सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “चित्रपटनगरीची जादू…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

चित्रपटनगरी तशी अफलातून नगरी.  हे तसं म्हंटलं तर वादळी क्षेत्र.ह्याची दुनियाच वेगळी. ह्या क्षेत्रात सगळंच मुळी बेभरवशाचं बघा.काहींना अल्पावधीतच यश मिळतं तर काहींची हे यश मिळविण्यासाठी संपूर्ण कारकिर्दच पणाला लागते.कुणाला हे यश स्वतःच्या रुपावर मिळतं तर काहींच यश हे त्यांचा उच्चप्रतीचा अभिनय ओढून आणतो. काहींना पचवता येणार नाही इतकी अलोट संपत्ती येथून मिळते तर काहींना ही मायानगरी अक्षरशः कंगाल बनविते. पण तरीही बहुतेकांच्या मनात ह्या चित्रपटसृष्टीविषयी आवड,उत्सुकता, कुतूहल हे असतं, अगदीच खासकरून अभिनेते वा अभिनेत्रींबाबत.

ह्या नगरीत अनेक आवडते कलाकार आपली कला फुलवित भरघोस योगदान देतात  तर काही व्यक्तींनी ह्या क्षेत्रात भरघोस योगदान देण्याआधीच एक्झीट घेतलीयं.

ही मायानगरी म्हणजे एक अख्ख भलमोठं कुटूंबच असत जणू. कुटूंबाप्रमाणेच सगळी कामं ही वेगवेगळ्या लोकांनी वाटून घेतलेली असतात. ह्या क्षेत्राचे कायम आपल्या सामान्य जनतेला आकर्षण, उत्सुकता वाटत असते.काळ खरच खूप बदललायं. आता ह्या मध्ये चांगले वाईट हा वादग्रस्त मुद्दा विचारात न घेता फक्त एक गोष्ट नक्कीच मान्य करुया ,की ह्मा बदलत्या काळामुळे स्थित्यंतरे आलीत, गोष्टी मुळासकट खूप बदलत गेल्यात.काही चांगल्या गोष्टी काळाच्या उदरात गडप झाल्यात तर काही चांगल्या गोष्टींचा उदय पण झाला. असो शेवटी कालाय तस्मै नमः हेच खर.

बदलत्या काळानुसार, वयानुसार आवडीनिवडी ह्या खूप बदलतात. प्रत्येक वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आपल्या आवडी वा गरजा ह्यामध्ये आमुलाग्र बदल होतो.खरतरं आपण व्यक्ती त्याच असतो पण आपलाच आपल्या बदलत्या आवडी बघितल्यावर प्रश्न पडतो खरचं आपण त्याच व्यक्त आहोत?

अगदी उदाहरणादाखल बघितले तर आपली स्वतःची चित्रपटांची आवड,चित्रपट बघण्याची क्रेझ, त्यासाठी करावी लागणारी खटपट, ह्या विषयातील चोखंदळपणा ह्यात जमीनआसमान चा फरक पडलाय, किंबहुना अजूनही पडतोय.

लहानपणी वा तरुणवयात आठवड्यातून एकदाच टीव्हीवर बघायला मिळणारा चित्रपट हे एक खूप मोठे आकर्षण होते.त्यासाठी त्या दिवसात घरच्यांनी सांगितलेली कामे,अभ्यास ह्या गोष्टी नियमानुसार कटाक्षाने पाळाव्याच लागतं.तेव्हा सर्रास थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायची पद्धत. नव्हती.आधी पालक त्या चित्रपटविषयी जाणून घेऊन मगच सठीसहामाशी आपल्या मुलांना एखादा चित्रपट बघण्यासाठी परवानगी देत असतं. फक्त शाळे कडून दाखविल्या जाणारे इतिहास वा सामाजिक विषयक चित्रपट बघायला मिळायचे.असो तो काळच वेगळा होता.

तरुण वयात फारसा कथानकाचा विचार न करता गाणी,हाणामारी ह्यांनी भरलेले चित्रपट हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असायचे. नंतर जस वय वाढत गेलं,जरा प्रगल्भता आली तेव्हा कथा

दिग्दर्शक  कलावंत ह्याकडे काळजीपूर्वक चोखंदळपणे अभ्यासपूर्ण बघून मग चित्रपट बघण्याची जाण आली.आणि आता तर अजून थोड वय पुढ गेल्यावर फारशी चित्रपट बघण्याची ईच्छा वा इतका वेळ देण्याचा स्टँमिना पण नाही राहीला.

पूर्वी चित्रपट कमी बघायला मिळायचे म्हणूनही कदाचित त्याची जास्त ओढ होती. अति मिळालं की नाविन्य,गोडी संपुष्टात येते त्यानुसार टीव्ही, वाहिन्या, थिएटर ह्यांच्या मुबलकतेमुळे चित्रपट बघण्यातील गोडवाच कुठेतरी हरवून गेला असं वाटतं.पण त्या चंदेरी आठवणी मात्र  कायम  असतात.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments