मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – “नाही वहिनी. आम्ही आणि डॉक्टरांनी काहीच केलेले नाही. आम्ही फक्त निमित्त होतो. बाळ वाचलंच नाहीय फक्त तर ते ‘वर’ जाऊन परत आलंय.” लेले काका सांगत होते,”आत्ता पहाटे आम्ही इथे आलो ते मनावर दगड ठेवून पुढचं सगळं अभद्र निस्तरण्याच्या तयारीनेच आणि इथे येऊन पहातो तर हे आक्रित! दादा, तुम्हा दोघांच्या महाराजांवरील अतूट श्रद्धेमुळेच या चमत्कार घडलाय.बाळ परत आलंय.”

या आणि अशा अनेक अनुभवांचे मनावर उमटलेले अमिट ठसे बरोबर घेऊनच मी लहानाचा मोठा झालोय.सोबत ‘तो’ होताच…!)

पुढे तीन वर्षांनी बाबांची कुरुंदवाडहून किर्लोस्करवाडीला बदली झाली ते १९५९ साल होतं. कुरुंदवाड सोडण्यापूर्वी आई न् बाबा दोघेही नृसिंहवाडीला दर्शनासाठी गेले.आता नित्य दर्शनाला येणं यापुढे जमणार नाही याची रुखरुख दोघांच्याही मनात होतीच. आईने दर पौर्णिमेला  वाडीला दर्शनाला येण्याचा संकल्प मनोमन सोडून ‘माझ्या हातून सेवा घडू दे’ अशी प्रार्थना केली आणि प्रस्थान ठेवलं!

किर्लोस्करवाडीला पोस्टातल्या कामाचं ओझं कुरुंदवाडपेक्षाही कितीतरी पटीने जास्त होतं.पूर्वी घरोघरी फोन नसायचे.त्यामुळे ‘फोन’ व ‘तार’ सेवा पोस्टखात्यामार्फत २४ तास पुरवली जायची.त्यासाठी पोस्टलस्टाफला दैनंदिन कामांव्यतिरिक्त जादा

रात्रपाळीच्या ड्युटीजनाही जावे लागायचे. त्याचे किरकोळ कां असेनात पण जास्तीचे पैसे मिळायचे खरे, पण ती बिले पास होऊन पैसे हातात पडायला मधे तीन-चार महिने तरी जायचेच. इथे येऊन बाबा अशा प्रचंड कामाच्या दुष्टचक्रात अडकून पडले.त्यांना शांतपणे वेळेवर दोन घास खाण्याइतकीही उसंत नसायची. दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला दत्तदर्शनासाठी जायचा आईचा नेम प्रत्येकवेळी तिची कसोटी बघत सुरू राहिला होता एवढंच काय ते समाधान. पण तरीही मनोमन जुळलेलं अनुसंधान अशा व्यस्ततेतही बाबांनी त्यांच्यापध्दतीने मनापासून जपलं होतं. किर्लोस्करवाडीजवळच असलेल्या रामानंदनगरच्या आपटे मळ्यातल्या दत्तमंदिरातले नित्य दर्शन आणि सततचे नामस्मरण हा त्यांचा नित्यनेम.कधीकधी घरी परत यायला कितीही उशीर झाला तरी त्यांनी यात कधीही खंड पडून दिला नव्हता!

मात्र बाबांच्या व्यस्ततेमुळे घरची देवपूजा मात्र रोज आईच करायची. माझा धाकटा भाऊ अजून लहान असला तरी त्याच्यावरच्या आम्हा दोन्ही मोठ्या भावांच्या मुंजी नुकत्याच झालेल्या होत्या. पण तरीही आईने पूजाअर्चा वगैरे बाबीत आम्हा मुलांना अडकवलेलं नव्हतं. या पार्श्वभूमीवरचा एक प्रसंग…

पोस्टलस्टाफला किर्लोस्कर कॉलनीत रहायला क्वार्टर्स असायच्या. आमचं घर बैठं,कौलारू व सर्व सोयींनी युक्त असं होतं. मागंपुढं अंगण, फुलाफळांची भरपूर झाडं, असं खऱ्या ऐश्वर्यानं परिपूर्ण! आम्ही तिथे रहायला गेलो तेव्हा घरात अर्थातच साधी जमिनच होती. पण कंपनीतर्फे अशा सर्वच घरांमधे शहाबादी फरशा बसवायचं काम लवकरच सुरू होणार होतं. त्यानुसार आमच्याही अंगणात भिंतीना टेकवून शहाबादी फरशांच्या रांगा रचल्या गेल्या.

त्याच दिवशी देवपूजा करताना आईच्या लक्षात आलं की आज पूजेत नेहमीच्या दत्ताच्या पादुका दिसत नाहीत. देवघरात बोटांच्या पेराएवढ्या दोन चांदीच्या पादुका होत्या आणि आज त्या अशा अचानक गायब झालेल्या!आई चरकली.अशा जातील कुठ़ न् कशा?तिला कांहीं सुचेचना.ती अस्वस्थ झाली. तिने कशीबशी पूजा आवरली. पुढची स्वयंपाकाची सगळी कामंही सवयीने करीत राहिली पण त्या कुठल्याच कामात तिचं मन नव्हतंच. मनात विचार होते फक्त हरवलेल्या पादुकांचे!

खरंतर घरी इतक्या आतपर्यंत बाहेरच्या कुणाची कधीच ये-जा नसायची. पूर्वीच्या सामान्य कुटुंबात कामाला बायका कुठून असणार?

धुण्याभांड्यांसकट सगळीच कामं आईच करायची. त्यामुळे बाहेरचं कुणी घरात आतपर्यंत यायचा प्रश्नच नव्हता. आईने इथं तिथं खूप शोधलं पण पादुका मिळाल्याच नाहीत.

बाबा पोस्टातून दुपारी घरी जेवायला आले. त्यांचं जेवण पूर्ण होईपर्यंत आई गप्पगप्पच होती. नंतर मात्र तिने लगेच ही गोष्ट बाबांच्या कानावर घातली.ऐकून बाबांनाही आश्चर्य वाटलं.

“अशा कशा हरवतील?”

“तेच तर”

“सगळीकडे नीट शोधलंस का?”

“हो..पण नाही मिळाल्या”

आई रडवेली होऊन गेली.

“नशीब, अजून फरशा बसवायला गवंडीमाणसं आलेली नाहीत.”

“त्यांचं काय..?”

“एरवी त्या गरीब माणसांवरही आपल्या मनात कां होईना पण आपण संशय घेतलाच असता..”

त्या अस्वस्थ मनस्थितीतही बाबांच्या मनात हा विचार यावा याचं त्या बालवयात मला काहीच वाटलं नव्हतं,पण आज मात्र या गोष्टीचं खूप अप्रूप वाटतंय!

नेमके त्याच दिवशी गवंडी आणि मजूर घरी आले. पूर्वतयारी म्हणून त्यांनी जमीन उकरायला सुरुवात केली. त्यानिमित्ताने घरातले सगळे कानेकोपरेही उकलले गेले. पण तिथेही कुठेच पादुका सापडल्या नाहीत. पूजा झाल्यानंतर आई ताम्हणातलं तीर्थ रोज समोरच्या अंगणातल्या फुलझाडांना घालायची. ताम्हणात चुकून राहिल्या असतील तर त्या पादुका त्या पाण्याबरोबर झाडात गेल्या असायची शक्यता गृहीत धरून त्या फुलझाडांच्या भोवतालची माती खोलवर उकरून तिथेही शोध घेतला गेला पण पादुका मिळाल्याच नाहीत.

मग मात्र आईसारखेच बाबाही अस्वस्थ झाले. नेहमीप्रमाणं रोजचं रुटीन सुरू झालं तरी बाबांच्या मनाला स्वस्थता नव्हतीच.कुणाकडूनतरी  बाबांना समजलं की जवळच असणाऱ्या पलूस या गावातील सावकार परांजपे यांच्या कुटु़ंबातले एक गृहस्थ आहेत जे पूर्णपणे दृष्टीहीन आहेत.ते केवळ अंत:प्रेरणेने हरवलेल्या वस्तूंचा माग अचूक सांगतात अशी त्यांची ख्याती आहे म्हणे.बाबांच्या दृष्टीने हा एकमेव आशेचा किरण होता! बाबा स्वत: त्यांनाही जाऊन भेटले. आपलं गाऱ्हाणं आणि मनातली रूखरूख त्यांच्या कानावर घातली. त्यांनीही आपुलकीने सगळं ऐकून घेतलं. काहीवेळ अंतर्मुख होऊन बसून राहिले.तोवरच्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या शांतपणाची  जागा हळूहळू काहीशा अस्वस्थपणानं घेतलीय असं बाबांना जाणवलं. त्यांची अंध,अधूदृष्टी क्षणभर समोर शून्यात स्थिरावली आणि ते अचानक बोलू लागले.बोलले मोजकेच पण अगदी नेमके शब्द!

“घरी देवपूजा कोण करतं?” त्यांनी विचारलं.

“आमची मंडळीच करतात”

बाबांनी खरं ते सांगून टाकलं.

” तरीच..”

“म्हणजे?”

” संन्याशाची पाद्यपूजा स्त्रियांनी करून कसं चालेल?”

“हो पण.., म्हणून..”

” हे पहा ” त्यांनी बाबांना मधेच थांबवलं.” मनी विषाद नको, आणि यापुढे हरवलेल्या त्या पादुकांचा शोधही नको. त्या कधीच परत मिळणार नाहीत.”

” म्हणजे..?”

” त्या हरवलेल्या नाहीयत. त्या गाणगापूरच्या पादुकांमध्ये विलीन झालेल्या आहेत.”

बाबांच्या मनातली अस्वस्थता अधिकच वाढली.कामात मनच लागेना ‘घडलेल्या अपराधाची एवढी मोठी शिक्षा नको’ असं आई-बाबा हात जोडून रोज प्रार्थना करीत विनवत राहिले.भोवतालच्या मिट्ट काळोखातही मनातला श्रध्देचा धागा बाबांनी घट्ट धरुन ठेवला होता. कांहीही करून हरवलेल्या त्या पादुका घरी परत याव्यात एवढीच त्यांची इच्छा होती पण ती फरुद्रूप होण्यासाठी कांहीतरी चमत्कार होणं आवश्यक होतं!आणि एक दिवस अचानक……?

क्रमश: दर गुरुवारी

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈