मराठी साहित्य – संस्मरण ☆ लेखांक # 7 – मी प्रभा… अभिमंत्रित वाटा ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? आत्मकथन ?

☆ लेखांक# 7 – मी प्रभा… अभिमंत्रित वाटा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आयुष्य खूप सरळ साधं होतं, वीस वर्षाची असताना लग्न, बाविसाव्या वर्षी मुलगा, घर..संसार इतकंच आयुष्य !

पण वयाच्या चौदाव्या वर्षीच माझ्या आयुष्यात “ती ” आली होती, तिच्या विषयी मी असं लिहिलंय, 

ही कोण सखी सारखी,

माझ्या मागे मागे येते

हलकेच करांगुली धरूनी

मज त्या वाटेवर नेते —–

मला त्या अभिमंत्रित वाटेवर नेणारी माझी सखी म्हणजे माझी कविता!

कविता करायची उर्मी काही काळ थांबली होती, कालांतराने…कविता  सुचतच होती,  त्या मासिकांमध्ये प्रकाशित होत होत्या. १९८५ बहिणाई मासिकाने आयोजित केलेल्या कविसंमेलनात कविता वाचली.त्या संमेलनाचे अध्यक्ष होते कविवर्य वसंत बापट !ते “कविता छान आहे” म्हणाले, सर्वच नवोदितांना वाटतं तसं मलाही खूप छान वाटलं ! 

त्यानंतर अनेक काव्यसंस्था माहित झाल्या. काव्य वाचनाला जाऊ  लागले. एका दिवाळी अंकाचं काम  पहायची संधी अचानकच मिळाली, साहित्यक्षेत्रात प्रवेश झाला. लग्नाच्या  आधी मी कथा, कविता लिहिल्या होत्या ! लेखन हा माझा छंद होताच पण लग्नानंतर मी काही लिहीन असं मला वाटलं नव्हतं ! पण पुन्हा नव्याने  कविता कथा लिहू लागले !

या अभिमंत्रित वाटेवर चालताना खूप समृद्ध झाले. अनेक साहित्यिक भेटले. स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. लेखनाचा आनंद वेगळाच असतो. मी चांगलं लिहिते याची नोंद इयत्ता दहावीत असताना हिंदीच्या जयंती कुलकर्णी मॅडमनी घेतली होती, माझ्या सहामाही परिक्षेत लिहिलेल्या “फॅशन की दुनिया” या निबंधाचं त्यांनी भरभरून कौतुक केलं होतं.

पण भविष्यात मी लेखिका, कवयित्री, संपादक होईन असं मला वाटलं नव्हतं ! मी अजिबातच महत्वाकांक्षी नव्हते….नाही ! घटना घडत गेल्या आणि मी घडले . कदाचित पुण्यात असल्यामुळेही असेल ! कविसमुदायात सामील झाले,काव्यक्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख मिळाली !

वेगळं जगता आलं,हीच आयुष्यभराची कमाई ! मी शाळेत असताना शैलजा राजेंच्या खूप कादंब-या वाचल्या होत्या. लग्नानंतर त्या रहात असलेल्या सोमवार पेठेत रहायला आले. त्यांना जाऊन भेटले. पुढे त्यांनी माझ्या दिवाळी अंकासाठी कथाही पाठवली. मी “अभिमानश्री” या स्वतःच्या वार्षिकाचे जे चार अंक काढले,ते संपादनाचा चौफेर आनंद देऊन गेले.

अनेक साहित्यिक कलावंत भेटले, मुलाखती घेतल्या….कवितेचे अनेक कार्यक्रम केले.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग नोंदवला! गज़ल संमेलनातही !

माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला खूप श्रीमंत अनुभव या साहित्य क्षेत्रानेच मिळवून दिले…दोन नामवंत काव्य संस्थांवर पदाधिकारी म्हणून काम पहाता आलं, साहित्य विषयक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवतात आला !

खूप वर्षांपूर्वी कवयित्री विजया संगवई भेटल्या अचानक, टिळक स्मारक मंदिरात.  नंतर तिथल्या पाय-यांवर बसून आम्ही खूप गप्पा मारल्या. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, “आपण कवयित्री आहोत हे किती छान आहे, आपल्या एकटेपणातही कविता साथ देते,आपण स्वतः मधेच रमू शकतो “. ते अगदी खरं आहे !

नियतीनं मला या अभिमंत्रित वाटेवर आणून सोडल्याबद्दल मी खरंच खूप कृतज्ञ आहे…

अल्प स्वल्प अस्तित्व मज अमूल्य वाटते

दरवळते जातिवंत खुणात आताशा

अशी मनाची भावावस्था होऊनही बराच काळ लोटला…….

या वाटेवर मनमुक्त फिरताना उपेक्षा, कुचेष्टा, टिंगलटवाळीही वाट्याला आली, पण जे काही मिळालं आहे, त्या तुलनेत हे अगदीच नगण्य !

सांग “प्रभा” तुज काय पाहिजे इथे अधिक?

रिक्त तुझ्या या जीवनात बहरली गज़ल

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈