मराठी साहित्य – विविधा ☆ जय गणेश आणि निळी कमळं !! ☆ वसंत वैभव ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? विविधा ?

☆ जय गणेश आणि निळी कमळं !! ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

गणपती आणि निळी कमळं यांचं माझ्या मनात अतूट नातं आहे… २००३ साली माझ्या मुलाचं अभिजितचं लग्न झालं त्यानंतर पाच महिन्यांनी गणेशोत्सव आला. आमच्या घरात गणपती बसत नाही… पण घराच्या दारातच मंडळाचा गणपती बसतो… माझी सून प्रिया एक दिवस म्हणाली, आपण उद्या पहाटे दगडूशेठ हलवाईं च्या गणपतीला जाऊ ! आम्ही सर्वजण तयार होऊन पहाटे चार वाजता गणपतीच्या दर्शनाला गेलो, ते गणपती दर्शन अलौकिकच असतं ! गणेशाचा वाहण्यासाठी मुली /बायका निळी कमळं विकत असतात! गेली अनेक वर्ष आम्ही ती निळी कमळं विकत घेतोय बाप्पासाठी आणि घरी परतताना आमच्यासाठीही ! निळी कमळं फक्त त्याच एका पहाटे घेतली जातात… माझ्या आजोळच्या गावात एक तळं होतं ..म्हणजे आहे.. आमच्या लहानपणी त्यात असंख्य निळी कमळं असायची… निळ्याकमळाचं आकर्षण तेव्हांपासूनचं… पुढे निलकमल हा सिनेमा पाहिला तेव्हाही राजकुमारी “निलकमल” अर्थात वहिदा रेहमानला पाहून तळ्यातली निळी कमळंच आठवली होती….

दगडूशेठच्या गणपतीचं दर्शन घेण्याचा नेम अर्थात सूनबाईनी पाडलेला पायंडा २००३ पासून आम्ही पाळतोय कोरोना काळात तो खंडित झाला ! या वर्षी कदाचित पहाटे पाऊले गणेशाच्या दर्शनासाठी वळतील पण आता ही प्रथा आमच्या घरात सुरू करणारी प्रिया आणि अभिजित, सार्थक तिघेही सिंगापूरला आहेत सध्या! पण माझ्यासारखी एरवी “सूर्यवंशीय” असलेली बाई सूर्य उगवायच्या आत उठून तेव्हा सारखंच आताही गणेश दर्शन घ्यायला जाईल असं वाटतंय…

ती निळी कमळंही साद घालतीलच आ ऽऽऽऽ जाओ….अशी☺बस गणेशजी का बुलावा आना चाहिए….🙏

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈