मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मिलेटस्/Millets म्हणजे काय? भाग – 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

मिलेटस्/Millets म्हणजे काय? भाग – 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

मिलेटस् म्हणजे भरडधान्ये वा तृणधान्ये, ज्याला इंग्रजी भाषेत Millets वा small seeded grass असे म्हणतात. Millets म्हणजे मोटा अनाज. या Millets ला Nutricereals वा Superfood असे म्हटले जाते.  

 मिलेटसचा इतिहास 5000 ते 6000 वर्षे पूर्वीपासूनचा आहे. आपल्याला भरडधान्ये म्हटले की, लगेचच फक्त दोन धान्ये डोळ्यासमोर येतात, ती म्हणजे गहू (wheat) आणि तांदूळ (paddy rice). त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज होती, त्याला अनुसरून पहिली हरितक्रांती घडविण्यात आली. गव्हाचे, तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ लागले. वेगवेगळ्या जाती, वाण आणले गेले अन् देशाची पोटाची भूक भागविण्यात आली. परंतु परिणामी आपली आरोग्यदायी भरडधान्ये, तृणधान्ये या हरितक्रांतीच्या धबडग्यात वेगाने बाजूला फेकली गेली. तसेच ही भरडधान्ये म्हणजे डोंगर, कड्याकपारीत राहणाऱ्या गरीब लोकांचे अन्न म्हणून हिणवले गेले आणि आपल्यासारख्या लोकांच्या जेवणाच्या थाळीतील खाण्याची जागा घेतली गव्हाच्या चपाती, पोळीने, मैदा पाव, बिस्कुटाने, तांदळाच्या भाताने, अन् इथूनच आरोग्याच्या समस्यांचे दुष्टचक्र सुरू झाले. तत्कालीन सरकार व प्रशासन शास्त्रज्ञ यांच्यासमोर भल्यामोठ्या लोकसंख्येला पोटाला अन्न देणे हे महत्त्वाचे होते अन् ती तत्कालीन प्राथमिकता होती.

आता आपले डोळे उघडले आहेत. आता आपण परत आपल्या पन्नास वर्षापूर्वीच्या अन्नाकडे वळायचे आहे आणि परत आपल्याला पूर्वीप्रमाणे सुदृढ व्हायचे आहे , जैवसाखळी/ Biodiversity निर्माण करायची आहे.

मिलेटस् प्रोत्साहन, मानवी आरोग्य व्यवस्थापन अन्  जैवसाखळी/Biodiversity पुनर्स्थापना, पर्यावरण, अर्थकारण यामध्ये मिलेटसची भूमिका काय, हे समजून घेऊया.

–  संपूर्ण देशभर असणारी दुष्काळी परिस्थिती व शेतीच्या पाण्याची उपलब्धता पाहता हे भरडधान्ये पीक कुठेही येऊ शकते. अगदी एक-दोन पाण्यामध्ये, वा फक्त पावसाच्या पाण्यावरसुद्धा. खते, औषधे, कीटकनाशक रसायने लागत नाहीत, म्हणजे पर्यावरणप्रिय शेती असे समजूया. मिलेटस् /भरडधान्ये शेती म्हणजे जंगल फार्मिंग/naturally grown & minimum care crops अर्थात कसलीही इनपुटस न देता, अगदी तीनचार महिन्यात छान पीक काढणीस तयार होते. म्हणजे अल्प भांडवल, उत्तम आरोग्यदायी अन्न, जनावरांना चारा, असा चौफेर फायदा.

1 किलो गहू तयार करण्यासाठी 10.00 लिटर पाणी लागते. 1 किलो तांदूळ (paddy rice) तयार करण्यासाठी 8000 ते 9000 लिटर पाणी लागते. परंतु 1 किलो मिलेटस् /भरडधान्ये तयार करण्यासाठी फक्त 200 लिटर पाणी लागते. म्हणजे मिलेटसच्या तुलनेने गव्हाला तांदळाला जवळजवळ चाळीस ते पन्नास पट पाणी लागते. तसेच 1 किलो गहू, तांदुळामध्ये चार लोक पोट भरू शकतात. परंतु 1 किलो भरडधान्ये/मिलेट मध्ये बारा लोक पोट भरू शकतात. म्हणजे तुम्ही तुलना करा किती मोठी फूड सेक्युरीटी आपण निर्माण करू शकतो. 

आता या मागील अर्थकारण पाहूया. साधारणपणे 80 ते 150 रूपये किलो ह्या दराने बाजारात मिलेट/भरडधान्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. म्हणजे यातून शेतकऱ्यांचे फार मोठे अर्थकारण साधता येणार आहे.

वेगवेगळी मिलेटस्/भरडधान्ये अन् त्यांचे आरोग्यदायी फायदे :-

गहू आणि तांदूळ (paddy rice) यामध्ये ग्लुटेन नावाचे एक प्रोटिन असते, जे पचायला जड असते, ज्यामुळे डायबिटीस व लठ्ठपणा, वा इतर आजार बळावले जातात. 

आता मिलेटस् /भरडधान्येच का खायची? :- कारण त्यामध्ये ग्लुटेन नसते. हे गहू, तांदुळामध्ये असणारे ग्लुटेन निरनिराळ्या आजारांना, रोगांना आमंत्रण देते. भरडधान्यात असणारे मुबलक फायबर्स पोट साफ करण्यासाठी मदत करतात, जेणेकरून पोटाचे विकार दूर होतात, कारण बहुतेक आजारांचे मूळ कारण पोट साफ न होणे हे आहे. परिणामी डायबिटीस, लठ्ठपणा, रक्तदाब, कॅन्सर, सांधेदुखी, वा इतर विविध शारीरिक विकार!  हे आजार, विकार दूर करण्यासाठी मिलेटस् फारच हमखास गुणकारी आहेत.

 मिलेटस् ग्लुटेन फ्री फूड आहे. सध्या सर्वत्र चर्चा आहे ना ते हेच! म्हणजेच भरडधान्ये आपण आहारात समाविष्ट केल्याने हे जीवनशैलीचे आजार, विकार, रोग आपण सहज टाळू शकतो. ‘Industrial food काय कामाचे?’ हे आपण स्वतःला विचारणार आहोत का नाही? 

— क्रमशः भाग पहिला 

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ – कवि श्री.राजा बढे… श्री समीर जावळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ – कवि श्री.राजा बढे… श्री समीर जावळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

 ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गाण्याच्या जन्माची रंजक गोष्ट काय आहे? महाराष्ट्र गीत कसं जन्माला आलं?

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे गीत आपण जेव्हा ऐकतो, तेव्हा आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. शाहीर साबळे यांचा पहाडी आवाज. त्यानंतर महाराष्ट्राचं यथार्थ वर्णन करणारे शब्द आणि उत्कृष्ट असं संगीत या सगळ्याचा मिलाफ म्हणजे हा पोवाडा किंवा हे महाराष्ट्र गीत. आजच या गीताविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गर्जा महाराष्ट्र माझा हे गाणं महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ

स्वतंत्र भारताची निर्मिती झाल्यानंतर मराठी भाषिकांचं राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली. या चळवळीत १०७ हुतात्म्यांनी रक्त सांडलं. या हुतात्म्यांनी सांडलेल्या रक्तामुळे आणि चळवळीसाठी उभ्या केलेल्या कष्टामुळे महाराष्ट्राची निर्मिती झाली. साहित्यिक, विचावंत, राजकीय पार्श्वभूमी असलेले नेते अशा सगळ्यांचाच या चळवळीत मोलाचा सहभाग होता. ब्रिटिश काळात राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली गेली होती. मात्र भाषावार प्रांतरचना झाली नव्हती. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबईसह महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे, डॉ. आर. डी भंडारे यांनी मांडला होता. प्रांतरचनेसाठी नेमलेल्या समितीने मात्र ही मागणी फेटाळली होती.

डिसेंबर १९५३ मध्ये फाजलअली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी, धनंजय गाडगीळांसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. इ.स.१९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीर झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. त्यानंतर या आयोगाविरोधात चळवळ उभी राहिली. या सगळ्या चळवळीनंतर आपल्याला मुंबईसह महाराष्ट्र मिळाला.

१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला. त्याच दिवशी महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली होती. याच दिवशी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गाणं सर्वात आधी सादर झालं. राजा बढे यांचे शब्द, शाहीर साबळे यांचा आवाज आणि श्रीनिवास खळे यांचं संगीत असा त्रिवेणी संगम या गाण्यासाठी जुळून आला. हे गाणं सादर झालं. ते लोकांच्या पसंतीस पडलं. त्यानंतर हे गाणं घराघरात पोहोचलं. महाराष्ट्र गीत म्हटलं की जय जय महाराष्ट्र माझा, हाच पोवाडा प्रत्येकाच्या ओठावर आला. मनात घर करून राहिला. आज त्याच गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. १९फेब्रुवारी २०२३ पासून म्हणजे शिवजयंतीपासून हे गीत महाराष्ट्र गीत म्हणून ओळखलं जाईल. 

शाहीर साबळेंचे नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी काय आठवण सांगितली?

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा पोवाडा आणि ‘महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान, माझे राष्ट्र महान’ दोन गीतं होती. त्यातलं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं लोकांना प्रचंड भावलं. कवी राजा बढे यांनी अवघ्या दीड दिवसात हे गाणं लिहिलं होतं. महाराष्ट्र गीत गाण्याचा प्रस्ताव आला तेव्हा बाबांना (शाहीर साबळे) यांना सुरुवातीला तो मंजूर नव्हता. कारण त्यावेळी त्यांच्या नाटकांचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर सुरू होते. आपल्याऐवजी हे गाणं शाहीर अमर शेख यांनी गावं असं बाबांना वाटत होतं. कारण अण्णाभाऊ साठे, तसंच शाहीर अमर शेख यांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठं योगदान होतं. मात्र त्यावेळी जी राजकीय परिस्थिती होती त्यात बाबांना आग्रह करण्यात आला की, हे गाणं तुम्हीच गावं. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांची तालीम करून बाबांनी (शाहीर साबळे यांनी) हे गाणं बसवलं. १ मे १९६० ला हे गाणं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर गायलं होतं. ६३ वर्षांपासून हे गीत मराठी माणसाच्या मनात घर करून राहिलं आहे.

लेखक – श्री समीर जावळे

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १८ (ब्रह्मणस्पति सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १८ (ब्रह्मणस्पति सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १८ (ब्रह्मणस्पति सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – आप्री देवतासमूह 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील अठराव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी ब्रह्मणस्पति, इंद्र, सोम, दक्षिणा व सदसस्पति अशा विविध देवतांना  आवाहन केलेले आहे. तरीही  हे सूक्त ब्रह्मणस्पति सूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद : 

सो॒मानं॒ स्वर॑णं कृणु॒हि ब्र॑ह्मणस्पते । क॒क्षीव॑न्तं॒ य औ॑शि॒जः ॥ १ ॥

उशिजसूत कुक्षीवानाने सोम तुला अर्पिला

प्रसन्न होई ब्रह्मणस्पते स्वीकारूनी हवीला

कल्याणास्तव त्यांच्या देई आशीर्वच भक्तां

कुक्षीवानासम त्यांना रे देई तेजस्वीता ||१||

यो रे॒वान्यो अ॑मीव॒हा व॑सु॒वित्पु॑ष्टि॒वर्ध॑नः । सः नः॑ सिषक्तु॒ यस्तु॒रः ॥ २ ॥

स्वामी असशी संपत्तीचा व्याधींचा हर्ता

साऱ्या जगताचा तू असशी समर्थ पालनकर्ता

द्रव्य अमाप तुझिया जवळी भक्तांचा तू त्राता

अमुच्या वरती ब्रह्मणस्पते ठेवी आशिषहस्ता ||२||

मा नः॒ शंसो॒ अर॑रुषो धू॒र्तिः प्रण॒ङ्‍ मर्त्य॑स्य । रक्षा॑ णो ब्रह्मणस्पते ॥ ३ ॥

कुटिलांची किती दुष्कृत्ये अन् क्षोभक दुर्वचने 

बाधा करण्या आम्हाला ती सदैव दुश्वचने

कवच तुझे दे ब्रह्मणस्पते अभेद्य आम्हाला 

तू असशी रे समर्थ अमुचे संरक्षण करण्याला ||३||

स घा॑ वी॒रो न रि॑ष्यति॒ यमिंद्रो॒ ब्रह्म॑ण॒स्पतिः॑ । सोमो॑ हि॒नोति॒ मर्त्य॑म् ॥ ४ ॥

ब्रह्मणस्पती, शचीपती अन् सोम श्रेष्ठ असती

समस्त मनुजा राखायाला सदैव सिद्ध असती

ज्यांच्या वरती कृपा तिघांची ते तर भाग्यवंत

अविनाशी ते कधी तयांच्या भाग्या नाही अंत ||४||

त्वं तं ब्र॑ह्मणस्पते॒ सोम॒ इंद्र॑श्च॒ मर्त्य॑म् । दक्षि॑णा पा॒त्वंह॑सः ॥ ५ ॥

रक्ष रक्ष हे ब्रह्मणस्पते इंद्र सोम दक्षिणा

मनुष्य प्राणी मोहांभवती घाली प्रदक्षिणा

कळत असो व नकळत घडती पापे हातूनी 

संरक्षण आम्हासी देउनिया न्यावे तारूनी ||५||

सद॑स॒स्पति॒मद्‍भु॑तं प्रि॒यमिंद्र॑स्य॒ काम्य॑म् । स॒निं मे॒धाम॑यासिषम् ॥ ६ ॥

प्रज्ञारूपी सदसस्पतीची मैत्री इंद्राशी 

अद्भुत आहे शौर्य तयाचे भिववी शत्रूसी

काय वर्णु औदार्य तयाचे प्रसन्न भक्तांशी

भाग्य लाभले सन्निध झालो आहे त्याच्यापाशी ||६||

यस्मा॑दृ॒ते न सिध्य॑ति य॒ज्ञो वि॑प॒श्चित॑श्च॒न । स धी॒नां योग॑मिन्वति ॥ ७ ॥

आम्हा लाभे बुद्धीमत्ता तयाची कृपा ही

आपुलकीने बहु प्रीतीने आम्हा तो पाही

सिद्ध कराया यज्ञायागा ज्ञानिहि समर्थ नाही

असेल त्याचे सहाय्य तर हे सहजी साध्य होई ||७||

आदृ॑ध्नोति ह॒विष्कृ॑तिं॒ प्राञ्चं॑ कृणोत्यध्व॒रम् । होत्रा॑ दे॒वेषु॑ गच्छति ॥ ८ ॥

अर्पण केल्या हविसी देई पूर्ण सफलता तो

यज्ञकार्यीच्या न्यूनालाही सांभाळुनिया घेतो 

अर्पण करुनीया  देवांसी हविर्भाग अमुचा

त्याच्या पायी होत सिद्धता यज्ञाला अमुच्या ||८||

नरा॒शंसं॑ सु॒धृष्ट॑म॒मप॑श्यं स॒प्रथ॑स्तमम् । दि॒वो न सद्म॑मखसम् ॥ ९ ॥

नराशंस हा अती पराक्रमी दिगंत त्याची कीर्ति

द्यूलोकच जणू तेजस्वी किती भव्य तयाची कांती

दर्शन त्याचे मजला घडले धन्य जाहलो मनी

प्रसन्न होउन कृपा करावी हीच प्रार्थना ध्यानी ||९||

(हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे. )

https://youtu.be/TDVCUNhPGKM

Attachments area

Preview YouTube video Rugved :: Mandal :: 1 :: 18 |||| ऋग्वेद :: मंडल १ :: सुक्त १८

Rugved :: Mandal :: 1 :: 18 |||| ऋग्वेद :: मंडल १ :: सुक्त १८

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ क्वांटम कम्युनिकेशन ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ क्वांटम कम्युनिकेशन  ☆ श्री राजीव गजानन पुजारी

डिजिटल दूरसंवादासाठी आपण ‘बिट’ हे एकक वापरतो. विजेच्या प्रवाहातील अनियमिततेचा वापर आपण बिट्स निर्माण करण्यासाठी करतो. वाय फाय मध्ये बिट्स निर्माण करण्यासाठी रेडिओ सिग्नल्स वापरतात. इथरनेट कनेक्शनमध्ये व्होल्टेजमधील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रिक सिग्नल्सचा वापर बिट्स निर्माण करण्यासाठी केला जातो. तर फायबर कनेक्शन्समध्ये प्रकाशाच्या स्पंदनांचा वापर बिट्स निर्माण करण्यासाठी केला जातो. यानंतर बायनरी सिस्टीम्सचा वापर करून विविध अक्षरे वा आकडे दर्शविले जातात. थोडक्यात on आणि off कंडिशन म्हणूया हवं तर. ऑन 1 हा आकडा आणि ऑफ 0 हा आकडा दर्शवितो. या शून्य व एक यांच्या विविध मांडण्या वापरून मेसेज प्रक्षेपित केला जातो व प्रक्षेपित केलेला मेसेज परत उलट प्रकाराने कनव्हर्ट करून श्रोत्यांना वा दर्शकांना ऐकविला /दर्शविला जातो. बँकांचे वा इतर वित्तसंस्थांचे व्यवहारही या पद्धतीने होत असतात. या पद्धतीत ‘शून्य’ वा ‘एक’ हा शेवटपर्यंत ‘शून्य’ व ‘एक’च राहतो. त्यामुळे हॅकरने मध्येच पाठविलेला संदेश वा माहिती पकडली तर त्यांना त्याची उकल सापडू शकते. असे होऊ नये व पाठविलेल्या माहितीचा हॅकरद्वारा दुरुपयोग होऊ नये म्हणून क्वांटम कम्युनिकेशनवर जगभरात जोमाने संशोधन व सुधारणा सुरु आहेत. त्याची सर्वसाधारण माहिती खालील प्रमाणे :

आपण जाणतोच की, कोणताही अणू हा प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स व इलेक्ट्रॉन्स यांनी बनविलेला असतो. केंद्रात प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स असतात. केंद्राभोंवती विविध कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. हे प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स हे काही वर्षांपूर्वीपर्यंत मूलभूत कण मानले जात होते. पण आता असे निदर्शनास आले आहे कि, हे प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स सुद्धा ‘क्वार्क’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कणांपासून बनलेले आहेत. असे अनेक क्वार्कस् आहेत. त्यांची नांवे अप, डाऊन, टॉप, बॉटम, चार्म, स्ट्रेन्ज वगैरे आहेत. सर्व मूलद्रव्यांच्या प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्समध्ये सर्वच क्वार्क्स नसतात, तर मूलद्रव्यानुसार प्रोटॉन्स वा न्यूट्रॉन्समध्ये ठराविक क्वार्क्सच असतात. या क्वार्क्सना गिरकी (spin) असते. काही क्वार्क्स स्वतःभोवती एकदा फिरल्यावर मूळ स्थितीत येतात, काही दोनदा फिरल्यावर मूळ स्थितीत येतात तर काही क्वार्क्स स्वतःभोवती अर्धी गिरकी घेतल्यावर मूळ पदाला येतात. या नवीन शोधलेल्या मूलकणांना एकमेकांत गुंतविता किंवा अडकविता (entangelment) येते. म्हणजे असे की, मी एकमेकांत अडकविलेले दोन क्वार्क्स घेतले. एक माझ्याजवळ ठेवला व दुसरा तुम्हाला दिला व तुम्हाला तो क्वार्क घेऊन लाखो प्रकाशवर्ष दूर असलेल्या एखाद्या ठिकाणी पाठविले. नंतर माझ्या क्वार्कला मी क्लॉकवाईज अर्धी गिरकी दिली, त्या क्षणी तुमच्या जवळील क्वार्क सुद्धा क्लॉकवाईज अर्धी गिरकी घेईल. समजा माझ्याकडे दहा क्वार्क्स आहेत व तुमच्याकडेही दहा क्वार्क्स आहेत व तुम्ही माझ्यापासून लाखो प्रकाशवर्ष दूर आहात. माझ्याकडील प्रत्येक क्वार्कला वेगवेगळ्या गिरक्या देऊन त्याद्वारे एक संदेश दिला, तर तुमच्या जवळील क्वार्क्स पण तशाच गिरक्या घेतील व मी पाठविलेला संदेश तुम्हास कळेल. या तंत्रज्ञानात चीन व अमेरिका आघाडीवर आहेत. त्यांनी अनेक मैलांपर्यंत या पद्धतीने दूरसंवाद साधला आहे. भारतीय अंतराळ संस्थेच्या (ISRO) साराभाई ऍप्लिकेशन सेंटर या केंद्रास या पद्धतीने तीस मीटर्स पर्यंत दूरसंवाद साधण्यास यश आले आहे. क्वांटम मेकॅनिक्समध्ये सुपरपोझिशन म्हणून एक कन्सेप्ट आहे. त्यामुळे हॅकर्सना आपण पाठविलेला मेसेज हॅक करता येत नाही. 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमई महालिंगा नाईक ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ अमई महालिंगा नाईक ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

खरे तर पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आणि ’अमई महालिंगा नाईक’ या नावाची शोधमोहीम सुरू झाली. मुळात हे नाव आतापर्यंत कुणालाही ठाऊक नव्हते. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल जास्त लेखन नाही आणि गूगलवर माहितीसुद्धा उपलब्ध नव्हती, हेच विद्यमान केंद्र सरकारचे वेगळेपण आवडून गेले आणि याबाबत कितीही कौतुक केले तरी थोडेच आहे. २०१४ पासून झालेला हा बदल अभिनंदनीय आहे.

कर्नाटकमधील आडनदी काठापासून जवळच एक छोटे खेडेगाव केपू. गावातील एका श्रीमंत शेतकर्‍याकडे एक शेतमजूर काम करायचा. त्यांच्या नारळ आणि सुपारीच्या बागेत हे गृहस्थ मजूर म्हणून इमानदारीने काबाडकष्ट करत होते. त्यांचा प्रामाणिकपणा पाहून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी त्या शेतमजुराला आपल्या डोंगरावरील पडीक पडलेला शेताचा तुकडा बक्षीस म्हणून दिला. पण त्या माळरानावर पाण्याचा मोठा प्रश्न होता. तरीही यांच्यासारख्या अवलियाने तिथे सुपारीची बाग लावण्याचे स्वप्न बघितले आणि तिथूनच संघर्षाचा प्रवास सुरू झाला. बघितलेले स्वप्न सत्यात उतरवणे तसे कठीण आहे. पण अमई महालिंगा नाईक हे नाव आज ‘टनेल मॅन’ म्हणून जगप्रसिद्ध झाले आहे, कारण त्यांनी जे स्वप्न बघितले, ते सत्यात उतरवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.साधारण 1978 सालातील ही घटना आहे. अमई महालिंगा नाईक यांना शेताचा तुकडा मिळाला होता, पण शेतात आणि त्या माळरानावर पाण्याचा प्रश्न आ वासून त्यांच्यासमोर उभा होता. आपल्यापैकी एखादा त्यांच्या जागी असता, तर हा शेतीचा नाद कधीच सोडून दिला असता. पण म्हणतात ना.. ’कोशिश करने वालों की कभी हार नही होतीं’ याप्रमाणे त्यांनी हार न मानता काम चालू ठेवले. त्यांनी त्या माळरानावर राहण्यासाठी एक छोटीशी झोपडी बांधली. तेथील जमीन सपाट करून घेतली. जमीन डोंगराच्या पायथ्याशी असल्याने त्यांनी पावसाचे पाणी अडवण्यासाठी चर खोदायला सुरुवात केली. हे सगळे होत असतानाच मालकाच्या शेतातील काम सुरूच होते. दिवसभर मालकाच्या शेतात काम करायचे आणि काम संपले की चर खोदण्याचे काम करणे हे त्यांचे रोजच्या परिपाठाप्रमाणे सुरू होते. हे काम रोज रात्री 9 वाजेपर्यंत चालायचे. अमई महालिंगा नाईक माळरानावर जाताना कापसाच्या वाती आणि रॉकेलची चिमणी घेऊन जायचे. असे करत करत त्यांनी पहिला बोगदा 20 मीटरपर्यंत खोदल्यानंतर तो कोसळला. तब्बल 2 वर्षे खोदण्याचे काम करूनही त्यांच्या हाताला काहीच मिळाले नाही. त्यानंतर सलग सहा वर्षांत असे ४  बोगदे कोसळल्यानंतरही त्यांनी माघार घेतली नाही. मग त्यांच्या नंतरच्या बोगद्याने त्यांच्यापुढे हार मानली आणि तब्बल 30 फूट खोदल्यानंतर बोगद्याला पाणी लागले. परंतु ते पाणी शेतापर्यंत आणण्याचे आव्हान होतेच. मग त्यांनी एक शक्कल लढवली आणि सुपारीच्या खोडाचा पाइपसारखा वापर करून बोगद्यातील पाणी शेतापर्यंत आणले आणि तिथे पाणी साठवण्यासाठी मोठा हौद तयार केला.सुमारे आठ वर्षांतील तेवीस हजार तासांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले होते. या आठ वर्षांत त्यांना अनेक लोकांनी नावे ठेवली, पण त्यांनी या बोलण्याकडे लक्ष न देता आपले काम केले आणि यामुळे त्यांच्या ओसाड माळरानावर सोने पिकवण्याच्या स्वप्नाला दिशा मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या शेतात सुपारीची, नारळाची आणि काजूची झाडे लावली. हौदातील साठवलेले पाणी शेतासाठी पुरत होते. हेच जिद्दी, मेहनती आणि पाण्याचा मागमूस नसलेल्या ओसाड माळरानावर सोने पिकवून दाखवणारे शेतकरी म्हणजेच आजचे पद्मश्री अलंकृत अमई महालिंगा नाईक. याच जिद्दीच्या जोरावर त्यांच्या शेतात आज 300 पेक्षा जास्त सुपारीची,

 ७५ नारळाची झाडे, १५० काजूची झाडे, 200 केळीची आणि काही मिरचीची झाडे आहेत. खोदलेल्या बोगद्याच्या साहाय्याने त्यांनी शेतीसाठी एक नवी सिंचन व्यवस्था शोधून काढलीय, म्हणून ’टनेल मॅन म्हणून जगभर त्यांची ओळख निर्माण झालीय. अमई महालिंगा नाईक यांनी जिद्दीने शेतकर्‍यांसमोर आपल्या कामातून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आज त्यांचे वय ७२ वर्षे इतके आहे. आजही अमई महालिंगा नाईक स्वत: शेतातली सगळी कामे करतात आणि सगळी शेती सेंद्रीय पद्धतीने करतात, हे विशेष आहे.

 राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमधील पुरस्कार सोहळ्यात त्यांना नुकताच कृषी क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण, तंत्रज्ञान, पैसा यांपैकी काहीच जवळ नसताना फक्त मेहनतीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करता येतात, हे त्यांनी साध्य करून दाखवले आहे. आजच्या काळातील तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही शेतीकडे दुय्यम दृष्टीकोनातून बघणार्‍या शेतकर्‍यांसाठी ’अमई महालिंगा नाईक’ हे एक उत्तम उदाहरण आहेत. कृषिप्रधान असणारा आपला देश अमई महालिंगा नाईक यांच्यासारख्या कष्ट करणार्‍या लोकांमुळे अधिक श्रीमंत होतो आहे. पद्मश्री ’अमई महालिंगा नाईक’ यांच्या कार्याला सलाम आहे. यावेळी कवी बा.भ. बोरकर यांच्या ’लावण्य रेखा’ या कवितेतील ओळी स्मरणात येत आहेत….. 

 देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे।

 मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे।।

संग्रहिका : सुश्री पार्वती नागमोती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वैदिक राष्ट्रगीत ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ वैदिक राष्ट्रगीत ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

शुक्ला यजुर्वेदातील बाविसाव्या अध्यायातील बाविसावा श्लोक हा वैदिक राष्ट्रगीत म्हणून प्रसिद्ध आहे. 

या मंत्रात राष्ट्राचे मानचित्र साकारण्यात आले आहे.

☆ संस्कृत श्लोक

आ ब्रह्मन् ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी जायतामा राष्ट्रे राजन्य: शूरऽइषव्योऽतिव्याधी महारथो जायतां दोग्ध्री धेनुर्वोढानड्वानाशु: सप्ति: पुरन्धिर्योषा जिष्णू रथेष्ठा: सभेयो युवास्य यजमानस्य वीरो जायतां निकामे निकामे न: पर्जन्यो वर्षतु फलवत्यो नऽओषधय: पच्यन्तां योगक्षेमो न: कल्पताम्।।

-यजु० २२/२२

अर्थ समजायला सुलभ जावे म्हणून मी या श्लोकाची खालीलप्रमाणे विभक्त मांडणी केली आहे. 

आ ब्रह्यन्‌ ब्राह्मणो बह्मवर्चसी जायताम्‌

आ राष्ट्रे राजन्यः शूर इषव्यः अति

व्याधी महारथो जायताम्‌

दोग्ध्री धेनुर्वोढानड्वानाशुः सप्तिः

पुरंध्रिर्योषा जिष्णू रथेष्ठाः सभेयो

युवाअस्य यजमानस्य वीरो जायतां

निकामे निकामे नः पर्जन्यो वर्षतु

फलवत्यो न ओषधयः पच्यन्ताम्‌

योगक्षेमो नः कल्पताम्

सुलभ अर्थ

हे ब्रह्मात्म्या , आमच्या देशात समस्त वेदादी ग्रंथांनी देदीप्यमान विद्वान निर्माण होवोत. अत्यंत पराक्रमी, शस्त्रास्त्रनिपुण असे शासक  उत्पन्न होवोत. विपुल दुध देणाऱ्या गाई आणि भार वाहणारे बैल, द्रुत गतीने दौडणारे घोडे पैदा होवोत.  

तैलबुद्धीच्या स्त्रिया जन्माला येवोत. प्रत्येक नागरिक श्रेष्ठ वक्ता, यशवंत आणि रथगामी असो.   या यज्ञकर्त्याच्या गृहात विद्या, यौवन आणि पराक्रमी संतती निर्माण होवो. आमच्या देशावर आमच्या इच्छेनुसार वर्षाव करणारे जलद मेघ विहारोत आणि सर्व वनस्पती फलदायी होवोत. 

आमच्या देशातील प्रत्येकाच्या योगक्षेम पूर्तीसाठी त्यांना प्राप्ती होवो. 

भावानुवाद :-

☆ वैदिक राष्ट्रगीत

विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो

 

वेदांत ज्ञानी ऐसे शास्त्रज्ञ जन्म घेवो

अतिबुद्धिमान ललना देशाला गर्व देवो

यशवंत ज्ञानी वक्ता रथगामी मान मिळवो

यौवन-ज्ञानपूर्ण संतती शूर निपजो 

विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो

 

भूभार वाही वृषभ, दुभत्या धेनु निपजो

वेगात पवन ऐशी पैदास अश्व होवे

इच्छेनुसार वर्षा अंबरी जलद विहरो

फळभार लगडूनीया द्रुमकल्प येथ बहरो

विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो

 

सकलांचे योगक्षेम परिपूर्ण होत जावो 

विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो…… 

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मानिनी… सुश्री उन्नती गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री लीला ताम्हणकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मानिनीसुश्री उन्नती गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री लीला ताम्हणकर

बोरे शब्द उच्चारताच – वाकलेली, थकलेली, सुरकुतलेली,श्रीरामाच्या दर्शनासाठी व्याकूळ झालेली, डोळ्यात प्राण आणून प्रतीक्षा करणारी, विस्फारलेल्या पांढऱ्या केसांची, करुण जख्ख म्हातारी शबरी नजरेसमोर येते. …. पण त्या काळात ती मनस्वी मानिनी होती.

तिचे मूळ नाव श्रमणा. तिचा पिता भिल्लांचा सेनानी. पित्याने कन्येचा विवाह ठरवला. सर्व तयारी जय्यत झाली होती. श्रमणाच्या कानावर आले — त्यांच्या जमातीत कन्या-जीवन सुखी व्हावे म्हणून तिच्या विवाहापूर्वी शेकडो पशूंचा बळी देतात. ही प्रथा होती. अत्यंत चतुर, संवेदनशील शबरीला हे असह्य झाले. इतक्या जीवांचा बळी जाणार असेल, तर नकोच तो विवाह !!! ..असा विचार करून ती हळूच पळून गेली. दंडकारण्यात मातंग ऋषींची सेवा करून अनेक विद्या पारंगत केल्या. बळी/हत्या न करता घनघोर जंगलात पशुधन जतन केले. अनेक वनस्पतींचे संशोधन करून पशूंची भाषा -विद्या प्राप्त केली.

श्रीरामांचे पवित्र पदकमल तिच्या झोपडीला लागताच ती अनन्य भाविका हरखून गेली. 

काटेरी झुडुपात शिरून बोरे काढून आणली. आणि प्रत्येक बोरात शाबरी विद्या भरून ( शबरी मुखातून श्रीराममुखी) रामरायास उष्टी बोरे दिली हे भासविले.—- प्रत्यक्षात शाबर विद्यामार्फत सुग्रीवाची मदत घ्यायला सांगितले. शबरी ही अत्यंत ज्ञानी व तेजस्वी तपश्री होती. वनवासी जीवनात प्रत्यक्ष विद्या-ज्ञान संपादन करायचे नाही, असा कठोर आदेश श्रीरामांना होता. म्हणून शबरीने चतुराईने प्रत्येक बोरातून शाबरी विद्या रामाला दिली.ती ‘ गुरूणां गुरु: ‘ म्हणजे देवता झाली.—- सुग्रीव वानरांचा सेनापती होता.नर नाही तो वा-नर!!! श्रीरामांनी शाबरीविद्याधारे वा-नरांशी संवाद साधून इप्सित साध्य केले.

——या गोष्टीतून मला जाणवले ते असे —–

बोराचे झाड काटेरी असते. संक्रमण काळात अश्या काटेरी झाडांची टपोरी, बाणेरी बोरे काढणे, वेचणे, म्हणजे धीराने, चतुराईने संकटाशी, येणाऱ्या कडक उन्हाळ्याशी दोन हात करणे. जळाविना रहाणे, अभावातील भाव बघणे.  सामना करून यश मिळवणे, अशी धडाडी वृत्ती बाळात येवो या हेतूने बोरन्हाण करतात.

शिक्षणाचा एखादा मार्ग बंद झाला ,तर पर्याय शोधून परिपूर्ण शिक्षण घेणे . शबरी सम स्व -बळ स्थान ओळखणे.एकटीने निर्भिड पणे राहून संशोधक वृत्ती जागृत ठेवून सजग होणे.

अनेक गोष्टी शिकवतात एकेक प्रसंग..

आता विज्ञान युगात परत  बेरी स्नान इव्हेंट असतो. पण त्या बोरनहाणा मागील  तत्व लक्षात घेऊन चंगळवादास आवर घालुया.

साधेसुधे राहून गोड गोड बोलुया।

लेखिका — सुश्री उन्नती गाडगीळ

संग्रहिका : सुश्री लीला ताम्हणकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तपोवनातील बोधिवृक्षाचा कुलवृत्तान्त… श्री प्रदीप गबाले ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

तपोवनातील बोधिवृक्षाचा कुलवृत्तान्त श्री प्रदीप गबाले ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

पाण्याच्या खजिन्याकडून कळंबा गावाकडे जाताना प्रथम कळंबा फिल्टर हाऊसचा थोडासा चढ लागतो. हा चढ चढून पुढे गेलो की, दूरवर उजव्या हाताला असणारा गर्द झाडीचा एक हिरवा ठिपका आपलं लक्ष वेधून घेतो. कळंबा आयटीआयपर्यंत आल्यानंतर मात्र या गर्द ठिपक्याचे रूपांतर भल्या मोठ्या वृक्षाच्या पसाऱ्यात झालेले असते. हा हिरवागार वटवृक्ष ही तपोवन जवळ आल्याची खूण असते.

तपोवन आणि वृक्षारोपण यांचं फार जुनं नातं आहे. विद्यापीठ शाळेला भेट देणाऱ्या नामांकित पाहुण्यांना तपोवनात नेऊन त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून, त्यांची स्मृती जपण्याची आगळी वेगळी परंपरा विद्यापीठाचे एक संस्थापक दीक्षित गुरुजी यांनी सुरू केली. यासाठी तपोवन आश्रमात राहणारे विद्यार्थी आणि स्वतः दीक्षित गुरुजी ४  फूट लांब, ४ फूट रुंद आणि 3 फूट खोलीचा खड्डा स्वतः कष्ट करून खणत असत. त्यामध्ये चांगली माती भरून नंतर वृक्षारोपण केले जाई. तपोवनात आतापर्यंत संत श्री मेहेर बाबा, संत श्री केसकर महाराज, संत तुकडोजी महाराज, डॉ. अरुंडेल, भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. वळे, जपानमधील भारतीय राजदूत मो. ज्ञा. शहाणे, तेंडोलकर वकील, लोहिया शेठजी, प्रभाकरपंत कोरगावकर, रावबहादूर सर रघुनाथराव सबनीस, लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात, चित्रपटतपस्वी भालजी पेंढारकर, नाना धर्माधिकारी , लेफ्टनंट जनरल नागेश, भारताचे माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई , प्रसिद्ध दिग्दर्शक यशवंत पेठकर, नॉर्वेच्या विदुषी सुमतीबाई, डॉ. रा.शं. किबे, दादा धर्माधिकारी, कु. विमलाताई ठकार, वि.म. परांजपे, नाना गबाळे तसेच अनेक नामवंत लेखकानी वृक्षारोपण केले आहे.  

या सर्व नामवंतामध्ये विद्यापीठ सोसायटीचेे पहिले अध्यक्ष डॉ. जॉर्ज एस. अरुंडेल यांचे नाव महत्त्वाचे आहे. २९ नोव्हेंबर १९२८ रोजी डॉ. जॉर्ज एस्.अरुंडेल हे तपोवनात आले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी, भारतीय भरतनाट्यम या नृत्यप्रकाराला जागतिक पातळीवर नेणाऱ्या प्रसिद्ध नृत्यांगना, डॉ. रुक्मिणीदेवी अरुंडेल याही होत्या.   डॉक्टर अरुंंडेल हे त्यावेळी होमरूल चळवळीच्या प्रणेत्या डॉ.ॲनी बेझंट यांचे सहायक म्हणून काम करत होते. तपोवन आश्रमाची उभारणी ज्या थिऑसॉफीच्या (विश्वबंधुत्व) तत्त्वावर झाली होती, त्या थिऑसाॅफीचे जागतिक मुख्यालय मद्रास (चेन्नई ) येथील अड्यार या ठिकाणी आहे. या अड्यारच्या केंद्रात असणाऱ्या अतिशय प्राचीन वटवृक्षाचे एक रोपटे डॉ.ॲनी बेझंट यांनी तपोवनात लावण्यासाठी म्हणूून पाठवले.  डॉ. जॉर्ज अरुंडेल हे वटवृक्षाचे रोपटे घेऊन स्वत: तपोवनात आले. दीक्षित गुरुजींनी डॉ. जॉर्ज अरुंडेल यांच्या हस्तेच हे वटवृक्षाचे रोप लावून घेतले. तो शुभ दिवस होता २९ नोव्हेंबर १९२८. ‘ बोधिवृक्ष ‘ असे या वटवृक्षाचे नामकरण करण्यात आले. या बोधिवृक्षाचे रोपटे मद्रासच्या ज्या थिऑसॉफी केंद्रातून तपोवनात आणले गेले त्या केंद्रात तो मूळ वृक्ष आजही आहे. अड्यार नदी मद्रासला ज्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते, त्या ठिकाणी हा भारतातील सर्वात वयोवृद्ध वृक्ष आजही डौलात आणि ताठ मानेने उभा आहे. त्याचे आयुष्यमान सुमारे ४५० वर्षाचे असावे असा तज्ज्ञांचा अंदाज असून, हा वृक्ष केवळ भारतातीलच नव्हे तर कदाचित जगातील सर्वात पुरातन वृक्ष असण्याची शक्यता आहे. या झाडाच्या पारंब्या जेथे जेथे जमिनीवर टेकल्या आहेत तेथे तेथे जणू दुसरा बुंधाच तयार झालेला आहे. असे हजारो बुंधे तयार झाल्यामुळे झाडाचा मूळ बुंधा कोणता हे ओळखता येत नाही. याच्या फांद्यांचा पसारा ६२००० चौरस फुटापर्यंत पसरलेला असून झाडाच्या फांद्या जमिनीपासून चाळीस फूट उंचीवर आहेत. एकेका फांदीचे वजन 30 टनापेक्षा जास्त भरेल असा अंदाज आहे. समुद्रकिनारी बहुतेक नारळ – पोफळीची झाडे वाढतात. पण हा वटवृक्ष त्याला अपवाद आहे.  झाडाचे जतन व्हावे म्हणून या झाडाभोवती एका विस्तीर्ण उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली असून अड्यार नदीकाठच्या या उद्यानाचा पसारा २६० एकर इतका विस्तीर्ण आहे. या उद्यानाचे नाव ‘ हडलस्टोन गार्डन ‘ असे असून या बागेत इतरही शेकडो दुर्मिळ वृक्ष आहेत. वटवृक्षाच्या शीतल छायेतून चालताना आपणास अंतर्मनातील शांततेचा अनुभव येतो. या बागेत दरवर्षी हजारो स्थलांतरित पक्षी येतात. त्यामुळे पक्षी निरीक्षकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे .अनेक प्राण्यांचेही वास्तव्य येथे आहे. या ठिकाणी अहिंसा धर्माचं पालन तंतोतंत केलं जातं. अहिंसा म्हणजे केवळ प्राणी, झाडे यांची हत्या न करणे असा नसून, आपल्या एखाद्या शब्दानेही कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घेणे. विचाराने, आचाराने आणि उच्चारानेही कोणाचे मन दुखावले जाणार नाही हे पाहणे म्हणजेच विश्वबंधुत्व. विश्वबंधुत्वाचा अर्थ केवळ मानवजातीपुरता मर्यादित नसून हे बंधुत्वाचं नातं मानवाबरोबरच वृक्ष, प्राणी आणि इतर जीवांशीही जोडले जाते. म्हणूनच तेथे वृक्ष किंवा एखादी फांदी तोडण्यासही मनाई आहे. अड्यार येथील अशा पवित्र वटवृक्षाचे रोप जागतिक थिऑसाॅफी फेडरेशनचे माजी अध्यक्ष आणि विद्यापीठ सोसायटीचे पहिले अध्यक्ष डॉ. जॉर्ज एस. अरुंडेल यांनी स्वतः आणून, स्वतःच्या शुभहस्ते तपोवनात लावले आहे. तपोवन हे खऱ्या अर्थाने ‘तपोवन’ आहे याची साक्ष हा बोधिवृक्ष आजही देत आहे. 

आज तपोवनातील बोधिवृक्षाचाही सुमारे अर्धा एकर परिसरात विस्तार झाला आहे. या वृक्षावर सकाळी विविध पक्षांचा किलबिलाट आपल्याला ऐकावयास मिळतो. विशेषत: हिरव्यागार पानांच्या देठांमधून लालचुटुक,  गोलाकार फळांनी हा वटवृक्ष  बहरला की त्याचे सौंदर्य वेगळेच असते. ही लालचुटुक फळं खाण्यासाठी साळुंकी, तांबट पक्षी,  कावळे ,कोकीळ, बुलबुल, मैना, यासारख्या पक्षांची जणू स्पर्धाच लागते. या झाडावर घार आणि कावळे यांची शेकडो घरटी आहेत. आपली मान गर्रकन फिरवणारे शेकडो पिंगळे या वडाच्या ढोलीमध्ये  लपलेले असतात. आता झाडाच्या मोठमोठ्या पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचल्या असून त्याचे रूपांतर जणू दुसऱ्या बुंध्यामध्ये होऊ लागले आहे. तपोवनाच्या शेजारी असणाऱ्या कलानिकेतनच्या मुलांना हा विशाल वटवृक्ष जणू नेहमी साद घालत असतो. ही कलाकार  मुले या डेरेदार वृक्षाचे पेंटिंग करताना स्वतःला विसरून जाताना दिसतात. तपोवनात असलेल्या शाळेतील विद्यार्थी, तसेच जवळ असणाऱ्या आयटीआय चे विद्यार्थी दुपारच्या वेळी या वटवृक्षाच्या सावलीत निवांतपणे अभ्यास करताना दिसतात. तपोवनाचे संस्थापक पूज्य दीक्षित गुरुजींनी एक सुंदर बाग या वटवृक्षाच्या सभोवती तयार केली होती, परंतु काळाच्या ओघात ती बाग आता नाहीशी झाली आहे. पण गुरुजींनी या वृक्षाभोवती बांधलेला मोठमोठ्या घडीव दगडांचा पार अजूनही सुस्थितीत आहे. वटवृक्षाचा पसारा आता खूप लांबूनही पाहायला मिळतो. सेेवा, स्वाध्याय, स्वावलंबन आणि साधी राहणी या तपोवन आश्रमाच्या चतु:सूत्री  बरोबरच अहिंसा आणि विश्वबंधुत्वाचे संस्कार दीक्षित गुरुजींनी, या बोधिवृक्षाच्या साक्षीने  तपोवनातील आश्रमीय विद्यार्थ्यांवर केले .सध्या 93 वर्षाचे आयुष्यमान असणारा तपोवनातील हा बोधिवृक्ष लवकरच शतायुषी होईल.

लेखक – श्री प्रदीप गबाले (तपोवनवासी)

निवृत्त मुख्याध्यापक, विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर.

9766747884

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वीर भाई कोतवाल… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? इंद्रधनुष्य ?

☆ वीर भाई कोतवाल… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

कोतवाल म्हटलं की सर्वसामान्यपणे आपल्याला आठवते दादरची प्लाझासमोरील मोक्याची कोतवाल गार्डन –  गावकी – भावकी किंवा गावाकडील मंडळींचे हमखास भेटीचे ठिकाण ! पण हा टुमदार बगीचा ज्यांचे नांवे आहे हे कोतवाल कोण याबाबत फारशी माहिती कोणालाच नसते आणि ती जाणून घेण्याचे कुतुहलही नसते !

विठ्ठल लक्ष्मण कोतवाल – जन्म ०१ डिसेंबर १९१२ – माथेरान 

नाभिक समाजात जन्मलेल्या या होतकरू तल्लख तरुणाने आपले एल एल बी शिक्षण पूर्ण करत वकिली क्षेत्रात प्रवेश केला ! नंतर ते स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय झाले. सशस्र क्रांतीसाठी त्यांनी बंडखोर तरुणांची फौज उभी केली ! ब्रिटीशांचे संदेशवहन उध्वस्त करण्यासाठी डोंगरांवरील वीजवाहक मनोरे पाडून टाकले ! आदिवासी शेतकरी बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला ! ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडले ! मुरबाडमधील सिध्दगड परिसरातील जंगलखोर्‍यात लपून स्वातंत्र्यलढा देणारे हे भाई कोतवाल, ०२ जानेवारी १९४३ रोजी ब्रिटीशांशी लढताना देशासाठी शहीद झाले , हुतात्मा झाले ! 

वीर कोतवाल यांचा यावर्षीचा ८० वा बलिदान दिवस आहे !

काही वर्षापूर्वी शहीद भाई कोतवाल या नांवाने चित्रपटही आला होता ॥

वीर भाई कोतवाल यांना विनम्र अभिवादन

तेथे कर माझे जुळती-

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १७ (इंद्रवरुण सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १७ (इंद्रवरुण सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १७ (इंद्रवरुण सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – अग्नि 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील सतराव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी इंद्र देवतेला आणि वरूण देवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त इंद्रवरुण सूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद : 

इंद्रा॒वरु॑णयोर॒हं स॒म्राजो॒रव॒ आ वृ॑णे । ता नः॑ मृळात ई॒दृशे॑ ॥ १ ॥

राज्य करिती जे जगतावरती इंद्र आणि वरुण

त्यांच्या चरणी करुणा भाकत दीन आम्ही होउन 

शरण पातता त्यांच्या चरणी सर्व भाव अर्पुन

सर्वसुखांचा  करीत ते वर्षाव होउनि प्रसन्न ||१||

गन्ता॑रा॒ हि स्थोऽ॑वसे॒ हवं॒ विप्र॑स्य॒ माव॑तः । ध॒र्तारा॑ चर्षणी॒नाम् ॥ २ ॥

उभय देवता इंद्र वरुण येताती झणी धावत

अमुच्या जैसे भक्त घालती साद तुम्हाला आर्त 

त्या सर्वांचे रक्षण तुम्ही सदैव हो करिता

अखिल जीवांचे पोषणकर्ते तुम्ही हो दाता ||२||

अ॒नु॒का॒मं त॑र्पयेथा॒मिंद्रा॑वरुण रा॒य आ । ता वा॒ं नेदि॑ष्ठमीमहे ॥ ३ ॥

तृप्ती करण्या आकाक्षांची द्यावी धनसंपत्ती

हे इंद्रा हे वरुणा अमुची तुम्हाठायी भक्ती

उदार व्हावे सन्निध यावे इतुकी कृपा करावी

अमुची इच्छा प्रसन्न होऊनि देवा पूर्ण करावी ||३||

यु॒वाकु॒ हि शची॑नां यु॒वाकु॑ सुमती॒नां । भू॒याम॑ वाज॒दाव्ना॑म् ॥ ४ ॥

कृपाकटाक्षासाठी  तुमच्या कष्ट करू आम्ही 

श्रेष्ठ करोनी कर्म जीवनी पात्र होऊ आम्ही 

सामर्थ्याचा लाभ होतसे कृपादृष्टीने तुमच्या  

काही न उरतो पारावार भाग्याला अमुच्या ||४||

इंद्र॑ः सहस्र॒दाव्नां॒ वरु॑णः॒ शंस्या॑नां । क्रतु॑र्भवत्यु॒क्थ्यः ॥ ५ ॥

सहस्रावधी दानकर्मे श्रेष्ठ इंद्र करितो

सकल देवतांमाजी तो तर अतिस्तुत्य ठरतो

वरुणदेवते त्याच्या संगे स्तुती मान मिळतो

या उभयांच्या सामर्थ्याची आम्ही प्रशंसा करितो  ||५||

तयो॒रिदव॑सा व॒यं स॒नेम॒ नि च॑ धीमहि । स्यादु॒त प्र॒रेच॑नम् ॥ ६ ॥

कृपा तयाची लाभताच संपत्ति अमाप मिळे

त्या लक्ष्मीचा संग्रह करुनी आम्हा मोद मिळे

कितीही त्याने दिधले दान त्याच्या संपत्तीचे

मोल कधी त्याच्या खजिन्याचे कमी न व्हायाचे ||६||

इंद्रा॑वरुण वाम॒हं हु॒वे चि॒त्राय॒ राध॑से । अ॒स्मान्त्सु जि॒ग्युष॑स्कृतम् ॥ ७ ॥

हे देवेंद्रा वरुण देवते ऐका अमुचा धावा

धनसंपत्ती सौख्यासाठी आम्हाला हो पावा

प्रसन्न होऊनी अमुच्यावरती द्यावे वरदान 

अमुच्या विजये वृद्धिंगत हो तुमचाची मान ||७||

इंद्रा॑वरुण॒ नू नु वां॒ सिषा॑सन्तीषु धी॒ष्वा । अ॒स्मभ्यं॒ शर्म॑ यच्छतम् ॥ ८ ॥

इंद्रा-वरुणा सदैव आम्ही चिंतनात तुमच्या

भविष्य अमुचे सोपविले आहे हाती तुमच्या 

सदात्रिकाळी जीवनामध्ये होवो कल्याण

कर ठेवूनिया शीरावरी द्यावे आशीर्वचन ||८||

प्र वा॑मश्नोतु सुष्टु॒तिरिंद्रा॑वरुण॒ यां हु॒वे । यामृ॒धाथे॑ स॒धस्तु॑तिम् ॥ ९ ॥

सुरेंद्र-वरुणा तुम्हासि अर्पण स्तुती वैखरीतुनी

प्रोत्साहित झालो आम्ही मोहक तुमच्या स्मरणानी

सुंदर रचिलेल्या या स्तुतिने तुमची आराधना  

प्रसन्न होऊनी स्वीकारावी अमुची ही प्रार्थना ||९||

हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे. 

https://youtu.be/j7qWOqc8gp8

Attachments area

Preview YouTube video Rugved 1 17

Rugved 1 17

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print