मराठी साहित्य – विविधा ☆ पंडीत बिरजु महाराज ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

 

?विविधा ?

☆ पंडीत बिरजु महाराज ☆ सौ राधिका भांडारकर ☆

प्रसिद्ध कथ्थक कलाकार पंडीत बिरजु महाराज यांचे वयाच्या ८३व्या  वर्षी नुकतेच निधन झाले…

जणू भारतीय संगीताची लयच थांबली.

सूर मुके झाले.

भाव शून्य झाले..एक विलोभनीय मुद्रा लोप पावली..

कथक नृत्य हा शब्द उच्चारताच,बिरजु महाराजांचेच नाव ओठावर येते.कथ्थक आणि बिरजु महाराज यांचे असे घट्ट नाते होते.

नृत्याला अभिजात कला न मानता,केवळ अंगविक्षेप म्हणून हेटाळणी केली जायची. त्या काळात,बिरजु महाराजांनी नृत्याला प्रतिष्ठा मिळवून दिली.नृत्यकलेतील अस्सलअभिजातता त्यांनी जपली.

शिवाय नृत्य हे स्त्रियांनी करण्याचा प्रकार आहे.

पुरुषांच्या जातीला हे बरोबर नव्हे,अशा मध्ययुगीन मानसिकतेला बिरजु महाराजांचे नृत्यमय  आयुष्य हे एक पद्धतशीर प्रभावी ऊत्तर आहे.

गायन ,वादन, व नृत्य याचा एकत्रित अविष्कार म्हणजे संगीत.पण गायन आणि वादनाकडे प्रतिष्ठेने पाहिले जाते.त्यामानाने नृत्याला ही प्रतिष्ठा फार उशीरा प्राप्त झाली.

बिरजु महाराज हे लखनौ घराण्यातील प्रमुख प्रतिनिधी होते.कालिकाबिंदादीन या घराण्याची गौरवशाली परंपरा त्यांनी जपली आणि जगभर त्याचा प्रसार केला.

बिरजुमहाराजांचे मूळ नाव, ब्रिजमोहन मिश्रा.

४फेब्रुवारी १९३८रोजी त्यांचा कथ्थक कुटुंबात जन्म झाला.त्यांचे वडील अच्छान महाराज आणि काका शंभुराज हे ही जागतिक स्तरावर प्रसिद्ध कलाकार होते.वडीलांचे अकाली निधन झाल्यामुळे बिरजु महाराजांवर लहान वयात कुटुंबाची जबाबदारी येउन पडली.त्यांनी कथ्थक नृत्याचे धडे आपल्या काकांकडून घ्यायला सुरवात केली.

त्यांचे आयुष्य म्हणजे एक ध्यास होता. शास्रीय नृत्याचा..कथ्थक नृत्याविषयी त्यांनी समाजभान जागृत केले. कोठीतले नृत्य म्हणून ओळख असणार्‍या कलेला त्यांनी लोकांपर्यंत पोहचवले.

त्यांनी अनेक शिष्य घडवले.

या वयातही त्यांचा नृत्याविष्कार तरुणांना लाजवेल इतका लोभस होता..

सरकारने त्यांना पद्मविभूषणाने गौरवले.

पुण्याच्या कला आणि आध्यात्म जगताने त्यांना लक्ष्मी—वासुदेव—कलाभूषण पुरस्कार दिला.

बिरजु महाराज यांनी अनेक बाॅलीवुड चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केले. उमराव जान,बाजीराव मस्तानी, देढ ईश्कीया या चित्रपटांतील त्यांनी दिलेले नृत्याविष्कार हे अत्यंत प्रेक्षणीय आणि विलोभनीय आहेत…

दिल्लीत कलाश्रम नावाचे नाट्य विद्यालय त्यांनी सुरू केले..या माध्यमातून अनेक शिष्य घडले,घडत आहेत आणि कथ्थक या भारतीय नृत्यकलेची परंपरा जपली जात आहे..

बिरजुमहाराज हे कथ्थक गुरु तर होतेच.

पण ते उत्कृष्ट गायक होते.तबला,सरोद,व्हायोलिन या वाद्यांचे निष्णात वादकही होते.उत्तम दर्जाचे चित्रकार होते.तसेच कोशाकार,लोकसाहित्याचे अभ्यासक,संग्राहक आणि संपादकही होते..

गुरुंकडून मिळालेली विद्या,असामान्य प्रतिभा,आणि अं त:प्रेरणा या त्रयींवर त्यांनी कथ्थक नृत्याचे नवनवे प्रयोग केले.

दरबारातली ही कला त्यांनी रंगमंचावर आणली.

बिरजु महाराज यांचे नृत्य पहाणे म्हणजे स्वर्गीय आनंद असायचा.त्यांच्या मुद्रेवरच्या सहज सुंदर रेषा,अप्रतीम पवित्रे,म्हणजे एक चित्रशिल्पच.

मोराच्या गतीत जेव्हां ते चालत,तेव्हां खरोखरच लखलखीत पिसार्‍याचा डौलदार मोरच आपल्यासमोर नाचतोय असे वाटायचे…इतके सुंदर त्यांचे भावांग…

“मी महाराष्ट्राला माझा पिता आणि बंगालला माता मानतो.कारण बंगालमधे मी माझ्या कलेचा आरंभ केला.पण मला अनेक मानसन्मान व नावलौकिक महाराष्ट्राने दिला..”

हे त्यांचे नम्र उद्गार आहेत…

आज हा महान कलाकार ,नृत्य सम्राट,कथ्थक नृत्य कलेचा सरताज अनंतात विलीन झाला..

जातो तो कलाकाराचा नश्वर देह..

पण त्यातला कलात्मा अमर असतो..!!

त्या देवत्वाचा अंश अंतहीन असतो..

या कलेच्या देवतेला आदरयुक्त श्रद्धांजली…???

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈