाचं  गणित सोडवण्याचा हाच एक उत्तम पर्याय असल्याने जिवाच्या कराराने शेवटी हाच निवडला , आणि आता ज्याची भिती वाटत होती तेच झालं. चांगली दीड तास लेट झाली होती flight! विमान लॅंड होऊन सामान मिळेपर्यंत ११.३० च वाजले होते.

सामान घेऊन बाहेर पडले आणि रिक्षेवाले टॅक्सीवाले मागे पुढे घोटाळायला लागले, टॅक्सी की रिक्षा अशी दोलायमान स्थिती असतांनाच एक काळाकभिन्न,  राकट, डेरेदार पोटाचा, घेरदार माणूस जणू मला घेरल्यासारखाच जवळ आला. ‘चला आपल्या रिक्षेत बसा, सामान द्या, तुम्ही व्हा पुढं!’ मला हो नाही म्हणायची संधी ही न देता.

जणू त्याने फर्मानच सोडलं त्याच्या रिक्षेत बसायचं. आणि त्याने एका माणसाला इशारा केला, त्यासरशी त्या माणसाने सराईतपणे रिक्षा जवळ आणून उभा केला आणि माझं सामान ठेवायला सुरूवात केली. ‘माझा हात घट्ट घरून ठेव ‘असं देवाला विनवत मी रिक्षेत बसले. मी मनोमन स्वत:लाच शिव्या घालत होते की, ‘का आपण असे त्या माणसाच्या म्हणण्याला भुललो, का नाही म्हंटलं नाही , कसा दिसत होता तो, अक्षरश: गुंड पुंड, भाई कॅटॅगरितला वाटत होता! आणि त्याने इशारा केलेला माणूस पण त्यालाच सामिल असणार! कित्येक उलट सुलट  बातम्या पेपरमधल्या आपण वाचत असतो, का आपण त्यातून शहाणपण शिकत नाही, ‘अशा एक ना अनेक विचारांचे  भुंगे डोकं पोखरायला लागले.

दिवसभराची पावसाची झड थांबली होती. खाचखळगे पाण्याने  तुडुंब भरले होते ! रस्ते पण काजळलेले, शिणून पेंगुळलेले, एकटेपणात गुरफटलेले वाटत होते. गारेगार झालं होतं पुणं अगदी! थंडं वारं हाडात शिरून अगदी झिणझिणून टाकत होतं तनामनाला!  एखाद् दुसरं वाहन आणि रिक्षेचा आवाज एवढंच काय ते रात्रीच्या नीरव शांततेचा भंग करत होतं. संभाषण नसल्याने एक विचित्र शांतता वातावरणात जाणवत होती. माझ्या मनातल्या गोंधळाचा सुगावा लागल्यासारखा, ‘ताई लेट झालं का विमान’ अशी त्याने संभाषणाला सुरूवात केली. त्याचं ‘ ताई ‘ हे संबोधन मी ऐकलं आणि माझ्या मनावरचा ताण अगदी कुठल्याकुठे पळाला. आणि मग आमच्या काय गप्पा रंगल्यायत राव ! त्याचं नेटकं कुटुंब, दोनच मुली पण त्यांना कसं मुलासारखं वाढवलं, त्याच्या ऐपतीप्रमाणे कसं शिकवलं, पुण्यातलं, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, राजकारणातले डावपेच, मुत्सद्दी, तसंच कुचकामी नेतृत्व, आणि शेवटी सामान्यांसाठी सारे एकाच माळेचे मणी हा निष्कर्ष! सगळं शेवटी जिथलं तिथेच राहतं, आपल्या पोळीवर तूप ओतून घेणाऱ्यांचं फावतं असा सूर!

खरंच, रात्र , निर्मनुष्य रस्ता, दूरवरचं घर सारं सारं विसरायला झालं मला. भानावर येत, ‘आता डावीकडे घ्या दादा’ असं त्याला सुचवत मी घरी पोहोचले देखील! त्याला रिक्षेचं भाडं देत आणि वर बक्षिसी देत शुभ रात्री चिंतत जिना चढतांना चक्क गुणगुणत होते मी …

मंडळी कल्पना करा काय गुणगुणत असेन मी ..? ‘ ऊस डोंगा परी, रस नोहे डोंगा, काय भुललासी, वरलिया रंगा? ‘खरंच राहून राहून माझ्या डोळ्यासमोर तो काळाकभिन्न, राकट देहाचा, डेरेदार पोटाचा, घेरदार माणूस आणि त्याने त्या रिक्षेवाल्याला केलेला इशारा येत होता. त्याच्या बाह्यरूपाचा मी धसका घेतला होता, भीती वाटली होती मला, पण प्रत्यक्षात किती वेगळा अनुभव आला मला. खरंच बाह्यरूपावरून असे अंदाज बांधणं अगदी चुकीचं आणि एखाद्यावर अन्याय करण्यासारखंच आहे, नाही का? किती मोठी चूक करतो आपण अशावेळी! माणसाचं दिसणं आणि त्याचं असणं यातल्या त्याच्या माणूस असण्याचा विसर का पडतो आपल्याला? आणि हो अजून एक गोष्ट ….कुठल्याही परिस्थितीत आपला हात ‘त्याने’ घट्ट धरलाय ही जाणीव सतत मनाशी जपावी, ती जाणीव आपला प्रवास नेहमी सुरक्षित होईल ह्याची काळजीच घेते! आपल्याला उभारी देऊन निश्चिंत करते!!

© ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कथा / लघुकथा – * तरूणाई * – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

तरूणाई

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी   की लघुकथा तरूणाई। )

‘आई मैत्री वेगळी, आणि व्यवसाय वेगळा’. व्यवसायात माझा पार्टनर म्हणून जरी आता तो राहिला नसला तरी आमच्यातली मैत्री तर तशीच आहे आणि तशीच राहणार. मित्र म्हणून तो आजही मला तितकाच आवडतो. नाही जमलं त्याला धंदा सांभाळणं, नाही मानवलं आम्हाला त्याचं व्यवसायाकडे दुर्लक्ष करणं. नविन नविन व्यवसाय, झोकून देऊन काम करून सुरूवात केली खरी आम्ही सगळ्यांनी, पण नाही राखता आलं त्याला उत्साहातलं सातत्य, देखरेखीतली जागरूकता, हिशेबातली सतर्कता! जाण असूनही नाही पेलता आली जवाबदारी, पण म्हणूनच दिला ना त्याला डच्चू! आम्हीच एकत्र बघितलेल्या स्वप्नाच्या मनोऱ्याचा एक खांब खणून बाजूला फेकतांना कोण यातना झाल्या आम्हाला, पण व्यवसाय सुरळीत चालावा, धंद्याला रूप यावं, म्हणून मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला, आणि योग्य वेळी निर्णय घेतल्याचा समाधानाचा सुस्कारा देखील सोडला. पण याचा अर्थ असा नाही ना होत की पार्टनरशीप बरोबर दोस्तीचाही शेवट झालाय! अगं कधीही काही सल्ल्याची गरज भासली , तर आम्ही धाव घेणारच त्याच्याकडे! अगं काय सुपीक डोकं आहे त्याचं, काय भन्नाट कल्पना असतात त्याच्या, हा आता थोडा भरकटलेला असतो , पण असतातच अशी ही creative लोकं  थोडी भरकटलेली, त्यांचं जगही वेगळं, आणि त्यात रमण्याच्या त्यांच्या कल्पनाही वेगळ्या! चल निघतो मी, एक काम दिलंय त्याला, बघतो झालं का final ते! ‘फटाफट माझ्या प्रश्नाला उत्त्तर देत, की मला गप्प बसवत माझ्या प्रश्नार्थक मुद्रेची जराही फिकीर न करता, असंख्य विचारांच्या भोवऱ्यात मला एकटीला गरगरत सोडून बाईकला किक मारत झूम्मदिशी तो गेला सुद्धा!!

वयाच्या सव्वीसाव्या वर्षी विचारांची एवढी स्पष्टता आपल्यात होती? असली तरी ती इतक्या स्पष्टपणे मांडण्याची ताकद आणि पारदर्शीपण आपल्यात होतं? व्यवसाय आणि नात्यांची गल्लत न करता दोन्हीचा तोल सांभाळत जीवनाचा ताल बिघडू न देण्याची मानसिकता आपल्यात होती? मुळात नाकासमोर चालत, एका comfort zone मध्ये वावरण्याची सवय लावून घेत आयुष्य गेलं आपलं, वेगळी वाट चोखाळणं तर मनाला शिवलं देखील नाही आपल्या! आणि त्या पार्श्वभूमीवर मनात असेल तेच करणारी , ईप्सित साध्य करण्यासाठी जिवाचं रान करणारी ही तरूणाई खुप वेगळी भासली मला! वेगवेगळ्या क्षेत्रांत पावलं टाकतांना, चालीतला वेग, तिची लय बिघडू न देता कायम राखणाऱ्या ह्या तरूणाईचा,  त्यांच्या आत्मविश्वासाचा मला खुप अभिमान वाटला त्या क्षणी ! स्वतंत्रपणे व्यवसाय उभारून भक्कमपणे पाय रोवू बघणारी ही दमदार तरूणाई मला खुप काही शिकवून गेली.  माझ्या बुरसट आणि कोत्या विचारांचा धुव्वा उडवत मनाचा अगदी स्वच्छ उपसा करणारी ही तरूणाई एका वेगळ्याच तेजाने झळाळत असलेली मला जाणवली!

विचारांचं वादळ शमलं होतं. डोळ्यातल्या प्रश्नचिन्हाची जागा आता  अपार स्नेहाने घेतली होती, कपाळावरच्या आठ्या पार विरल्या होत्या, चेहऱ्यावर कौतुक आणि आनंदाचं तृप्त हास्य पसरलं होतं, आणि मनात फक्त ‘शुभं भवतु’ चे हुंकार निनादत होते.

© ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कथा/लघुकथा – योग्यता – श्री सदानंद आंबेकर 

श्री सदानंद आंबेकर 

 

 

 

 

 

योग्यता

(श्री सदानंद आंबेकर जी की हिन्दी एवं मराठी साहित्य लेखन में विशेष अभिरुचि है।  गायत्री तीर्थ  शांतिकुंज, हरिद्वार के निर्मल गंगा जन अभियान के अंतर्गत गंगा स्वच्छता जन-जागरण हेतु गंगा तट पर 2013 से  निरंतर प्रवास

हम श्री सदानंद आंबेकर जी  के आभारी हैं इस मराठी  लघुकथा – “योग्यता ” के लिए)

शहरातील नामवंत ई एन टी तज्ञ डाॅ किशोर देशपांडे यांचा मोबाइल वाजत होता। आपल्या घरीच असलेल्या दवाखाण्यातून निघून बैठकीत पोहोचे पर्यंत सतत वाजत असलेल्या घंटी ने वैताग आणला, डाॅ साहेबांनी जसांच फोन कनेक्ट केला, दुसरी कडून गावी असलेली त्यांची आई म्हणाली- अरे किशोर, किती वेळानी फोन घेतो रे तू ? घरी कोणी नाही कां रे ?

किंचित वैतागानी डाॅ उत्तरले- अगं आई, या वेळी आम्हीं दोघेहि पेशंट सोबत असतो ना, म्हणून गं वेळ लागला। हं, बोला , कसा काय फोन केला दुपारी ?

आईने जुजबी विचारपूस केली नि पुढे म्हणाली- कां रे किशोर , तुझा आवाज इतका बसलेला कां बरं आहे?

यावर डाॅ साहेबांनी उत्तर दिलं कि काही नाही, मागल्या आठवड्या पासून खोकला व गळा बसला आहे, काही विशेष नसून सीजनल आजार आहे नि मी हवे ते एंटिबायोटिक्स घेतलेत;

हे ऐकून आई म्हणाली – अरे ते असू देत, पण ऐक, थोडी शी जेष्ठमधाची पूड, काळे मिरे आणि लवंग भाजून त्यांना मिळवून मधा सोबत घे बघू दोन तीन दिवस, पहा, लगेच आराम होईल।

आपल्या आईचा हा प्रेमळ सल्ला ऐकून डाॅ किशोर त्यांना म्हणे- अगं आई, मी याचाच डाॅ आहे, माला ह्याचा इलाज महिताय, मी औषध घेतलंय। नंतर आईला वाईट वाटू नये म्हणून म्हणे बरं, मी हे आजंच घेईन। घरची मोघम विचारपूस करून आईने फोन बंद केला।

आज डाॅ किशोर रिटायर होऊन सत्तरा पलीकडे झालेत, मुलगा-सून दोघेहि डाॅक्टर असून परदेशात असतात। डॉ साहेबांना मागल्या काही दिवसांपासून गळयांत पुन्हां इंफेक्शन झाल्या मुळे बोलायला खूप त्रास होऊन राहिला होता। साधारण औषध घेत असतांना त्यांची पत्नी आज त्यांना म्हणाली – ऐकंतलत का हो, तुम्हाला अजिबात आराम वाटत नाही आहे, माझं ऐकाल तर थोडी शी जेष्ठमधाची पूड, काळे मिरे आणि लवंग भाजून त्यांना मिळवून मधा सोबत घ्या बघू दोन तीन दिवस, पहा लगेच आराम होईल।

अनेक वर्षां पूर्वी आपल्या आई नी म्हंटलेले शब्द आज पुन्हां तसेच ऐकून त्यांना वाटले, आपुलकीच्या या उच्च भावने पुढे माझी चिकित्सकीय योग्यता ठेंगणीच। प्रेमाची ही भाषा पीढीगत अशीच चालत राहणार।

©  सदानंद आंबेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कथा/लघुकथा – आशिर्वादाचं पाकिट – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

आशिर्वादाचं पाकिट

(e-abhivyakti welcomes Mrs. Jyoti Hasabnis who is a renowned Marathi Author/Poetess. Her articles are being published in Sakal Nagpur Edition.) 

कपाट आवरता आवरता एक रिकामं पाकिट दिसलं . जसं जपून ठेवलंय अगदी ! मनात विचार येतोय , रिकामं पाकिट कशासाठी जागा अडवून बसलंय फेकायला हवंय तेवढ्यात त्याच्या अक्षराने लक्ष वेधलं , बारीक बारीक डोळ्यांनी त्यावरचा मजकूर वाचला , चष्मा डोळ्यावर चढवला , पुन्हा पुन्हा वाचलं , हळूवार हात फिरवला त्यावर …आईच्या सुरेख हस्ताक्षरांतलं तोंड भरून आशिर्वाद देणारं पाकिट होतं ते ! होतंच ते जपून ठेवण्यासारखं ! ते पाहिलं आणि मन जाऊन पोहोचलं माहेरच्या अंगणात ! आठवणींचे लक्षावधी फुटवेच फुटले मनात !

माहेरचं वारं काही वेगळंच असतं का ?

अधिकच मंदशीतल  , गंधभरलं ! घराच्या कट्ट्यावरच्या रंगलेल्या तिच्याबरोबरच्या गप्पा अजूनही मनात ठाण मांडून आहेत अगदी बकुळफुलांच्या गंधासारख्या ! मुलांच्या धबडग्यात जो संध्याकाळचा वेळ मिळायचा तो असा खास दोघींचा ! संध्याकाळचं भणाण वारं अंगावर घेत जिव्हाळ्याच्या विषयांना कुरवाळत,  कधी दिवेलागण व्हायची कळायचं देखील नाही !

माहेरचं आभाळ काही वेगळंच असतं का ? त्या आभाळाच्या छताखाली ना एक अन्नपूर्णा असायची ! आभाळाएवढे अमाप लाड पुरवणारी , लाडाकोडाने खाऊ घालणारी , सुगरण हातांची ! आईचा हात जादूचा असतो का ? तशीच आमटी मी पण करते  पण आईच्या आमटीची सर तिला कधीच नसते , तसाच मसालेभात मी पण करते पण मसालेभात असावा तर अस्साच असं तिच्या मसालेभाताचा पहिला घास घेताक्षणी प्रकर्षाने जाणवायचं  ! आणि सांजा …तो तर खास तिच्याच हातचा , त्याची सजावट तर तिनेच करावी ! खरंच तिच्या हातात जादूच होती !

माहेरचं घड्याळ खुप फास्ट असतं का ?  , कॅलेंडर मधल्या तारखांना पुढे पुढे जायची खुप घाई झालेली असते का ?आत्ताच तर आलो आणि निघायचा दिवसही आला , इतक्या लवकर हे असं कसं झालं हे एक न सुटलेलं कोडंच !

ओट्यापाशी आई असणार पण तिचं चित्त स्वैंपाकात नसणार , नजर सतत माझ्या हालचालीवर , मध्येच ,अगं कॉफी घेते का , ह्या प्रश्नाने मी चमकणार , कॉफी आणि ह्या वेळी ..? आता उमगतेय  ह्या प्रश्नामागची तिची मन:स्थिती .. तिची घालमेल !

माहेरचं प्रेम इतकं हळवं असतं का ?

दरच वेळी निरोप घेतांना तिच्या डोळ्यात दाटलेली आभाळमाया वाटभर माझ्या सोबत असायची ! आतल्या आत हुंदके जिरवणारी ती माऊली  मला जवळ घेत हळूच तिचं ते आशिर्वादाचं पाकिट माझ्या हातात सरकवायची ! आणि …तिचं सुंदर हस्ताक्षरातलं , खुप छान प्रेमाचे चार बोल लिहीलेलं पाकिट घेतांना मला काय वाटायचं ते शब्दांतच व्यक्त नाही करू शकणार मी ! गाडीत देखील सारखा अधून मघून त्या पाकिटावरून हात फिरत असायचा माझा ! मुलं निरागसपणे विचारायची , आई आजीने किती पैसे दिले , त्यांना काय माहित ..माझ्यासाठी ते पैशाचं पाकिट नव्हतं ,  माझ्या आईचा आशिर्वाद होता तो तिच्या प्रेमळ शब्दातून कायम माझ्याजवळ असणारा !

आज ते रिकामं पाकिट दिसलं , तिचं सुरेख अक्षर , प्रेमळ शब्द बघितले , आणि असं आठवणींचं मोहोळ उठलं …

आई किती व्यापून असते ना आपल्याला कितीही काळ लोटला तरी !

 

© ज्योति हसबनीस

 

 

Please share your Post !

Shares
image_print