मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 10 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 10 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

सांगावसं वाटलं म्हणून….10

अश्विन शुद्ध एक म्हणजे घटस्थापना!कधी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला सुरू होणारा तर कधी ऑक्टोबर महिन्यात सुरू होणारा अश्विन महिना घेऊन येतो नवरात्रोत्सव आणि जाता जाता दीपोत्सव देऊन जातो.

घटस्थापनेला घटांची स्थापना केली जाते. शारदीय नवरात्रीला प्रारंभ होतो. ललितापंचमी, दुर्गाष्टमी, खंडेनवमी असे एक एक दिवस साजरे होत असतात. नऊ दिवसांचे, नव्हे नव्हे नऊ रात्रींचे, नवरात्र संपते आणि विजयादशमीचा दिवस उजाडतो.विजयादशमी म्हणजेच दसरा,दशहरा!असूरीय वृत्तींचा वध करून सत्प्रवृत्तींचा विजय साजरा करण्याचा दिवस.पारंपारिक सीमोलंघनाबरोबरच वैचारिक सीमोलंघन करण्याचा दिवस. अन्यायाचा प्रतिकार करून मानवतेचा संदेश पसरवण्यासाठी मानवी मनाचे परिवर्तन करण्याचा दिवस!नवरात्रीतील लक्ष लक्ष दीपज्योतीच सांगत असतात आता तमाचा नाश फार दूर नाही. या दीपाप्रमाणेच आकाशातील पूर्णचंद्राचा दीपही उजाळून निघतो आणि को जागरती,कोण कोण जागे आहे हे पाहण्यासाठी अश्विन पौर्णिमेला सहस्त्ररश्मी तेजाने उजळून निघालेला असतो.आकाशाचा तो नीलमंडप जणू काही मोग-याच्या फुलांनी बहरून जावा असा फुललेला असतो. चांदण्याची ही फुले प्रत्येक क्षण उल्हसित करत असतात. जणू काही ही पुढच्या आनंदमयी दिवसांची सुरूवातच असते.

अश्विनातील अमावस्येचा अंधःकार विरत जातो आणि कार्तिकातील पहिल्या पहाटेच घरोघरी दारापुढे पणत्यांच्या मंद ज्योती प्रकाशाचा निरोप घेऊन येतात. कधी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तर कधी नोव्हेंबरच्या सुरूवातीला सुरू होणारा हा प्रकाशोत्सव म्हणजेच दीपावली! दिवाळी. आनंद, उत्साह, तेज घेऊन येणारा हा सण. गोवत्स द्वादशी म्हणजेच वसूबारस, गुरूद्वादशी, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान,  लक्ष्मीचे पूजन करून समृद्धी आणि संपन्नता मिळावी म्हणून प्रार्थना करण्याचा लक्ष्मीपूजनाचा दिवस!. त्यानंतर येणारा, नवे व्यावसायिक वर्ष सुरू करणारा  आणि पती पत्नीतील प्रेम आणि विश्वास दृढ करणारा दिवाळी पाडव्याचा दिवस. दिवाळीतील पाडव्यालाच विक्रम संवत व महावीर जैन संवत या नववर्षांचा प्रारंभ होत असतो. 

भाऊ आणि बहिण यांच्यातील स्नेहाच्या मोत्यांच्या माळा गुंफणारी भाऊबीज. दीपांच्या मालिकांप्रमाणे एका मागोमाग एक  येणा-या या मंगलमयी दिवसांमुळे दीपावलीचे हे  पर्व सर्वत्र चैतन्य पसरवित जाते. नवे कपडे, भेट वस्तू, नवी खरेदी, फराळाच्या पदार्थांनी भरलेली ताटे, आतषबाजी, रोषणाई या सगळ्याची लयलूट करणारा हा दिवाळीचा सण मनाला एक वेगळीच उर्जा देऊन जातो.

हा ऑक्टोबर महिना अन्य काही कारणांसाठी लक्षात राहणारा असतो. महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती असते.तर हाच दिवस अर्थशास्त्रज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, पहिले अर्थमंत्री व साहित्यिक श्री.चिंतामणराव देशमुख यांचा हा स्मृतीदिन. याच ऑक्टोबर महिन्यातील दसरा  हा क्रांतीकारक सीमोलंघन करणारा ठरला तो धम्मचक्र प्रवर्तनामुळे. तर दुसरीकडे ईद-ए-मिलाद मुळे मुस्लिम धर्मियांसाठीही हा महिना तितकाच महत्त्वाचा.

जागतिक स्तरावर एक ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून पाळला जातोच पण त्याशिवाय तो काॅफी दिन, संगीत दिन आणि रक्तदान दिनही आहे. पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन व सात ऑक्टोबर हा जागतिक वन्य पशू दिन आहे. आठ ऑक्टोबर हा भारतीय हवाई दल दिन म्हणून साजरा केला जातो.जागतिक टपाल दिन नऊ ऑक्टोबरला तर दहा ऑक्टोबरला राष्ट्रीय टपाल दिन पाळून टपाल खाते व कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेतली जाते. अंधांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून त्यांना मदत करण्यासाठी पंधरा ऑक्टोबर हा अंध सहायता दिन म्हणून पाळला जातो.जागतिक पोलिओ दिन चोवीस ऑक्टोबरला असतो तर तीस ऑक्टोबरला  बचत दिन साजरा करून बचतीकडे लक्ष वेधले जाते. एकतीस ऑक्टोबर या दिवशी भारतात राष्ट्रीय एकता दिवस  पाळला जातो.

याच महिन्यात महर्षि वाल्मिकी, श्री जलाराम तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते; तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राजे यशवंतराव होळकर यांची पुण्यतिथि ऑक्टोबर महिन्यातच येते.

सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा विविध कारणांनी गजबजलेल्या या ऑक्टोबरच्या शेवटी शेवटी हवेतही बदल होत जातो. थंडीची चाहुल लागते. दिवाळीच्या सुट्ट्या संपत आलेल्या असतात. त्या संपण्यापूर्वी पर्यटनाला उत्सुक असणारे पर्यटक घराबाहेर पडत असतात. त्याच वेळेस निसर्ग एक पाऊल पुढे टाकून आपला प्रवास चालूच ठेवत असतो.व र्षा ऋतुला पूर्ण निरोप देऊन शरद आणि हेमंत ऋतुचा आल्हाददायक अनुभव घेण्यासाठी काळ पुढे पुढे सरकत असतो.एका नव्या महिन्यात प्रवेश करण्यासाठी !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈