मराठी साहित्य – मराठी आलेख – * पारंपरिक उत्सव काळाची गरज * – सुश्री रंजना लसणे 

सुश्री रंजना लसणे 

पारंपरिक उत्सव काळाची गरज – गणेश जयंती
(e-abhivyakti में  सुश्री रंजना लसणे जी का स्वागत है।  प्रस्तुत है  पारंपरिक उत्सवों  की महत्ता पर  सुश्री रंजना जी का एक आलेख) 
माघ शु. चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती  घरा शेजारी असलेल्या गणेश मंदिरात काल खूप  मोठा गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला अगदी नियोजन बद्ध रीतीने साजरी करण्यात आली आठ दिवस अगोदरच बच्चे कंपनी ते आजी आजोबा सगळे जोमाने कामाला लागले ज्यांना जे जमेल ते काम कुठल्याही जबरदस्ती शिवाय उचलले गेले अगदी गल्ली बोळी सफाई ते व्यासपीठ उभारणी पर्यंत सगळी कामे शिस्तबद्ध रितीने व उत्साहात पार पडली तृतीयेला लहान मुलींची भजन जुगलबंदी अक्षरशः बारा तास रंगली. नऊ ते चौदा वयोगटातील मुली परंतु अंगावर शहारे येईल असे सादरीकरण रात्री बारा पर्यंत चालले, भजनाच्या तालावर सगळी कामेही जोरात सुरूच होती. अगदी जवळपासच्या गावातील लोकांनीही कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
ज्या दिवसाची आतूरतेने वाट पाहात होते तो दिवस म्हणजेच माघ शु. चतुर्थीचा दिवस उगवला.  पहाटेच  ब्रह्म मुहूर्तावर सुमधुर आवाजात गणेश वंदना लावण्याता आली. फक्त गल्लीच नव्हे तर पूर्ण गावच सडा रांगोळ्यांनी साजला गेला अगदी दिवाळी सारखा. लहान मुले ते वयस्कय मंडळी पर्यंत सारेच उत्साहाने कामाला लागले , सगळे भेदभाव विसरून ज्याला जे जमेल ते काम तो करू लागला. मंगलमय  गणेश याग करण्यात आला  नंतर गणेश प्रतिमेची उत्साहाने कलश यात्रा काढण्यात आली. गावाती लहान मुली ते प्रौढ स्त्रिया कलश घेऊन  मिरवणूकीत सामील झाल्या ,वृद्ध पुरूष सुद्धा टाळ वीणा घेऊन हजरच होते. मागच्या वर्षी  या मंडळाला गणेशोत्सवाचा  जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार  मिळाला . त्यातूनच ढोल पथकासाठी साहित्य आणून सुंदर ढोल पथकतयार करण्यात आले होते.   दररोज सायंकाळी हरीपाठ भजन घेतले जाते यात लहान मुले ते वयस्कर मंडळी यांचा समावेश असतो. पूर्ण गावच जणू मिरवणूकीत सहभागी झाला होता.  या दिवशी बारा ते तीन कीर्तन घेण्यात आले त्या नंतर महाप्रसाद ठेवण्यात आला अगदी रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रम चालला  प्रत्येकजण शिस्तबद्ध रीतीने एकमेकांच्या सहकार्याने काम करत होते. दिवसभर मिळणारा प्रसाद मोदक यावर बच्चा पार्टी एकदम खूष होती सार्वजनिक सकस आहाराची सर्वांनाच मेजवानी होती .शिवाय परस्पर सहकार्य प्रेम सेवा , एकात्मता , सृजनानंद , संस्कृतीचा आदर इत्यादी अनेक मूल्ये विकसित होण्यास मदत झाली.
कुठलाही सांस्कृतिक उत्सव केवळ अंधश्रद्धा कालबाह्य परंपरा म्हणून ते नाकारण्या पेक्षा त्यातील चांगल्या गोष्टी घेवून त्या वृद्धींगत केल्या पाहिजेत शिवाय आजच्या गरजा ओळखून त्यात आवश्यक ते बदल करून ते नव्याने सुरू केले तर अनेक सामाजिक सांस्कृतिक मूल्ये सहज राबवता येतील लहान थोर मंडळी एकत्र येऊन कार्य केल्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर कमी होऊन विचारांची देवाणघेवाण होईल समाजातील सर्व स्तरातील लोक सहभागी होत असल्यामुळे सामाजिक ऐक्य निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल यासाठी जुन्या उत्सवांना असे नवीन रूप मिळणे ही आजच्या काळाची गरज आहे असे मला वाटते.
© रंजना लसणे
बाळापूर आखाडा,  हिंगोली