मराठी साहित्य – विविधा ☆ मी आणि काॅफी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ मी आणि काॅफी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

कॉफी ही माझ्या आयुष्याशी चहाइतकीच जोडली गेलेली आहे. एखाद्या पावसाळी संध्याकाळी खिडकीत बसून गरम कॉफीचे घोट घेताना त्या निसर्ग सौंदर्याची, मोहक वातावरणाची मनावर होणारी जादू किंवा जेव्हा पहिल्यांदा डेटला जातात त्यावेळी त्या प्रेमळ क्षणांची साथ द्यायला सोबत असते ती कॉफी किंवा मग रात्रीच्या निरव शांततेत मंद गाण्याच्या सोबतीने वाफाळत्या कॉफीचा आस्वाद घेताना मिळणारी कमालीची स्वस्थता किंवा पुस्तक वाचताना कॉफीची सोबत असली तर वाचनाचा आनंद द्विगुणीत होतो.. एखाद्या सुंदर दिवसाची सुरुवात व्हावी ती गरमा-गरम कॉफी आणि चविष्ट केक स्लाईससोबत तर क्या बात है…!

कॉफी म्हणजे  विचार, निवांतपणा, संगीत, दरवळणारा सुगंध, मनाची तरतरी, हसू, गप्पा, वाचन, पाऊस, तो आणि ती, आनंद, मैत्र व मी आणि लिखाण…

कॉफीचे माझ्या आयुष्यात निश्चितच एक स्थान आहे. फिल्टर कॉफी असो की कॅफे मोका, कोल्ड काॅफी असो वा कॅपिचुना काॅफी इ. या साऱ्याच प्रकारांनी माझ्या मनात जागा केली आहे..

माझी दिवसाची सुरुवात कॉफीने होते…कॉफी नुसतं असं म्हटलं तरी माझ्या आजूबाजूला कॉफीचा सुगंध दरवळायला लागतो.. काॅफीचा मग ओठांना लावण्याआधीच तिचा मस्त सुगंध काहीतरी आत हलकेच जागं करतं असतो अगदी तसचं जसा पावसाच्या सरींनी दरवळणारा मातीचा गंध… येणा-या आठवणींच्या वर्षावाची जाणीव करून देत असतो.

आठवणींच्या सुगंधात मन चिंब चिंब भिजत असते… काय सांगायचे असते त्याला ? एक वेगळीच आभा का दाटते मनात ?

कारण काॅफीच नातचं असतं हळव्या  जगाशी बांधलेलं रूजू पाहणारं नवं नातं…हे नवं नात स्वीकारताना येणा-या आनंदाच्या सरी झेलू पाहणारं…  खरचं काॅफीचा तो मस्त सुगंध जेव्हा अलगद जवळ येतो तेव्हा नव्या जाणीवांचा बांध अलगद बांधला जातो…

माझ्यासाठी अतिप्रिय काही असेल तर ते म्हणजे गरम स्ट्राँग कॉफी. कॉफी म्हटलं की आठवते तिची जिभेवर रेंगाळणारी थोडी स्ट्राँग कडवट चव.. हो कडवट कारण कॉफी प्यायची तर स्ट्राँगच…कडवट

गोड आणि कॉफी… झोप उडवून तरतरी आणणाऱ्या पेयामध्ये कडक कॉफीचा नंबर पहिला असेल असे माझे मत .. कॉफीला पर्यायी एकतर काही नसावं आणि असलंच तरी कॉफीची सर त्याला नसावी… सुस्ती-आळस-कंटाळा दूर सारून स्फूर्ती आणि ताजंतवानं करण्यात कॉफी फायदेशीर असल्याचं मी तरी अनुभवलं आहे आणि अनुभवत आहे

कामाचा लोड कितीही असू द्या किंवा शीण आला असेल आणि त्याच वेळी समोर कॉफीचा वाफाळलेला कप जेव्हा समोर दिसतो त्या कॉफीचा घोट जेव्हा घशाखाली उतरतो ना तेव्हा हा सगळा शीण, कंटाळा व आळस क्षणार्धात कुठच्या कुठे पळून जातो..

कॉफीचं महत्त्व माझ्या लेखी खूप आहे कारण वेळोवेळी सुख-दुःखात, महत्त्वाच्या क्षणी माझा आत्मविश्वास वाढवण्यात आणि मला खंबीर करण्यात जर कोणाची साथ असेल तर ती माझी सखी कॉफीची..!

लेखन हा माझा आवडता छंद त्यामुळं काही सुचत नसेल आणि कॉफी प्यायली तर माझं डोकं जाम भारी काम करतं थोडक्यात काय तर  माझ्या रिफ्रेशमेंटसाठी कॉफी तिचं काम चोख पार पाडते..

माझ्यासाठी कॉफी म्हणजे बिस्मिल्ला खाँसाहेबांच्या सनईसारखी आहे… रोज हवी असे नाही पण जशी विशेष प्रसंगी ती असल्याशिवाय पूर्णता नाही तसेच काहीसे कॉफीचे आहे.. निवांत आहे, सुंदर माहोल आहे, निसर्ग त्याच्या सौंदर्याची उधळण करत आहे अशा प्रसंगी कॉफी हवीच.. ! त्याशिवाय त्या प्रसंगाला, त्या क्षणाला पूर्तता नाही…

मी एकटीनं एन्जॉय करायची जागा म्हणजे बुक कॅफे..  पुस्तकांच्या दुकानात असलेलं कॉफी शॉप किंवा कॉफी शॉपमध्ये असणारी लायब्ररी असं बुक कॅफेचं स्वरूप.. निवांतपणे, पुस्तक आणि कॉफीच्या सान्निध्यात वीकएंड साजरा करायला हे हक्काचं ठिकाण मनाला आनंद देऊन जाणारं असं मनापासून नमूद करीन.. शांत तरीही छान पॉझिटिव्ह वातावरण..,

पुस्तके वाचताना सोबतीला वाफाळत्या कॉफीचा कप आणि काही समविचारी मित्र- मैत्रिणी सोबत मैफल जमवता आली तर ? ही कल्पनाच भन्नाट नाही ..!

काॅफीचा घुटका घेताना फेसबुक न्याहाळणे हा माझा आवडता संध्याकाळचा कार्यक्रम.. माझ्यासाठी ते फार मोठे विरंगुळय़ाचे चार क्षण.. आजही मी तेच करते..

कॉफी हा प्रवास आहे ठिकाण नाही

जी चालण्यात मजा आहे ती पोचण्यात नाही…अशी ही बहुरंगी, बहुरूपी आणि अनेक आठवणींची साक्षीदार असलेली कॉफी मी तरी दैवी पेयच मानते..!

माझ्या आजवरच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साक्षीदार म्हणून या कॉफीने मला सोबत केलीये..!

लव्ह यू कॉफी!

एक छोटेसे टेबल सोबत मी व काॅफी

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈