चहाची तल्लफ ? होय ना ? मग ऑफिस मध्ये. मीटिंग मध्ये ,कुणाच्याही भेटी दरम्यान ,प्रवासात आणि वातावरणाचा परिणाम म्हणून सुद्धा या चहाची तल्लफ आपल्याला येतेच. काही वेळा तर चहा ची वेळ हे सासूबाई किंवा आज्जेसासूबाई यांचे घड्याळ असते. पण ही तल्लफ मोठी वाईट. ठरलेल्या वेळेला चहा नाही मिळाला तर काहींचे डोके चढते …म्हणजे दुखायला लागते. चिडचिड होते. काही कामाच्या ठिकाणी दिवसभरचा कामाचा ताण बाजूला ठेऊन जरा निवांत वेळ मिळण्यासाठी चहासाठी ब्रेक घेतात. टी-टाईम. (कुठल्याही ऑफिस मधले लोक १० मिनिटांच्या चहाला तास भराचा फेर फटका मारतात ही गोष्ट वेगळी.)
चहा सुद्धा ठराविक ब्रॅंड चा प्यायचा अशी सवय जडली असते. कोणाला भेटायला बोलवायचे तेंव्हा आपण म्हणतोच “चहाला या” यात लपलेला अर्थ म्हणजे ‘गप्पा मारायला या’.(चित्रपट गीतात “शायद मेरे शादी का खयाल दिल मे आया है, इसिलीये मम्मीने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है” हेच ते बोलणे या वेळी करायचे असते.)ते असो. पूर्वी आपल्याकडे चहा सुद्धा पित नसत. आमच्या लहानपणी आम्ही चहा मागितला की चहाची सवय लागू नये म्हणून ,आज्ज्या, मावश्या, काकू आम्हाला भीती दाखवायच्या. की, लहान मुलांनी चहा प्यायचा नसतो ,कोणी म्हणायचे चहा प्यायला की काळे होतो. आज चहाचे आवडते ब्रॅंड आहेत. आता मात्र याला मोठेच सांस्कृतिक महत्व आलेले दिसते. सुर्रर्र….के पियो … अशा चहाच्या उत्पादनाच्या अनेक जाहिरातीतून चहा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेला आहे हे कळते. म्हणून तर चहा प्रेमींसाठी ‘२१ मे’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतपणे जाहीर केला आहे.
चहा म्हणजे चा या चीनी भाषेतून रूढ झालेला शब्द. तोच मग चीनी भाषेतून भारत, जपान, इराण, रशिया या देशातून सुद्धा थोड्या फार प्रकाराने रूढ झाला. डच लोकांनी हा शब्द जावा मार्गे युरोपात नेला असे म्हणतात.चहा चे शास्त्रीय नाव कॅमेलिया सायनेन्सिस. चहा ची ही वनस्पति झुडुपे या प्रकारात मोडते. याच्या पानांवर प्रक्रिया करून उत्तेजक पेय तयार होते तोच चहा.चीनी दंतकथेत चहा हे उत्तेजक पेय म्हणून उल्लेखलेले असले तरी Erhya या चीनी शब्दकोशानुसार चहा ही औषधी वनस्पति म्हणून लोकांना परिचित होती. केवळ चहाच्या पानांच्या उत्पादनांसाठी याची लागवड केली जाते. हाच चहा आता जगातील निम्मे लोक पितात आणि हे पेय लोकप्रिय आहे. म्हणूनच चाय पे चर्चेला आणि दैनंदिन आहारामध्ये व आदरातिथ्यात ‘चहाला’ महत्व आहे. सातव्या आणि आठव्या शतकात म्हणे चीन मध्ये चहा इतका लोकप्रिय झाला होता की चहावर चीनी सरकराने कर बसवला होता . चीन मध्ये चहा वर ग्रंथ सुद्धा आहे. त्याचे नाव आहे ‘चा चिंग’,आठव्या शतकातील हा ग्रंथ, चहाचा इतिहास व चीन मधील ही मूळ वनस्पति याची माहिती देतो. असे म्हणतात की बौद्ध भिक्कुंमार्फत चहा पिण्याची ही सवय चीन मधून युरोपात पोहोचली. मग पुढे याचा प्रसार झाला. सहाव्या ते आठव्या शतका दरम्यान जपान मध्ये प्रथम चहा गेला. आता तर चहापान विधी तिथे घराघरात महत्वाचा समजाला जातो. सर्व आशियाई देशात पण हा प्रसार झाला.
जपान मध्ये चहा समारंभ –
जपानी चहा समारंभ ‘चाडो’. द वे ऑफ टी, म्हणून ओळखला जाणारा हा समारंभ एक सांस्कृतिक परंपरा समजली जाते. १५०० च्या काळात सेन नो रिक्यु यांनी जपानी चहा संस्कृतीत क्रांति घडवून आणली आणि त्याला एक कला प्रकार म्हणून मान्यता प्राप्त करून दिली. चीनी चहाचे पूर्णपणे जपानीकरण केले. तेंव्हा पासून चहाचे घर, चहाची बाग, चहाची भांडी, चहा समारंभाचे नियम असे लागू करून सौंदर्य पूर्ण चहा समारंभ होऊ लागले. सेन नो रिक्यु ने या समारंभाचे योगी नियोजन होण्यासाठी सात नियम घालून दिलेले आहेत. चहा समारंभासाठी म्हणजे चानोयू साठी हे जपानी परंपरेतले एक घर / वास्तू ‘चशीत्सू’ हे चहाघर म्हणून वापरले जाते. आपल्याकडे जशी अमृततुल्य चहा ची दुकाने अथवा चहा टपर्या ठिकठिकाणी आढळतात तशीच.यात चहा शिकविणारे असतात चाय मास्टर म्हणजे तज्ञ त्यांना ‘तेशू’ म्हणतात.
चहा घर – चशीत्सु
सेन नो रिक्यु यांच्या पतवंडांनी म्हणजे पुढच्या पिढिंनीही या संकल्पनेचा विकास करत आणला. या पद्धती शाळेच्या पाठ्यक्रमात लावल्या गेल्या आहेत. त्यांनी तर ओमोटेसेन्के , उरासेन्के आणि मुशाकोजिसेन्के या चहा शाळांची स्थापना केली.या तीन प्रमुख शैली आहेत. यातील शाळा आजही सुरू आहेत. पुढे चहा संमेलनाचे औपचारिक आणि अनौपचारिक वर्ग पडून वर्गीकरण झाले. तिथे शाळा महाविद्यालये आणि विद्यापीठात चहाचे क्लब आहेत.
जसे आपल्याकडे पाककृतींचे वर्ग घेतले जातात तसे तिथे वेगवेगळ्या लोकांसाठी चहाच्या सशुल्क शाळा चालतात. हे विद्यार्थी महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असे असतात.म्हणजे थोडक्यात क्लासेस.त्यात काय शिकायचे असा प्रश्न आपल्याला पडेल पण खरच हा एक समारंभ असा असतो की त्या शाळेत प्रवेश करण्यापासून चे नियम , शिस्त, प्रथा, मॅनर्स अगदी दार कसे उघडायचे,आत आल्यावर तातामी मॅट वर कसे चालायचे , इथपासून भांडी कोणती वापरायची, कशी वापरायची, कशी धुवायची, कशी मांडायची, आलेल्यांचे स्वागत कसे करायचे , कोणाला आधी नमन करायचे, यजमानाने चहा समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांशी कसे वागायचे आणि पाहुण्यांनी पण वागताना कोणते नियम पाळायचे असे एव्हढे संस्कार/पद्धती या शाळेत शिकविले जातात. पाहुण्यांनी चहा समारंभाला आल्यानंतर आत जाण्याआधी चपला बूट बाहेर काढून, हात पाय तोंड स्वच्छ धुवून मगच जायचे असते.तेही यजमानांनी आदरपूर्वक बोलवल्यानंतरच . तो पर्यन्त वेटिंग रूम मधेच थांबायचे असते. एक राऊंड झाल्यानंतर मध्यंतर असते, त्यात चहा च्या खोलीची स्वच्छता होते पुन्हा पाहुण्यांना आदराने आत बोलावले जाते. एका वेळी पाहुण्यांची संख्या साधारण ५ असते. असा हा समारंभ किमान अर्धा तास ते जास्तीत जास्त चार तास चालू असतो. हा, वेळ पाहुण्यांची संख्या ,चहा सादरीकरणाची पद्धती, जेवण व चहाचे प्रकार यावर अवलंबून असतो. अशी ही मोठी प्रक्रियाच असते.
चहाच्या या औपचारिक कार्यक्रमावेळी ताजे जेवण दिले जाते त्याला कैसेकी किंवा ‘चा- कैसेकी’ म्हणतात. या समारंभासाठी यजमान विशेष कपडे ‘किमोनो’ घालतात. किमोनो हा जपानचा राष्ट्रीय पोशाख आहे. शाळा, प्रसंग, त्या वेळचा ऋतु, उपकरणे अशा अनेक घटकांवर ही चाडो म्हणजे (the way of tea)पद्धत आधारित असते. म्हणजे चहा समारंभ केवळ चहा पुरताच मर्यादित नसतो तर या वेळी छोटेसे भोजन पण असते. याचे महत्व म्हणजे आस्वाद घेणे आणि आनंद देणे असते.
अशा शाळांतून चहा शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील मिळते. हे ऐकलं की आपल्याकडे सुद्धा संगीत, शिवण, कला याबरोबर पाककौशल्य किंवा चहा, कॉफी, सरबते शिकवण्यासाठी एखादा तास असायला हरकत नाही ,नाही का ? पण एक मात्र आहे , आपल्या मुलामुलींना चहा नक्कीच करता येतो.नव्हे यायलाच हवा त्यासाठी कशाला शाळा हव्यात ? हं चहा करून झाल्यावर तो सर्व्ह करतांना ,किंवा कपात चहा ओतताना हातावर कंट्रोल हवा ,तो ट्रे मध्ये, खाली जमिनीवर सांडू नये , कपातला चहा बशीत सुद्धा सांडू नये देताना, असे शिक्षण द्यायला हवे पालकांनी. हेच ते मॅनर्स, शिस्त जपानी चहा समारंभात शिकवले जातात.
पाहिलंत, हा जपानी चहा समारंभ म्हणजे नुसता एक सोहळा च नसतो तर तो सद्भाव, सन्मान, पवित्रता आणि शांतीचे प्रतीक असलेली, एक आध्यात्मिक अभ्यासाची पद्धत मानली जाते. त्यात इतिहास आहे, संस्कृती आहे, सौंदर्य शास्त्र आहे , सामाजिक एकोपा वाढवण्याचे साधन आहे. शिवाय त्यात कला आहे, स्वच्छता आहे , नीटनेटकेपणा आहे, आतिथ्य आहे. नम्रता आहे, शिष्टाचार आहे. विविध शैली आहेत.
मग काय कधीही जपान टूरवर जाल तेंव्हा नक्की या समारंभाला जाणीवपूर्वक हजर रहा. तिथला अमृततुल्य पिऊन या. आपल्या इथल्या आसाम – दार्जिलिंग सारखे चहाचे मळे पण बघून या. संस्कृतीतला फरक बघाल तेंव्हाच महत्व अनुभवाल, तर अशी ही जपानी चहा संस्कृती ! वाचली म्हणून सांगितली.
एक राजा होता. त्याला आपल्या प्रजेसाठी काहीतरी करावे असे नेहमीच वाटायचे. त्या प्रमाणे तो नेहमीच काहीतरी करून प्रजेला आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा. कारण त्याला माहित होते की प्रजा आनंदी तर राज्य आनंदी आणि राज्य आनंदी तर राजा मनापासून आनंदी.
एके दिवशी त्याला असे वाटते की आपण प्रजेला अशी एखादी गोष्ट देऊ की जी कधीच संपणार नाही. अर्थातच अशी कोणती गोष्ट आहे जी कधीच संपणार नाही याचा शोध त्याने घ्यायचे ठरवले.
त्याने नगरात दवंडी पिटवली की जो कोणी राजाला अशा गोष्टीची माहिती देईल त्याला राजा मोठे बक्षीस तर देईलच पण ती गोष्ट तो प्रजेला देऊन प्रजेला अजून सुखी करण्याचा प्रयत्न करेल.पण त्या व्यक्तीने ती गोष्ट नाशवंत नाही असे सिद्ध करून दाखवावे लागेल.
राजाची दवंडी ऐकून बक्षीसाच्या आशेने अनेकजण येतात आणि सांगतात. पण सिद्ध करायची वेळ आली की त्यात ते नापास होतं होते.
एक जण येतो आणि म्हणतो सूर्यप्रकाश नाशवंत नाही. तो इथे नसला तरी दुसरीकडे प्रकाशमानच असतो म्हणून तो नाशवंत नाही. पण राजा म्हणतो ते जरी खरे असले तरी रोज रात्री सूर्यास्त झाला की हा प्रकाश येथे रहातच नाही त्यामुळे ते काही खरे नाही. मग तो म्हणतो सोलर एनर्जी साठवली तर ते शक्य आहे. आणि त्याने ते करूनही दाखवले. राजा खूष होतो. त्याला बक्षीस देऊन आपल्या राज्यात सगळीकडे सोलर सिस्टीमने रात्री पण प्रकाश निर्माण करतो. त्यामुळे वीज बचत होऊन राज्याची प्रगतीच होत आहे असे त्याला वाटले.
परंतु पुढे जून महिन्यात दिवसाच सूर्यप्रकाश अपूरा असल्याने सोलर सिस्टीम सक्रिय होत नव्हती म्हणून ते पण नाशवंत आहे हे लक्षात आले.
मग राजा त्या व्यक्तीला परत बोलावतो आणि सांगतो अरे ही सूर्यप्रकाशाची वाट तूच दाखवलीस पण ती चुकीची ठरली. आता तू अजून दुसरी गोष्ट सांग नाहीतर बक्षीसाच्या दुप्पट दाम लगेच परत कर… असे केले नाही तर तुला राजाची फसवणूक केली म्हणून मृत्यूदंड दिला जाईल.
ती व्यक्ती घाबरते. थोडा विचार करते आणि पटकन म्हणते, ” अमृतमं ज्ञानम अभयस्य तत् कदापि नहन्यते ” अर्थात हे राजा जगात अमृत, ज्ञान आणि अभय या तीन गोष्टी शाश्वत आहेत. याचा कधीच नाश होत नाही.
राजाला ते पटते आणि तो त्या व्यक्तीची शिक्षा माफ करतो. तसेच एका गोष्टी ऐवजी तीन तीन गोष्टी सांगितल्या म्हणून त्याला अतिरिक्त बक्षीस देतो.
मग तो आपल्या प्रजेला निडर रहायचे धडे देतो त्यामुळे अभय भाव मनात येऊन कोणत्याही संकटाला धीराने सामोरे जायचे मग काही बिघडत नाही हे लक्षात येऊन राज्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहिले नाही. अमृत ही गोष्ट तो प्रजेसाठी देऊ शकला नाही पण अमृताचे गुण जाणून त्याने प्रजेला आयुर्वेद महत्व सांगितले. त्याप्रमाणे सगळ्या प्रजेने वागल्याने प्रजेचे आरोग्य सुधारले आणि आयुष्यमान वाढले. अर्थात हे ज्ञान सगळ्यांना दिल्याने हा ज्ञानदीवा अखंड तेवता राहिला ज्याचा कधीच नाश नाही झाला.
राजाने सगळ्यांना ही शिकवण दिल्याने पिढ्यानुपिढया सगळ्यांच्या मनात आत्मविश्वास आला आणि सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करू लागल्याने राज्याची प्रगतीच होत राहिली.
पण तरी अमृत ही गोष्ट तो देऊ शकला नाही म्हणून त्याने ती गोष्ट नाशवंत न म्हणता अस्तित्वातच नाही असे सांगून ते सुभाषित बदलले आणि स्वानुभवातून त्याने सांगितले सत्यम ज्ञानम अभयस्य तत् कदापि नहन्यते…
सत्य हे कायम सत्यच रहात असल्याने ते पण अक्षय म्हणून मानले जाऊ लागले.
लेखिका : सुश्री वर्षा बालगोपाल
२)गणपती
श्रीपाद आणि सुलोचना गरीब जोडपे. लोकांच्या घरची धुणी भांडी, आणि मोलमजुरीचे काम करून आपली उपजीविका करत होते. खाऊन पिऊन सुखी होते.
निसर्ग नियमाने सुलोचना आई होऊ घातली होती. खरे तर इतकी आनंदाची बातमी तरी सुलोचना धस्तावलेलीच होती. तिला त्याबद्दल विचारले तर ती म्हणाली श्रीपाद आणि घरच्यांना मुलगी नको आहे. मुलगी झाली तर आम्ही सांभाळणार नाही म्हणत आहेत. म्हणून काळजी वाटते.
असे म्हटले तरी तसे होणार नाही. शेवटी आपलेच बाळ म्हणून स्वीकारतील. तसे नाही झाले तर त्यांना समजावता येईल. तू काळजी करू नको असे सुलोचनाच्या घरचे तिला धीर देत होते.
यथावकाश सुलोचना प्रसूत होऊन मुलगीच झाली. ती सुद्धा दिव्यांग… हात पाय छोटे असलेली. गिड्डूच रहाणारी. डॉक्टरांनी हे सांगितले मात्र श्रीपाद आणि त्याच्या घरच्यांनी मुलगी नाकारली. तिला तू कोठेही सोडून ये आम्हाला मुलगीच नको होती त्यातून अशी तर मुळीच नको. तुला आम्ही स्वीकारू….
असे म्हणताच सुलोचनाने त्याला ठाम नकार दिला. मी येईन तर मुलीला घेऊनच नाहीतर मी मुलीला घेऊन कशीही राहीन. असे म्हणून ती त्यांच्याकडे अपेक्षेने पाहू लागली पण त्याला न बधता ते खरेच तिला आणि मुलीला सोडून गेले.
मामाने भाचीला आधार दिला तरी सुलोचनाने तिला धुणं भांड्यांची कामे करून चांगले वाढवले. तिला 10वी पर्यंत शिकवले. मानिनी तिचे नाव. पुढे याच बळावर मानिनीने दिव्यांग मुलांसाठीच शाळा काढण्याचा निर्णय घेऊन त्या दृष्टीने 2 कोर्स केले आणि मामाच्या घराच्या पडवीतच ही शाळा सुरु केली. तिला सरकारी मदत मिळाली आणि मग त्या जागेत तिने मोठी शाळा चालू केली.
ते पाहून श्रीपाद तिच्या पैशासाठी तिला स्वीकारायला तयार झाला.
तेव्हा सुलोचना म्हणाली तुम्ही श्री गणेशाची पूजा करता ना? श्रीपाद म्हणाला हो. पण त्याच काय इथे? पुढे सुलोचना म्हणाली तुम्ही गणपतीची भक्ती विघ्नहर्ता म्हणून करता त्यावेळीच तो बुद्धीदाता आहे कलाधिपती आहे हे विसरलात. आणि ज्या गणपतीची उपासना तुम्ही करता त्याच्याकडे नीट बघता का तरी? गणपतीच्याही जीवनात त्याच्या जन्माच्या वेळेसच संकट आले आणि तो स्वतः दिव्यांगच झाला नाही का? त्याच्या डोक्याच्या भारामुळे त्याचे पोट मोठे झाले म्हणून बेढब नाही का झाला? पण तरीही आपल्या बुद्धीच्या जोरावर कलांच्या साहाय्याने त्याने आपले स्थान अबाधित केलेच ना?
तशीच माझी मुलगी आहे. तिने तिच्या बुद्धीने आज यश मिळवून तिची महानता सिद्ध केली आहे.
एक लक्षात घ्यायला हवं आंधळ्या माणसाला सिक्सथ सेन्स असतो म्हणून त्याला समजते. न बोलता येणाऱ्याला ऐकू चांगले येते. म्हणजेच एक भाग कमी असला तरी काही ना काही जास्त त्याकडे असते. तेच आपल्यातील बळ आहे हे ओळखून काम केले तर दिव्यांग व्यक्ती अविश्वसनीय काम करून दाखवते. त्याला प्रोत्साहन द्यायचे पाठिंबा द्यायचे काम समाजातील इतर घटकांनी करायचे असते. मग दिव्यांग खऱ्या अर्थाने दिव्यांग होतील. अगदी गणपतीबाप्पासारखे.
मला वाटतं संसारात पदार्पण केल्यानंतर आईची जरा जास्तच आठवण येते काहो ? कारण एकेक चटके बसायला लागले की आई गं ! असं म्हणून आईच आठवते नाही कां आपल्याला ? बघा नं ! टोपली भरून वांगी बघून तुमचही असच झाल असत . पुराणातली नाही कांही खऱ्या वांग्याची गोष्ट सांगतीय मी. सोबतीला माझी फजिती पण ऐका. पहिल्यापासूनच सगळं सांगते तुम्हाला,
‘कंटाळा,’आणि ‘ हे मला येत नाही ‘! हे दोन शब्द माझ्या आईच्या कोशातच नव्हते. ही कडक शिस्त तिने आम्हा भावंडांना मारून मुटकून लावली होती .
संसाराचे धडे आईने आमच्याकडून गिरवून घेतले.ते धडे लग्न झाल्यावर ,संसारात पडल्यावर फार फार उपयुक्त आणि मौल्यवान ठरले.
एकदा गंमतच झाली कशी कोण जाणे ह्यांनी वांगी जरा जास्तचं आणली होती . कदाचित भाजीवालीने गोड बोलून साहेबांच्या गळ्यातच मारली असावीत, आता या एवढ्या वांग्याचे काय करू ? त्यांना प्रेमाने गोजांरू म्हटलं तर काटे हातात टोचणार . चरफडत पिशवी रिकामी केली. अहो टोपल भरलं की हो वांग्यानी ! माझ्यापुढे मोठा यक्षप्रश्न,! संसारात पडून सुगरणपणाच्या मोरावळा झाला नव्हता . त्यामुळे मला सुगरणीला ते आव्हानच होत. आईच डाळवांग अप्रतिम व्हायच. बुद्धीला ताण देऊन पहिल्या दिवशी आई कसं करायची ? काय काय घालायची ? हे आठवून आठवून केल एकदाच डाळ वांग. दुसऱ्या दिवशी केली भरली वांगी. तिसऱ्या दिवशी कांदा बटाटा वांग्याचा रस्सा. हाय रे देवा! तरीपण द्रौपदीच्या थाळीसारखी टोपलीत काही वांगी उड्या मारतच होती.आता काय करायच बाई ह्या वांग्याच ? पुन्हा भल मोठ्ठ प्रश्नचिन्ह ??? आणि मग एकदम ट्यूब पेटली. आईने केलेली मिश्र डाळींची, दाणे आणि अगदी दोनच चमचे, तांदुळाची सगळं काही थोडं थोडं घेऊन भाजून, वाटून मसाला घालून केलेली चविष्ट रस्सा भाजी आठवली. मग काय बांधला की हो पदर.! सगळ्या डाळी, दाणे भाजून, वाटून रस्सा केला. अय्या ! पण भाजलेले तांदूळ वाटायचे राहयलेच की जाउं दे ! घालू तसेच सबंध तांदूळ,एवढ्याशा तांदुळानी काय होणार आहे ? असं म्हणून मी तांदुळाची वाटी रिकामी केली.काय तरी बाई ह्या वांग्या वांग्यांनी डोकच फिरवलय. रसरशित फुललेल्या दगडी कोळशाच्या शेगडीवर भाजीचा हंडा चढवलाएकदाचा . “आज काय मग बेत” ?असं म्हणतच सगळेजण स्वयंपाक घरात डोकावले. मी थंडपणे उत्तर दिल, ” आज पण शेवटच्या वांग्याची, वेगळ्या प्रकारची,रस्सा भाजी केली आहे चला जेवायला “. सगळे नाक मुरडत मागच्या मागे पसार झाले. ह्यांना तर बोलायला जागाच नव्हती. कारण किलो दोन किलो वांगी हयांनीच तर आणली होती. माझ्या चेहऱ्याकडे बघून नवरोबांनी पण चक्क पळ काढला. पण काही म्हणा हं, भाजीचा सुगंध लपत नव्हता. बारा वाजले. पंगत बसली.आणि —
बापरे ! वाढताना लक्षात आल,भाजीत न वाटलेल्या तांदुळाचे प्रमाण जरा जास्तच झालय. एकजीव न झालेले अखंड तांदूळ माझ्याकडे डोळे वटारून बघताहेत आणि पाणबुडी सारख्या उड्या मारताहेत. चार घास खाऊन कसंबसं जेवण उरकून, ” ए आई आम्ही ग्राउंड वर जातो गं ” म्हणून मुल पसार पण झाली. हे मात्र भाजी चिवडत बसले होते. शेवटी न राहून इकडून विचारणा झाली “आजचा वांग्याचा प्रकार जरा वेगळा वाटला नाही कां?म्हणजे कुठे मासिकांत वाचलात कीं कुणी सखीनी शिकवला? नाही म्हणजे सहज विचारतोय, नक्की काय आहे हे ? वांग्याची भाजी का वांगी भात,? काय म्हणायच ह्याला ?”
मसाल्याबरोबर न वाटता सबंध तांदूळ घालून आधीच माझ्या चारी मुंड्या चीत झाल्या होत्या. तरी पण हार मानेल ती बायको कसली ? मी ठसक्यात उत्तर दिल, “आमच्याकडे ह्याला ‘ मसाला वांगी रस्सा भाजी ‘ , म्हणतात आणि माझ्या आईनेच तर मला ही शिकवलीय. आई पण अशीच करते ही मसाला वांगी. ह्यांचा घास हातातच राहयला. आ वासून ते माझ्याकडे बघतच राह्यले. ‘आता हीच्या आईने, म्हणजे आपल्या सासूबाईंनीच शिकवलं म्हणजे….
जाऊदे झाल ! पुढे काही न बोलणंच चांगल अशा धूर्त विचाराने, अगदी शेवटचं एकच राह्यलेलं वांग आ वासलेल्या तोंडात महाशयांनी कोंबल.आणि मी हुश्यss केल. संपली ग बाई एकदाची भाजी.
पुढे आईकडे गेल्यावर अगदी जस्सच्या तस्स आई पुढे मी ते वांगी पुराण मांडल. आणि लाडात येऊन म्हणाले, “ए आई अशीच करतेस नां गं तू ही भाजी ? मी तस ह्यांना सांगूनही टाकलंय की माझ्या आईने शिकवलीय ही भाजी मला.” आई काम करता करता एकदम थबकली . कपाळावर हात मारून पुटपुटली, “कार्टीनी तिच्याबरोबर जावयांसमोर माझीही अब्रू घालवली.जावई म्हणाले असतील, “अरे वा रे वा! आपली इतकी सुगरण बायको,आणि तिची आई म्हणजे आपली सासू खरंच किती सुगरण असेल.आईला नुसत्या कल्पनेनेच लाजल्यासारख झाल. आणि काय योगायोग बघा हं! हे नेमके त्याच दिवशी आईकडे यायचे होते. आई मधली सासू जागी झाली. पटकन माझ्या हातात पिशवी कोंबत ती म्हणाली, ” लवकर जा आणि मंडईतून वांगी घेऊन ये. आणि हो वाटेत मैत्रिण भेटली तर चकाट्या पिटत बसू नकोस.जावई यायच्या आत भाजी तयार झाली पाहिजे.” आहे का आता ! आई म्हणजे ना! मी कुरकुरले, ” आई अगं पुन्हा वांगी ? हे वैतागतील माझ्यावर” माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत आई म्हणाली, “जा लवकर आणि ताजी, छोटी, काटेरी वांगी आण पटकन.” हाय रे दैवा ! कुठून आईला हा किस्सा सांगितला असं झाल मला .कंटाळा तर खूssप आला होता पण आई पुढे डाळ शिजणार नव्हती. एकदाची चरफडत वांगी आणली. आणि जरा हाश हुश करीत दमले ग आई !असं म्हणून टेकले, लोडावर रेलून लोळण फुगडी घेऊन , माहेरपणाचा विसावा,घेण्याचा सुखद विचार करत होते . इतक्यात आईसाहेबांचे फर्मान आले.,” लोळू नकोस इकडे ये ,मी भाजी कशी करतेय ते नीट बघ. आणि तांदुळाचं वगैरे प्रमाण किती घेते तेही बघून ठेव.” मंडळी बघताय ना तुम्ही? माहेरी आले पण सासुरवासच कीं हो हा.! कुठून आईला ही वांग्याची गाथा सांगितली असं झालं मला. आणि हे तरी आजच का यावेत ? लगेच बायकोच्या मागे सासुरवाडीचा पाहुणचार झोडायला ? सगळे ग्रहच फिरलेत गं बाई माझे, पण करणार काय ? झक्कत उठले. आणि आईसमोर बसले. बघता बघता सगळी धान्य थोडी थोडी घेऊन भाजून,वाटून मसाला घालून चमचमीत भाजी तयार पण झाली. संपूर्ण घरभर भाजीचा घमघमाट सुटला होता. काय तरी बाई ! याच भाजीचा भुसावळला आपण केवढा मोssठ्ठा घोळ घातला होता. आणि ती तर मसाला भाजी नाही, तर मसाले भातच झाला होता. पाणबुडी सारखे अखंड तांदूळ त्यात उड्या मारत होते. पणअहाहा!ही आईने आत्ता केलेली भाजी रस्सेदार अशी,कित्ती छान दिसतीये . हे आले बारा वाजले. म्हणजे घड्याळयाचे हं . 😃 पानं मांडली . हात धुवायला जावई मोरीपाशी गेले. तेव्हा टॉवेल द्यायचं निमित्त करून मी पण हळूच पिल्लू सोडल, “अहो ऐकलंत का?आज जेवणात वांग्याची भाजी आहे बरं का! मी जेवढं हळू सांगितलं नां तेवढे हे जोरात किंचाळले “काsssय वांगी? आमच्या घरात आईकडे बाथरूम नव्हतं तर चौकोनी मोरी होती. तिथेच भला मोठा तांब्याचा वहिनीने लखलखीत घासलेला बंब आईने कोपऱ्यात त्रिकोणी तिवईवर व्यवस्थित बसवला होता.
हं तर काय सांगत होते, हे का s s sय ? करून ओरडल्यामुळे माझ्या भावाला शरद आप्पाला वाटल ह्यांना बंबाचा चटका बसला की काय ? तो एकदम पुढे येत म्हणाला, ” काय झालं बाळासाहेब ? बंबाचा चटका बसला का ? नाही म्हणजे ! एकदम ओरडलात म्हणून म्हटलं.” हे गडबडले ओशाळून म्हणाले, “नाही ! नाही! तसं नाही.,! “असं म्हणत मी दिलेल्या टॉवेलमध्ये त्यांनी तोंड खूपसलं. तेवढ्यात, शरद आप्पासाहेब गरजले” अरे त्या बंबाची जागा बदला रे कुणीतरी. ” एवढ्या सगळ्या गोंधळात मी कशाला थांबतीय तिथे? वांग्याच्या भाजीचे पिल्लू सोडून मी पळ काढला. आईजवळ येऊन उभी राहयले तर आई गालातल्या गालांत हंसत होती.’ त ‘ वरून ताकभात ओळखण्या इतकी ती नक्कीच हुशार होती .या सगळ्या प्रकरणाची काहीच माहिती नसल्याने वहिनी मात्र विचार करीत होती,बंब कुठे ठेवायचा? असा हा सावळा गोंधळ कुठून कुठे चालला होता.
पानावर बसल्यावर जावई सासुबाईंना म्हणाले, “सासूबाई भाजी जरा कमी करता का? नाही म्हणजे वांग्याची भाजी मला सोसत नाही अलर्जी आहे .” हा इशारा मला होता. मुकाट्याने वाटी उचलून त्यात फक्त दोनच चमचे भाजी वाढून मी वाटी ह्यांच्या पुढे ठेवली.पहिला वरण भात संपला.आता पाळी आली भाजीची. ह्यांनी भाकरीचा तुकडा मोडून घास तोंडात घातला.आणि डोळेच विस्फारले. एका सेकंदात वाटी रिकामी झाली.अगदी चाटून-पुसून वाटी घासल्यासारखी लख्ख झाली. उस्फूर्तपणे शब्द बाहेर पडले, ” सासूबाई काय कमाल आहे!मस्त झालीय हो भाजी. खूपच छान ! नाहीतर आमच्याकडची बाई साहेबांनी केलेली भाजी, नव्हे.. नव्हे वांगी भातच म्हणावं लागेल त्याला .नको नको ती आठवणच नको!. असं म्हणून चेहरा वेडा वाकडा करत जावयांनी विनवल, ” सासुबाई एक विनंती आहे, तुमची लेक माहेर पणाला आली आहे ना, तर रोज शाळा घ्या तिची. “आई झटकन पुढे झाली. आणि म्हणाली,”असं नका हं म्हणू, ही भाजी तुमच्या बायकोनीच केली आहे ” आईने पांघरूण घातल्यावर मीही नाक फुगवून म्हणाले, ” बर का आई ! आत्ता तुझ्या देखरेखी खाली मी भाजी केलीय . अशीच भाजी पुन्हां मी करूनच दाखवीन.” खाली मान घालून घे पुटपुटले नको नको!काही दिवस तरी नको. ” लगेच वहिनी म्हणाली,” आता सासुबाईंच्या देखरेखी खाली मी पण तयार होणार आहे.आणि म्हणणार आहे ,” हम भी कुछ कम नहीं ”
मैत्रिणींनो –वांगी पुराण– संपलं. एक गोष्ट मात्र लक्षात आली, माझी आई,सुगरण, संसार दक्ष, संसाराचा समन्वय साधणारी आणि सगळ्यांना शिस्तीत मार्गदर्शन करणारी होती. तसंच मला व्हायचं आहे. पण या कथेवरून तुम्हीही एक धडा घ्या बरं का ! वांगी खूप नका हं आणू? नाहीतर रोज वांगी..वांगी.वांगीपुराणच होईल तुमच्या घरी. .
ज्ञानेश्वर कोमल मनाचे ज्ञानी संत. त्यांचे दृष्टांत व उपमा विशेष करून नेहमीच्या व्यवहारातील व निसर्गातील आहेत. आपण वसंत ऋतू म्हणजे निसर्गाशी निगडित म्हणतो. वसंत म्हणजे निसर्गाचे सौंदर्य, तेज, झाडावेलींची टवटवी, नवी पालवी, फळांचा बहर असा अर्थ घेतो. ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ जास्त व्यापक आहे. तो निसर्गापुरता मर्यादित नाही. निसर्ग त्यांना आवडतोच, वसंत ऋतूचा उल्लेख ते माधवी असा करतात. एकच वस्तू पाच ज्ञानेंद्रियांनी पाच प्रकारची दिसते, पाच प्रकारे तिचा अनुभव घेता येतो. तसाच एकाच वसंत ऋतुचा वीस दृष्टीने ज्ञानेश्वर विचार करतात. वसंत ऋतुच्या रूपागुणांचा जेथे जेथे उत्कर्ष तेथे तेथे त्यांना वसंत दिसतो. म्हणून हा वसंत दोन महिन्याच्या काळापुरता मर्यादित नाही.
व्यासांच्या बुद्धीच्या तेजात, प्रतिभेत ज्ञानेश्वरांना वसंत दिसला. त्यामुळे महाभारताला वैभव प्राप्त झाले. अर्जुनाला ते वसंत आणि कृष्णाला कोकिळ म्हणतात. कारण अर्जुनाला पाहून कृष्णरुपी कोकीळ बोलू लागला. गीताख्यान सुरू झाले. तसेच ज्ञानी पुरुषातही त्यांना वसंत दिसतो. कारण वसंताचा प्रवेश जसा झाडाच्या टवटवीवरून कळतो तसेच ज्ञानी पुरुषाचे ज्ञान त्यांच्या हालचालीतून, वागण्या बोलण्यातून प्रकट होते. सद्गुरूंमध्येही ज्ञानेश्वरांना वसंत दिसला. म्हणून ते सद्गुरूंना म्हणतात ‘माझी प्रज्ञा रुपी वेल्हाळ। काव्ये होय सुफळ।तो वसंत होय स्नेहाळ। शिरोमणी।(१४/२१) माझ्या बुद्धीरुपी वेलीला काव्यरूपी सुंदर फळ देणारे कृपाळू वसंत तुम्ही व्हा.चेतनेला ते शरीररुपी वनाचा वसंत म्हणतात कारण त्यामुळे मन बुद्धी प्रसन्न राहते.
योग्य काळाचे महत्व सांगताना ते म्हणतात, माळ्याने कितीही कष्ट केले तरी वसंत ऋतू येतो तेव्हाच फळे लागतात. माधवी जसे मनाला मोहित करते तसे दैवी माया म्हणजे मोहरुपी वनातील वसंतच, कामरुपी वेल वाढवते. योग्य अपेक्षेविषयी सांगताना ते म्हणतात, वसंत असला तरी आकाशाला फुले येत नाहीत. अनासक्ती आणि निरपेक्षतेचे उदाहरण म्हणजे वसंत. ‘का वसंतांचिया वहाणी।आलिया वनश्रीचिया अक्षौहिणी। तेन करीतुची घेणी। निघाला तो।(१६/१६४) वनाच्या शोभेचे अनेक समुदाय आले तरी त्यांचा स्वीकार न करता वसंत निघून जातो. एवढेच नव्हे तर त्या फळाफुलांना, पालवीला हातही लावीत नाही. कर्मफलत्यागाचं हे उदाहरण!
वसंत ऋतूतील वाऱ्याला ते आईच्या प्रेमाची उपमा देतात. कारण त्याचा स्पर्श आईच्या प्रेमासारखा मऊ असतो. वसंत ऋतू प्राप्त झाला असता झाडांना अकस्मात पालवी फुटते. कशी ते झाडानाही कळत नाही आणि ती थांबवणे त्यांच्याही हातात नाही, स्वाधीन नाही. यातून भगवंताच्या स्मरणाने मी पणा कसा विसरतो हे दाखवून देतात. ‘वाचे बरवे कवित्व। कवित्वीं बरवें रसिकत्व। रसिकत्वी परतत्व। स्पर्श जैसा।'(१८/३४७ ) या आपल्या वचनाला आधार म्हणून ते वसंत ऋतूचे उदाहरण देतात. वसंत ऋतूतील अल्हाददायक बागेत प्रिय माणसाचा योग चांगला आणि त्यात इतर उपचारांची प्राप्ती व्हावी, तसाच वाचा, सुरस कवित्व आणि परमात्मतत्व यांचा संबंध. गीता आख्यानला तर ते भक्तरुपी वनातील वसंत म्हणतात .’वसंत तेथे वने। वन तेथे सुमने। सुमनी पालींगने। सारंगाची। (१८/१६३५)वसंत तेथे वने, वन तेथे सुमने आणि सुमन तेथे भ्रमरांचे समुह. याचाच अर्थ येथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी आणि जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी व भक्तांचे समुदाय.याचाच मतीतार्थ येथे कृष्ण व अर्जुन तेथे विजय व इतर सर्व भरभराट. हाच गीतेचा मतीतार्थ.
वसंतावरील शेवटच्या ओवीत ज्ञानेश्वर म्हणतात ‘नाना गुंफिली का मोकळी।उणी न होती परिमळी। वसंता गमीची वाटोळी। मोगरी जैसी।(१८/१७४०) वसंत ऋतूतील मोगरीची वाटोळी फुले, ओवलेली असो वा मोकळी, वासाच्या दृष्टीने त्यात कमी जास्त पणा नाही. त्याचप्रमाणे संस्कृत गीता आणि त्यावरील मराठी विस्तृत टीका दोन्ही शोभादायकच. दोन्ही मोगऱ्याचीच फुले,भाषारुपी वसंतातील!
एकंदरीत विचार करता गीतेतील तत्त्वज्ञानच या 20 ओव्यातून ज्ञानेश्वर सांगतात. वसंतांचा इतका विविधांगी विचार करणारे एकमेव ज्ञानेश्वरच. वसंत म्हणजे दोन महिन्याचा सृष्टी शोभा वाढवणारा कालावधी आहेच पण त्याच बरोबर वसंताचे कार्य करणारी व्यक्ती, वस्तू किंवा विचार म्हणजे वसंतच. म्हणून म्हणावे वाटते ज्ञानेश्वर रुपी वसंत या भारत वर्षात बहरला म्हणूनच गीतारूपी वनाची शोभा, जी ज्ञानेश्वरी, तिचा आस्वाद आपल्यासारख्या सामान्य भ्रमरांना घेता आला.
धन्य ते ज्ञानेश्वर आणि धन्य त्यांच्या ज्ञानेश्वरीतील वसंत!अशा या प्रतिभावंत ज्ञानेश्वरांना शतशः प्रणाम।
ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे क्रमांक जेथे वसंताचा उल्लेख आहे.
☆ वास्तवातली मूल्ये… लेखक : श्री ओंकार दाभोडकर ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆
काल लोकलमधे ३-४ मंडळींमध्ये रावणाचं कौतुक करणारं डिस्कशन सुरू होतं. प्रोपागंडा रुजत रुजत सार्वत्रिक मत कसं तयार होतं याचं लाईव्ह प्रात्यक्षिक बघितलं. खोटे हिरो निर्माण करण्याचा प्रकार हसून, गंमत म्हणून सोडून देण्यात आला की सामान्य माणूस कसा घडत जातो याची जाणीव अधिकच ठळक झाली.
कथा कादंबऱ्या म्हणून प्रसिद्ध झालेली पुस्तकं गाजतात, चर्चा होतात आणि वास्तवाचा अन त्याहून महत्वाचं – मूलभूत मूल्यांचा – सगळा कचरा होऊन बसतो.
रावण त्याच्या गुणांमुळे आदर्श वाटावा असं बरंच काही होतंच त्यात. ज्ञानी, तपस्वी, कर्तबगार, योद्धा…बऱ्याच अनुकरणीय गोष्टी होत्या. रामायणात त्यांची दखल घेतली गेली आहेच. परंतु रावण समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्व होऊ शकत नाही. कारण त्याच्या दुर्गुणांमुळे सगळे सद्गुण मागे पडले.
अहंकारी, दुराग्रही, वासनांध – हेच रावणाचं खरं रूप आहे. हे रूप न ओळखता रावण ग्रेट वाटायला लागला तर ती फक्त सुरुवात असते. हळूहळू आपल्याला श्रीराम कमी महत्वाचे वाटायला लागतात. मग श्रीरामांचे गुण – ज्यांमुळे श्रीराम “श्रीराम” ठरतात – ते झाकोळले जायला लागतात. छत्रपती शिवराय याच श्रीरामाचं चरित्र शिकून स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरित झाले हे आपण विसरायला लागतो.
हळूहळू नाळ तुटत जाते.
रावणाने सीता मातेला तिच्या मर्जी विरुद्ध स्पर्श न करणे मोठं आदर्श वर्तन समजलं जातं. एका महिलेच्या अपहरणाचं समर्थन करायला “फक्त युद्ध टेक्निक म्हणून”, “बहिणीच्या अपमानाचा बदला म्हणून” वगैरे कारणं दिली जातात.
मग श्रीरामांनी सीतेची परीक्षा घेतली, प्रेग्नन्ट बायको जंगलात सोडली…हे सगळं खटकायला लागतं.
पण आपल्याला खरी स्टोरी माहितीच नसते. सांगितली गेलेली नसते. त्या स्टोरीचे पर्स्पेक्टिव्हच समजावून सांगितले जात नाहीत. प्रोपागंडा सशक्त होत जातो.
रावणाने सीता मातेला स्पर्श करण्यामागे त्याचं चरित्र नव्हे – हतबलता होती.
रंभेवर केलेल्या बलात्कारा नंतर चिडून नलकुबेराने “यापुढे कुठल्याही स्त्रीला तिच्या इच्छेशिवाय स्पर्श जरी केलास तरी भस्म होशील” हा शाप दिला होता रावणाला. रावण “असाच” होता. विलासी, भोक्ता, बलात्कारी. राजा असणं, बलवान असणं रावणाने “असं” मिरवलं. वाट्टेल त्या स्त्रीचा, आसक्तीचा भोग घेऊन. (वाल्मिकी रामायणात, ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यानंतर रावणाने त्रिलोकात माजवलेला हाहाकार स्पष्ट मांडला आहे. स्त्रियांच्या अपहरणासकट. सीतेला आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न करताना रावण हीच शेखी मिरवतो.)
दुसरीकडे राजपुत्र श्रीराम.
पत्नी अदृश्य झाली म्हणून “जाऊ दे!” म्हणून दुसरं लग्न न करणारा. तिच्यासाठी उद्विग्न होणारा. तिला शोधत भटकणारा. ३००० किलोमीटर पायपीट करून अपहरणकर्त्या बरोबर युद्ध करून तिला मुक्त करणारा.
आणि आपल्या पत्नीवर अमर्याद प्रेम असूनही – स्वतःचं राजकीय, जबाबदार स्थान न विसरणारा.
जनतेचा आपल्या राणीवर विश्वास असायला हवा हे ओळखणारा.
सीता एका रामाची बायको नव्हती फक्त. ती महाराणी पदावर विराजमान होती. सिंहासनावर बसलेला राजा विष्णूचा अवतार मानून त्याला दिशादर्शक मानणाऱ्या समाजाचा काळ होता तो. तिच्या पोटी जन्मणारं अपत्य पुढे सिंहासनावर बसणार होतं. सीता त्या राज्याची माता होती.
जनतेचं मन मातेबद्दल कलुषित झालं असेल तर लोक पित्याला मानतील?
सिंहासनावर त्यांची श्रद्धा टिकून राहील? स्थैर्य असेल राज्यात?
मुळात असं राज्य टिकेल?
जनतेला काही कळत नाही – असं म्हणून सोडून देता येत नसतं. सिंहासनावर बसलेल्या राजाला – जर तो रावणासारखा उन्मत्त, बेफिकीर, बदफैली नसेल तर – हा सगळा विचार करावा लागतो. तेच त्याचं पहिलं कर्तव्य असतं. तो नवरा नंतर असतो – सर्वात आधी तो जनतेचा राजा, प्रतिपाळ करणारा असतो.
म्हणून त्याने स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अतिशय कठोर नियम पाळायचे असतात.
हे चूक नाही का? सीतेवर हा अन्याय नाही का? लव-कुशवर हा अन्याय नाही का?
आहेच. रामासकट – सीता, लव-कुश या स्वतंत्र व्यक्तींवर हा अन्याय नक्कीच आहे. पण राजा – राणी – राजकुमार यांचं हे कर्तव्य आहे. दुर्दैवी वाटेल कदाचित. पण स्वायत्त यंत्रणांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर हे अत्यावश्यक आहे.
आधुनिक काळात हे कसंसंच वाटत असेल कदाचित. पण आजही इंग्रजीत जेव्हा Caesar’s wife must be above suspicion म्हटलं जातं तेव्हा कौतुकाने मान डोलावतोच आपण. सिझरच्या बाबतीत झटकन सहमत होणारे आपण, श्रीरामांनी स्वतःच्या आवडीनिवडीवर, स्वातंत्र्यावर, सुखावर सतत, जन्मभर पाणी सोडलं हे सहजच विसरून जातो.
महत्वाच्या राजकीय पदावर विराजमान असलेल्याना व्यक्तिस्वातंत्र्य एका मर्यादेतच असणार. त्यांच्यासाठी नैतिकतेचे नियम अधिक कठोर, अधिक अरुंद असणार.
पूर्वीही असंच होतं – आजही असंच आहे. (किमान असायला हवं!)
वाट्टेल तसं वागण्याचं स्वातंत्र्य सामान्य व्यक्तीला ठीकाय.
राजाला ते स्वातंत्र्य नाही.
सीझरला ही नाही, त्याच्या पत्नीला ही नाही.
हे भान श्रीरामांना होतं.
म्हणून ते श्रीराम होते.
सत्तेत धुंद झालेला, वाट्टेल तेव्हा वाट्टेल ते करणारा रावण – म्हणूनच – पंडित, महादेवाचा भक्त वगैरे असूनही – आपला आदर्श होऊच शकत नाही.
म्हणूनच – राम की रावण, अर्जुन की कर्ण – हा निर्णय कादंबऱ्या वाचून करू नये.
मूळ चरित्र वाचून, समजून मग करावा.
कारण मुद्दा राम की रावण या दोन व्यक्तींचा नाहीच.
तो तसा कधीच नसतो.
मुद्दा या दोन्ही नावांमागील मूल्यांचा असतो.
ती मूल्यं सर्वात महत्वाची.
म्हणूनच श्रीराम महत्वाचे!
जय श्रीराम!
लेखक : श्री ओंकार दाभोडकर
प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपका भावप्रवण कविता – कथा क्रम (स्वगत)…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 193 – कथा क्रम (स्वगत)…
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत “रात सुन्दर रूप चौदस की...”)
☆ साप्ताहिक स्तम्भ # 193 ☆।। अभिनव गीत ।। ☆
☆ “रात सुन्दर रूप चौदस की...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
श्री हनुमान साधना सम्पन्न हुई। अगली साधना की जानकारी आपको शीघ्र ही दी जाएगी।
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈