मराठी साहित्य – विविधा ☆ सावधान ! शांतता कोर्टात गेली आहे. ..! ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ सावधान ! शांतता कोर्टात गेली आहे. ..! ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

‘पहाटेच्या रम्य आणि शांत वेळी…’ अशा प्रकारची वाक्ये आता बहुधा कथा कादंबऱ्यातूनच वाचायला मिळतील की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली दिसते. पहाट किंवा सकाळ ही शांत आणि रम्य राहिल्याचे चित्र आता अभावानेच आढळते. निरनिराळ्या आवाजांनी पहाटेची ही रम्य आणि शांत वेळ प्रदूषित केली आहे. सकाळी पाच वाजल्यापासून वाहनांचे आवाज सुरु होतात. काही वाहने लवकर सुरु न झाल्याने त्यांचे मालक अक्सिलेटर वाढवून ती बराच वेळ सुरु ठेवतात. जवळपास असलेल्या काही मंदिर आणि मशिदीवरील भोंगे आरती, प्रार्थना आणि अजान आदी सुरु होतात. तुम्हाला ते  ऐकण्याशिवाय काही चॉईस नसतो. पहाटेची शांत वेळ ध्यान करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी उत्तम असते असे म्हणतात. आता अशा या गोंगाटात ध्यान आणि अभ्यास कसा करणार ? सहा साडेसहा वाजेनंतर शाळेत जाणाऱ्या मुलांच्या रिक्षा आणि बसचे कर्कश हॉर्न सुरु होतात. मुलांनी तयार राहावे म्हणून ते लांबूनच हॉर्न वाजवत येतात. बऱ्याच वेळा मुलं शाळेसाठी तयार होऊन उभीच असतात, पण यांची हॉर्न वाजवण्याची सवय जात नाही. त्यावर काही टॅक्स नाही आणि त्यांना बोलणारं कोणी नाही. कोणी बोललंच तर तो वाईट ठरतो. मुलं शाळेत गेल्यावर कुठं हुश्श करत बसावं तोवर भाजीवाले, फळवाले, भंगारवाले तयार होऊन येतात. त्यांचेही आवाज तुम्हाला ऐकावेच लागतात. आता तर त्यांनी आपल्या गाड्यांवर आवाज रेकॉर्ड केलेले स्पिकर्स लावले आहेत. त्यामुळे त्यांचा ओरडण्याचा ताण कमी झाला पण जनतेला मात्र ते स्पीकर्सचे आवाज सहन करण्यापलीकडे पर्याय नाही. त्यानंतर नगरपालिकेची घंटा/कचरा गाडी येते. तिच्यावर लावलेल्या स्पीकर्समधून विविध प्रकारच्या गाणीवजा सूचना तुम्हाला ऐकाव्याच लागतात. हे सगळे कमी की काय म्हणून कुणीतरी शेजारी जोरात टीव्ही किंवा रेडिओ लावलेला असतो. काही मंडळी मोबाईलवर गाणी वाजवीत जात असतात. त्याशिवाय रात्रीची झोप आणि पहाटेची शांतता भंग करणारे बेवारशी कुत्र्यांचे आवाज आहेतच. आपण म्हणतो सकाळची रम्य आणि शांत वेळ ! पूर्वी कधी तरी नक्कीच पहाट रम्य आणि शांत असावी त्याशिवाय आमच्या ऋषीमुनींना आणि साहित्यिकांना इतक्या सुंदर सुंदर साहित्यरचना कशा सुचल्या असत्या !

परवाच्या दिवशी एका स्वागतसमारंभाला जाण्याचा योग आला. बरेचसे  नातेवाईक त्या दिवशी एकमेकांना बऱ्याच दिवसांनी भेटत होते. खूप दिवसांनी भेटी होत असल्याने बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या. पण ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता, त्यांनी त्याच वेळेला एक गाण्यांचा कार्यक्रमही ठेवला होता. एकाच हॉलमध्ये स्टेजवर वधुवर, त्याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था आणि  तिथेच गाणी. गाण्यांचा ऑर्केस्ट्रा ठेवण्याचा आयोजकांचा उद्देश चांगला असेलही, पण तिथे खूप दिवसांनी भेटलेल्या आप्तेष्टाना एकमेकांशी संवाद साधणे देखील कठीण होत होते एवढा गाण्यांचा आवाज मोठा होता. गाणी ऐकण्याच्या मनस्थितीत फारसं कोणी दिसत नव्हतंच. कोणाशी बोलायचं झाल्यास अगदी दुसऱ्याच्या कानाजवळ तोंड नेऊन बोलावं लागत होतं. उपस्थितांनी तशाच वातावरणात जेवणाचा आस्वाद घेतला. वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. त्या कर्कश आवाजातील गाण्यांऐवजी जर मंजुळ आणि हळू आवाजातील सनईचे सूर असते, तर सगळ्यांनाच किती छान वाटलं असतं !

माझ्या घराशेजारीच एक लग्न होते. लग्नाच्या आधीच्या दिवशी संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता. घरापुढेच मंडप टाकण्यात आला होता. सायंकाळी पाच वाजेपासून कार्यक्रमस्थळी डीजेला सुरुवात झाली. हळदीचा कार्यक्रम पार पडेपर्यंत डीजे सुरु होता. हळदीचा कार्यक्रम पार पडल्यावर डीजे थांबला. मला हायसे वाटले. पण माझा तो आनंद थोडाच वेळ टिकला. जेवणानंतर पुन्हा डीजे सुरु झाला. रात्री वाजेपर्यंत डीजेच्या आवाजात सगळ्यांचे नाचणे झाले. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मंडप, डीजे. आजूबाजूच्या कोणाला त्रास होत असेल याचा कोणताही विचार नाही. त्याऐवजी असे कार्यक्रम इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आयोजित करता येणार नाहीत का ? पण आमचे सामाजिक भान सुटत चालले आहे. ‘ इतरांचा काय संबंध ? माझ्याकडे कार्यक्रम आहे ? कोणाला त्रास होत असेल तर मला काय त्याचे ? इतरांकडे कार्यक्रम असतो, तेव्हा ते करतात का असला विचार ? ‘ प्रत्येकजण असा सोयीस्कर स्वतःपुरता विचार करताना दिसतो.

पूर्वी फक्त दिवाळीतच फटाके फोडत असत. हल्ली प्रसंग कोणताही असो, फटाके फोडायचे हे ठरलेले असते. लग्न, मिरवणूक, वाढदिवस, पार्टी, क्रिकेटची मॅच, एखादा विजय किंवा यश साजरे करणे हे फटाके आणि डीजे लावल्याशिवाय होताना दिसत नाही. त्यातूनही बरेचसे बहाद्दर रात्री बारानंतर फटाके फोडून लोकांना त्रास देण्यात आनंद मानणारे आहेत. फक्त कोणी गेल्यानंतर अजून फटाके वाजवण्याची पद्धत सुरु झाली हे नशीब ! ( उगवतीचे रंग- विश्वास देशपांडे )

एक गमतीदार प्रसंग सांगतो. काही दिवसांपूर्वी एका सुप्रसिद्ध अशा धार्मिक स्थळी गेलो होतो. तिथे दर्शनासाठी निरनिराळ्या राज्यातून लोक आले होते. मंदिरात दर्शनाला जाताना रस्त्यातून एक मिरवणूक जात होती. कोणीतरी एक जवान सैन्यातून निवृत्त झालेला होता. त्याच्या स्वागताचे आणि अभिनंदनाचे पोस्टर्सही सगळीकडे लावले होते. एका उघड्या जीपमधून त्यांची मिरवणूक सुरु होती. त्या गाडीच्या पुढे कर्कश आवाजात डीजे लावलेला होता. त्यापुढे त्या मिरवणुकीत सामील झालेले बरेचसे स्त्रीपुरुष बेभान होऊन नाचत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो जवान सैन्यातून निवृत्त झाला होता, तो आणि त्याची पत्नी त्या जीपवर त्या गाण्यांच्या तालावर वेडेवाकडे नाचत होते. कदाचित त्या सगळ्यांसाठी तो आनंदाचा आणि अभिमानाचा प्रसंग असेलही पण मंदिरासमोर असलेल्या छोटया रस्त्यावरून ही मिरवणूक जात असल्याने भाविकांची प्रचंड गैरसोय होत होती. त्याचे कोणालाच सोयरसुतक नव्हते. कोण बोलणार ? देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल मला प्रचंड आदर आणि अभिमान आहे. देशात शांतता राहावी म्हणून सीमेवर हे सैनिक जीवाची बाजू लावून लढत असतात. पण  हे दृश्य पाहून मला खरोखरच वाईट वाटले.

प्रश्न असा पडतो की आपल्याला खरोखरच शांतता नकोशी झालीय का ? आम्ही गोंगाटप्रिय झालो आहोत का ? इंग्रजीत एक सुंदर वाक्य आहे ‘ Speech is silver, silence is gold. ‘ या वाक्याचा अर्थ असा की  व्यर्थ बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ आहे. शांततेचे मोल करता येणार नाही. मानवासहित सर्वच सजीवांच्या निकोप आणि आरोग्यदायी जीवनासाठी शांतता अतिशय महत्वाची आहे. आम्ही आज शाळांमध्ये पर्यावरण हा विषय शिकवतो. त्यामध्ये हवा, ध्वनी, जल इ. प्रकारच्या प्रदूषणांबद्दल शिकतो, बोलतो. पण प्रत्यक्ष आचरणात ते किती आणतो ? ती नुसतीच पोपटपंची राहते. रात्री उशिरापर्यंत डीजे, फटाके वाजवू नयेत असे कायदे आहेत. पण जोपर्यंत त्यांची कडक अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत त्यांचा काही उपयोग नाही. अर्थात नुसते कायदे करूनही उपयोग होत नाही. त्यासाठी समाजजागृती व्हावी लागते. आपल्या अशा वागण्याने इतरांना त्रास होऊ शकतो, ही भावना ज्या दिवशी आमच्या मनात निर्माण होईल, तो सुदीन म्हणायचा. विजय तेंडुलकरांचे ‘ शांतता कोर्ट चालू आहे ‘ हे नाटक प्रचंड लोकप्रिय झाले होते. कोर्टात हवी असणारी शांतता आम्हाला प्रत्यक्ष जीवनातही हवी आहे. ती जर मिळणार नसेल तर एक दिवस शांतता सुद्धा रुसून कोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈