मराठी साहित्य – विविधा ☆ १५  सप्टेंबर अभियंता दिन / १७ सप्टेंबर विश्वकर्मा दिन ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ १५  सप्टेंबर अभियंता दिन / १७ सप्टेंबर विश्वकर्मा दिन ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

15 सप्टेंबर. ! अभियंतादिन. तमाम इंजिनिअर्सनां शुभेच्छा. अभियंतादिन ज्या व्यक्तीच्या अफाट, अचाट कर्तृत्वामुळे अस्तित्वात आला त्या व्यक्तीला आपण विसरुच शकणार नाही.

हे आदर्श अभियंता म्हणजे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या, ज्यांना”‘नाईट कमांडर” म्हणून ओळखल्या जातं. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 चा.

त्यांचे वडिल हे एक संस्कृत विद्वान होते व हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य होते. मात्र हे पंधरा वर्षांचे असतानांच वडीलांचे निधन झाल्याने ह्यांच्यावर संकटाचा डोंगरच कोसळला होता. वडील खूप हुषार होते परंतु तेव्हाचा काळ हा सरस्वती व लक्ष्मी एकत्र नांदत नसते ह्या पध्दतीचा होता. त्यामुळे त्यांचे वडील बुध्दीमान असूनही पैसा गाठीशी न जोडून ठेवल्याने त्यांच्या पश्चात ह्यांच्या कुटूंबाला परिस्थीतीचे चटके खूप सोसावे लागले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथुन बी. ए. ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग, पुणे मध्ये पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.

अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर, त्यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून एका कामगिरीचा श्रीगणेशा करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतिशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी ‘सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली’ विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील  खडकवासला धरणास लावण्यात आली. ही द्वारे, धरणातील साठ्याची पूरपातळी, पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत. या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे, ती दारं ग्वाल्हेर व म्हैसूर येथील धरणांवर बसविण्यात आली.

सर विश्वेश्वरैया ह्यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती च्या रांगेत बसविण्यात आले. विशाखापट्टणम  बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. सर मो. विश्वेश्वरैया ह्यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची संपूर्ण जबाबदारी स्विकारुन देखरेख केली. या धरणाचे बांधकामाने तेव्हाच्या काळातील हे आशियातील सर्वात मोठे सरोवर ठरले. ह्यामुळेच ते  ‘म्हैसूर राज्याचे पिता’ म्हणून ओळखले जावू लागले.

त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान, त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी, , किटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट, बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बॅंक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, मैसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अनेक औद्योगीक प्रकल्प सुरु केलेत. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला. त्यांचे वेळेचे नियोजन, प्रामाणिकपणा आणि झोकून देऊन समोरील काम यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेणे हीच त्यांची शेवटपर्यंत ओळख बनली. तिरुमला-  तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले.

सर विश्वेश्वरय्या ह्यांची सुरत येथून  पुण्याच्या सेन्ट्रल डिव्हिजनमध्ये असिस्टन्ट  चीफ इंजिनिअर या पदावर बदली झाली. पुणे विभाग हा मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये मोडत असे. या पुणे विभागातच मुंबई प्रेसिडेन्सीमधील सर्वात मोठे असे दोन साठवण जलाशय होते. खडकी क्यानटोन्मेंट विभागाला गाळलेल्या पाण्याचा पुरवठा केला जात असे. मुळा नदीच्या एका कालव्यातून हे पाणी फिफे जलाशयात येत असे. मुळा नदी उन्हाळ्यात कोरडी पडायची तर पावसाळ्यात पूर येउन दगडी बंधाऱ्यावरून पाणी वाहून फुकट जात असे. अस्तित्वात असलेले दगडी धरण उंच करायचे तर पायाच्या भिंतीना अधिक  जलस्तंभामुळे धोका संभवला असत. मग अधिक पाणी साठवण्यासाठी काय मार्ग काढावयाचा ?हा सगळ्यांसमोर यक्ष प्रश्न पडला. श्री विश्वेश्वरय्या यांच्यावर मोठीच जबाबदारी पडलेली होती. परंतु अशा स्थितीत न डगमगता खंबीरपणे त्यांनी या सांडव्यावर ७ ते ८ फूट अधिक पाणी साठवू शकतील असे दरवाजे बनवण्याचे ठरवले आणि स्वतःच्या तल्लख बुद्धीने त्यांनी स्वयंचलित दरवाज्यांचे डिझाईन तयार केले. धरणाच्या  सांडव्यावर आणखी ८ फूट जलस्तंभ अडवतील असे ऑटोमाटिक दरवाजे त्यांनी बनवले. पावसाळ्यात या दरवाज्यांमुळे ८ फूट पाणी अडल्यानंतर जर आणखी अधिक पाणी वाढू लागले तर हे दरवाजे ऑटोमॅटिकली उघडत आणि जादाचे पाणी वाहून जात असे. एकदा का जादा पाणी येण्याचे थांबले की ते दरवाजे बंद होत. हा एक महान आणि क्रांतिकारी शोध त्यांनी लावला. सरकारने त्यांच्या नावाने ह्या  ऑटोमाटिक दरवाजांचे पेटंट त्यांना करून दिले. हे दरवाजे ग्वाल्हेरच्या   आणि कृष्णाराज सागर या धरणांवर बसवले गेले. तसे पाहता  ते  पूर्ण संशोधन श्री  विश्वेश्वरय्या यांचे होते. त्यामुळे त्याच्या पेटंट पोटी  सरकारने त्यांना पेटंट मनी देऊ केला परंतु अतिशय नम्रपणे त्यांनी ते नाकारले. मी ब्रिटीश सरकारच्या नोकरीत असताना हे डिझाईन केले आहे त्यामुळे  त्या पेटंटचे पैसे  घेणे माझ्या नीतिमत्तेला धरून नाही असे त्यांनी सरकारला सांगितले. स्वयंचलित दरवाज्यांचे हे डिझाईन इतके चांगले होते  की हे जलाशयावर बसवलेले हे दरवाजे पाहण्यास ते पन्नास वर्षांनी स्वतः गेले तरी ते दरवाजे उत्तम रीतीने काम करीत होते. पुण्याचा जलसिंचन विभाग पाण्याच्या मोठ्या साठ्यांमुळे आणि धरणांमुळे सन १९०० च्या सुमारास प्रसिद्ध होता. परंतु ज्या भागाला कालव्यांद्वारे पाणी पुरवठा होतो ते प्रांत सुबत्ता प्राप्त करत आणि धरणांच्या खालील भागांना किंवा कालव्याच्या उप शाखांना कमी पाणी पोचत असल्यामुळे तिथे पाणी कमी पडत असे. मोठे व धनवान शेतकरी मुख्य कालव्यातून जास्त पाणी घेत आणि दूरवर वसलेल्या कालव्याबाजूच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी अपुरे पडत असे. ही विषमता दूर करण्यासाठी श्री विश्वेश्वरय्या यांनी पाळीपाळीने किंवा चक्राकार पद्धतीने पिकांना पाणी देण्याची विशेष योजना आखली. कालव्याच्या वरील भागातील श्रीमंत शेतकऱ्यांना या योजनेमुळे मन मानेल तसे पाणी घेता येणार नव्हतेह त्यामुळे त्यांनी आपले म्हणणे केसरीचे तत्कालीन संपादक लोकमान्य टिळक यांच्याकडे मांडले आणि केसरीतून दर आठवड्याला  या चक्राकार पद्धती विरुद्ध लिखाण छापून येऊ  लागले. विश्वेश्वरय्यानी आपली ही योजना सरकारला विशद केली आणि विरोध करणाऱ्या जमीनदार शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून ही योजना प्रत्यक्ष कार्यवाहीत आणली. ब्लॉक सिस्टीम या नावाने  ही योजना प्रसिद्ध आहे आणि अजूनही भारतभर हीच पद्धत अवलंबिली जाते.

सर विश्वेश्वरय्या ह्यांच्या बुद्धीमत्तेचे  भारतीयांबरोबरच इंग्रज लोकसुद्धा कौतुक करू लागले. ब्लॉक पद्धतीनुसार वर्षातून तीन पिके वर्तुळाकार क्रमाने घ्यायची आणि उपलब्ध पाणी वापरूनच अधिक लाभ क्षेत्रात पिके काढायची अशी पद्धत आहे. तीन पिकातील एक भात किंवा उस हे सर्वाधिक पाणी लागणारे पीक असावे आणि आणि दुसरे मध्यम पाण्यावर तयार होईल असे असावे तर तिसरे पीक कमीतकमी पाणी लागेल असे असावे असे विश्वेश्वरय्या यांनी निश्चित केले.  एकाच जमिनीत वेगवेगळी पिके पाळीपाळीने घेतल्यास मातीचा कस कमी होत नाही. सगळया  रयतेला हे पटण्यासाठी त्यांनी मोठ्या जमीनदारांना असा प्रयोग निदान एकदा तरी करून पाहण्याची सूचना केली. मोठ्या जमीनदारांनी ते मानले आणि हा प्रयोग कल्पनातीत यशस्वी झाला. सामान्य शेतकरीसुद्धा ब्लॉक सिस्टीमच्या जलसिंचनासाठी तयार झाला. मुंबई सरकारचे ज्येष्ठ सदस्य सर जोन  मूर माकेंझी यांनी या पद्धतीसाठी श्री.  विश्वेश्वरय्या यांचे तोंड भरून कौतुक केले. पाण्याच्या संयमित वापरामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होउन मलेरिया सारख्या  रोगालाही आळा  बसला.

सन १९०८ मध्ये स्वेच्छानिवृत्ती नंतर म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणून त्यांना नियुक्त केले गेले. कृष्णराज वोडेयार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजांच्या पाठिंब्यामुळे सर विश्वेश्वरया यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत, सन १९१७ मध्ये बंगळूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. ही भारतातील पहिली अभियांत्रिकी संस्था होती, जी अद्यापही कर्नाटकातील एक प्रतिष्ठित संस्था आहे.

म्हैसूर येथे असतांना त्यांनी जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, त्यांना’नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर’ या सन्मानाने गौरविले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केल्या गेल.

सर मो. विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स ह्या लंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स च्या बंगलोर शाखेने फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना ‘डॉक्टर’ ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले. ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.

अशी अद्वितीय, असामान्य माणसं आपल्या देशाची खरी संपत्ती असतात. वयाच्या 101 व्या वर्षी दिनांक 14 एप्रिल 1962 रोजी ह्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि जगातील तमाम इंजिनिअर्स ना ह्या अभियंता दिनाच्या शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈