मराठी साहित्य – विविधा ☆ शब्द… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ शब्द… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

श्री संत तुकाराम महाराज म्हणतात,

‘आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू।।

शब्दची आमुच्या जीवीचे जीवन। शब्दे वाटू धन, जनलोक।।

तुका म्हणे पाहा, शब्दचि हा देव। शब्दाची गौरव पूजा।।

किंवा एके ठिकाणी ते असेही म्हणतात•••

घासावा शब्द | तासावा शब्द |

तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||

शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा

बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||

शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान, कर्म, भक्ती |

स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||

शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |

शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||

– संत तुकाराम महाराज

तशी शब्दांची महती ही शब्दातीत आहे.  पण मला याठिकाणी शब्दाची  एक व्याख्या सांगावीशी वाटते, दोन किंवा अधिक अक्षरे जोडल्याने त्या अक्षरांना मिळालेला अर्थ म्हणजे शब्द.

मग शब्दाचा हा अर्थ असला तरी या शब्दाचा अर्थ त्याला क्रियापद जोडल्याने बदलतो. यासाठी एक प्रसंग  वर्णन करते.

कॉलेजातील ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे आणि केव्हा पडले हे त्यांनाच कळले नाही . लग्नाचा विषय येताच तो म्हणाला मी तुला शब्द देतो   की मी माझ्या पायावर व्यवस्थित उभा राहिलो की तुझ्याशीच लग्न करेन. ती म्हटली मी हा शब्द घेते पण तू तुझा शब्द नक्की पाळशील ना?

तो म्हणाला मी आमच्या अण्णांचा शब्द मानतो. त्यांच्या शब्दाला फार किंमत असते. गावातही त्याच्या शब्दाचे वजन पडते त्यामुळे त्यांनी हो म्हटले की लगेच मी शब्द प्रमाण मानून तुझ्याकडे येणारच .

ती म्हणाली ए तू उगाच शब्दात अडकवू नकोस हां !! नंतर म्हणशील मी शब्द टाकला पण त्यांनी नाही माझा शब्द झेलला त्यामुळे माझा शब्द चालला नाही. असा तुझा शब्दाघात मी सहन नाही करू शकणार. तुला तुझ्या शब्दांची किमया तुझ्या अण्णांवर करावीच लागेल. तुला तुझा शब्द फिरवता येणार नाही. तू म्हणशील मी शब्द मागे घेतो पण शब्दांचा असा महाल बांधून माझा शब्द तुला तुडवता येणार नाही.

तो म्हणाला अगं वेडे तुझ्यावर उधळलेला शब्द  म्हणजे शब्दांची पेरणी करून शब्दांचे फळ मिळेपर्यंतच्या प्रक्रीयेचा आनंदोत्सव आहे.  मग उगीच शब्दाने शब्द कशाला वाढवायचा ?  त्यापेक्षा शब्द तोलूया. तू आणि मी शब्दजोडून आपण होऊया. या शब्दाची कधीच फोड नाही होणार  ही खात्री बाळगूया. आणि नि:संदेह होऊन म्हणू•••

शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले.

असेच शब्दांसोबत हसता, खेळता, बोलता, चालता, रूसता, प्रेमात पडता, लिहिता, वाचता अनुभवूया शब्दांचा लळा.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈