चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर म्हणजे अन्नपूर्णा आसनावर किंवा झोक्यावर बसवली जाते. रेशमी वस्त्रे, मोगरीची फुलं, चंदनगंधाचे विलेपन यांनी तिला सजवले जाते..माहेरपणाला आलेली लाडाची लेकच जणू.. त्या झोक्यात बसलेल्या गौरीला पाहून मला इंदिराबाईंची, ‘आली माहेरपणाला’ ही कविता आठवते नेहमी..
“आली माहेरपणाला
आणा शेवंतीची वेणी
पाचू मरव्याचे तुरे
जरी कुसर देखणी “
सासरी राबून थकलेल्या लेकीला विसाव्याचे चार क्षण मिळावेत, तिला आनंद व्हावा, तिच्या चेहऱ्यावर हसू फुलावे म्हणून आईची कोण धडपड..लेक माहेरपणाला आलीय, कुठे तिच्यासाठी शेवंतीची वेणी कर, कुठे तिच्या पोलक्यावर पाचू जडव तर तिला सुगंध आवडतो म्हणून तिच्यासाठी मरव्याचे अत्तर बनव..आईची ही सारी धडपड संसारीक वैशाखाने रणरणलेल्या लेकीच्या मनाला थोडा तरी गारवा मिळावा..
चैत्र, चांद्रवर्षाचा पहिला महिना. या महिन्यातल्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र अवकाशात असते म्हणून हा चैत्र महिना. ऋतूराज वसंताचा लाडका महिना..आणि म्हणूनच या काळात येणाऱ्या नव्या तांबूस पोपटी पालवीला चैत्रपालवी म्हणतात. साऱ्या सृष्टीचे सृजन या काळात होते. म्हणूनच आदिशक्ती आणि शिव या सृष्टीच्या उगमकर्त्यांचे पूजन या महिन्यात करण्याचा प्रघात पडला असावा. भारतात अनेक ठिकाणी या काळात गणगौरी पुजन युवती आणि विवाहित स्त्रीया करतात. आपल्या घरी हळदीकुंकू करतात. मनाला आणि शरीराला गारवा देणारे मोगरीची फुले, ओले हरभरे, विड्याचे पान-सुपारी, कलिंगड, आंंब्याची डाळ आणि पन्हे यांचे वाण दिले जाते. या हळदीकुंकवाच्या निमित्ताने माय-लेकी, बहिणी-बहिणी, मैत्रीणी एकमेकांना भेटतात..एकमेकींची सुखदुःख निगूतीने ऐकतात..त्यावर फुंकर घालताना आपल्या डोळ्यांतील पाणी लपवतात.
मला आठवतंय..लहानपणी, जेव्हा गौरीला झोक्यात बसवलं जायचं तेव्हा मी ही आईकडे झोक्यासाठी, गौरीसारखं नटवण्यासाठी हट्ट करायचे तेव्हा कधी आई गालातल्या गालात हसायची तर कधी डोळ्यांत पाणी आणायची. आज तिच्या त्या वागण्याचा अर्थ कळतोय. स्त्रीचे भावविश्व अशा सणवार व्रतवैकल्य यांच्याशी जोडलं गेलयं. चैत्रगौर ही सृजनदेवता आणि स्त्री देखील..हे मांडलं जाणारं चैत्रांगण किंवा हळदीकुंकू हे याच सृजनाचं संक्रमण असावं. एका उर्जेचा एकीकडून दुसरीकडे चालणारा प्रवास असावा. चैत्र हा ही सृजनसखाच..तर चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या चैत्र महिन्यात अंगणात; मग ते अंगण ग्रामिण असो की शहरी.. चैत्रांगण रेखाटले जाते. ६४ शुभचिह्नांनी युक्त अशा या रांगोळीत चैत्रगौर, तिचे पती शंभू महादेव, तिचे सौभाग्यालंकार, मोरपीस, बासरी, ती जगत्जननी असल्याने सूर्य चंद्रापासून साप-हत्तीपर्यंतचा तिचा संसार रेखला जातो. तिची पावले, तिच्या अस्तित्वाचे प्रतिक असलेले स्वस्तिक आणि तिचे आवडते कमळ, तिच्या पुजेसाठीचे शंख, घंटा, ध्वज असे सारे ऐवज रेखले जातात. ते चैत्रांगण बघताना वाटते की कुणा चिमुकलीची भातुकलीच मांडली आहे की काय? या साऱ्या रांगोळीचे रेखाटन चैत्र महिना संपेपर्यंत केले जाते.
माहेरपणाला आलेल्या गौरीला पाळण्यात बसवले जाते. पाळण्यात बसवण्यापूर्वी देवीच्या मुर्तीला अंघोळ घालून, पूजा-अर्चा करून नैवेद्य दाखविला जातो. फुलांची सजावट केली जाते. देवीसमोर वेगवेगळे पदार्थ, देखावे यांची आरास मांडली जाते. खिरापत म्हणून सुके खोबरे व साखर दिली जाते. छोट्या तांब्यात देवीसाठी पाणी भरून ठेवले जाते.बत्तासे, कलिंगड, काकडी, कैरीची डाळ, भिजवलेले हरभरे, पन्हे आदी पदार्थ देवीसाठी केले जातात व नंतर हळदी कुंकू करून वाण म्हणून दिले जातात. सुगीच्या हंगामात केल्या जाणाऱ्या या व्रतात आपली मुले-बाळे, घर-दार यांच्या सुखसमृद्धी ची मनोकामना केली जाते.
अशा या माहेरपणासाठी आलेल्या लेकीचे कौतुक करण्यासोबतच सृजनाचीही पूजा केली जाते. लेकीचे कोडकौतुक करताना लेकीने आईपासून लपवलेले अश्रू असोत की मनातले सल.. चैत्रांगण टिपतेच असे स्त्रीभावनांचे गूढ पदर..
डोळ्यांत आसू अन् ओठांवर हसू
सुखाच्या ओंजळीत दुःखाचे पसू…
या आणि अशा अनेक झळांवर गारव्याचे लिंपण म्हणून तर झोक्यातले झुलणे आणि चैत्रातले रेखाटन असेल का?
(हॉस्पिटलमध्ये मी फोन करून सांगितलंय, मी सोबत आहे. तुम्ही नाटक सुरु ठेवा, ही तुमची दोन माणसे गाडीत आहेत, ती त्याच्या सोबत राहतील .”) – इथून पुढे
डॉक्टरांची गाडी अनिलला घेऊन गेली, आता परीक्षकांना पण देवव्रताची भूमिका केलेल्या नटाला हार्टअटॅक आला, ही बातमी समजली, ते पण स्पर्धक काय पुढे सांगतात, हे पहाण्यासाठी थांबले.
प्रेक्षकांना पण हळूहळू हे कळले, काही प्रेक्षक आत भेटायला आले.
आता त्यांची तब्येत बरी होईल म्हणाले ना डॉक्टर, मग दुसरा कलाकार घेऊन नाटक सुरु करा, आम्हाला नाटक पहायचे आहे, पुढील अंकातील गाणी ऐकायची आहेत.
काही प्रेक्षक बोंबाबोंब करत म्हणाले “आम्ही तिकीट काढलंय की राव,आमास्नी नाटक बघायचं हाय.”
काय करावे अजितला सुचेना. आता आयत्यावेळी देवव्रतासारखी महत्वाची भूमिका कोण करेल?
एव्हढ्यात सत्यवती झालेली तन्वी अजितकडे आली “अजित, सुदर्शन आलेला आहे ना, त्याने या वर्षी देवव्रताची भूमिका केली आहें, त्याला गळ घाल, तो नाही म्हणणार नाही.”
अजितच्या लक्षात आले, होय, सुदर्शन देवव्रत करू शकेल, तसं स्पर्धेच्या नियमात बसतं की नाही कोण जाणे, पण नाटक पुढे चालू राहील, प्रेक्षक नाराज होणार नाहीत. तेथेच बाजूला उभ्या असलेल्या सुदर्शनला अजित म्हणाला “सुदर्शन, नाटक रद्द करावे लागता कामा नये. कारण रंगभूमीचा आणि प्रेक्षकांचा तो अपमान होईल.”
“होय खरे आहे, पण आता काय करणार?”
“तूच करू शकतोस सुदर्शन, तूच करू शकतोस, तू येथून पुढील देवव्रताचा रोल करायचा, नाही म्हणू नकोस दोस्ता, स्पर्धेत पहिला दुसरा नंबर मिळवायचा म्हणून नव्हे, हे मायबाप प्रेक्षक तिकीट काढून आलेत, त्यांना पुढील नाटक पहायचे आहे म्हणून आणि आपल्या रंगभूमीसाठी.”
सुदर्शन भांबावला, असे कधी या आधी झाले नसेल, आपण ते करावे काय?
तो आपल्या सोबत्याकडे धावला. त्याना पण अजितचा प्रस्ताव आश्रयकारक वाटला आणि नटराज ग्रुप त्याचाही प्रतिस्पर्धी होता गेल्या कित्येक वर्षाचा. पण..ज्योती म्हणाली “सुदर्शन, तू आत्ता काम करावंसं, नाटक थांबता कामा नये, नटराज ग्रुप आपला नाटकातील दुश्मन असला तरी प्रेक्षक नाटक अर्धवट पाहून नाराज होऊन परत जाता कामा नयेत. तू हो म्हण .”
मग सर्वच सोबती नाटक करावं असं म्हणू लागले आणि सुदर्शन भूमिका करायला तयार झाला.
सुदर्शन देवव्रत म्हणजेच भीष्मचा पुढचा भाग करणार हे निश्चित झाल्यावर अजितने परीक्षकांना त्याची कल्पना दिली, ते म्हणाले “नाटक थांबवू नका, आम्ही सरकारला या नाटका दरम्यान घडलेली परिस्थिती आमच्या अहवालत कळविणार पण स्पर्धेसाठी नाटक पुरे होणे चांगले”.
तो पर्यत बऱ्याच प्रेक्षकांना दुसरा नट देवव्रताची भूमिका करणार हे कळले होते. जे नवखे होते, ते म्हणत होते, हा आयत्यावेळी काय करेल? प्राॅम्टींग वर बोलेल, धा मिनिट बघू नायतर सटकू..
पण काही नेहमी स्पर्धेची नाटके पाहणारे त्या शहरातील सुज्ञ प्रेक्षक होते, त्याना आपल्या प्रतिस्पर्धी ग्रुप मधील माणूस आयत्या वेळी नाटक रद्द होऊ नये म्हणून, भूमिका पुढे न्यायला तयार झाला याचे कौतुक वाटत होते, आता सुदर्शन या दुसऱ्या ग्रुप मध्ये कशी भूमिका करतो, याचे पण कुतूहल वाटत होते.
आत मध्ये सुदर्शन रंगायला बसला. मनातल्या मनात देवव्रताचे संवाद आठवू लागला. या ग्रुप मधील इतर साथीदार डोळ्यासमोर आणू लागला. आज आपली परीक्षा आहें हे त्याने जाणले. त्याने मनातल्या मनात आई वडिलांना नमस्कार केला, आज मला यश द्या, अस मनात म्हणत राहिला. .
सुदर्शनने देवव्रताची वेशभूषा केली आणि तो स्टेज वरील त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांना भेटायला गेला, त्याचे जास्त संवाद तन्वी म्हणजेच सत्यवती सोबत आणि चंडोल झालेल्या मोहन सोबत होते. सर्वांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि तिसऱ्या अंकाची बेल दिली गेली आणि पडदा उघडला.
तिसऱ्या अंकातले सत्यवती आणि भिवरा मधील संवाद सुरु होते, तेंव्हा पाठीमागच्या विंगेत सुदर्शन आपल्या एन्ट्री साठी श्वास रोखून तयार होता. त्याचा सेनापती सत्यवतीला “राजपुत्र देवव्रत इकडेच येत आहेत,यावर भिवर काही म्हणणार एव्हड्यात देव व्रत प्रवेश करत म्हणतो, “देवव्रताच्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द म्हणजे देवव्रताचा निर्धार असतो”.
सत्यवतीची भूमिका करणाऱ्या तन्वीच्या शरीरावर हे धारदार वाक्य ऐकून शिरशिरी आली, अनिल या भूमिकेत असे वाक्य एवढ्या परिणामकरक कधीच म्हणत नसे.
आणि मग सुरु झाली देवव्रतची पल्लेदार वाक्ये. कानेटकरानी एवढी जबरदस्त वाक्ये देवव्रतला लिहिली आहेत, ती उच्चारणे येणे नटाचे काम नव्हे.
“देवी मी कुणाला जन्मालाच घातलं नाही म्हणजे या राज्यात वाटेकरी नसेल “.
“भीष्म हा स्वतः उदगारलेल्या प्रतिज्ञेचा बंदी आहें “.
“भीष्माचे वर्तन धर्माच्या चौकटीत बसत नसेल तर धर्माची चौकट बदलेल पण भीष्म बदलणार नाही “
एकापाठोपाठ एक शब्दसरी प्रेक्षकांच्या अंगावर कोसळत होत्या आणि प्रेक्षक ओलेचिंब होत होते. स्टेज वरील आणि विंगेत राहून पहाणारे इतर कलावंत सुदर्शनाच्या या अनोख्या भीष्म दर्शनाने आश्चर्यचकित झाले होते.
आज स्वतः सुदर्शन खूष होता, त्या दिवशी तो मूड मध्ये आला नव्हता पण जी मोठी जबाबदारी पडली, त्याने त्याच्यातल्या कलाकाराला चॅलेंज दिले होते. तो एका पाठोपाठ एक संवादाच्या फैरी झाडत होता.
शेवटी लावण्यवती अंबा, भीष्म तिचा स्विकार करत नाही म्हणून धिक्कार करते, आणि त्याचे त्याच्या आप्तेष्टांसमोर सैरावैरा धावताना मरण येईल असा शाप मागते आणि भीष्म तो देतो.
पडदा पडला, प्रेक्षक डोळे भरलेल्या अवस्थेत आत येऊन भेटत होते.
आज काहीतरी विलक्षण पाहिले असे प्रत्येक प्रेक्षकाला वाटले, आयत्या वेळी भूमिका स्वीकारून आणि एक अंक दुसऱ्या नटाने केला असताना, शेवटचा अंक या नटाने विलक्षण उंचीवर नेला, असे कदाचित नाटकाच्या इतिहासात प्रथमच घडले असेल.
नटराज नाट्यग्रुप चे सर्व कलाकार सुदर्शनला मिठी मारून रडत होते. आज शेवटी रंगभूमी जिकंली होती.
Show must go on म्हणजे काय ते आज नाट्यरासिकांना कळलं.
सुदर्शनचे नेहमीचे साथीदार पण नाटक पहात होते, आजची सुदर्शनची भीष्मची भूमिका पाहून ते पण भारावले होते. त्यांचे कंठ दाटून आले होते.
दुसऱ्या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रात कालच्या संगीत स्पर्धेत घडलेली घटना म्हणजे रंगभूमी वर पहिलीच, असा उल्लेख करून सुदर्शनने आपल्या स्पर्धक ग्रुप मध्ये नाटकाच्या शेवटच्या अंकात नाटक रद्द होऊ नये म्हणून भूमिका फारच उच्च अभिनीत केली, म्हणून कौतुक झाले.
नाटक मधेच सोडून हॉस्पिटल मध्ये भरती झालेल्या अनिलची एंजिओप्लास्टी झाली, हे सुदर्शनला समजले
आठ दिवसानंतर तो अनिलला भेटायला गेला, तेव्हा अनिल त्याचा हात पकडून सद्गदित स्वरात म्हणाला,
“दोस्ता, माझ्यासाठी जे केलंस ते अमूल्य आहे.”
त्याचा हात थोपटत सुदर्शन म्हणाला “दोस्ता, मी तुझ्यासाठी नाही केलं, केलं ते त्या रंगभूमीसाठी, ती आहे म्हणून आपण आहोत.”
☆ कुकर आणि गॅसवरचा पाडवा !☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
“अहो ऐकलंत का जरा !”
“अगं लग्न झाल्यापासून तुझ्या शिवाय कुठल्या बाईच ऐकलंय का मी ?”
“आता मला कसं कळणार, ऑफिसमध्ये कोणा कोणाचं ऐकता ते ?”
“बरं, बरं, कळतात हो मला टोमणे ! ते जाऊ दे, सकाळी सकाळी मला सणा सुदिला वाद नकोय ! बोल काय म्हणत होतीस तू ?”
“अहो आपण किनई या पाडव्याला स्वर्गात जाऊ या !”
“काय s s s s ?”
“अहो केवढ्या मोठ्याने ओरडताय ? शेजारी पाजारी बघायला येतील, काय झालं म्हणून !”
“अगं मग तू बोललीसच तशी ! दसऱ्याला जसं सिमो्लंघन करतात तसं पाडव्याला काय स्वर्गारोहण करतात की काय ?”
“अहो नीट ऐकून तर घ्याल किनई, का लगेच सुतांवरून स्वर्ग गाठाल ?”
“अगं मी कुठे स्वर्ग गाठायला चाललोय ? तूच म्हणालीस नां, की आपण या पाडव्याला स्वर्गात जाऊ या म्हणून ?”
“अहो हा स्वर्ग म्हणजे एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची शो रूम !”
“अगं मग असं सविस्तर सांग नां, मला कसं माहित असणार तुझ्या डोक्यात कुठला स्वर्ग आहे ते ? पण तिथून तुला काय घ्यायच आहे ते नाही बोललीस.”
“अहो आता मला प्रत्येक पाडव्याला नवीन साडी वगैरे नकोय. अजून पाच सहा कोऱ्या साडया तशाच पडल्येत !”
“पण त्या साडया काय तुला ‘इधर का माल उधर !’ करण्यात कधीतरी कामाला येतीलच नां ?”
“म्हणजे ?”
“अगं म्हणजे एखादी मिळालेली साडी आवडली नाही, तर तोंड दाबून बुक्क्याचा मार खाल्ल्यागत तुम्ही बायका ती ठेवून घेताच की नाही ?”
“मग तोंडावर कसं बरं सांगणार आवडली नाही म्हणून ? ते बरं दिसत का ?”
“हो ना, मग तीच साडी कधी ना कधी तरी दुसऱ्या बाईला देता नां, त्यालाच मी ‘इधर का माल….’
“कळलं, कळलं ! आम्हां बायकांचं ते ट्रेड सिक्रेट आहे !”
“यात कसलं आलंय सिक्रेट, ओपन सिक्रेट म्हणं हवं तर ! बरं ते जाऊ दे, तुला त्या स्वर्गाच्या शो रूममधे कशाला जायचय ते नाही कळलं.”
“मला ‘ठुशी’ घ्यायची आहे ! सासूबाईंनी त्यांची खरी ‘ठुशी’ मोठ्या जाऊबाईंना दिली, तेंव्हा पासून माझ्या डोक्यात निदान एक ग्रॅमची ‘ठुशी’ घ्यायच फारच मनांत आहे.”
“अगं पण तुला आईनं, वहिनीला दिलेल्या ठुशीच्या बदल्यात तिचा ‘घपला हार’ दिला ना, मग?”
“अहो त्याला ‘घपला हार’ नाही ‘चपला हार’ म्हणतात!”
“तेच ते, अगं पण मी काय म्हणतो आपण तुला एक ग्रॅमची खोटी खोटी ‘ठुशी’ कशाला घ्यायची ? आपण त्यापेक्षा वा. ह. पे. कडून किंवा पु. ना. गा. कडून खरी सोन्याची ‘ठुशी’ घेऊ या की ?”
“नको गं बाई, हल्ली खरे दागिने घालायची सोय कुठे राहील्ये ? सगळ्या बायकांचे सगळे खरे दागिने लॉकरची शोभा वाढवताहेत झालं.”
“मग माझ्या डोक्यात एक नाही दोन वस्तू आहेत, ज्या नुकत्याच बाजारात नव्याने आल्येत. त्या नवीन आणि इनोव्हेटिव्ह असल्यामुळे खूप म्हणजे खूपच महाग आहेत, त्या घेऊ या का ?”
“अगं बाई, त्या आणि कुठल्या ?”
“प्रेशर कुकर आणि…..”
“काय s s s ?”
“अगं किती जोरात ओरडलीस ? शेजारी पाजारी बघायला येतील ना ?”
“अहो तुम्ही बोललातच तसं ! प्रेशर कुकर काय बाजारात नवीन आलेली वस्तू आहे ? गेली कित्येक वर्ष मी वेग वेगळे कुकर वापरत्ये.”
“अगं खरंच सांगतो, हा प्रेशर कुकर बोलणारा आहे, जो नुकताच नवीन आलाय बाजारात!”
“काय सांगताय काय ?”
“अगं खरं तेच सांगतोय, या कुकर मधे ना शिट्याच होत नाहीत !”
“मग कळणार कसं कुकर झाला आहे का नाही ते ?”
“अगं जरा नीट ऐक. मी तुला म्हटलं ना, की हा बोलणारा कुकर आहे म्हणून, मग त्याच्यात शिट्या कशा होतील ? तुला किती शिट्या हव्येत त्यावर तो सेट करायचा आणि गॅस चालू करायचा !”
“बरं, मग ?”
“मग त्यातून थोडया थोडया वेळाने one, two, three असे आवाज येतील, त्यावरून तुला कळेल की कुकरच्या किती शिट्या झाल्येत त्या.”
“अस्स होय ! मग बरंच आहे, सिरीयल बघायच्या नादात मला मेलीला कळतच नाही किती शिट्या झाल्येत त्या ! चालेल मला, आपण तो बोलणारा कुकर घेऊयाच. ते ठुशी बिशीच जाऊ दे, पुन्हा कधी तरी बघू !”
“Ok, मग उद्याच जाऊन बोलणारा कुकर घेऊन येवू, काय ?”
“हो चालेल, पण तुम्ही दुसरी वस्तू पण म्हणाला होतात, ती कुठली ?”
“आहे, म्हणजे तुझ्या लक्षात आहे मी दोन वस्तू म्हटल्याचे.”
“म्हणजे काय? आम्हां बायकांची मेमरी तशी पुरुषांपेक्षा बरी असते असं म्हणतात!”
“असं कोण म्हणत ?”
“आम्ही बायकाच!”
“अगदी बरोबर, पण ती फक्त तुम्हाला हव्या असलेल्या खरेदीच्या बाबतीतच बरं का ! बाकी सगळा उजेडच म्हणायचा.”
“कळलं, कळलं ! मला पण तुम्ही म्हणालात तसा सणा सुदीला वाद नकोय, ती दुसरी वस्तू काय आहे ना, ती बोला चटचट, मला अजून बरीच कामं पडल्येत !”
“अगं त्या दुसऱ्या नवीन वस्तूच तू नांव ऐकलंस ना, तर नाचायलाच लागशील बघ !”
“नाच करायचा कां आनंदाने गायचं ते नंतर बघू, पटकन त्याच नांव….”
“रिमोट कंट्रोलची गॅस शेगडी !”
“का s s य ?”
“अगं आपल्या टीव्हीला कसा रिमोट कंट्रोल असतो ना, तसाच या गॅसच्या शेगडीला पण असतो. बसल्या जागेवरून तू गॅस चालू किंवा बंद करू शकतेस. बोल कशा काय आहेत या दोन नवीन वस्तू !”
“झ ss का ss स ss ! आता सिरीयल सोडून मधेच उठायला नको गॅस बंद करायला !”
एवढं बोलून बायको किचन मधे पळाली आणि मी…. खरी सोन्याची ठुशी परवडली असती, पण या दोन नवीन, त्याहून महागडया वस्तू घ्यायचे कबूल करून, स्वतःच्या पायावर धोंडा तर मारून नाही ना घेतला, या विचारात पाडव्याला आडवा पडलो !
रामायणातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कैकयी. तिच्यामुळेच रामायण घडले. वनवासात जाण्यापूर्वी राम हा इतर राजांप्रमाणे फक्त रामराजा होता. पण रावणाचा वध करून, 14 वर्षांचा वनवास संपवून जेव्हा तो अयोध्येस परत आला तेव्हा तो” प्रभू रामचंद्र” झाला. शुद्ध परात्पर राजाराम वगैरे सर्व विशेषणे त्याला त्यावेळेला लागली. आणि यासाठी कैकयीच कारणीभूत आहे.
ती केकय देशाच्या अश्वपती राजाची कन्या होती. दशरथा पासून तिला भरत नावाचा पुत्र झाला. आपल्या मुलाला अयोध्येचे राज्य मिळावे म्हणून तिने सावत्र मुलगा राम याला वनवासास धाडण्याची गळ दशरथाला घातली. परंतु पुत्र विरहाच्या शोकामुळे दशरथाचा मृत्यू झाला. रामाचा वनवास व दशरथाचा मृत्यू या घटनांना कारणीभूत ठरल्यामुळे तिला खलनायिका ठरवतात.”माता न तू, वैरिणी “या प्रसिद्ध
गाण्यामुळे तर ती जास्तच दुष्ट वाटू लागते. पण प्रत्यक्षात तसे नाही.
कैकयी अत्यंत सुंदर, धाडसी ,युद्धकलानिपुण, ज्योतिषतज्ञ होती .त्यामुळे दशरथाची सर्वात लाडकी राणी होती. एकदा देवराज इंद्र संब्रासुर नावाच्या राक्षसाशी लढत होता. पण तो राक्षस खूप शक्तिशाली होता म्हणून इंद्राने दशरथाकडे मदत मागितली. दशरथ युद्धाला सज्ज झाला. कैकयीदेखील त्याच्याबरोबर गेली. युद्धामध्ये दशरथाच्या सारथ्याला बाण लागला. दशरथ हादरला. पण कैकयीने स्वतः उत्तम सारथ्य केले. दुर्दैवाने रथाचे एक चाक खड्डयात अडकले. कैकयी पटकन रथातून खाली उतरली. रथाचे चाक खड्डयातून बाहेर काढले. ते पाहून राक्षस घाबरला आणि पळून गेला. दशरथाचे प्राण वाचले. त्याने तिला दोन वर दिले.
रामाचा राज्याभिषेक ठरला. कैकयीने वराप्रमाणे दशरथाला रामाला 14 वर्षे वनवास आणि भरताला राज्याभिषेक असे दोन वर मागितले. त्याची खरी कारणे खालील प्रमाणे आहेत.
१)कैकयी ज्योतिष जाणत होती. तिने रामाच्या राज्याभिषेकावेळी कुंडली मांडली. त्यावेळी तिच्या लक्षात आले की सध्या चौदा वर्ष जो कोणी सिंहासनावर बसेल तो स्वतःचा आणि रघुवंशाचा नाश करेल. ते टाळण्यासाठी तिने रामाला वनवासाला पाठवले.
२) ती युद्ध कला निपुण होती. त्यावेळी वाली नावाचा एक राजा होता. त्याला वरदान मिळाले होते की जो कोणी त्याच्याशी युद्ध करेल त्याची निम्मी शक्ती त्याला मिळत असे. त्याच्याशी युद्ध करायला दशरथ आणि कैकयी गेले. पण दशरथ हरला. तेव्हा वालीने त्याला दोन अटी घातल्या. तुला सोडतो पण मला कैकयी देऊन टाक किंवा तुझा राजमुकुट दे. अर्थात् दशरथाने आपला राजमुकुट त्याला दिला. ही गोष्ट फक्त या दोघांनाच माहीत होती. राजमुकुटाशिवाय राज्याभिषेक करता येत नाही . म्हणून तिने राज्याभिषेकाच्या आदल्या रात्री रामाला बोलावले. विश्वासात घेऊन हे सांगितले .” तू वनवासाच्या निमित्ताने वालीचा वध कर आणि तो राजमुकुट घेऊन ये.” राम तयार झाला. आणि म्हणूनच राम जेव्हा रावणाचा, वालीचा ,वध करून अयोध्येस परत आला तेव्हा त्याने सर्वात प्रथम कैकयीला नमस्कार केला नंतर कौसल्येला.
३) श्रावणबाळाच्या मातापित्यांनी दशरथाला शाप दिला होता की तू देखील आमच्यासारखाच पुत्रशोकाने प्राण सोडशील. राज्याभिषेकाच्या वेळी दशरथ तसा वृद्धच झाला होता. रामाच्या मृत्यूपेक्षा विरहाच्या पुत्रशोकाने दशरथाचा मृत्यू झालेला बरा. असा सूज्ञ विचार करून , रामाचा मृत्यू योग टाळण्यासाठी तिने रामाला वनवासात पाठवले.
४) रामाचा जन्मच मुळी रावण किंवा सर्व राक्षसांचा वध करणे यासाठी होता. राज्याभिषेकाच्या वेळी सर्व देवांना चिंता पडली की हा जर इतर राजांप्रमाणे राज्यकारभार करू लागला तर राक्षसांचा वध कोण करणार? ते सगळे सरस्वतीला शरण गेले. सरस्वती मंथरा दासीच्या जिभेवर आरूढ झाली. तिने कैकयीला गोड बोलून भुलवले आणि रामाला वनवासात पाठवण्यास भाग पाडले.
५) खरे तर तिचे भरतापेक्षा रामावर जास्त प्रेम होते. ती भरताबरोबर रामाला भेटण्यासाठी चित्रकूट पर्वतावर गेली. व म्हणाली, मी कुमाता आहे. तू मला क्षमा कर. तेव्हा रामाने तिची समजूत घातली.” तू सुमाता आहेस. ज्या मातेने भरतासारखा भाऊ मला दिला ती सुमाताच आहे .”
… मग आपणही तिला कुमाता न म्हणता सुमाताच म्हणूया ना?
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ट्रकने मुंबईत प्रवेश केला तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. एका साध्या टपरीवजा हॉटेलपाशी ट्रक थांबला. बुवा ड्रायव्हर शेजारीच बसले होते. ड्रायव्हरनं खाली उडी मारली. बुवांनाही जाग आली. रात्रभर म्हणावी तशी झोप लागलीच नव्हती. आणि रात्रभरच्या ट्रक प्रवासात ते शक्यही नसतं. पहाटे कुठं डोळा लागला तर मुंबई आलीच.
बुवांचं वय झालं होतं. त्यांना ट्रकच्या केबिन मधुन खाली उडी मारणं शक्य नव्हतं. ड्रायव्हर सोबतच्या माणसानं कशीतरी कसरत करुन बुवांना खाली उतरवलं. टपरीपुढे एक लाकडी टेबल होता.. आणि चार लोखंडी खुर्च्या. बुवा तेथे टेकले. प्लास्टीकच्या जगमधुन पेल्यात पाणी ओतले. खळखळुन चुळ भरली.. तोंडावर पाणी मारलं. खांद्यावरच्या पंच्याला तोंड पुसलं.
टवके उडालेल्या कपात एका पोरानं चहा आणुन दिला. त्या गरम चहाचा पहिला घोट घेतल्यावर बुवांना जरा बरं वाटलं. थोडी तरतरी आली.
ट्रक ड्रायव्हर नंतर चहाचे पैसे दिले.. ते ठरलेलंच असायचं. बुवांची परिस्थिती ड्रायव्हरला माहीत होती. म्हणुन तर तो नेहमी बुवांना कोल्हापूर पासुन मुंबई पर्यंत घेऊन यायचा.. काहीही पैसे न घेता. जातानाही तसंच.. त्याच ट्रकमधून बुवा पुन्हा कोल्हापुरला जायला निघायचे.
चालत चालत बुवा निघाले.. आणि पंधरा मिनिटांत आकाशवाणी केंद्रावर आले. त्यांचा अवतार बघून खरंतर गेटवर त्यांना अडवायला पाहिजे होतं.. पण बुवांना आता तिथे सगळे जण ओळखत होते. चुरगळलेला सदरा.. गाठी मारलेलं धोतर.. झिजलेल्या वहाणा.. पण दाढी मात्र एकदम गुळगुळीत. काल रात्री निघण्यापूर्वीच बुवांनी दाढी केली होती.
आकाशवाणी केंद्राच्या प्रतिक्षा गृहात बुवा आले. नेहमीच्या सोफ्यावर बुवांची नजर गेली. तो रिकामाच होता. बुवांना जरा बरं वाटलं. तिथे कुणी बसायच्या आत बुवा घाईघाईने गेले.. आणि सोफ्यावर चक्क आडवे झाले. दोनच मिनिटांत बुवा छानपैकी घोरु लागले.
एवढा आटापिटा करून कोल्हापुराहुन मुंबईला येण्याचं काय कारण? तर केवळ पैसा..
बुवांची परिस्थिती खुपच हलाखीची होती. साक्षात सवाई गंधर्वांचा आशिर्वाद मिळालेल्या कागलकर बुवांची सध्या ही अशी परिस्थिती होती. एकेकाळी सवाई गंधर्वांचे शिष्य म्हणून त्यांना कोण मान होता. पण आर्थिक नियोजनचा अभाव. कुणीतरी सांगितलं.. मुंबई आकाशवाणीवर गाण्याचा कार्यक्रम केला की साठ रुपये बिदागी मिळते. त्यांनी आकाशवाणी केंद्रावर चकरा मारायला सुरुवात केली.
तिथं त्यांना सांगण्यात आलं.. ’ तुम्ही कोल्हापूरचे.. त्यामुळे पुणे केंद्रावर जा. ’
पण झालं होतं काय.. पुणे केंद्रावर कलाकारांची गर्दी.. तिथं नंबर लागणं कठीण.. शिवाय बिदागी पण कमी.. म्हणून मग मुंबई केंद्रावर चकरा.
अखेर कुणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी मुंबईचा असाच एक डमी पत्ता दिला.. आणि आपण मुंबईकर आहोत असं सिद्ध केलं. मुंबई केंद्रावर त्या वेळी रविंद्र पिंगे अधिकारी होते. त्यांनीही समजुन घेतलं. वर्षाकाठी पाच सहा कार्यक्रम देण्याची व्यवस्था केली.
आकाशवाणी केंद्रावरच्या माणसांनी बुवांना जागं केलं. बुवांच्या रेकॉर्डिंगची वेळ झाली होती. बुवा उठले चुळ भरली.. तोंडावर पाणी मारलं.. ताजेतवाने झाले.. आणि रेकॉर्डींग रुममध्ये आले.
गळ्यात दैवी सुर घेऊन जन्मलेले कागलकर बुवा गायला बसले.. आणि..
.. त्यांच्या अलौकीक गायनानं सगळा रेकॉर्डींग रुम भारुन गेला.
अर्ध्या तासाचं रेकॉर्डींग झालं.. बुवा बाहेर आले. केंद्रावर असलेल्या कॅन्टीन मध्ये एक रुपयात राईस प्लेट मिळत होती. तिथे जेवण केलं. साठ रुपयांचा चेक खिशात टाकला.. आणि डुलत डुलत पुन्हा कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले.
उमेदीच्या काळात मिळालेला पैश्यात भविष्य काळाची तरतूद करणं सगळ्यांना तरच जमतं असं नाही. मग म्हातारपणी त्यांची ही अशी अवस्था होते. कागलकर बुवांचं नशीब थोडंफार चांगलं.. त्यांना आकाशवाणीनं मदतीचा हात दिला.
कागलकर बुवा ज्याला त्याला अभिमानाने सांगत.. पु. ल. देशपांडे यांनी माझा गंडा बांधला होता. आता पु. ल. तर बालगंधर्वांच्या गायकीचे चहाते.. मग सवाई गंधर्वांचे शिष्य असलेल्या कागलकर बुवांचा गंडा ते कसे बांधणार?
हाच प्रश्न एकदा रविंद्र पिंगे यांनी पु. लं. ना विचारला.
पु. ल. देशपांडे म्हणाले..
मी तेव्हा बेळगावात रहात होतो. कागलकर बुवा पण तेव्हा बेळगावातच रहात होते. मी बुवांची परिस्थिती पाहिली. दोन पैसे मिळावेत म्हणून त्यांनी गाण्याचा क्लास काढला होता. पण त्यांना विद्यार्थी मिळेनात.
मी विचार केला.. मी जर बुवांचा गंडा बांधला, तर बुवांचा जरा गाजावाजा होईल.. त्यांना विद्यार्थी मिळतील. केवळ म्हणून मी बुवांचा गंडा बांधला.. त्यामुळे मला अपेक्षित असलेला बोलबाला झाला.. त्यांच्याकडे बरेच विद्यार्थीही आले हे खरं.. पण माणूस मात्र खुपच गुणी.. त्यांच्यासारख्या थोर गायकाला अश्या परिस्थितीतला सामोरं जावं लागलं हे दुर्दैव..
आणि हे आम्हाला पाहायला लागतं आहे.. हे आमचं दुर्दैव!
मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा की बाबांना कसा खिसा असतो, त्यात ते पेन , सुट्टी नाणी, कधी कधी बंद्या नोटा ठेवतात,तसा आईला खिसा का नसतो?शाळेची फी भरताना बाबा कसे ऐटीत खिशातून काढून फीसाठी पैसे देतात , किंवा प्रगति पुस्तकावर खिशातलं पेन काढून ऐटीत सही करतात. तसा आई जवळ खिसा का नसतो? आणि जर असलाच खिसा तर नेमका कुठे असतो? आईला विचारलं तर ती फक्त हसायची. “तुला भूक लागली असेल ना?” असं म्हणून पदर खोचून शिऱ्यासाठी रवा भाजायला घ्यायची . रवा भाजण्याच्या त्या वासावर भुकेशिवाय दुसरं काही सुचत नसे. एकदा खेळताना पडल्यावर पायाची जखम पुसायला कापसाचा बोळा मिळाला नाही म्हणून चक्क कॉटनच्या नव्या साडीच्या टोकाने माझी जखम तिने पुसून काढली आणि कपाटातील कैलास जीवन काढून त्यातलं लोण्याच्या गोळ्यासारखं मलम माझ्या जखमेवर लावलं.
मला रात्री लवकर झोप यायची, तेव्हा घरातली कामं लगबगीने आवरून ती तिच्या जुन्या साडीचा काठ घडी करून मला दिव्याच्या उजेडाने त्रास होऊ नये म्हणून डोळ्यांवर मांडायची आणि मला त्या साडीसारखीच अगदी तलम निद्रा यायची.
कुठे बाहेर जाताना बाबा खिशातून पैसे काढून रेल्वेची तिकीट काढायचे आणि आई मात्र खिडकीतून झो झो येणारा वारा माझ्या कानाला बसतो म्हणून माझ्या काना- केसांभोवती आपला पदर गुंडाळून घ्यायची. तेव्हाही माझं लक्ष खिडकीतल्या बाहेरच्या दृश्याबरोबर बाबांच्या खिशाकडे असायचं.
मोठा झाल्यावर मीसुद्धा बाबांसारखा खिसा शिवून घेऊन त्यात वेगवेगळ्या वस्तू ठेवणार, हे ठरवून ठेवले होते. नेमकी तेव्हाच आई पदराच्या टोकाला गुंडाळून ठेवलेली गोळी (मला तहान लागली असताना) हळूच माझ्या जिभेवर ठेवायची. तृषा पूर्ण शांत व्हायची. कधी खेळताना सर्व मुलं बॉल आणण्यासाठी वर्गणी काढत. अशा वेळी आई तिच्या पदरात बांधलेला रुपया- दोन रुपये काढून देत असे आणि वर रुपया देऊन “उन्ह फार आहे. पेपरमिंट खा चघळायला,” म्हणून सांगत असे. मित्र म्हणत, ” तुझी आई खूप छान आहे रे!” तेव्हा कॉलर टाईट होत असे.
आईकडे खिसा नसताना बाबांपेक्षा जास्त गोष्टी तिच्याकडे कशा, हा प्रश्न मला थोडा मोठा होताना पडू लागला. आणि एक दिवस मला माझंच उत्तर सापडून गेलं. आईकडे खिसा असतो. आणि त्या खिशाला चौकट नसते. तो आईचा पदर असतो, जो कायम मुलांसाठी सुखं बांधून ठेवत असतो आणि तोच आईचा कधीही रिक्त न होणारा खिसा असतो .
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘आनंदनिधान’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक – आनंदनिधान
लेखक – श्री.विश्वास देशपांडे.
प्रकाशक : सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन.
पृष्ठ संख्या – १६०
किंमत – २००/
पुस्तकाचे मुखपृष्ठच इतके आकर्षक रंगसंगती व मन प्रसन्न करणारे आहे.निळ्या आकाशात सूर्यमुखी फुले. जणू असे वाटते, पुस्तकरुपी आनंदाकडे आकर्षित होणारे वाचक आहेत. एकूण ३३ लेखांच्या माध्यमातून आनंदाचा वर्षाव केला आहे.
पुस्तक उघडल्यावर प्रथम दिसतात मनोगताचे दोन शब्द…
ते वाचताच जाणवते आतील लेख आपल्याला आनंदा बरोबर खूप काही देणार आहेत.आणि पुढील लेखांची उत्सुकता अजूनच वाढते.
श्री विश्वास विष्णु देशपांडे
पहिलाच लेख आनंदनिधान …. आपल्या आयुष्यातील आनंदाची ठिकाणे की जी जवळ असतात पण वेळेवर आठवत नाहीत. हे सांगताना सुरुवातीची वाक्येच मनाची पकड घेतात. एखादी खरोखरची सुंदर गोष्ट असते ती कायम स्वरूपी आनंद देणारी असते. त्या गोष्टीजवळ कधीही गेले तरी ती आनंदच देते.
असाच आनंद देणारी काही ठिकाणे पुढील काही लेखातून भेटायला येतात. त्यात आनंद व ज्ञान मिळणारी पुस्तके,ग्रंथ,निसर्ग,गाणी,चांगले वक्ते त्यांचे कार्य यांचे महत्व वाचायला मिळते.
काही लेख वैचारिक मंथनातून उतरलेले व आपल्याला विचार करायला लावणारे आहेत हे जाणवते. जसे धन्यवाद हो धन्यवाद यात धन्यवादाचे महत्व आपल्याला विचार करायला लावते. परतफेड मध्ये अपेक्षा ठेवल्यावर काय होते हे सांगितले आहे. पण शेवट एकदम उत्तम व सर्वांनी अंमलात आणावे असे सोपे तत्व सांगून होतो. मी प्रतिज्ञा करतो की… असे म्हणताना प्रतिज्ञा व तिचे महत्व खरेच आपल्या गळी उतरते. साखळी मानव्याची कल्पक शिक्षक चांगली क्रांती कशी घडवू शकतो याचा पाठच घालून दिला आहे. भिंत बांधताना मनाच्या भिंती दिसतात. तर इकडची स्वारी संबोधन व नाती काळानुसार कशी बदलतात या कडे लक्ष वेधतात.
खाणाऱ्याने खात जावे म्हणता म्हणता खाणे व गाणे यांची छान संगती चाखायला मिळते.व शेवटच्या ओळी अगदी लक्षात राहतात…
“बनवणाऱ्याने बनवत जावे
खाणाऱ्याने खात जावे
खाता खाता एक दिवस
बनवणाऱ्याचे हात घ्यावे.”
जुने जाऊ द्या मरणा लागुनी म्हणत ध्यानाचे फार उत्तम तत्व विषद केले आहे. मुखवटे वास्तवाचे भान देतात. तर काही खुसखुशीत लेख खूपच हसू फुलवतात. असं आहे अशा माणसांच्या हसू आणणाऱ्या क्वचित इतरांना नकोशा वाटणाऱ्या सवयी सुहास्य तुझे मनास मोही म्हणत हसण्याचे फायदे सांगत दिल है छोटासा व राम का गुणगान करिए पण म्हणतात. आणि छोट्या विश्वासच्या शाळेची सफर घडवून आणतात. त्यातच लक्षात येते वाचन लेखनाचे बीज कोठे व कसे रोवले गेले. हा प्रवास कृतज्ञता मधून याची देही याची डोळा अनुभवलेला अपघात दाखवतो आणि बुद्ध लेण्यातून बुद्ध दर्शनही घडवतो. आपण सर्व जण अजिंठ्याची लेणी बघतो. बरेचदा शाळेच्या सहली बरोबर! पण हा लेख वाचून जर लेणी बघितली तर खऱ्या अर्थाने लेणी समजतात. जशी सुरुवात आनंद निधान ने होते तसेच शेवट म्हणणे योग्य नाही. पण या पुस्तकातील शेवटचा लेख आनंदाची गुढी उभारून नवीन पुस्तकाची सुरुवात करून देतो आणि वाचकांना आनंदी आनंद देऊन जातो.
एकंदरीत सर्वार्थाने भिन्न भावना व विचार एकत्र एकाच पुस्तकात अनुभवू शकतो.यात सर्व लेखात आपल्याला दिसते ती कोणत्याही वयोगटाला समजणारी सहज सुलभ भाषा, सर्वत्र सकारात्मकता. त्यातून हलक्या कानपिचक्याही मिळतात. आणि आपल्याला लिखाणासाठी नवीन विषय मिळतात.
लेखात योग्य ठिकाणी गाणी,श्लोक,काव्य याचाही समर्पक वापर दिसतो.
एकंदर आनंद ते आनंद असा आपला छान आनंदी प्रवास वेगवेगळ्या भावना अनुभवून होतो. आणि आनंदनिधानाशी आपली गाठ लेखक घालून देतात.
अशा आनंदी अनुभवासाठी खूप खूप धन्यवाद व पुढील पुस्तकाची प्रतीक्षा.
(पुस्तकासाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा… श्री.विश्वास देशपांडे….. ९३७३७११७१८ )
पुस्तक परीक्षण – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈