मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जागतिक हास्य दिवस – ४ मे २५” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “जागतिक हास्य दिवस – ४ मे २५” ☆ श्री सुधीर करंदीकर

आज मे महिन्याचा पहिला रविवार. काय खासियत असते याची सांगा बरं !

सकाळी सकाळी कॉलेज मैत्रीण छाया हिचा फोन आला – अरे आज काय खास आहे, ते विसरला का ? दरवर्षी तुझा या दिवशी मला पहिला फोन असतो आणि आपण जोरदार हसत सुटतो.

मी : विसरलो मुळीच नाही. मी तुला फोन करणार एवढ्यात शाळेतल्या एका मैत्रिणीचा जागतिक हास्य दिन म्हणून फोन आला. मग बराच वेळ आमचे हसणे आणि बोलणे सुरू होते. तो फोन संपला आणि मी तुला फोन लावणार तेवढ्यात तुझा फोन आला.

छाया : ठीक आहे. पण पुढच्या वर्षी पहिला फोन आणि पहिलं बोलणं माझ्याशीच झालं पाहिजे. चलो, let us start laughing.
आणि आमचे हसणे आणि गप्पा सुरू झाल्या …..

मंडळी, जागतिक हास्य दिवस म्हणून एकच दिवस न हसता, आपण रोजच काहीतरी कारण शोधून, निमित्त शोधून, हसायलाच पाहिजे.

असं म्हणतात –

  • life is worth living as long as there is laugh in it
  • a day without laughter is a day wasted
  • laughter is a good for health and it is one of the best medicines in the world

एवढे सगळे फायदे असूनही लोक हसत नाहीत, यावर मुंबईचे डॉक्टर कटारिया यांनी १९९८ साली एक सोपा तोडगा काढला. आणि तो म्हणजे दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिवस साजरा करायचा. त्यांनी असा विचार केला की एक दिवस सगळ्यांनीच हसल्यामुळे सगळ्यांना त्यामध्ये मिळणारा आनंद समजेल आणि लोक हळूहळू रोजच हसायला लागतील. जगामधल्या जवळजवळ ७० देशांमध्ये याच दिवशी हास्य दिन साजरा केला जातो.

हसण्यामुळे —

  • मनावरचा ताण कमी होतो
  • आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते
  • हार्ट अटॅक चा धोका कमी होतो
  • चेहऱ्यावर चमक येते आणि आणखीन एक खूप छान महत्त्वाचा फायदा म्हणजे – smile is a spiritual perfume you spray on others.

आता तुम्ही म्हणाल – नुसत्या हसण्यामुळे एवढे फायदे होतात तरी कसे ?

मेडिकल सायन्स याचे उत्तर देते ते असे –

आपण हसायला लागलो की आपल्या मेंदू मधून डोपामाईन, सेरोटीनीन, ऑक्सीटोसिन हे फील गुड हार्मोन्स रिलीज होतात आणि त्यामुळे मन प्रसन्न होते.

तसेच हसण्यामुळे मेंदू मधून एंडोर्फिन्स हे हार्मोन्स पण रिलीज होतात, आणि हे नॅचरल पेन किलर चे काम करतात. त्यामुळे स्ट्रेस कमी होते.

हे विचार जर पटले तर कोणीही हे पॅकेज एक दिवस घेऊन थांबणार नाही, हे नक्की. 

आणि हे फ्री पॅकेज रोजच मिळवण्याकरता सगळीच मंडळी रोजच हसणार हे पण तेवढेच नक्की.

काही जणांकडून एक प्रश्न असाही येऊ शकतो, कि – आजकाल घरामध्ये काय, किंवा ऑफिसमध्ये काय, किंवा मित्रांबरोबर काय, जेवढ्यास तेवढे बोलणे / कामापुरते बोलणे, एवढेच होत असते. अघळपघळ गप्पा आणि हसणे, हे कधीच होत नाही. नेपोलियन यांच्या डिक्शनरी मधून जसा त्यांनी अशक्य शब्द बाद केला होता, तसाच आपल्या डिक्शनरी मधून हसणे हा शब्द बाद होत चालला आहे आणि त्यामुळे हसायला कारणच मिळत नाही, तर काय करू?

यावर पण सोपे उत्तर आहे, ते असे –

विनोद ऐकून हसता येतं (युट्युब, फेसबुक वगैरेंची  मदत सहजपणे मिळू शकते), विनोदी वाचन करून हसता येतं, विनोदी सिनेमा बघून हसता येतं, लहान मुलांशी खेळताना हसता येतं, मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारताना मनसोक्त हसता येतं (माझं रोजचं भरपूर हसणं याच माध्यमातून होत असतं), माझी तीन पुस्तके “म्हैस” आणि “काही आहे का ? काही आहे का?” आणि “हसती खेळती बायको“ ही ॲमेझॉन वर प्रकाशित झाली आहेत. त्यातल्या गोष्टी वाचून भरपूर हसता येईल. मला फोन करा आणि ही पुस्तके ॲमेझॉन कडून कुरियरने तुमच्या घरी दोन दिवसांमध्ये हजर होतील.

आणि अगदीच नाही तर आरशामध्ये स्वतःकडे बघून पण हसता येतं. आणि ते पण जमत नसेल तर मला फोन करा,आपण भरपूर हसू.

काही जणांना आपण हसल्यामुळे आपले पिवळे दात दिसतील, अशी भीती वाटणे साहजिक आहे, कारण  “हसतील त्याचे पिवळे पिवळे दात दिसतील” ही म्हण लगेच त्यांच्या मनात येणार. या कारणाकरता डिस्टर्ब होण्याचं काहीच कारण नाही.

मी लिहिलेला “चूळा भरूया आणि निरोगी राहूया” हा लेख जरूर वाचा, आणि त्यामध्ये डॉक्टरांनी सुचवले आहे त्याप्रमाणे चूळा भरा, म्हणजे दात दाखवायची भीती तर वाटणार नाहीच, उलट हसून आपले स्वच्छ दात दाखवावेत असे वाटेल.

चला तर मग, आता कुठलेही कारण न शोधता,                   

start 1….2…3.. &   4

हा हा हा हा

हा हा हा हा हा हा

हा हा हा हा हा हा हा             

हा हा हा . . . . . .

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ त्या दिवशी पहलगामला मी असते तर काय केलं असतं?- लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ त्या दिवशी पहलगामला मी असते तर काय केलं असतं?- लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे 

पहलगामच्या हिंदूंना टारगेट करणाऱ्या इस्लामी दहशतवादी हल्ल्यामुळे गेले काही दिवस प्रचंड अस्वस्थ आहे. त्यातच काल रात्री मला स्वप्न पडलं—

पहलगामच्या त्या हिरव्यागार कुरणात मी उभी आहे आणि ती थंडगार बंदुकीची नळी माझ्या चेहऱ्यावर रोखलेली आहे. नळीच्या पलीकडे आहेत क्रूर, थिजलेले, थंड डोळे, कमालीच्या द्वेषाने भरलेले.

मी घामाघूम होऊन जागी झाले, पहाटेचे दोन वाजले होते. छातीत अजून धडधडत होतं, मनात एकच प्रश्न घोळत होता — 

खरंच जर माझ्यासोबत असं काही घडलं असतं, तर मी काय केलं असतं? 

मी जर त्या दिवशी, त्या वेळी पहलगामला असते तर मी काय केलं असतं? 

जीव वाचवण्यासाठी मी माझी बिंदी काढून फेकली असती का?

माझा विश्वास, माझी श्रद्धा त्यागून मी कलमा उच्चारला असता का? ज्यांनी असं केलं त्यांना मी मुळीच दोष देत नाही. आपण साधी माणसे आहोत, सैनिक नाही. मृत्यूला धीरोदात्तपणे सामोरं जायला आपल्याला कोणीच शिकवलेलं नाही आणि जीव जायची भीती ही एक अतिशय प्रबळ नैसर्गिक भावना आहे.

त्या दिवशी पहलगामला मी तशी वागले असते का की कधीतरी मृत्यू येणारच आहे, आणि मी काहीही केलं तरी त्या इस्लामी हैवानांसाठी मी काफीरच आहे आणि मी काहीही बोलले तरी ते मला मारून टाकणारच आहेत हे जाणवून मी शक्य तितक्या धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरी गेले असते? 

किंवा — सगळ्यात वाईट — काय करावं हे न उमजून मी थिजून गेले असते का? भीतीने माझी मनगटं आणि मेंदू एकदम गोठून गेला असता का?

त्या दिवशी पहलगामला मी असते तर काय केलं असतं?

प्रामाणिकपणे सांगायचं तर, ह्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही.

मला आशा आहे की असं काही दुर्दैवाने माझ्या बाबतीत घडलंच असतं तर देशासाठी एकविसाव्या वर्षी हातात शस्त्रे घेणाऱ्या माझ्या स्वातंत्र्यसेनानी वडिलांची मी लेक ठरेन, त्यांचा वारसा मी खाली पडू देणार नाही. मरायच्या आधी प्रतिकारासाठी एक दगड तरी उचलायचा मी प्रयत्न करेन.

 पण ही फक्त माझी आशा आहे

जेव्हा आपण आपल्याच उबदार बिछान्यात सुरक्षीत झोपलेलो असतो आणि येणारा आवाज ही फक्त पंख्याची घरघर असते, गोळीबाराचा आवाज नाही, तेव्हा शौर्याच्या वल्गना करणं फार सोपं असतं.

सत्य हे आहे — की आपल्यापैकी कोणालाही नक्की माहिती नाही की आपण त्या दिवशी, त्या जागी असतो तर त्या क्षणाला कसे वागलो असतो.

धैर्य हा एक असा स्नायू आहे —जो संकटाच्या क्षणी वापरायची वेळ येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीवही होत नाही.

त्या दिवशी पहलगामला मी असते तर काय केलं असतं हे मी नक्की सांगू शकत नाही पण एक गोष्ट मात्र मी नक्की सांगू शकते.

आपण हिंदू एक समाज म्हणून फार काळ ह्या खोट्या समजुतीत जगतो आहोत की आपल्या बाबतीत हे कधीच घडणार नाही. धर्म की जीवन ह्यांपैकी एकच गोष्ट आपल्याला कधीच निवडावी लागणार नाही. आपल्याला माहिती आहे की भारतातल्या लाखो-करोडो हिंदूंना कधी ना कधी हा निर्णय घ्यावा लागला होता, कधी बंदुकीच्या भीतीने, कधी तलवारीच्या, कधी बलात्काराच्या.

आपण इतिहास वाचलाय, पण आपण सोईस्करपणे तो विसरून जातो कारण सत्य कटू असतं. म्हणून आपण आपल्या डोळ्यांवर धर्मनिरपेक्षतेची पट्टी बांधतो आणि सर्वधर्मसमभावाची अफूची गोळी घेऊन निवांत जगत असतो, अशी एखादी घटना घडेपर्यंत.

धर्म की जीव हा निर्णय हिंदूंना घ्यावा लागणं हे एक जिवंत, जळतं विदारक सत्य आहे. हा आपला इतिहास आहे, वर्तमान आहे आणि नीट डोळे उघडून पाहीलंत तर भविष्य तर आहेच आहे.

हे सत्य पहलगाममध्ये मृत्यू पावलेल्या त्या २६ लोकांच्या कुटुंबांसाठी वास्तव आहे.

हे त्या नवविवाहित मुलीचं सत्य आहे जिने फक्त पाच दिवसांच्या अंतरामध्ये ज्या अग्नीला साक्षी ठेवून ज्याच्याशी विवाह केला, त्याच अग्नीच्या चीतेमध्ये त्याचे पार्थिव जळताना पाहिले.

हे वास्तव त्या लहान मुलाचं सत्य आहे — ज्याने आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलंय, इस्लामी दहशतवाद्यांनी त्यांची पॅंट उतरवलेल्या अवस्थेत.

हे सत्य उद्या तुमचं-माझंही वास्तव होऊ शकतं. कुठेही, कधीही, केव्हाही.

हे काळीज विदीर्ण करणारं वास्तव कोणताही हॅशटॅग, कोणताही मेणबत्ती मोर्चा, कोणतीही शांतता परिषद, कोणतेही सेक्यूलरिजमचे प्रदर्शन मिटवू शकणार नाही.

आणि कृपया भ्रमात राहू नका —

आपल्या शत्रूला सेक्युलरीजमशी काहीही घेणंदेणं नाही. ‘अमन का तमाशा’ मध्येही त्यांना काही स्वारस्य नाही.

त्यांच्यासाठी आपण फक्त ‘काफिर’ आहोत.

एक लक्ष्य. एक बळी. जन्नत मध्ये जायचा एक परवाना.

बस. इतकीच त्यांच्या लेखी आपली किंमत.

आपण कितीही गोंडस शब्द वापरले, कितीही भाईचारा च्या घोषणा दिल्या तरी हे वास्तव बदलणार नाही, कारण आपण त्यांना भाई मानलं तरी त्यांच्यालेखी आपण चाराच आहोत.

खूप काळ आपण भित्रेपणाला ‘सहिष्णुता’, आणि दुर्बलतेला ‘शांती‘ म्हणून गोंजारत राहिलो आहोत. आपल्याला वाटतं की आपण शांतीपूर्ण सहअस्तित्वाच्या घोषणा दिल्या, तर आपल्याला काही होणार नाही.

हा आपला गैरसमज आहे.

त्या दिवशी पहलगामला मी असते तर काय केलं असतं ह्या प्रश्नाला ह्या घडीला माझ्याकडे उत्तर नाही. पण मला निदान हा प्रश्न तरी पडलाय.

तुम्ही हे कधी स्वतःला विचारलंत का?

कधी माझ्यावर अशी दुर्दैवी वेळ आलीच तर मी आई दुर्गेकडे प्रार्थना करते की जेव्हा तो क्षण येईल — (आणि तो येणारच आहे, आज नाही तरी अजून तीसेक वर्षांनी) — तेव्हा मला मान ताठ ठेवून मृत्यूला उघड्या डोळ्यांनी सामोरं जाण्याचं सामर्थ्य मिळो, प्रतिकार करण्याचे मनगटात बळ मिळो.

ज्या शूर हिंदू पूर्वजांच्या प्रतिकारामुळे मी आज हिंदू नाव लावतेय त्यांच्या उष्ण रक्ताची उकळी माझ्याही नसांमधून अशीच वाहो.

मरायचंच असेल तर गांडूळ म्हणून नाही, तर फणा काढणारा नाग म्हणून मृत्यू येवो! 

#NeverForgetPahalgam #NeverForgetNeverForgive #उद्या_ते_तुमच्यासोबत_होऊ_शकते

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य 

प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “चिमणी… !!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “चिमणी… !!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एक होती चिमणी, नाजुक… छान ! हिचे आईवडिल लहानपणीच वारले. बहिण भाऊ कुणीच नाही…,

कालांतराने एका चिमण्याबरोबर तीचं लग्न लागलं. दोघांनी मिळुन काडी काडी जमवुन एक घरटं बांधलं…. काटकसरीनं का होईना चिमणा – चिमणीचा सुखानं संसार चालु होता.

चिमणा रोज दाणा पाणी मिळवण्यासाठी दिवसभर फिरुन कष्ट करायचा…. चिमणी मागं घरटं सांभाळायची…. !

ठिक ठाक चाललं होतं…

चिमणा चिमणीला तसं पाहिलं तर कुणीच नव्हतं… ना नात्यातलं ना गोत्यातलं… चिमण्याला चिमणीचा…. अन् चिमणीला चिमण्याचाच काय तो आधार…!

दोघांनाही खूप वाटायचं… आपल्या घरात पण एक छोटं पिल्लु असावं… दोघांव्यतिरिक्त कुणी आणखी तिसरं असावं… त्याच्या इवल्याशा चोचीत घास भरवावेत… चिवचिवाट करुन पिल्लानं घरटं डोक्यावर घ्यावं… आणि आपण ते डोळे भरुन पहावं… पण… पण… का कोण जाणे, त्यांची ही इच्छा कधीच पुर्ण झाली नाही… या एकाच गोष्टीची खंत दोघांनाही आयुष्यभर छळत राहिली… जाळत राहिली… विशेषतः चिमणीला जास्त… !

दिवस सरत होते… चिमणी मनातुन कुढत होती, आयुष्यात कुणीच सख्खं उरलं नव्हतं… किमान स्वतःचं पिल्लू तरी असावं एवढीच माफक अपेक्षा… पण ती ही पुर्ण होत नव्हती… चिमणा खुप समजावून सांगायचा चिमणीला… पण उपयोग नसायचा…

दिवस पुढे पुढे पळत होते, या दोघांनाही मागं टाकुन…

एव्हढ्या मोठ्या रानात आजुबाजुला इतर घरटी पण होती… पण सगळ्या गर्दित हे दोघे मात्र एकटेच…

उमेदीचं वय निघुन गेलं… जाताना भेट म्हणुन म्हातारपण देवुन गेलं… एकटेच जगा असा निःशब्द शाप देवुन गेलं… !

चिमणा आता थकला होता म्हातारपणामुळं, आणि चिमणीही… !

चिमण्याला आताशा काही काम होत नव्हतं… पंख थकले होते… पायात त्राण नव्हतं… मिळेल त्यात भागवत, एकमेकांना सावरत, एकमेकांना आवरत दोघंही जगण्याची लढाई लढत होते… न हरता… !

एके दिवशी चिमणा अन्न शोधायला बाहेर निघाला घरट्यातुन… जातांना चिमणीला त्या दिवशी आवर्जून म्हणाला… काळजी घे स्वतःची… म्हातारी चिमणी मनातुन चरकली… म्हणाली, आज असं काय बोलताय ? चिमणा तीचा हात हातात घेवुन म्हणाला, आयुष्यात कधीच काही देवु शकलो नाही तुला… सुखसमृद्धी तर नाहीच नाही… पण एक पिल्लु ही तुझ्या पदरात टाकु शकलो नाही मी….. माफ कर मला… करशील ना… ?

चिमण्याला हुंदका आवरेना… घराबाहेर पडवेना… चिमणी हळुच जवळ आली, तीने वृद्ध चिमण्याचा हात हातात घेतला, म्हणाली… “ पदर रिकामा कुठंय माझा… ? तुमच्या प्रेमानंच पदर माझा काठोकाठ भरलाय हे काय कमी आहे ? आयुष्यभर साथ दिलीत, पडले तर हात दिलात… मी संपुर्ण सुखी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे…” 

….. यानंतर घरट्यातुन कितीतरी वेळ चिमणा चिमणीचे हुंदके ऐकु येत होते… बोलत कुणीच नव्हतं, पण हजार शब्दांना जे जमणार नाही ते एका हुंदक्यात साठलं होतं… एकमेकांच्या अश्रुत दोघांचेही म्हातारे पंख भिजुन गेले… !

खुप वेळानं, चिमणी हातातुन हात सोडवत, पदर हातात घेवुन म्हणाली, “ आता फक्त अजुन एकच दान या पदरात टाका…. मला कधीच एकटीला टाकुन कुठं जावु नका… शेवटपर्यंत…. मरेपर्यंत सौभाग्यवती म्हणुनच मला राहु द्या… द्याल ना हे दान मला ? बोला ना, गप्प का… ?”

चिमण्यानं निष्प्राण डोळ्यांनी चिमणीकडे पाहिलं, तिच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर चिमण्याकडं नव्हतं….

आपला सुरकुतलेला थरथरता हात त्यानं चिमणीच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला… सुखी रहा…. !!!

चिमणी सुखावली, म्हणाली, “ तुम्ही सोबत असाल, यातच माझं सुख आहे, तुम्ही सोबत रहाल ना कायम?” 

….. चिमणीच्या प्रश्नाला उत्तर द्यायला चिमणा होताच कुठं… ? चिमणा केव्हाच भुर्र उडुन गेला… परत कधीही न येण्यासाठी…

चिमणी टाहो फोडुन चिमण्याला प्रश्न विचारत राहिली…. हातात हात घेवुन तो परत येईल या आशेनं मूक हुंदके देत राहीली…. पण चिमणा त्यादिवशी चिमणीला एकटीला सोडुन गेला तो गेलाच… परत आलाच नाही… ! आता चिमणी ख-या अर्थानं एकटी पडली…

रानातले “डोमकावळे” आता जागे झाले… या कावळ्यांनी एकट्या पडलेल्या म्हाताऱ्या चिमणीला टोचा मारायला सुरुवात केली… त्यांना तिचं काडीकाडीनं बनवलेलं घरटं हवं होतं…

चिमणी या डोमकावळ्यांशी आधी लढली… मग रडली आणि नंतर कोलमडली… !

निगरगट्ट “काळ्या” कावळ्यांनी तिला घरातून हुसकुन लावलं…. चिमणीचा एकुलता एक आधार… तिचं घरटं, ते ही गेलं…. आता चिमणी आली रस्त्यावर…

कुणाच्याही अंगणात पडलेले दाणे चोचीत घ्यायचे… त्या दिवसाचं पोट भरायचं… जागा मिळेल तिथे अंग टाकायचं… भोगलेल्या यातनाच इतक्या भयंकर की शरीर निगरगट्ट झालेलं,… उन वारा पाउस कशा कशानंही त्रास व्हायचा नाही…. मन तर त्याहुन बधीर… सुख आणि दुःख दोन्ही सारखंच…. !

दुस-याच्या अंगणात दाणे वेचतांना कुणी हुसकुन लावायचं, कुणी शिव्याशाप द्यायचं…. कुणी दगड मारायचं तर कुणी टोमणे…. दगडापेक्षा हे टोमणेच लागायचे जास्त…. पण करणार काय, भुकेला “लाज” नसते… !

चिमणी आभाळाकडं बघायची… चिमण्याच्या आठवणीनं धो धो रडायची… पण तिचे डोळे पुसायला वेळ होताच कुणाकडं… ?.. आणि म्हणुन देवाकडं रोज रोज मरणाचं दान मागत बसायची….

जग चालविणारा जो कुणी असेल, तो या अशा शापित चिमण्यांना जन्माला का घालतो ?

माणसानं आस्तिक असावं की नास्तिक ? मला वाटतं, माणसानं याहीपेक्षा वास्तविक असावं….. !

…… तर, ही चिमणी एक दिवस माझे मित्र श्री. भापकर, नगरसेवक तथा स्थायी समिती अध्यक्ष खडकी यांना दिसली….

पंख तुटलेल्या असहाय चिमणीला पाहुन, पहाडासारख्या या कणखर माणसाला पाझर फुटला,…

त्यांनी मला फोन केला, डाॕक्टर पंख तुटलेल्या या माऊलीला पंख द्यायचे आहेत…. बघा काहीतरी……. एवढं बोलुन फोन कट्…. पुढचं बहुतेक बोलूच शकले नसावेत ते…. !

मी या जर्जर चिमणीला भेटलो…. शून्य नजर, भकास चेहरा आणि मेलेलं मन…. ती काही बोलेचना…

तिच्या वेदनांवर माझ्याकडं कुठलंही औषध नव्हतं,.. डाॕक्टर असण्याची लाज वाटली मला…!

कशीबशी जेमतेम माहिती कळल्यानंतर, मला तिची दुखरी नस जाणवली आणि मी ती बरोब्बर पकडली….

हातात हात घेवुन मी तो जादुचा शब्द वापरला….. ” आई…. “! 

तिचा चेहरा झरझर बदलला…. ती अविश्वासाने पाहु लागली…. त्यात कौतुक होतं, प्रेम होतं, माया होती….

‘आई’ या एकाच शब्दानं जादू केली…. इतकं फास्ट काम करणारं जगातलं दुसरं औषध मला माहिती नाही…

.. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हटलं, “ आई, आजपासून तु माझी आई, इथुन पुढची तुझी सर्व जबाबदारी माझी…. मला पोरगा म्हणुन स्विकारशील…. ?”

…. आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी झुरली, ती गोष्ट अचानक पुढं आल्यावर ती भांबावली…. तिचा विश्वास बसेना…. शब्द सुचेना….. त्… त्… प्… प्…. करायला लागली…. मला तिची ही अवस्था बघवेना…. मी सरळ तिला माझ्या छातीशी धरलं…. !

यानंतर जे घडलं… ते इथं शब्दांत मांडण्यास मी असमर्थ आहे…. पण पहायला साक्षीदार म्हणुन कोसळणारा पाउस होता आणि सोबत आमचे हुंदकेही….

सहज आभाळाकडं लक्ष गेलं…. एक पक्षी आमच्या डोक्यावरुन घिरट्या मारत होता…. हा त्या आजीचा चिमणा तर नसावा… ? माय लेकरांची भेट पाहणारा…. मूल हवंय म्हणत तडफडून गेलेला….. अतृप्त आत्मा तर नसावा… ?.. माहित नाही….

या वृद्ध चिमणीला आता स्वतंत्र आणि स्वतःचा आसरा देणार आहे….

एका वृद्धाश्रमात या माऊलीची सोय करणार आहोत….

इथून पुढं कुणाच्याही अंगणात आता ही माऊली जाणार नाही भिक मागत… सन्मानानं जगेल….

या माऊलीस अत्यंत सन्मानानं कारमधुन या वृद्धाश्रमात घेवुन जात आहे…. !

शुक्रवारी पुन्हा भेटण्याचं आश्वासन देऊन मी निघालो…. मागुन हाक आली, “ बेटा, तु इतकं करतोयस माझ्यासाठी…. मी तुला काय देवू ?”

मी म्हटलं “ तू आई माझी…. पोरगा म्हणून स्विकार केलास माझा… याहुन मोठं मला काहीच नाही…. !”

ती म्हणाली, “ काय तरी घे…”

म्हटलं, “ काय देशील आता ?”

म्हणाली, “ तू माग…. ”

म्हटलं, “ तुझे पंख दे…. ”

“ अरे बेटा, तुटलेत हे पंख, तुझ्या कामाचे नाहीत ते…”

म्हटलं, “ माझे नवीन पंख तु घे, तुझे जुने पंख मला दे…. ज्या पंखांनी तुला इथवर आणलं, त्याची किंमत खुप आहे माझ्यासाठी…. या पंखांवरती मी जग जिंकेन…. !”

“ तुटलेल्या पंखांनी जग कसा जिंकशील ? “ तिचा भाबडा प्रश्न… !

म्हटलं, “ आज तुझा मुलगा म्हणुन नवीनच जन्म झालाय माझा…. तूच माझी आई आणि तूच माझं जग…. ! 

आता दुस-या कुठल्याही जगाला जिंकायची गरजच नाही मला…. ! “

… “ अरे बेटा “.. म्हणत ती पुन्हा माझ्या गळ्यात पडली आणि मी त्या जुन्या तुटलेल्या पंखांवरुन हात फिरवत राहिलो…. कितीतरी वेळ…. !

पाऊस पुन्हा पुन्हा पडतच होता… कितीतरी वेळ… !!! 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनोगत…. आपल्या सर्वांचेच ! ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ मनोगत…. आपल्या सर्वांचेच ! ☆ सुश्री शीला पतकी 

काल अक्षय तृतीयेला अक्षय दान मागावे म्हणून मी परमेश्वराला म्हणाले, ” कालच्या मुहूर्तावर परशुराम अवतार पृथ्वीवर प्रकटला…. सुदाम्याने कृष्णाला पोहे दिले तो हाच दिवस…. दोन युगांची सुरुवात झाली तो आजचा दिवस…. वेदव्यासांनी महाभारताच्या लिखाणाला सुरुवात केली तो हाच दिवस… याच दिवशी सर्वात महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे गंगा आजच्या दिवशी पृथ्वीवर स्वर्गातून उतरली….. ” मग मी देवाला म्हणाले, “देवा आमच्यापासून दोन किलोमीटर अंतरावर उजनी आली आहे. पण समांतर वाहिनी.. तिचे काम का अडलयं… ?. त्यामुळे सोलापूरला प्रचंड पाणीटंचाई… सहा दिवसांनी एकदा पाणी येणे..

हा काय पाण्याचा हिशोब आहे ? आणि गेले कित्येक वर्ष पाणी भरणे या एकाच गोष्टीला माझ्या आयुष्यात प्राधान्य आहे. मग कृपया हे सांगा की गंगा जर भगीरथाच्या प्रयत्नाने स्वर्गातून पृथ्वीवर येऊ शकते तर उजनीचे पाणी.. जे अगदी जवळ येवून ठेपले आहे ते इथल्या इथे आमच्यापर्यंत का बरे येत नाही?…. या प्रश्नाचे उत्तर कृपया मला द्या “….

रात्री देव स्वप्नात येऊन म्हणाले, “ प्रिय भक्ता तू मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर खरंतर तुला ठाऊक आहे. तू खूप हुशार आहेस. सगळं सगळं तुला कळतं. मग याचे उत्तर ठाऊक नसेल का?… अगं तुमच्या गावाला भगीरथ पाहिजे.. त्याची इच्छा पाहिजे आपल्या गावातल्या लोकांना पाणी देण्याची. त्यांना ते नकोच आहे. त्यांना टँकरवाले पोसायचेत.. शेतकऱ्यांना जादा पैसे द्यायचेत, तेव्हा त्या जमिनीचा तो थोडासा पाईप टाकण्यापुरता भाग ते मोकळा करून देणार आणि ते झाल्यावर त्याला भोक पाडून पाणी घेणार. मग माझ्या लाडक्या भक्ता सांग बरं.. स्वर्गातली गंगा आणणं सोपं होतं, का इतक्या जवळ असलेली उजनी तुझ्या दारात आणणं ?… त्यामुळे सध्या हा उन्हाळा.. हे वर्ष असेच पाण्याची काटकसर करीत काढ बरं बाळा…! “ 

“बरोबर आहे देवा तुमचं. पहिल्यांदा तुमची आंघोळ आणि पूजा बंद… काटकसरीला सुरुवात.. चला ठरलं तर मग…! आता बसा पारोसे… हाय का नाय गंमत.. 😄 😄

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘स्वरसंमोहन…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘स्वरसंमोहन…’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

स्वरांची ‘भन्नाट’ जादू काय असते, हे काहीच कलाकारांच्या बाबतीत मी नेहमी अनुभवते. गेले काही दिवस भारतरत्न पं. रवी शंकरजी आणि पद्मविभूषण उ. अली अकबर खाँ साहेब यांच्या जुगलबंदी वादनाच्या आविष्कारातून असाच आनंद घेतेय. त्यातून बाहेर पडूच नये, अशी ही केवळ मोहिनीच नव्हे तर ‘संमोहिनी’ Hypnotism म्हणजे मनावर जडलेली जादू / भुरळ! त्यांचा ‘मांज खमाज’ हा राग तर झपाटल्यागत, माझी पाठच सोडत नाही……..

कुठल्याही शब्दांच्या आधाराविना स्वरांचा भावनाविष्कार काय असतो? तो शब्देविण संवादु अनुभव म्हणजे…… स्वरांचा उत्सव, स्वरांचे लखलखते झाड, अंगावर बरसणा-या स्वरांच्या फुलझडया मिटलेल्या डोळ्यांना दिसू लागतात; आणि अलगद डोळे पाझरू लागतात… हृदयाला टाचणी लागल्यावेळीच असे डोळ्यातून पाणी येते.

अशा उत्कृष्ट शास्त्रीय संगीताचा, आपल्या मानसिकतेवर काय परिणाम होऊ शकतो…. मन उडूबागडू लागते, नाचू लागते, नाट्य करू लागते, ती लय रवीजींनी नृत्य शिकल्यामुळे आपल्याही रक्तात सळसळू लागते, शरीर नागासारखे डोलूही लागते, काळजात सौंदर्य लहरी उमटू लागतात. त्यातून आनंद, प्रेम, लज्जा, लडिवाळपणा, आस, विरह, व्याकुळता, अशा अनेक भावना, केवळ कानापर्यंतच नाही तर थेट हृदयापर्यंत पोहोचवण्याची ताकद नि चित्तवृत्ती उल्हसित करण्याची ताकदही या स्वरांत आहे, म्हणून तर या हातांनी, पाश्चिमात्यांवर, त्यांचे संगीत उपलब्ध असूनही त्यांच्यावर भुरळ पाडली.

हे स्वर ऐकताना ते हृदयापर्यंत पोहोचल्याची जाणीव प्रत्येक रोमरोमांत होते. आपण काहीतरी अद्वितीय, अपूर्व ऐकतोय याची, रक्ताच्या थेंबाथेंबाला, नसानसांत उसळताना, “उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा… ” अशी अनुभूती येऊ लागते.

दोघेही दिग्गज, पण एकमेकांवर कुरघोडी न करता, गिमिक्स न करता, एकमेकांना पूरक, complementaryवाजवून केवळ स्वरांच्या वेगवेगळ्या सौंदर्यपूर्ण जागा (उपज) घेऊन, आपल्या जाणिवा, रागाबरोबर फुलवतात. शरीराचा प्रत्येक भाग ‘पुलकित’ होतो म्हणजे काय? हे तेव्हा जाणवतं. अवघ्या ३५-४० मिनिटांत अवकाशात न मावणा-या, वैविध्यपूर्ण अनंत जागा. (Varieties)…..

एकासारखी दुसरी शोधून सापडणार नाही. इतक्यांदा पारायणे केली, तरी पुढची जागा ही (pleasant surprise) वेगळाच गोड धक्का देऊन जाते. लयीचे तर काय नि किती किती नानाविध प्रकार…. ? यांना दरवेळी इतके कसे सुचत असेल नि किती अफाट रियाझ केला असेल या मंडळींनी…. दैवी देणगी आणि मेहेनत, परमेशाची कृपा आणि नशिबाची साथ, अशा अनेक गोष्टींचा सुंदर संगम….. या जुगलबंदीला अजून एक साथ अत्यंत मधुर हात असलेल्या अब्बाजींची… ! म्हणजे पद्मविभूषण उस्ताद अल्लारखाँ खाँ साहेब, जणू स्वत:चा गोडवा असूनही, दुधात विरघळलेल्या साखरेसारखी! कुठेही अवास्तव स्तोम न माजवणारी!

भारतरत्न पं. रवीजींसारखेच दुसरे असेच गाणारे भारतरत्न म्हणजे गानसम्राज्ञी लतादीदी! पुण्यात दीदींच्या ८५ व्या वाढदिवसाला माझे गुरू पद्मश्री पं. हृदयनाथजी मंगेशकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, मी पं. रवीशंकरजींनी ‘अनुराधा’ चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेली… ‘जाने कैसे सपनों में… ’, ‘हाये रे वो दिन… ’, ‘कैसे दिन बीते… ’ अशी एकाहून एक सुंदर गाणी सादर केली. त्यावेळी साक्षात् पं. रवीजींना थेट भेटल्यासारख्या, बाळासाहेबांच्या (गुरुजींच्या) प्रेम व आदर या भावना उचंबळून आल्या, ज्या त्यांनी स्टेजवरून श्रोत्यांसमोर व्यक्तही केल्या. एका दिग्गजाने दुस-या दिग्गजाला दिलेली ही सलामी! या दिग्गजांची काय ‘उंची’ आहे याचे मोजमाप करणारी पट्टी आमच्याजवळ उपलब्धच नाही, ही खरी गंमत आहे! थेट हिमालयाच्या शिखराकडे आश्चर्याने आणि कौतुकाने आपण फक्त पहात राहावे, अशी ही सारी ईश्वरीय वरदान लाभलेली मंडळी! त्यासाठी हिमालयाच्या निदान पायथ्याशी तरी पोहोचावे लागते!

त्यादिवशी बाळासाहेबांनी, मी रवीजींची गाणी गाऊन त्यांची आठवण करून दिल्याबद्दल, माझे पुन्हा पुन्हा आभार का मानले, हे मला ‘आज’ कळतंय ! त्यावेळी फक्त आश्चर्यच वाटलं होतं. पंडितजींच्या शेवटच्या आजारपणात ICUत असताना त्यांनी बाळासाहेब व दीदींची ‘मीरा’ ऐकली… हे सारे अमेरिकेहून फोन वर झालेले संभाषण, त्यांचा सहवास, या सर्व गोष्टी आठवून, बाळासाहेब काहीसे भावूक झाले होते. एक अनुपम सौंदर्याची अखेर आठवून ते का गदगद झाले होते? हे मला आज ‘मांज खमाज’ ऐकताना वारंवार जाणवत राहिले आणि राहीलही… अशी संगीतातली थोर माणसे आता होणे नाही; म्हणूनच वाटते की; या वेड लावणा-या, संमोहन घालणा-या व्यक्तींच्या कार्यात सतत सान्निध्यात रहाणे, त्याचा अभ्यास करणे, त्यात चिंब चिंब भिजून जाणे हेच या काळात आपले उन्नयन आहे. हीच स्वर्गीय स्वरांची अनुभूती आहे.

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सांभाळ बेटा स्वतःला… ☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

डॉ. तेजस्विनी वाळिंबे

? मनमंजुषेतून ?

☆ सांभाळ बेटा स्वतःला… ☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषदेतील एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा मार्केटिंग हेतूने उभारलेला स्टॉल…

दिव्यांचा झगमगाट… मांडून ठेवलेली अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे. अशाच एका अत्याधुनिक दुर्बिणीजवळ डोळ्याची शस्त्रक्रिया करायला आवश्यक असलेल्या मायक्रोस्कोप जवळ मी थबकले. एका गुलाबावर फोकस केलेला तो प्रकाश गोल. क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोर त्या गुलाबाच्या जागी माझ्या पेशंटचा डोळा दिसला…सफाईदारपणे ऑपरेशन करणारी माझी बोटं दिसली. नकळत मी त्या दुर्बिणीची किंमत विचारली.

७२ लाख… क्षणभर मी जागच्या जागी थबकले. फक्त दुर्बीण ७२ लाख, बाकी उपकरणे वेगळीच !! लुटतात या कंपन्या आम्हा डॉक्टरांना ! 

दुसरीही बाजू विचार करण्यासारखी आहेच. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा आपल्या पेशंटना होतोच. आज पाश्चिमात्य देशात जे तंत्रज्ञान वापरले जाते, तेच आज आपण भारतीय डॉक्टर वापरतो हे किती अभिमानाने सांगतो आपण !

आपल्या रुग्णांना या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि उत्कृष्ट उपचारांचा फायदा मिळतो, तोही पाश्चात्य देशांच्या तुलनेत फारच कमी खर्चात !!

पण मी या दुर्बिणीच्या खर्चाचं गणित कसं मांडणार ? 

बँकेचे कर्ज, नको रे बाबा !! आतापर्यंत भरपूर कर्ज घेतलं आणि फेडलं. आता या वयात नक्कीच नको. रात्रंदिवस मेहनत करण्याचे दिवस गेले आता.

विचारचक्र चालू होतं, तोच मोबाईल मधून ‘बीप’ आवाज आला…मेसेजेस, व्हिडिओचा महापूर!

भिरभिरत्या डोळ्यांनी मी हपापल्यासारखे मेसेजेस वाचत होती. सभोवतालच्या झगमगाटातही माझ्या डोळ्यासमोर काळ्या ढगांनी गर्दी केली होती. तोंडाला कोरड पडली. हातपाय थरथरायला लागले. एक डॉक्टर -हत्यारा, खुनी, चोर, लुटारू, नालायक …. वाचवेना.

अभ्यासासाठी केलेल्या अनेक रात्रींची जागरणं, जीवघेण्या शिक्षणाचा तो लांबलचक प्रवास, मेसच्या डब्यातले तेलात पोहणारे पिवळे बटाटे, मेडिकल कॉलेजमध्ये अस्वच्छ टॉयलेट्स, सारं काही डोळ्यासमोर नाचत होतं.

चार गावाला खेडोपाडी ऑपरेशन करून थकून भागून रात्री अडीच वाजता घरी परतणारा डॉक्टर नवरा… बँकेचं कर्ज मिळवण्यासाठी केलेली धडपड… रक्ताचं पाणी करून वाढवलेलं माझं हॉस्पिटल, ज्याचा मला खूप अभिमान वाटतो असं…

चहूबाजूनी नराधम माझ्यावर आक्रमण करत आहेत असं काहीतरी मला भासलं.

जड पायांनी मी त्या गुबगुबीत सोफ्यावरून उठली.

” मॅडम, मॅडम, काय डिसिजन घेतलं तुम्ही ?कॉफी घेणार का ?”

“नको, बघू नेक्स्ट फायनान्शिअल इयर मध्ये. ” असं बोलून मी उठले.

चार पावलं जात नाही तर फोन खणखणला.

” हॅलो आई. “

” बोल बेटा, ठीक आहेस ना? तू जेवलास का?”

” जेवतो कशाचा? काल कॅम्पचे 70 पेशंट आले. रात्री अडीच वाजले रूमवर जायला. फक्त अडीच तास झोपलो. परत सकाळी साडेसहा वाजता हॉस्पिटल. ” 

“अरे जेवत जा वेळेवर. कसं होणार असं ? 

तुला कळली का रे बातमी?”

” अगं इथे तामिळनाडूत कशा पुण्याच्या बातम्या येणार?

पण मी बघतो ना मोबाईलवर पुण्याच्या बातम्या. तू विचार करू नकोस आता. “

” तुझ्या हॉस्पिटलमध्ये असं काही झालं तर? जमावाचं मानसशास्त्र फार भीतीदायक असतं. निष्पाप लोकांचा बळी घेतात हे नराधम. तू लहान आहेस, जगाचा अनुभव नाही तुला. आपलं शरीर आणि मन सांभाळ रे बेटा. “

” आई, तू माझी काळजी करू नकोस. चल ठेवतो मी. बाय”

हाच तो माझा मुलगा दोन वर्षांपूर्वी मला म्हणाला होता, आई सगळे मित्र 

USMLE देत आहेत, ज्याला त्याला अमेरिकेत जायचं, पण मी मात्र भारतातच राहणार.

मीही म्हणाले होते, अरे योग्य निर्णय घेतलास, “जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी”

आता मात्र वाटतं योग्य सल्ला दिला का मी माझ्या मुलाला? बुद्धिवंत, बुद्धिजीवी लोकांसाठी नरक तर नाही ना होणार ही माझी मातृभूमी? 

अशीच एकदा सायन हॉस्पिटलमध्ये भाचीच्या होस्टेलला गेले होते. संपूर्ण देशात लाखो विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या शंभरात नंबर पटकावणारी ही बुद्धिमान मुलगी…

कोंडवाड्यात ठेवाव्यात अशा या सहा डॉक्टर्स मुली एका खोलीत कोंबलेल्या !!आरोग्याला घातक वातावरण.

ढेकूण व झुरळांचे साम्राज्य.

रात्रंदिवस कामाचा बोजा.

मनात आलं आज आयआयटीत गेली असतीस, तर गलेलठ्ठ पगाराची नोकरी घेऊन देशात किंवा परदेशात सुखात राहिली असतीस. काय डॉक्टर व्हायचं खुळ घेतलंय आपल्या घरातल्या मुलांनी? पोटातले हे शब्द ओठापर्यंत न आणता तशीच परतले.

प्रथमच एक अवघड ऑपरेशन बघून उत्साहीत झालेली माझी मुलगी म्हणाली, ‘आई सगळे हुशार टॉपर्स मुलं-मुली रेडिओलॉजी आणि डरमॅटॅालॉजी(क्ष- किरणशास्त्र आणि त्वचा रोगशास्त्र) अशा ब्रांचेस घेतात, मला मात्र सर्जन व्हायचंय. “

“हो ना, मलाही आश्चर्य वाटतं. खरंतर सर्जन, स्त्रीरोगतज्ञ, इमर्जन्सी मेडिसिन अशा विषयांमध्ये निर्णयक्षमता, कार्यतत्परता, शल्य कौशल्य, शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता याची खरी परीक्षा होते ; हे विषय सोडून हुशार विद्यार्थी दुसऱ्या ब्रांचेस कशा घेतात? आमच्या वेळी असं नव्हतं. ” “आई, तुझा काळ गेला आता. हिंसक हल्ले होतात ना डॉक्टरांवर म्हणून घाबरतात सगळे. ” 

“अग पण पेशंटचं काय? त्यांना चांगले डॅाक्टर कसे मिळणार असे झाले तर ?अर्धे हुशार डॉक्टर देशाबाहेर जातात. अर्धे हुशार डॉक्टर नॉन इमर्जन्सी ब्रांचेस घेतात. “

” हो, पण मला मात्र सर्जन व्हायचं आहे हं आई. “

त्या दिवशी आपल्या लेकीकडे बघून माझा ऊर अभिमानाने भरून आला होता, पण आता….

.. माझं मन काळजीने व्यापून गेलं आहे..

“बाळा, गिधाडं आहेत गं या समाजात. ते सुखाने आपल्याला जगू देणार नाहीत बेटा. माझं ऐकशील का? 

आईचं काळीज आहे गं हे….. सांभाळ बेटा स्वतःला !!!”

 

© डॉ. तेजस्विनी वाळिंबे

(नेत्रतज्ञ)

 (एक डॅाक्टरची आई)

पुणे मो. ८८८८८३१९०५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लाईफ विदाऊट पुणे…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? मनमंजुषेतून ?

☆ लाईफ विदाऊट पुणे☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

दहा वर्ष.

दहा वर्ष झाली रेवाच्या लग्नाला.

खरंच कळलं नाही. भुर्रकन उडून गेली ही वर्ष.

आठवतंय तर..

किती तरी चांगली स्थळं नाकारलेली तिनं.

बरं झालं. नाहीतर, रवी कसा मिळाला असता तिला ?

कारण ?.. कारण एकच… पुण्याबाहेर जायचं नाही… पुणं रक्तात… नसानसात… रोमारोमात.

.. ‘पुणं’ जगण्याचा आॅक्सीजन.

रेवा विदाऊट पुणे ? शक्यच नाही.

रेवानं आधीपासूनच ठरवलेलं. “मुलगा कसाही असला, तरी चालेल. काळा कुट्ट, तिरळा, टकला.

दोन खोल्यांत सुखानं संसार करीन. पण… पुण्यातला हवा… “

अगदी आयटी वाल्यांनाही, सरळ नाही म्हणायची ती.

‘अय्यो… यांचा काय भरवसा ? म्हणायला आज हिंजवडीत… उद्या उठून चालायला लागतील, बंगलोरला.

नाहीतर हैद्राबादला… परवा एकदम स्टेटस् ला. नको रे बाबा.. ‘

नशीब काढलं पोरीनं. रवी मिळाला तिला. शनवारात माहेर… नारायणात सासर. अगदी मुठेला सुद्धा ओलांडायला नको.

सुख म्हणजे दुसरं काय असतं ? हेच…

नारायणात पत्र्या मारूतीशी तिचं सासर.

“परशुराम क्षुधाशांती गृह”.. अस्सल मराठमोळ्या चवीचं, धो धो चालणारं हाॅटेल.

रवी, गल्ल्यावर बसणारी तिसरी पिढी… हाॅटेलमधल्या कामगारांचीही तिसरी पिढी. रवीच्या आजोबांनी चालू केलेलं.

तिथलं थालीपीठ, साबुदाण्याची खिचडी, आणि साजूक तुपातला अस्सल बदामी शिरा.. अजून बरच काही.

एकही पदार्थ कधी शिल्लक रहायचा नाही.

हाॅटेल पहिल्यापासून फेमस… टोकन सिस्टम. दोन मजली हाॅटेल… जागा कमी पडायची. मोस्ट अवेटींग वेटींग..

तिसऱ्या, चौथ्या मजल्यावर घर… ऐसपैस… प्रशस्त.

रवी हाॅटेलमधे कमीच असायचा. त्याचे बाबाच सांभाळायचे हाॅटेल. रवीनं रीतसर हाॅटेल मॅनेजमेंट केलेलं.

आयटी कंपनीतली दोन कॅन्टीन्स घेतलेली चालवायला. त्याच्याकडे चांगली टीम होती. थोडी धावपळ व्हायची. मस्त बस्तान बसलं होतं.

रवी तसा मवाळ… करलो दुनिया मुठ्ठीमें टाईप. रेवाच्या मुठीतला प्राणी. सासू सासरे प्रेमळ. साठ डेसीबल्सच्या वरच्या आवाजाची सवयच नव्हती घराला.

रेवा तिच्या माहेरी, शनवारात नर्सरी स्कूल चालवायची. लग्न झाल्यावर रवी म्हणाला…

” कॅरी आॅन रेवा… “

रवीनं नळस्टाॅपला एक बऱ्यापैकी मोठी जागा घेतली. सध्या भाड्यानेच.

रेवाचं नर्सरी स्कूल झोकात. ” लिटील एन्जल्स “

त्यांच्या घरात पण आलीय, आता एक लिटील एन्जल… तन्वी.

तन्वी आता जरा, मोठी झालीय. आजीबरोबर मस्त राहते. रेवा दिवसभर तिच्या नर्सरी स्कूलमधे बिझी.

पुढच्या वर्षी तन्वी पण जायला लागेल. घरची शाळा.

एकंदर काय ? रेवा जाम खुष होती. ” जिंदगी का सफर… ” काहीच suffer नव्हतं.

– – अचानक काल विनायकराव… रवीच्या बाबांचे सख्खे मित्र. परशुरामला रहायचे. मोठ्ठी वाडी होती त्यांची… डोंगरउतारी… वाशिष्ठीकडे तोंड करून. अप्रतिम नजारा दिसायचा. ऐसपैस मोठ्ठं घर. नुकतंच बांधलेलं. समीर.. त्यांचा एकुलता एक मुलगा आस्ट्रेलियात असतो. इकडे परत यायची शक्यता नाही.

तिथं दोघंच म्हातारा म्हातारी. बऱ्याच वेळा जाऊन आलीयेत, सगळी तिथं. दोन घरात खूप घरोबा.

काल रात्री विनायकराव अचानक आले. बऱ्याच वेळ रवीशी, त्याच्या बाबांशी बोलणं चाललेलं. रेवा, तिची सासू स्वयपाकघरात. जेवणं आटोपली. सगळी हाॅलमधे जमली. रवीच्या बाबांनी सुरुवात केली.

.. ” विनायकनं एक प्रोपोजल ठेवलंय. परशुरामला त्याची वाडी, तुम्ही बघितलीच आहे. तिथं एक हाॅलीडे रिसाॅर्ट डेव्हलप करतोय तो. समीरनं… त्याच्या लेकानं, बऱ्याच डाॅलर्सचा रतीब घातलाय तिथं. काम पूर्ण होत आलंय. पंचवीस तीस एसी रूम्स… काॅन्फरन्स हाॅल… स्विमिंग पूल… ईनडोअर गेम्स… प्युअर व्हेज रेस्टाॅरंट… सगळ्या थ्री स्टार फॅसिलिटीज … सगळा सेट अप रेडी आहे. समीर काही इकडे येणार नाहीये.

रवीला पार्टनरशीप ऑफर करतोय तो. मला वाटतं रवीनं जावं. फूड इंडस्ट्रीजचा त्याला एक्सपिरीयन्स आहेच. हाॅलीडे होम थ्रू बरंच शिकायला मिळेल. इथलं हाॅटेल अजून काही वर्ष तरी मी नक्की सांभाळीन.

निदान वर्षभर तरी जावं. नाही आवडलं तर, ये परत… “

रवी कनफ्युजलेला. तो रेवा की नस नस से वाकीफ. पुण्याबाहेर पडायचं ? शक्यच नाही… त्याचा डिसीजन ठरलेला… बायकोशी दुश्मनी ?.. नको रे बाबा ?

तो नाही म्हणणार, एवढ्यात रेवा उवाच.

” बाबा, आम्ही तयार आहोत. पण एकच वर्ष. जास्त नाही. पुढे मागे पुण्यात एखाद मोठ्ठ हाॅटेल, चालवायला घेवू आपण. हा एक्पेरीअन्स खूप काही शिकवून जाईल. “

…. अजूबा… रेवानं सोप्पं गणित मांडलेलं. एकच वर्ष तर काढायचंय. यूऽऽ कट जायेगा..

खरं सांगू ? एक नाही, साडेचार वर्ष झालीयेत आता. “वाशिष्ठी दर्शन मोटेल” जोरात चाललंय. विनायकराव आणि काकू खूष.

समीर तर रवीला म्हणतोय, ‘तूच सांभाळ सगळं, लाईफटाईम. ‘

वाडीतल्या रिकाम्या जागेवर, रेवाचं स्कूल उभं राहिलंय… ‘समीर फायनान्स’च्या सहकार्यानं.

चिपळूणातलं पहिलं आय सी एस ई स्कूल… जोरात चालंलय. ” पुण्याच्या बाईंची शाळा ” फेमस झालीये.

तन्वीही मस्त रमलीये. रेवा पुणं विसरलीय बहुतेक.

परवाचीच गोष्ट… एक निवांत संध्याकाळ. रेवा आणि रवी गॅलरीत उभे…काॅफीच्या सोबतीला समोरची वाशिष्ठी.. वळणदार, नागमोडी.

“रेवा, मै तुम्हे कभी समझ ही नही पाया…. पुणं सोडून, तू कशी काय राहिलीस इथं ?”

रेवानं मोठ्ठा पाॅझ घेतला.

“रव्या, कोण म्हणतंय मी पुण्यापासून लांब आहे ? पुणं इथंच आहे, माझ्यासोबत.

पुणं म्हणजे फक्त पिनकोड नाहीये… पुणं म्हणजे संस्कार… पुणं म्हणजे लाईन ऑफ थिंकींग… पुणं म्हणजे वर्क कल्चर.. जे फक्त पुण्यात राहूनच, शिकता येतं. आज तू अन् मी इथं, आपापलं छोटसं विश्व उभारू शकलो ते याच संस्काराच्या जीवावर. आहे ते शिस्तीत सांभाळायचं, वाढवत न्यायचं. फुकाचा माज करायचा नाही. स्वतःची ओळख निर्माण करायची. अटकेपार डंका फडकवायचा. अन्… रिटायरमेंनंतर पुण्यात परत यायचं….. हे असलं, अस्सल जगणं, म्हणजेच पुणं… मी चुकत होते रव्या.. पुण्यापासून लांब गेलं की, पुण्याची किंमत कळते. माणूस शहाणा होतो. प्रगती करतो. “पुण्या”च्या वाटेवर चालू लागतो.

अस्सल पुणेकरानं, दोन चार वर्ष बाहेर काढावीतच… ते जाऊ दे. ही शाळा मला बारावीपर्यंत न्यायचीय.

तुझं हाॅटेल बारा महीने फुल्ल रहायला हवं.. ”

“होणार.. असंच होणार. वाशिष्ठीच्या साक्षीनं… ओंकारेश्वराच्या आशीर्वादानं… एकदा लेकीचं लग्न झालं, की जाऊ पुण्याला परत. अजून एक, जावई मात्र पुण्यातलाच हवा.. “

खरंय.. रेवा पुण्याशिवाय राहूच शकत नाही. रग रग में पुणे.. ” ये बयो लवकर परत…पुणं वाट बघतंय. ” 

– – ‘पुण्या’ची गणना कोण करी ?”

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आम्ही पेशवेकालीन मोरोबादादांच्या वाड्यात…

रोड वायडिंग मध्ये आमची जागा गेली. जोगेश्वरीच्या अगदी समोरच्या दीपमाळेजवळची, जागा सोडून आम्ही पोटभरे वाड्यात म्हणजे जोगेश्वरीच्या पाठीमागे आलो. आई देवीला हात जोडून म्हणाली, ” माते आम्ही तुझ्या पोटाशी होतो तु पाठीशी घातलसआणि तुझ्या परिसरातच ठेवलंस”.

हा पेशवेकालीन मोरोबा दादांचा वाडा चार चौकी आणि पुष्कर्णी हौदाचा होता. पेशव्यांची रंगपंचमीची रंगत ह्याच वाड्यात रंगली. शानदार, नक्षीदार दरवाजातून आत गेल्यावर लांबरुंद हेssभले मोठे सुंदर हौद दिसायचे. पेशवे काळात पूर्णपणे हे हौद भरून रंग तयार केला जायचा. आणि रंगपंचमीचा जल्लोष साजरा व्हायचा. पेशवाई संपली, वाडा ओस पडला आणि ह्या वाड्यात नंतर 100 बिऱ्हाड आली. त्यात 101 च्या आकड्यात आमची वर्णी लागली. घराची दुरुस्ती, लाईट बिल खर्च, मालकांनी करायचा असा नियम होता. पण जुनी पडझडीची वास्तू, तुळया, सळया जुन्या पुराण्या झाल्या. तेलपाण्या अभावी त्यागंजलेल्या होत्या. लाकडी जिन्याच्या पायऱ्या तुटलेल्या असून, जिन्यात इतका अंधार होता की पायरी चुकली तर पावलं उचलायचा त्रास वाचून, वरचा माणूस घसरगुंडी खेळत l पहिल्या पायरीवरच पोहोचायचा. जिन्यात दिवसाढवळ्या इतका काळोख असायचा की चढणारा आणि उतरणारा टक्कर देउन कसाबसा तोल सावरत कपाळ चोळायचा. अहो!लहान काय, मोठ्ठे सुद्धा ‘ठो देरे ठोचा ‘ खेळ त्या अंधाऱ्या जिन्यात खेळायचे. मग काय कपाळावर हात मारून, एक सणसणीत शिवी हांसडून एकमेकांना म्हणायचे. “साल्या दिसत नाही कां तुला?”डोळे फुटलेत का तुझे? आंधळा झालास की काय?” पहिल्या पायरीवरून हा रंगलेला डाव बघणारे आम्ही हंसू दाबून एकमेकांना विचारायचो. ” हे तर चांगले डोळस आहेत, पण जिनाच आंधळा आहे त्याला ते तरी काय करणार? 

अहो !काय सांगू तुम्हाला! पुण्यात सगळ्याच वाड्यांची ही कथा होती. कारण वाडे जुने झाले होते नां!मालक तरी काय करतील? आभाळाला किती ठिगळ जोडतील? भाडेकरूही चिवट होते. वाडा पडेपर्यंत ते बहाद्दर जाम हलले नाहीत. जिने उतरतांना तर आम्ही कड्या कठडे खुळखुळ्यासारखे हलवायचो. लाईट कनेक्शन तुटलं, मालक भाडेकरूंची शब्दांची हाणामारी झाली तरीही, चार भिंतींना जुनी बिऱ्हाड चिकटूनच राह्यली. पोटभरे वाड्यात कमीत कमी जागेचे भाडेकरूंचं भाडे होतं फक्त 2 रुपये. आमच् घर म्हणजे एक हॉलचं होता. माझ्या मावशीने आणि वर्षा वहिनीने त्याला आकार देऊन ‘टू इन वन’ केलं होतं. तेव्हा कुठली आलीय हो प्रायव्हसी, ? पण थोडीफार प्रायव्हसी असावी म्हणून आमच्या बंधूराजांनी घरात शामियान्यासारखे पडदे सोडले होते.

सगळ्या बिऱ्हाडांना जोडलेला, सार्वजनिक पटांगणासारखा भला मोठा हॉल पहिल्या मजल्यावर होता. ‘आव जाव हॉल तुम्हारा’अशी प्रथा पडून मंगळागौर लग्न, मुंज, डोहाळे जेवण सारं काहीं या फुकटच्या हॉलमध्ये फुकटात साजरं व्हायचं. वाड्यात सगळ्यात जास्त म्हणजे मोठ्या आकड्याचं भाडं आम्हालाच होतं. ते किती होतं माहितीय का? फक्त रु. 12 नगद. आजच्या लाखोवारीच्या जगामध्ये ते बारा रुपये म्हणजे कुठलातरी कोपराचं म्हणावं लागेल. मालक श्री. व सौ. पोटभरे सगळ्या भाडेकरुंचे भाऊ आणि वहिनी होते. माहेरवाशिणीचे माहेरपण तिथे कौतुकाने साजरं व्हायचं. इतकंच काय, आम्ही वाड्यातल्या मुली उपवर झालो की, आमची लग्न, रुखवत, धान्य निवडणे सारी सारी तयारी वाडा अगदी आपलं घरचं कार्य समजून करायचा. त्यात उत्साहाचा वाटा आणि गाईडन्स अर्थात पोटभरे भाऊ वहिनीचंच असायचं.

तुम्हाला एक नवलाईची गोष्ट सांगू?तिथले एक भाडेकरू श्री. कळमकर ह्यांना आई वडील भाऊ बहिण कुणीच नव्हते. खोटं वाटेल तुम्हाला पण त्यांचं लग्न या वाड्यांनी लावलं. देव देवक भाऊंनी बसवलं. करवल्या झालो आम्ही. आणि कार्यवाहक झाला संपूर्ण वाडा. असं हे शुभमंगल वाड्यातल्या हॉलनी दणक्यात लावलं. इतकचं काय त्यांचे बारा महिन्यांचे लगेचच आलेले १२ सण हौसेनी केले. मंगळागौरीचं, हरतालिकेचं जागरण, झिम्मा, दणादण फुगड्या या वाड्यानेच जागवल्या काही दिवसांनी कळमकर वहिनीनीं गोड गुपित माझ्या आईच्या कानांत सांगितलं. आईतली माय माऊली जागी झाली आणि कौतुकाने हंसली मग काय! माझ्या आईनी चोर चोळीचा कार्यक्रम गुपचूप उरकला. पुढे सातवा महिना लागल्यावर डोहाळतुलीचं सजून धजुन डोहाळेजेवणही हौसेत झालं. त्या वहिनीची तिच्या मामीकडे माहेरी पाठवणी झाली. “सांभाळून, सावकाश जा गं! तब्येतीची काळजी घे हो. जड ओझं उचलू नकोस हं!काही खावसं वाटलं तर सांग बरंका! “ अशा एका अनेक प्रेमाच्या सूचना झेलत डोहाळकरीण माहेरी रवाना झाली. आणि मग काही दिवसांनी, बालराजांना घेऊन बाळंतींण आपल्या घरी, मोरोबादादांच्या वाड्यात परतली.

बालराजांचं स्वागत अगदी थाटामाटात पायघड्यांवरून फुलांच्या मऊ शार पाकळ्यांवरून झालं. आणि बाळकृष्ण बोळकं पसरून हंसले. बाळकृष्ण कलेकलेने वाढत होता त्याचं उष्टावण झालं संक्रांत सण, बोरनहाण, करदोडे वाण, अगदी सगळे सगळे सोहळे कौतुकाने वाड्यातल्या आयाबायांनी साजरे केले. इतकचं काय मुलांची मुंज पण इथे निर्वीघ्नपणे पार पडली. प्रेम, जिव्हाळा, सहकार्य, आणि शेजारधर्म ह्या तत्वावर आधारलेली संस्कृती त्यावेळच्या जुन्या पुण्यात पाय रोउन घट्ट रुतली होती.

ते सगळं खरं आहे हो!पण ह्या वाडा संस्कृतीत देवाला स्थान हे हवेच नाही कां! वाड्याच्या मागच्या बाजूला छोटसं विष्णू मंदिर होतं आणि अजूनही आहे. बायका इतक्या उत्साही की भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत सुस्नात होऊन काकड्याला जायच्या. तितक्याच हौसेने जवळच्या प्रभात टॉकीजच्या मराठी सिनेमाला पण घोळक्यांनी भेट द्यायच्या. हळव्या रडक्या सिनेमात रडून आणि विनोदी सिनेमात हसून बाहेर पडायच्या. आमच्या वहिनीला सिनेमाची खूप आवड होती म्हणून आमची आई वाड्यातल्या बायकांना तिचं पण तिकीट काढायला सांगायची. एकदा तर गंमतच झाली बहिणीबरोबर वहिनीने 12 ते 3 सिनेमा बघितला, घरी आली तर वाड्यातल्या बायकांनी ‘मोलकरीण’ सिनेमासाठी तिचं तिकीट काढलं होतं. प्रभात टॉकीजला वेगवेगळे मॅटिनी शो असायचे त्यातून तर हा सुलोचनाचा गाजलेला कौटुंबिक चित्रपट होता. वहिनीला जेवायला सुद्धा वेळ मिळाला नाही. ‘शो’ ची सुरुवात जायला नको म्हणून आईने घरी भाजलेले खारे शेंगदाणे आणि कोरड्या भेळेचा पुडा बायकांच्या हातात कोंबला. तेव्हा थिएटरमध्ये सर्रास शेंगा, फुटाणे, भेळ, फरसाण खायची फुल परमिशन होती. सिनेमाचा आस्वाद घेताना रसिक प्रेक्षक, शेंगा फराळ करायचे. शेंगा फोलपटांचा ढीग, कागदाचे बोळे बाकाखाली इतके पडायचे की ते आवरतांना सफाई कामगारांचं कंबरडच मोडायचं. पुढची गंमत तर ऐका ना, वहिनी बहिणीबरोबर 12 ते 3 सिनेमा बघून नुकतीच आली होती. वाड्यातल्या बायकांबरोबर 3 ते 6 दुपारचा शो बघून घरी येऊन चहा प्यायला टेकली न टेकली तोच आमचे बंधुराज घाईघाईने आले. आणि म्हणाले, “वर्षा लवकर चहा पी, मी तिकीट काढलीत, आपल्याला 6 ते 9 च्या शोला जायचय पटकन उठ. सिनेमाची सुरुवात जायला नको” आता आली का पंचाईत!. हो म्हणावं की नाही म्हणावं? ह्या विचारांच्या गोंधळात वहिनींबाईंनी आईकडे बघितलं, माझी आई सगळ्यांना सावरून घेणारी, सगळ्यांची मर्जी सांभाळणारी होती. माझ्या भावाला राग येऊ नये म्हणून तिने वहिनीला त्याच्याबरोबर जाण्याची खूण केली. अहो!वहिनीला तशी सिनेमाची आवड होती म्हणा! पण त्या एकाच दिवशी तीन प्रकारचे तीन सिनेमे बघून तिच्या डोक्यात अगदी सिनेमांची खिचडी झाली. 12 ते3, – 3 ते6 आणि शेवटचा 6 ते 9चा शो बघून घरी आल्यावर अर्धी अधिक अमृतांजनची बाटली तिने संपवली. हंसून हंसून आम्ही लोळण फुगडी घेतली. त्यानंतर मात्र वहिनीने पाच-सहा महिने ‘चला जाऊया सिनेमाला’ ह्या वाक्याचा धसका घेऊन सिनेमाचं नांवच काढलं नाही.

बरं का मित्रमैत्रिणींनो अशा गंमतीशीर आठवणी आम्हाला मोरोबा दादांच्या वाड्याने दिल्या आहेत. मग आवडली का तुम्हांला ही त्यावेळच्या वाड्यातली गमतीशीर गम्मत?.

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चराचरात आहे राम… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

??

☆ ✍️ चराचरात आहे राम… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

श्रीराम जय राम जय जय राम 🙏🚩

या जगातील सगळ्या गोष्टींची जबाबदारी भगवंताची आहे

कुणी मानतं कुणी मानत नाही,

एवढाच काय तो फरक आहे..

 *

पृथ्वी, जल, आप, वायू, अग्नी तर त्याचेच, जीवाचा श्वास ही “त्याचा” आहे 

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे….

 *

दृश्य, अदृश्य, ऊन, सावली, सुख दुःखाचा तोच द्रष्टा आहे

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे…

 *

निर्माता तर आहेच पण निर्मितीचे कारणही तोच आहे 

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे…

 *

साधु संतांनी हे ओळखले व त्याला जाणले आहे 

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे…

 *

मानणे न मानणे हया पलिकडचे अस्तित्व “तो” आहे

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे….

 *

गुह्यतम हे ज्ञान हेच केवळ सत्य आहे 

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे….

 *

ज्याने जाणले त्याला त्याचाच तो आहे 

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे….

 *

त्याला जाणल्यावर जाणण्याचे काही शिल्लक रहात नाही 

स्वतः तच त्याला अनुभवल्यावर वेगळे काही असत नाही…

 *

स्वानंदाचा हा आनंदकंद निर्मितेचे कारण आहे

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे….

 *

“शीतोष्ण सुख दुःखेषु” असा तो स्थितप्रज्ञ ज्ञानी आहे 

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे…

 *

मानणे, न मानणे अंध:कार संपला

फरक ओळखून जगी “सुवर्ण मध्य” साधला…

 *

सत्यमेव जयते 🙏

 आत्माराम (च)राजाराम *

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वेळीच दाद द्या। ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ वेळीच दाद द्या। ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

एका अतिशय चांगल्या Whats अप मेसेज वरून सहज सुचलं.

माणूस असतानाच, आपण त्याला, का चांगले म्हणत नाही?

तो दुर्दैवाने गेल्यावर, मग त्याचे चांगले गुण आपण गौरव करून सांगतो.

आपले मन एवढे मोठे का बरे नसावे, की आपण एखाद्याला, त्याच्यासमोरच, कौतुकाचे शब्द ऐकवावे.

विशेषे करून, आपण बायका, समोरच्या बाईंचे कौतुक, जरा हात राखूनच करतो ना?

काय हरकत आहे हो, की.. “ अग, किती सुंदर आहे ही तुझी साडी, अगदी मस्त दिसतेय तुला. ”

का नाही पटकन आपण म्हणत, “ किती ग मस्त केलेस तू वडे. अगदी अन्नपूर्णा आहेस बघ. ” 

पण सहसा लोकांच्या हातून हे होत नाही.

हे फक्त बायकांच्याच बाबतीत नाही मला म्हणायचे, तर पुरुष मंडळीही याला अपवाद नाहीत.

ऑफिसमध्ये, जरा कनिष्ठ पदावरचा माणूस प्रमोशन मिळून वर गेला तर, खुल्या दिलाने त्याचे कौतुक किती सहकारी करत असतील?.. तर फार कमीच.

आणि ही वृत्ती लहान मुलांतही असतेच. पण पालकांनी त्याला खतपाणी घालता कामा नये.

पहिल्या आलेल्या मुलाचे खुल्या दिलाने अभिनंदन करायला, मुलांना आई वडिलांनी शिकवले पाहिजे.

आपण सुंदर दिसणाऱ्या मुलीचे कित्ती तरी वेळा मनातून कौतुक करतो, पण मग तिला तसे जाऊन सांगत का नाही की “अग, किती छान दिसतेस तू. तुझा चॉईस खूप छान आहे, तुला कपड्यातले खूप छान कळते ग. माझ्या बरोबर येशील का खरेदीला? “ बघा किती आनंदच होईल ना तिला.

सुनेने एखादा पदार्थ खरोखरच सुंदर केला, तर द्यावी ना सासूबाईंनी दाद की “ किती चव आहे ग तुझ्या हाताला. मस्त केलेस हो हे. “ आनंद हा कौतुक केल्याने द्विगुणित होतो.

आम्ही पुण्याच्या प्रख्यात हुजूरपागेत शिकलो. मुख्याध्यापक बाईंच्या त्या ऑफिसमध्ये जायचीही भीती वाटायची तेव्हा इतका त्या खुर्चीचा दरारा होता.

फार वर्षांनी माझी मामे बहीण हुजूरपागेची मुख्याध्यापिका झाली. इतके कौतुक वाटले ना तिचे.

तिला न कळवता तिचे कौतुक करायला आम्ही बहिणी तिला भेटायला ऑफिसमध्ये गेलो.

तिला म्हटले, “ आमची बहीण कशी दिसते या खुर्चीत ते बघायला आलोय आम्ही. ” 

तिचे डोळे आनंदाने भरून आलेले आजही आठवतात.

कौतुकाची थाप पाठीवर दिलेली तर आपल्या कुत्र्यालाही आवडते, मग आपण तर माणसे.

.. का नाही समोरच्याचे वेळीच कौतुक करू?

.. चार चांगले शब्द काय जड होतात का हो उच्चारायला?

– – – या वरून आपल्या लाडक्या सुधा मूर्ती आठवतात. तळागाळातील बायकांशी मैत्री करून, त्यांची सुखदुःख्खे जाणून घेऊन, त्यावर उपाय शोधून, पुन्हा कुठेही मोठेपणाची हाव न धरणाऱ्या सुधाताईंचे किती कौतुक करावे ? 

…. समाजाने वाळीत टाकलेल्या बायकांनी केलेल्या सुबक गोधड्या बघून त्यांचे मन भरून कौतुक करणाऱ्या सुधाताई तिथेच नुसत्या थांबल्या नाहीत, तर त्यांना त्या तयार करून विकायला त्यांनी

बाजारपेठ उपलब्ध करून दिली. त्यांना मान खाली घालायला लावणारा व्यवसाय सोडायला लावून,

नवीन दिशा दिली… यातूनच ‘ तीन हजार टाके ‘ हे पुस्तक जन्माला आले.

‘ कौन बनेगा करोडपती ‘ मध्ये सुधाताईंनी साक्षात अमिताभ बच्चनना त्या बायकांनी केलेली सुबक गोधडी प्रेझेन्ट दिली… असे मोठे मन आपण किती लोकांकडे बघतो?

आपणही, खुल्या दिलाने कौतुक करायला शिकले पाहिजे.

.. मी मुलीकडे हॉंगकॉंगला गेले होते. तिकडे फिरत असताना आम्हाला बाबा गाडीत इतकी गोड बाळे दिसली ना.. मला लहान मुले अतिशय आवडतात. त्यातून ही जुळी मुले तर गुबगुबीत, मिचमिचे डोळे करून बघत होती. मी त्यांच्या आईला विचारले, “ मी बोलू का यांच्याशी? “ ती हसली आणि म्हणाली,

“ हो, पण ती चावतात बर का. जपूनच बोला. ”

मी गुढग्यावर बसले, आणि चक्क मराठीत बोलू लागले त्या गोड बाळांशी.

ती दोघेही जोरजोरात दंगा करायला लागली, आणि हात पसरून माझ्याकडे झेप घेऊ लागली.

त्यांच्या आईला खूप मजा वाटली. किती अभिमानाने ती आपल्या गोड बाळांकडे बघत होती !

प्रेमाला भाषा नसते हो, फक्त तुम्ही ते व्यक्त करा, ते समोर पोचते लगेच.

.. माणूस जिवंत असतानाच दाद द्या, चार शब्द कौतुकाचे बोला, तो माणूस शहरातून बदलून गेल्यावर,

किंवा दुर्दैवाने, या जगातूनच निघून गेल्यावर मग हळहळून काय उपयोग?

आपल्या भावना, लगेचच पोचवायला शिका. वेळ आणि वाट नका बघू. नंतर हळहळून, गेलेली वेळ परत येत नसते. मग आपल्या हातात, ‘अरेरे।’ असा पश्चात्ताप करण्याशिवाय काहीही उरत नाही.

मंडळी, तर मग करा सुरुवात दिलखुलास दाद द्यायला…. न कचरता.

…. आणि बघा, समोरचाही किती खुश होतो, आणि तुमचाही दिवस किती सुंदर जातो ते ।।।

©  डॉ. ज्योती गोडबोले 

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares