सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ वेळ… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

वेळ- दोनच अक्षरी शब्द.पण नाना  प्रकारचे अर्थ सामावणारा. कारण संदर्भानुसार अर्थ बदलत जातात हो. नीला मैत्रिणीला म्हणाली, ‘अग,एक प्रदर्शन पाहायला जायचं आहे. वेळ आहे का तुला माझ्याबरोबर यायला.’ ‘ हो.एका पायावर तयार आहे बघ यायला.’ नीला पटकन उत्तरली.  तोच आई नीलाला जेवायला बोलवू लागली, नि नीला आईस म्हणाली, “नाही ग आई. वेळ लागेल थोडा. मी एक आर्टिकल लिहितेय. ते पुरं होत आलय. ते झाल्यावर येते. इथं पहिल्यांदा वेळ या शब्दाचा अर्थ सवड होतो तर तर दुसऱ्या  उदाहरणात वेळ म्हणजे उशीर.

‌रामराव असेच मित्रांच्यात बसून बोलतांना म्हणाले, “  माझ्या एका मित्रावर, दिनेशवर काय वेळ आलीय बघा. लेकीला कॅन्सर झाला नि पाण्यासारखा पैसा खर्च करुनही उपयोग झाला नाही. शिवाय कर्जही वाढले.”  इथं “वेळ ” म्हणजे वाईट परिस्थिती. 

कोणत्याही गोष्टीसाठी वेळ महत्वाची असते. आपले नियोजन योग्य, काटेकोर असेल तर कोणत्याही वेळेस एखादे नवीन काम सुरू केले तर ते नीट पार पडते. याउलट आपली योग्य तयारी नसेल तर अगदी मुहूर्त  पाहून काम सुरू केले तरी ते यशस्वी होईलच याची खात्री देता येत नाही.वेळ पाळणे सुद्धा महत्वाचे असते हं. वेळ पाळण्याची सवय म्हणजे वक्तशीरपणा. वक्तशीरपणा हा एक चांगला गुण आहे, ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव दुसऱ्यावर चांगला पडतो.

कोणतेही काम वेळेत करण्याच्या सवयीमुळे आपण कामे वेळेत पूर्ण करतो.वेळ दरवेळी सोयिस्कर असतेच असे नाही. पण काही वेळा अवेळही योग्य प्रकारे  हाताळल्याने आपण कोणत्याही  प्रसंगातून  सहीसलामत बाहेर पडतो.चांगली वेळ आपण हसतमुखाने चांगल्या प्रकारे वर्तन करतोच  पण वेळ वाईट असताना सुद्धा जो विवेकाने वर्तन करुन त्या वाईट वेळीही चांगला वागतो नि कोणत्याही प्रसंगास व्यवस्थित सामोरा जातो तोच खरा.

कातरवेळ म्हणजेच तिन्हीसांजेची वेळ थोडी हुरहूर  निर्माण करणारी असते.सकाळची वेळ प्रसन्नच ! कारण सूर्यदेवांच्या आगमनानं पृथ्वीवर चैतन्यमय वातावरण असते. फुलांच्या उमलण्याची, सूर्यविकासी कमळे उमलण्याची ही वेळ खरच आनंदमय असते. सकाळपासून सूर्यास्तापर्यंत प्रकाशाची सोबत असते. त्यामुळे एकाकीपणा जाणवत नाही. त्यामानाने रात्रीच्या वेळी एकाकी वाटते. कधीकधी मनात भीतीही दाटते.

परीक्षार्थी ज्या वेळेची उत्सुकतेने वाट पाहतात  ती वेळ निकालाची. निवडणुक लढविणारे उमेदवारसुद्धा मतमोजणीनंतर विजय घोषित होण्याच्या वेळेची वाट पाहतात अगदी उतावीळपणे. म्हणूनच म्हणावे वाटते वेळेचे नियोजन  हवेच. मग काम बौद्धिक असो, आर्थिक असो की अन्य कोणत्याही प्रकारचे…..  कारण वेळ काही कधी सांगून येत नाही.

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

हैदराबाद

मो.नं. ९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments