मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जय भारत ☆ सौ.मंजुषा आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ जय भारत ☆ सौ.मंजुषा आफळे ☆

देश माझा, मी देशाचा

भारतवासी बोलतो

घुमतो असा निनाद

ध्वज उंच फडकतो.

 

प्रथम ती देशभक्ती

अंतरात ठसवतो

निनादता राष्ट्रगीत

देशप्रेमात भिजतो.

 

सीमेवरी सैनिकांचे

आत्मबल वाढवितो

निनादो विश्वशांती

पराक्रमाला वंदीतो.

 

सुजाण तो नागरिक

संस्कृती अंगिकारतो

निनादती नवे मंत्र

देश विश्वात शोभतो.

 

© सौ.मंजुषा आफळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वतंत्र भारत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वतंत्र भारत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

भारतभूला स्वतंत्र करण्या

वीरपुत्र जन्मले

पारतंत्र्य शृंखला तोडण्या

अगणित रक्त सांडले

 

स्वातंत्र्यवीर सावरकर

राष्ट्रभक्तीने झपाटलेले

न पर्वा त्यांना प्राणांची

फिरंगी पळता भुई थोडे झाले

 

चिखलात उगवले कमळ

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

एकच जपला महामंत्र

“स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क”

 

बापू अमुचे राष्ट्रपिता

आयुष्य वेचिले भूमातेकरिता

करात काठी कटीस पंचा

अहिंसा धर्माचे पुरस्कर्ता

 

पुकारिले आंदोलन

“भारत छोडो” केली चळवळ

नाही जगणे पारतंत्र्यी

एकच ध्यास एकच तळमळ

 

बलिदान भूमिपुत्रांचे

नको व्यर्थ जाया

एकजुटीने सारे आपण

स्वराज्याचे सुराज्य करूया

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ क्रांती ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ क्रांती ☆ श्रीशैल चौगुले ☆

(छंदवृत्तमात्राः अक्रुर)

मनात ज्वाळा पेटून ऊठल्या ज्या

स्वातंत्र्याची क्रांती पर

भारतीय वीरांच्या त्या हाती ध्वज

वंदे मातरम् ! गर्जे स्वर.

 

कुणी विचार नारा,कुणी भय कावा

जो तो शत्रुवरतीच वार

वंदे मातरम् !गर्जे स्वर.

 

हां,हां म्हणता युध्द पेटले,देशभर

गांधी धारदार बळ शुर

वंदे मातरम् ! गर्जे स्वर.

 

देशभक्त सारे जहाळ,मवाळ तारे

गेणू,बोस,वि.दा.बहादुर

वंदे मातरम् ! गर्जे स्वर.

 

भगत,सुखदेव,राजगुरु श्रेष्ठ अमर

जयहिंद! घोषित एक गजर

वंदे मातरम् ! गर्जे स्वर.

 

भारतमाता सिध्द स्वातंत्र्य तिरंगा

स्वागता पहाट सज्ज तत्पर

वंदे मातरम् ! गर्जे स्वर.

                 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – विविधा ☆ नऊ आगस्ट आणि पंधरा आगस्टच्या निमीत्ताने….. ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ नऊ आगस्ट आणि पंधरा आगस्टच्या निमीत्ताने….. ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

महिना आला की  इतिहासाची पाने ऊलगडतात.

इतिहास शौर्याचा.इतिहास अभिमानाचा. आमच्या पीढीसाठी तर तो ह्रदयात भिनलेला.मनावर स्वार झालेला.पाठ्यपुस्तकातून घोकलेलाही. आवेशाने लिहीलेली प्रश्नांची परिक्षेतली उत्तरेही..इतिहासाच्या पानापानावरची ती घटनांची चित्रे आजही तशीच्या तशी दिसतात…

नऊ अॉगस्ट  आणि पंधरा अॉगस्ट या कॅलेंडरवरच्या ठळक तारखा.

तसं म्हटलं तर दोनशे वर्षाच्या ब्रिटीश गुलामगिरीच्या काळात १८५७ पासून स्वातंत्र्यासाठी अनेक लढे,अंदोलने झाली.मात्र दुसर्‍या महायुद्धानंतर भारताला तात्काळ स्वातंत्र्य देण्यासाठी, ब्रिटीश शासनाच्या विरुद्ध ९अॉगस्ट १९४२ रोजी अहिंसक, साविनय अवज्ञा अंदोलन पुकारले गेले. क्रिप्स मिशन करारातले ब्रिटीशांनी नमूद केलेले मुद्दे अत्यंत असमाधानकारक होते. परिणामी, अखिल भारतीय काँग्रेस कमीटीच्या नऊ अॉगस्ट १९४२ रोजी, गवालिया टँक मुंबई येथे भरलेल्या अधिवेशनात “छोडो भारत” (quit India) अंदोलनाची हाक महात्मा गांधी यांनी दिली. तेव्हांपासून अॉगस्ट क्रांती मैदान अशी ऐतिहासिक ओळख या ठिकाणाला मिळाली. आणि या दिवसाची क्रांती दिन म्हणून नोंद झाली. या अंदोलनाचा भडका संपूर्ण देशभरात पसरला. इंग्रजी सत्तेविरुद्ध संपूर्ण देश पेटून उठला. धर्म, जात, वंश इत्यादी बाबी बाजूला सारत लाखो लोक या जनअंदोलनात सामील झाले. युवकांचा सहभाग अधिक होता. करेंगे या मरेंगे हा मंत्र, ही गर्जना, घोषवाक्य हजारो तरुणांच्या नसानसात भिनले.!! इंग्रजांना ही परिस्थिती हाताळताना नाकी नउ आले. त्यांनी लाठीहल्ला, गोळीबार केला. काही नेत्यांना गुप्त ठिकाणी हलवण्यात आले.अंदोलनाला हिंसक वळणही लागले. गांधीजींनाही अटक झाली.मात्र अरुणा असफ अलीचे नेतृत्व या अंदोलनास लाभले. गांधीजींनी या वेळी युवकांना आवाहन केले होते की “नुसतेच कार्यकर्ते नका बनू ,नेते व्हा…”

हे अंदोलन फसले नाही पण सफलही झाले नाही. कदाचित नियोजनाच्या अभावामुळे असेल.. पण बलीदान व्यर्थ गेले नाही. या अंदोलनामुळे प्रचंड उद्रेक झाला. स्वातंत्र्याची पहाट उगवली..

ई.स.वि. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.

विसाव्या शतकात अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधी यांनी “चले जाव.” अंदोलन पुकारले.

आणि दुसर्‍या महायुद्धानंतर ब्रिटीशांच्या लक्षात आले, आता आपल्याला भारतावरचे राज्य, युद्ध सांभाळता येणार नाही. क्रांतीकारक उसळले होते.

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जुन १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. त्यावेळी माउंटबेटन हे व्हाॅइसरॉय होते. मात्र मुस्लीम लीगचा प्रभाव, मतभेद, जीना  विचारसरणीचा उदय या संधीचा फायदा घेउन ब्रिटीशांनी Devide and रूल ची अंडर करंट पाॅलीसी वापरलीच. अखेर १५आॅगस्ट १९४७रोजी भारत स्वतंत्र झाला. युनीअन जॅक उतरला आणि भारताचा तिरंगा फडफडला. तो अविस्मरणीय आनंदाचा ऐतिहासिक क्षण गुलामगिरीचे जोखड उतरल्यामुळे भारतीयांनी प्रचंड जल्लोषात साजरा केला. पण त्यावेळीच  भारताचे पाकिस्तान आणि भारत असे तुकडे झाले.

पाकीस्तानात रहाणार्‍या अनेक पंजाबी सिंधींना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक यात मारलेही गेले. प्रचंड हिंसा, कत्तली झाल्या. याचे पडसाद अजुनही पुसले गेले नाहीत. या विभाजनानेच काश्मीरचा प्रश्नही पुढे आला, जो आजही सतावत आहे…

Tryst with destiny हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरु यांचे स्वातंत्र्य दिवशी दिलेले भाषण..ते म्हणाले होते, “स्वातंत्र्य आणि सत्ता मिळाल्या नंतर* जबाबदारी वाढते.

आतां खूप कष्ट घ्यायचे आहेत .we have hard work ahead. आराम हराम है। जोपर्यंत आपण देशासाठी घेतलेली शपथ पूर्ण करीत नाही…..”

यावर्षीचा हा ७४वा स्वांतंत्र्यदिन आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिल्ली  येथे लालकिला लाहोरी गेटवर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, जन गण मन ची धुन वाजेल. देशाला उद्देशून पंतप्रधानांचे भाषण होईल.

क्रांतीची धगधगती मशाल हातात घेउन, देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी प्राणाहुती दिली अशा अमर हुत्म्यांचे स्मृतीदिन म्हणून या दोनही दिवशी आपण त्यांना मानवंदना देतो.आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो. पंधरा आॉगस्ट हा राष्ट्रीय सण मानतो….. मात्र इतिहासाकडे  मागे वळून पाहता, मनांत येते, स्वातंत्र्यपूर्व काळीतील ती पीढी , अंशत:च उरली असेल. आणि स्वातंत्र्याचा इतिहास अभ्यासत घडलेली पीढीही आयुष्याच्या उतरंडीवरच.. या अभिमानाच्या  इतिहासाला पुढची पीढी कशी बघेल…स्फुरेल का काही त्यांच्याही नसांतून…वर्षानुवर्षे उभी राहिलेली स्मारके, पुतळे यांच्याशी त्यांचा नेमका काय संवाद साधेल..?? इतिहासाची ही सुवर्णपाने अखंड राहतील की वितळून जातील,..? हरताल,उपोषण असहकार अंदोलन या शब्दांच्या व्याख्या त्यांच्यासाठी नक्की काय असतील…?  पूर्वजांनी देशाची तळी ऊचलून, रक्तरंजीत भंडारा उधळून घेतलेल्या शपथेशी आजच्या पीढीची काय बांधीलकी असेल  ?असेल की नसेल?

प्रश्न असंख्य आहेत…. चालू समस्यांची बीजे भूतकाळातच शोधत बसणार ,दोषांचा भार टाकून मोकळे होणार की उपायासाठी नवा अभ्यास करणार…??

काळच ठरवेल… बाकी या दिवशी मिळणारी सुट्टीच महत्वाची… पंधरा आॉगस्टला कॅलेंडरवर रविवार नाही ना याचेच समाधान…!!! असो… 

स्वतंत्र्यासाठी बलीदान देणार्‍या हुत्म्यांना  आदरांजली..!!????

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – विविधा ☆ “स्वराज्य – सुराज्य” ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ “स्वराज्य – सुराज्य” ☆ सौ. अमृता देशपांडे 

हिंदुस्थान- भारत  गेल्या अनेक शतकांपासून परकीय साम्राज्याच्या राजवटीखाली होता. आदिलशाही, निजामशाही, पातशाही, इंग्रज , अशा अनेक  राजवटींनी भारतावर राज्य केलं. भारतातील काही प्रदेशांवर  फ्रेंच, पोर्तुगीजांनी राज्य केलं. तेव्हा पासून या देशातल्या प्रजेवर, रयतेवर, आणि एकूणच सामान्य जनतेवर सक्ती, दडपशाही,  त्यांच्या धर्माची पायमल्ली,  स्त्रियांवर अत्याचार ह्याचे वर्णन इतिहासात आढळते.

 नंतर या पारतंत्र्याला, अत्याचाराला विरोध करणारी, जनतेच्या मनात स्वराज्याचे, स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग फुलवणारी,  ठिणगी पेटवणारी , परकीयांच्या जोखडातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी बलिदान देणारी अनेक अनेक थोर स्त्री पुरूष व्यक्तिमत्वे आपल्या देशात होऊन गेली. आपल्या इतिहासाचे प्रत्येक पान त्यांचे जीवन, आणि बलिदान ह्याची आपल्याला जाणीव करून देते.

जाणीव करून देते मानवता धर्माची, स्वराज्याची आणि  सुराज्याची.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची विचारधारा स्वातंत्र्याबरोबर स्वराज्याची होती. सत्य,  अहिंसा,  स्वावलंबन,  आत्मनिर्भरता अशा मूलभूत तत्वांवर आधारित सुराज्याची होती.

गांधीजींनी स्त्रियांना सीतेसारखे चारित्र्य,  शील यांचा आदर्श घेण्याचा उपदेशच केला नाही तर त्यांच्यातल्या सीतेच्या अंशाची,  स्त्री शक्ती ची जाणीव करून दिली. जगातील प्रत्येक स्त्रीने  स्वतःतील स्त्री शक्तीला जागृत केले तर ती स्वतः, तिचा परिवार,  समाज आणि राष्ट्र या सर्वांचीच प्रगती झपाट्याने होऊ शकते ह्या विचारांचे बीज त्यांनी समाजात पेरले.

परकीयांची सत्ता उखडून टाकण्यासाठी,  मातृभूमीचे साखळदंड तोडण्यासाठी स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता यांचे आचरण आवश्यक आहे. हे त्यांनी निक्षून सांगितले व त्याचाच आग्रह धरला.

इंग्रज राजवटीला उलथून टाकण्याच्या लढ्यात अनेकांनी दिलेले बलिदान आज स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्षी ही तितकेच जिवंत आहे. 15 ऑगस्ट हा वार्षिक दिवस येतो तेव्हाच ही सर्व चरित्रे, प्रसंग,  घटना परत समोर येतात.  स्वातंत्र्य दिन अशा विभूतींच्या स्मरणार्थ ध्वजवंदन करून, राष्ट्रगीते गाऊन,  त्यावरचे चित्रपट प्रदर्शित करून साजरा केला जातो.

पण हे करत असताना प्रत्येक सूज्ञ भारतीयाच्या मनात सतत एक विचार डोकावत असला पाहिजे कि, 1857 पासून 1947 पर्यंत 90 वर्षे म्हणजे जवळ जवळ एक शतक आपल्या असंख्य पूर्वजांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढ्यात आपल्या सर्वस्वाची आहुती दिली,  त्यांना  74 वर्षानंतर आजच्या दिवशी वंदन करण्यासाठी तरी आपण लायक आहोत का? पात्र आहोत का?

ज्या इंग्रजांना ‘ चले जाव ‘ म्हणून हाकलून लावले, त्यांचेच अनुकरण आपल्याला आदर्श वाटते. भारतीय संस्कृती,  भारतीय एकात्मता आणि भारतीय असल्याचा अभिमान  ह्या विचारांकडे आपण सोयिस्करपणे डोळेझाक करत आहोत.

‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार आत्मसात करताना आपल्या देशहिताकडे दुर्लक्ष होते आहे, ही जाणीव राज्यकर्त्यांनी,  समाजधुरीणांनी युवा पिढीला करून द्यावी,  ही अपेक्षा सर्व भारतीयांची आहे. सध्याच्या युवा पिढीच्या मनात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने परत एकदा स्फुल्लिंग जागृत केले आहे,  ही आश्वासक,  समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

म्हणूनच प्रत्येक भारतीयाने

” राष्ट्र – प्रथम ” हा  शब्द मनात धरून जीवन विकास करणे अत्यावश्यक आहे.

देशातील प्रत्येक क्षेत्र शैक्षणिक,  औद्योगिक,  शेती, वित्त, बॅकिंग,  अनुशासन, सहकार, वैद्यकीय सेवा,  औषध उत्पादन, सेवा क्षेत्र,  विज्ञान व तंत्रज्ञान (Science & Technology), संशोधन ( Research) , digital globalization अशा विविध  क्षेत्रात काम करताना ‘ राष्ट्र- प्रथम ‘ हाच मंत्र अनुसरला , कार्यपद्धतीत लागू केला तर नकळतच अनेक विकासात्मक गोष्टी साध्य होतील.

धर्म, जात, वर्ण, राखीवता  या गुंत्यातून बाहेर पडून मानवता , भारतीय एकात्मता आणि भारतीय संस्कृती ह्या त्रिसूत्रीवर आधारित असा ‘ पूर्ण विकसित ‘ देश साकारणे हेच आपले ध्येय ठेवू या.

शालेय वयात अभ्यासलेल्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचे महत्त्व,  राष्ट्रगीताचे महत्त्व पुढच्या प्रत्येक अभ्यासक्रमात सामील करणे अत्यावश्यक केले तर विस्मरण होणार नाही.  प्रत्येक भारतीयाने आपले कर्तव्य सचोटीने निभावले तरच  हक्क मिळवण्याची अपेक्षा ठेवणं  रास्त आहे.

” वेदमंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम् ” ही गदिमांनी दिलेली उक्ती जर आचरणात आणली तर राष्ट्राच्या विकासाबरोबर स्वतःची प्रगती ही अढळ असेल.

‘बलसागर भारत होवो

विश्वात शोभुनी राहो ‘

हे स्वप्न साकारणे आपल्याच हातात आहे.  त्यासाठी एकच लक्षात ठेवू या,

” देश हा देव असे माझा अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा “.??????

 

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा 

9822176170  

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – विविधा ☆ स्वातंत्र्य संग्रामात भारतीय स्त्रियांचे योगदान – भाग पहिला ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

? विविधा ?

☆ स्वातंत्र्य संग्रामात भारतीय स्त्रियांचे योगदान – भाग पहिला ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

स्वातंत्र्यापूर्वी भारतीय स्त्रियांवर अनेक बंधने होती. तरीही भारतीय स्री त्याकाळी घराबाहेर पडली.देशासाठी योगदान द्यायला ती मागं राहिली नाही. काही मोजकी उदाहरणं सोडली तर क्रांतीकारकांच्या विजयगाथेत या वीरांगनांच  नाव झळकलेलं दिसत नाही.

तो काळ स्त्रियांच्या दृष्टीनं अत्यंत कठीण काळ होता.असुरक्षितता,अराजकता यामुळं पाळण्यात सुध्दा मुलींची लग्नं ठरवली जात असत. मुलींचे आणि स्त्रियांचे आयुष्य हजारो बंधनात जखडलेले होते.स्रियांना शिक्षण मिळत नसे, स्वातंत्र्य नव्हतेच. आवड निवड, इच्छा, मत यापासून त्या कोसो मैल दूर होत्या. सार्वजनिक जीवनात स्थान, मान आणि संधी तर नाहीच, पण समाजात मिसळण्याची परवानगीही नव्हती. परंतु पुढील लहानशा कालखंडात तिनं प्रगतीचा टप्पा गाठलेला दिसतो. भारतीय इतिहासाच्या पुस्तकात स्त्रीच्या कर्तृत्वाचा ठसा दिसतो. आजच्या वर्तमानाचा आणि भविष्याचा पाया तिथं नक्की दिसतो.

भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम १८५७ मध्ये सुरू झाला. अर्थातच त्या बरोबर आठवते ती ‘राणी लक्ष्मीबाई.’ त्यांनी स्त्रियांना युध्दकलेचे शिक्षण दिले. घोड्यावर बसणे, बंदुका आणि तोफा चालवणे, तलवार चालवणे, पोहणे असे शिक्षण देऊन त्यांची पलटण बनवली. त्यांच्या ‘काशी’आणि ‘सुंदर’ या दोन दासी युध्दकलेत प्रवीण होत्या.’फुलकारी’ नावाची एक महिला गस्त घालणे, गवंडी काम करणे यात प्रवीण होती. ‘मोतीबाई’ नावाची अत्यंत बुद्धिमान आणि मुत्सद्दी महिला लढाईचा आराखडा करण्यात वाकबगार होती. सैन्याचा व्यूह रचण्यात तिचाच सल्ला महत्त्वाचा असे. ‘अझीझन’ नावाची कलावंतीण ब्रिटिशांच्या सैन्यातून बातम्या काढून आणण्याचे काम करे.

दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जाफर याची पत्नी ‘बेगम झोनतने’ मतभेद मिटवून एक होण्याचे आवाहन केले.

अवधचा नवाब वाजिरअली शहा, राज्य खालसा झाल्यावर, इंग्रजांनी दिलेल्या ठिकाणी गेला. परंतु त्याची बेगम ‘ हसरत महलने’ अवधवर ताबा ठेवून इंग्रजांबरोबर लढणे पसंत केले. या राण्यांचे बलिदान आपण विसरु शकत नाही.

उत्तरेसारखेच दक्षिणेकडे महिला इंग्रजांविरुद्ध लढण्यास तयार होत्या. मद्रास प्रांतात शिवगंगा नावाचं छोटंसं संस्थान होतं. या राज्याची राणी ‘वेलुंचीयार’ हिनं ब्रिटिशांना आपल्या युध्दकौशल्यानं हैराण केलं होतं. १८५७ च्या अंधकारमय युगात राणीनं स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवली होती.

सन १८१७ मध्ये होळकरांचा पराभव झाला. या लढाईचे नेतृत्व ‘राणी भीमाबाईने’ केले. इंग्रजांच्या वेढ्यातून राणी घोडा फेकत बाहेर आली. ती इंग्रजांच्या हाताला लागली नाही.

कित्तुर हे कर्नाटकातील एक लहान पण श्रीमंत संस्थान. या संस्थानची ‘राणी चेन्नमा’ हिने इंग्रजांचा धुव्वा उडवला. कानडी लोकगीतात राणीची शौर्यगाथा वर्णिली आहे.

क्रमशः……..

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ क्रांतिकारकांचे आईस (भारतमातेस) पत्र ☆ श्री विजय गावडे

? मनमंजुषेतून ? 

☆ क्रांतिकारकांचे आईस (भारतमातेस) पत्र ☆ श्री विजय गावडे ☆  

प्रिय भारत मातेस
कृ. सा. न. वि. वि.

आई तूझी आठवण येते. आई तुझी खूप खूप आठवण येते.

काळ कसा भरभर पुढे सरकला, कळलंच नाही बघ. हा हा म्हणता तू स्वतंत्र होऊन पंच्यात्तर वर्षें उलटली सुद्धा.  तुझ्यावर जीव ओवाळून टाकतानाचा तो क्षण आठवला तरी नसलेल्या शरीरावर आजही रोमांच उभे राहतात.

सिंहावलोकन करतांना कधी कधी आई असं वाटतं की स्वातंत्र्य लढ्यात आम्ही दिलेली आमच्या प्राणांची आहुती, हि चूक तर नव्हती ना आमच्या हातुन घडलेली.

आम्ही तर जागेपणी हि तुझ्या अखंड अस्तित्वाची स्वप्ने पाहिलेली.  आसेतू हिमालय असलेली तुझी अखंड मूर्ती आम्ही आमच्या हृदयात साठविलेली. मात्र स्वातंत्र्य  मिळताच जे घडलं ते अत्यन्त क्लेशकारक होतं. आमच्या मातृभूचे तुकडे झालेले पाहून आमचा भ्रमनिरास झालेला. तुच्छ राजकीय अभिलाषा तुला एवढं दुःख आणि वेदना देईल यावर विश्वासच नव्हता बसत.

असो. जे झालं ते झालं. तुझ्यावर राज्य करणारे आमचे बांधव तुझा आत्मसन्मान तुला पुनः मिळवून देतील अशी आशा आहे.
तेवढं सर्व राजा रजवाड्यांच्या रियसतींचं तुझ्यात झालेलं विलीनकरण सोडलं तर काहीच आमच्या मनासारखं होत नव्हतं. कित्येक वेळा तर परकीयांच्या जागी आता आपल्याच लोकांशी संघर्ष करावा लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली पाहून आमचे सर्वांचे आत्मे तडफडत होते.

पण ईश्वरेच्छा बलियसी या न्यायाने तुझ्या उज्वल भवितव्याकडे सुरु असलेल्या वाटचालीकडे आमचे डोळे लागून राहिले आहेत. तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि तुला विश्वगुरूचा मान मिळो हिच आम्हा सर्वांची मनोमन प्रार्थना.  येवू घातलेल्या पंच्यात्तरि पुढे शम्भर, सव्वाशे, दीडशे……… हजार……..अशी अनन्त काळ पर्यंत तुझी स्वतंत्रज्योत तेवत राहो हिच तुझ्या सर्व लेकरांची शुभेच्छा!

तुझेच लाडके सुपुत्र क्रांतिकारी
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, वासुदेव बळवन्त फडके…………….. ई.

© श्री विजय गावडे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग पहिला ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? मनमंजुषेतून ? 

☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग पहिला ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆  

पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस! आपल्या देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन!! त्यावेळी आम्ही पाचवी- सहावीत शिकत असू. शहरात सगळीकडे उत्साही वातावरण होते.. तसेच शाळेतही होते. एखाद्या सणाप्रमाणे आम्ही चांगले कपडे घालून, नटूनथटून शाळेत गेलो होतो. त्यावेळी शाळेचा विशिष्ट असा युनिफॉर्म नव्हता. शाळा रंगीबेरंगी पताका लावून सजवली होती. पंटागणात रांगोळी काढली होती. कोणी मोठे पाहुणे येणार असावेत! वातावरण स्वच्छ, सुंदर, आनंदी होते. मैदानावर रांगेत आम्ही सर्व मुले-मुली ऊभे होतो. शाळा सुरु होण्यापूर्वी रोज प्रार्थना असे. त्यादिवशी स्वतंत्र भारताचा

‘तिरंगा’ उंच फडकाविला गेला. ‘ वंदे मातरम’ गायले गेले, ‘राष्ट्रगीत’ झाले. ‘भारत माता की जय’ घोषणा दिली गेली. आम्ही सर्व मुले खूप जोरात मोठ्या अभिमानाने ‘जय’ म्हणत असू. आम्हाला सर्वांना गोड खाऊ वाटला गेला. आम्ही मुले स्वतंत्र भारताचे उद्याचे भविष्य आहे, असे काहीसे पाहुण्यांचे भाषण झाले. त्यांनी खूप काही सांगितले. ते म. गांधी, पं. नेहरु, सुभाषचंद्र बोस अशा अनेक थोर नेत्यांबद्दल बोलले. आम्हाला ‘देश स्वतंत्र झाला’; एवढे फक्त कळले. आता भारत देशाला, आपल्याला चांगले दिवस येणार. तो खूप आनंदी दिवस होता.

आमच्या घरात भिंतीवर एक फोटो फ्रेम होती. सुंदर रंगीत चित्र! भारताच्या नकाशाचे!! एका बाजूला गांधी, नेहरु, सुभाषचंद्र असे बऱ्याच पुढाऱ्यांचे चेहरे. दुसऱ्या बाजूला भारतातून ब्रिटिश शिपाई बाहेर पडत आहेत असे दाखवले होते. तसेच भारतीय लोकांची खूप मोठी रांग, जी संपूर्ण नकाशावर होती. प्रत्येकाच्या हातात तिरंगा ध्वज! हे चित्र मनावर कोरले गेले. खाली लिहिले होते. . . ” छोडो भारत”, “Quit India”. त्यावेळी त्या चित्राचा अर्थ फारसा लक्षात येत नसे. पुढे शाळेत इतिहासाच्या अभ्यासात; तसेच गोष्टी वाचनातून समजत गेले, तसे सर्व गोष्टींचे महत्त्व कळत गेले.

शालेय जीवनात  माझ्या हातात एक पुस्तक आले. माझा चुलतभाऊ नाना ( चंद्रकांत ) याने ते मला भेट म्हणून दिले. मुखपृष्ठावर कॅप्टन लक्ष्मीचे लष्करी पोषाखातील आकर्षक रंगीत चित्र, बाजूला लष्करी पोषाखातील महिला. नाना आम्हां भावंडांपेक्षा वयाने बरेच मोठे होते. माझ्या आठवणीप्रमाणे ते ब्रिटिश काळात जेलर म्हणून नोकरीस होते. देशभक्त कैदी लोकांचे हाल त्यांना सहन होत नसत. म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली होती. आमच्या बालमनावर नकळत संस्कार होत गेले. आम्ही बघत होतो, ऐकत होतो, घडत होतो.

आम्ही असे मोठे होत गेलो. वाचन वाढले. संदर्भ लक्षात यायला लागले. ऑगस्ट महिन्यात अनेक सण येतात.पारंपारिक सणांशिवाय सर्व भारतीयांचे आनंदाचे सण, अभिमानाचे दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट क्रांतीदिन आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन!

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसची चळवळ हे जनतेने केलेले तीव्र आंदोलन होते. इ. स. २०२१ साली या चळवळीला  एकोणऐंशी वर्षे, २०२२ साली ऐंशी वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईत ज्या मैदानात या आंदोलनाला सुरुवात झाली त्या मैदानाला ‘ऑगस्ट क्रांतीदिन मैदान’ म्हणून ओळखले जाऊ लागले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रपिता म. गांधीजींनी ‘भारत छोडो’ हा अंतिम इशारा दिला. संपूर्ण देशातील अनेक लोक तरुण पिढी या आंदोलनात सहभागी झाली होती. प्रत्येक व्यक्ती जणू नेता बनली होती. ब्रिटिश सरकारने एक दिवस आधीच म. गांधी आणि प्रमुख पुढाऱ्यांना कैद करुन बंदी केले होते. ८ ऑगस्ट १९४२ या दिवशी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या सभेत ह्या आंदोलनाचा निर्णय झाला होता. अरुणा असफअली ही शूर धाडसी तरुणी पकडली गेली नाही. ९  ऑगस्ट १९४२ या दिवशी मुंबईच्या ‘ गवालिया टॅंक मैदानात’ ‘तिरंगा ध्वज’ फडकविला गेला आणि ‘भारत छोडो’ आंदोलनाला सुरुवात झाली.

क्रमशः…………

© सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

फोन नंबर : 0738768883

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी एक भूमिगत -भाग १ :: लेखक – कै. वासुदेव त्र्यंबक भावे ☆ प्रस्तुती  – श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? वाचताना वेचलेले ? 

☆ मी एक भूमिगत -भाग १ :: लेखक – कै. वासुदेव त्र्यंबक भावे ☆ प्रस्तुती  – श्रीमती सुधा भोगले ☆  

(माझे वडील कै. वासुदेव त्र्यंबक भावे. यांनी 1930 ते 1946 या कालावधीत स्वातंत्र्य संग्रामात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या ‘ मी एक भूमिगत ‘ या पुस्तकातील काही लेखांचे उतारे आणि त्या मंतरलेल्या क्षणांचा मागोवा घेतला आहे. यामुळे स्वातंत्र्य संग्रामात अनेक अज्ञातांनी केलेल्या त्यागाची ओळख होईल. या छोटेखानी पुस्तकास कै. ग. प्र. प्रधान सर या साहित्यिक व विचारवंत मित्राची प्रस्तावना लाभलेली आहे.)  

माझे नाव वासुदेव त्र्यंबक भावे. माझा जन्म ६ जून १९१५ चा. आमचे कुटुंब बऱ्याच पिढ्या भिवंडीत राहत होते. माझे मोठे बंधू श्री. बाबजी त्र्यंबक भावे हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, त्यामुळे घरात राष्ट्रीय वृत्ती आणि देशसेवेचे वळण होते. त्याच वळणात मी वाढलो व माझा देशसेवेचा पिंड तयार झाला. त्या अनुषंगाने एक निर्भीडपणा व शिस्तही अंगी आपोआपच बाणली गेली. भिवंडीत इंग्रजी शिक्षणाची किंवा अन्य प्रकारच्या शिक्षणाची सोय नव्हती. परिस्थिती मुळे राष्ट्रीय पाठशाळेत शिक्षणासाठी गेलो. माझ्या वरच्या देशसेवेच्या संस्कारांचे दृढीकरण या राष्ट्रीय शाळेत झाले. भिवंडी येथे 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात मला भाग घ्यायला मिळाला. 1931 साली गांधीजी गोलमेज परिषदेला जाऊन आल्यावर कायदेभंगाची चळवळ पुन्हा सुरू झाली. तेव्हा आमची पाठशाळा सरकारी अवकृपेला बळी पडली. मी मात्र भिवंडीस परत आलो. 

काही दिवसांनी मला नगर होऊन पत्र आले. माझे मित्र डॉक्टर गोविंद जोग व श्री. न. पू. जोशी यांचे ते पत्र होते. त्यांनी मला आग्रहपूर्वक नगरला परत बोलाविले होते. नगरला परत आल्यानंतर मी चळवळीचे काम सुरू केले. रोज सायंकाळी गांधी मैदानात मुलांना जमवू लागलो. सायंफेरी सुरु केली. बुलेटीन काढू लागलो. सत्याग्रह करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सभेची व्यवस्था ठेवू लागलो. नगर मधील बऱ्याच लोकांना सत्याग्रह केल्यावरून पकडण्यात आले होते. त्यामुळे 3 जून 1932 रोजी कोणी सत्याग्रहीच मिळेना. म्हणून उर्वरित काँग्रेसचा सर्वाधिकारी म्हणून गांधी मैदानात मीच सत्याग्रह केला. मला ताबडतोब पकडण्यात आले. दुसऱ्या दिवशी मला सहा महिने सक्तमजुरी ही ठोठावण्यात आली. मी नगर पोलीस कस्टडीत होतो. तेथे रोज चक्कीचे काम करावे लागे. ७0 पाऊंड ज्वारी पीसावी लागे. तीन तासात ते काम पूर्ण करावे लागे. शेवटी शेवटी पोटातील आतडी गोळा होत व फार त्रास सहन करावा लागे. एवढ्या धान्यातून फक्त भुसा म्हणून साधारण अर्धा किलो काढावा लागे. सहा महिन्यांची शिक्षा संपल्यानंतर मी भिवंडीस परत आलो.

आता उपजीविकेसाठी काहीतरी करणे आवश्यक होते. भिवंडी येथील अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये माझ्याजवळ असलेल्या कांदिवली व अमरावती येथील शारीरिक शिक्षण परीक्षांच्या जोरावर मला व्यायाम शिक्षकाची नोकरी मिळाली. श्री. ग. बा नेवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1939 मध्ये एक ‘अभिनव चर्चा मंडळ’ स्थापन झाले होते. व्यायाम शाळेत येणाऱ्या आम्हा सर्व तरूणांचा त्यात सहभाग होता. पुढे सर्वजणांनी ‘चले जाव’ लढ्यात भाग घेतला. 8 ऑगस्ट 1942 च्या ‘चले जाव’  ठरावाच्या गोवालिया टँक वरील ऐतिहासिक अधिवेशनाला आम्ही सारे गेलो होतो. अभिनव चर्चा मंडळातील आमचा एक ग्रुप फोटो, आम्हाला पकडण्यासाठी पोलिसांच्या उपयोगी पडला. चळवळीच्या कामाचे दोन भाग होते. एक म्हणजे बुलेटीन-प्रचारसभा यांच्याद्वारे सरकार विरोधी वातावरण तयार करणे. दुसरी म्हणजे शासन यंत्रणा कमकुवत करणे व ती बंद पाडणे. अनायसेच माझी श्री भाई कोतवालांशी गाठ पडली. एका फार मोठ्या योजनेच्या संदर्भात, मी श्री कोतवालांच्या छावणीवर गेलो होतो. टाटा पॉवर हाऊस व पाण्याचे नळ तोडण्याचा कार्यक्रम होता. कोतवालांच्या छावणीत बॉम्बसदृश्य पदार्थ करून त्याचा उपयोग कचेऱ्यात व विशेषतः रेकॉर्ड रूममध्ये ठेवण्याची योजना होती. असा उपयोग बरेच ठिकाणी झाला व यश आले.

—-क्रमश:

प्रस्तुती श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – कलास्वाद ☆ आचंद्र सूर्य नांदो…. ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सौ.वंदना अशोक हुळबत्ते

? कलास्वाद ?

☆ आचंद्र सूर्य नांदो…. ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

“विजयी विश्व तिरंगा प्यारा

झंडा उंचा रहे  हमारा |”

 दै.तरूण भारत दर बुधवारी खजाना पुरवणी काढते. ११ आॅगस्टच्या खजाना पुरवणीच्या मुखपृष्ठाने माझे लक्ष वेधून घेतले.

एका तरूणीने अभिमानाने आपल्या हातात तिरंगा घेतला आहे.तो तिरंगा फडकत आहे.तिच्या भोवती नारंगी, पांढऱ्या, हिरव्या, रंगांच्या कपड्यांने वर्तुळ बनवले आहे. एखाद्या नृत्य आविष्कारात बनवतात तसे. शालेय मुलांनी ते वर्तुळ तयार केले आहे. जणू ते म्हणत आहेत या तिरंग्याचा आम्हाला अभिमान आहे. त्याचा मान ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. देशाच्या स्वातंत्रासाठी दिलेले बलिदान आम्ही व्यर्थ जावू देणार नाही. या देशाची आण, बाण, शान आम्ही राखणार. या भारत देशाचे आधार स्तंभ आम्ही आहोत. देशाचे भविष्य आम्ही घडवणार.आम्ही तरुण आहोत आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे.आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माचे असलो तरी भारतीय आहोत.आमची एकता अखंड आहे. जोवर या सृष्टीत सूर्य, चंद्र, तारे आहेत तोवर या भारताचे स्वातंत्र्य अबाधित आहे. ते अबाधित ठेवण्याची जबाबदारी संपूर्णपणे आमची आहे. आमच्या क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे.

“विजयी विश्व तिरंगा प्यारा

झंडा उंचा रहे हमारा |”

आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन आपण साजरा करत आहोत.हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले.अनेकांनी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवले.याचे भान आम्हा तरुणांना आहे.

तिरंग्यातील नारंगी रंगा प्रमाणे देशासाठी स्वार्थाचा त्याग करण्याची भावना अंगी बाळगून पांढऱ्या रंगा प्रमाणे पवित्र राहून हिरवाईची समृध्दी देशाला मिळवून देणार हेच या दिनी मनात ठसवणार आणि त्या प्रमाणे वाटचाल करणार.हा आशय या मुखपृष्ठातून व्यक्त होताना दिसतो आहे.

भारतीय स्वातंत्र्य चिरायु राहो

जय हिंद

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सांगली

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈