मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…5 – वसंतसेना ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…5 – वसंतसेना ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

हल्लीच काही दिवसांपूर्वी “गंगुबाई काठियावाडी” चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात गंगुबाईच्या तोंडी एक वाक्य आहे. ती म्हणते, “ वेश्यांशिवाय स्वर्गसुद्धा अधुरा आहे.” शाश्वत सत्यच तिच्या तोंडून सांगितले आहे असे मला वाटते. कारण वास्तविक ज्या वेश्यासमाजाला आपल्या संस्कृतीत एका वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते त्या समाजमुळेच पांढरपेशा समाज सुदृढ आहे. त्यामुळे तो चित्रपट पाहताना मला ‛शुद्रक’ या संस्कृत नाटककाराने लिहिलेल्या ‛मृच्छकटिक’ या नाटकाची आठवण झाली.

या मृच्छकटिक नाटकाची नायिका ‛वसंतसेना’ हीसुद्धा एक गणिका असते आणि थोड्याफार फरकाने समाजाचा अशा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोनही तोच आहे. फक्त त्या काळी गणिका आणि वेश्या यांच्यात किंचित फरक असा होता की गणिका केवळ नृत्य- संगीत या माध्यमातून पुरुषांचे मनोरंजन करत असत. आणि वेश्या शरीरविक्रय करत असत.

संतसेना आणि चारुदत्त यांच्या प्रेमाची ही कहाणी आहे. याशिवाय अनेक सामाजिक- राजकीय संदर्भ या नाटकात आहेतच. चारुदत्त हा एक अतिशय श्रीमंत ब्राह्मण असतो. पण आपल्या अति परोपकारी स्वभावाने आपली सर्व संपत्ती गमावून बसतो. याउलट वसंतसेना गणिका असूनही अतिशय श्रीमंत असते आणि सुखासीन आयुष्य जगत असते. चारुदत्ताच्या निर्व्याज स्वभावामुळे ती त्याच्याकडे आकर्षित होते आणि चारुदत्तही तिच्या प्रेमात पडतो. वास्तविक चारुदत्ताचे लग्नही झालेले असते आणि त्याला एक लहान मुलगाही असतो. परंतु त्या काळात पुरुषांनी असे गणिकांशी संबंध ठेवणे अयोग्य मानले जात नसावे. त्यामुळे चारुदत्ताची पत्नीही वसंतसेनेशी मित्रत्वाच्या नात्याने वागत असते.

एकदा काही गुंड मागे लागल्याने अचानक वसंतसेना चारुदत्ताच्या घरी येऊन लपते. तिला ते चारुदत्ताचे घर आहे हे माहीत नसते. पण त्याचवेळी अंगणात खेळणारा चारुदत्ताचा मुलगा आपल्या दासीकडे खेळण्यासाठी सोन्याची गाडी दे म्हणून हट्ट करत असतो. त्याच्या मित्राची तशी गाडी असते. म्हणून त्याला हवी असते. पण विपन्नावस्था प्राप्त झालेल्या चारुदत्ताकडे मुलाला द्यायला सोनेच नसते. त्यामुळे ती दासी त्या बालकाची समजूत काढत त्याला मातीची गाडी खेळायला देते. हा सर्व प्रसंग पाहणारी लपलेली वसंतसेना त्यावेळी लगेच बाहेर येते व आपले सर्व दागिने काढून त्या खेळण्याच्या गाडीत ठेवते.  ते बघून तो बालक अतिशय खुश होतो. वसंतसेनेमध्ये असलेली सहृदयता यात दिसून येतेच. पण धनाविषयी असणारी तिची अनासक्तीही यातून दिसून येते. धनापेक्षाही एखाद्याच्या भावना श्रेष्ठ आहेत असे मानणारी वसंतसेना म्हणूनच अधिक भावून जाते. 

वसंतसेना जरी गणिका असली तरी तिलाही स्त्रीसुलभ भावना होत्याच. कलेच्या माध्यमातून पुरुषांचे मनोरंजन करणे  हा तिचा व्यवसाय असला तरी मनाने ती चारुदत्तावर प्रेम करत असते. आणि आपले हे प्रेम चारुदत्ताकडे व्यक्त करण्याचे धाडसही ती दाखवते. शिवाय एकदा ती आणि चारुदत्त भेटण्याचे ठरलेले असते. पण प्रचंड वादळ होत असतानाही केवळ चारुदत्तावरील प्रेमापोटी ती त्या वादळातही त्याला भेटायला बाहेर पडते. यातून तिची साहसी वृत्ती दिसून येते.

वसंतसेनेशी आई थोडी लोभी असते. त्यामुळे काही धनाच्या बदल्यात ती राजाच्या मेहुण्याला आपली मुलगी द्यायला तयार होते. हे वसंतसेनेला कळल्यावर ती त्यासाठी स्पष्ट नकार देते व आईला सांगते की “जर तू मला जिवंत पाहू इच्छित असशील तर पुन्हा कधीही असे काम करणार नाही.” यातून वसंतसेनेचा निग्रही स्वभाव दिसून येतो. त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्तीही दिसून येते.

तिला नाईलाजाने हा व्यवसाय निवडावा लागलेला असतो. वास्तविक आपले घर, संसार, मुले यामध्ये रममाण होऊन सामान्य स्त्रियांप्रमाणे संसार करण्याची तिची इच्छा असते. तिची ही इच्छा कितपत पूर्ण होईल हे तिला माहीत नसते. पण जेव्हा तिची दासी एका तरुणावर प्रेम करते हे तिला समजते तेव्हा ती तात्काळ तिला दास्यत्वातून मुक्त करते आणि तिला आनंदाने सुखाचा संसार करण्यास मदत करते. आपल्याला असे सुख मिळेल की नाही याची शाश्वती नसतानाही दुसऱ्याच्या सुखात आपले सुख शोधणारी वसंतसेना त्यामुळे अधिक श्रेष्ठ ठरते.

अशाप्रकारे समाजातील एका वेगळ्या स्तरातील स्त्रीचे चित्रण शुद्रकाने या नाटकात केले आहे. अतिशय वेगळ्या संस्कारात वाढलेली असूनही तितकीच सुसंस्कृत, उत्तम नर्तिका, उत्तम गायिका आणि सौंदर्यवती असणारी वसंतसेना म्हणूनच नारीशक्तीचे एक वेगळेच रूप आहे.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈