मराठी साहित्य – विविधा ☆ नवरसांपैकी एक शांत रस ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

?  विविधा ?

☆ नवरसांपैकी एक शांत रस ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

आपल्या मनातील भावभावना व्यक्त करणारे नवरस म्हणजे एक “अनमोल देणगी” रूपांत आपणास देवाने देऊ केलेला खजिनाच आहे. त्यातील कोणता रस कोठे आहे, व तो कसा जाणावा हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार, आवडीनुसार, जो तो आपले कर्म आनंद मिळवण्यासाठी करीत असतो. मनात ज्या प्रकारचे विचार निर्माण होतात, त्याप्रमाणेच भावभावनांमध्ये हे विविध रस दिसून येतात.”भूप रूप गंभीर शांत रस” हे भूप रागाची ओळख सांगणारे गीत शिकताना शांत रस याचा अर्थ बालवयात नीटसा कळलाच नव्हता. पण जसजसे आयुष्य पुढे पुढे सरकू लागले, तेव्हा  मिळणाऱ्या एकांतात शांत रस समजू लागला. मला वाटते शांत रस व एकांत यांचे एकमेकांशी एक घट्ट नाते आहे. एकांतात नेहमीच तुम्ही हा शांत रसाचे अनुभूती घेऊ शकता. मग कुठेही मिळणारा एकांत असो, अगदी आनंदाच्या प्रसंगी व दुःखाच्या प्रसंगी दोन्ही वेळेत शांत रसाची भेट होतेच होते. विशेषतः निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही गेलात, तर कुठेही एकांतात मिळणारी शांत रसातील शक्ती तुम्हाला खूप काही देऊन जाते. अगदी जंगल भटकंती करत असाल, तर एखाद्या ठिकाणी थोडे शांत व स्तब्ध उभे रहा. जंगलातील ती निरव शांतता तुम्हाला विश्वरूप दर्शनासाठी नक्की सहाय्य करेल. नदीकिनारी शांत बसून नुसते पाण्यावर उठणारे तरंग पाहताना देखील, शांत रस अनुभवता येईल. किंवा एखाद्या डोंगर माथ्यावर थोडा विसावा घेताना, एकांतात शांत रसाचे अनुभूती आल्या वाचून राहणार नाही. देवाच्या गाभाऱ्यात समईतील ज्योत शांत रसाची जाणीव करून देते. उत्कट प्रेमळ क्षणांत ही, शांत रस अनुभवता येतो. मनातील व्याकुळता, विरह, दुःख हे सुद्धा कित्येकदा शांत रसामुळे निभावता येते. तन्मयतेने चैतन्य अनुभवता येते. तेथेही शांत रस उपयोगी ठरतो. शांत रसामुळे एकरूपता साधता येते. अहंकार गळून पडतो. व पुढे जाण्याचा मार्ग सुकर होतो. निर्मळता आवडू लागते. शांत रसात सर्व संकटे, दुःख, नष्ट करण्याची ताकद मिळवता येते. परमेश्वराशी अनुसंधान साधता येते. म्हणूनच ध्यान धारणेचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. ती अंगिकारता आली तर, आपली सद्सत विवेक बुद्धी नेहमीच जागृत राहते. आणि नकळत होणाऱ्या चुका टाळता येणं शक्य होते. म्हणूनच हे जीवन समृद्ध होताना, शांत रसाची अनुभूती घेणे गरजेचे होईल.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

विश्रामबाग, सांगली.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈