मराठी साहित्य – विविधा ☆ गानसरस्वती… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ गानसरस्वती… ☆ श्री विश्वास देशपांडे

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्याबद्दलचा एक किस्सा नुकताच वाचनात आला. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यातील एका सभागृहात किशोरीताईंचे गाणे सुरु होते. कार्यक्रम नुकताच सुरु झाला होता आणि साऊंड सिस्टीम बिघडली. संयोजकांनी बरेच प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. ताई स्टेजवरून उठून गेल्या. श्रोत्यांमध्ये कुजबुज सुरु झाली. आता काय होईल ? दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली. कोणी म्हणाले ताईंचा स्वभाव विचित्र आहे. कोणी म्हणाले त्या स्वतःला फार ग्रेट समजतात. ज्याला जे वाटले ते तो बोलू लागला. शेवटी कोणी तरी बराच प्रयत्न करून साऊंड सिस्टीम सुरु केली. ताई आतमध्ये होत्या. कोणीतरी भीतभीतच त्यांना सांगितले की साऊंड सिस्टीम सुरु झाली आहे.

ताई आल्या. त्यांनी गायला सुरुवात केली. हळूहळू मैफलीत रंग भरू लागला. उत्तरोत्तर मैफल अधिकाधिक गहिरी होत गेली. ताईंचा स्वर सप्तकातून सहज विहार करू लागला. जणू आपल्या गायनातून त्यांनी अनंताचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांची गानसमाधी लागली. त्यांच्याबरोबर श्रोते देखील स्वरांच्या पावसात चिंब झाले होते. ताईंच्या सुरात भक्तीभाव होता, बेहोशी होती, माधुर्य होते. आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे जाणारे आणखी काहीतरी होते. अनंताची आराधना होती. सुरांच्या माध्यमातूनच त्या अनंताचा शोध घेत होत्या. त्यामागे त्यांची खडतर तपश्चर्या होती. आणि अशी खडतर साधना करणाऱ्या साधकाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की ज्या क्षणी त्याचा आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो. मी आणि तू वेगळे नाहीतच. माझ्यातच तू आहेस आणि तुझ्यातच मी आहे असा साक्षात्कार साधकाला होतो. तशी ताईंची गानसमाधी लागली होती. पण आपल्यासवे त्या श्रोत्यांना देखील त्यांनी त्यात सामील करून घेतले होते.  त्यांचा ‘ स्व ‘ विश्वव्यापक झाला होता. हळूहळू त्या समेवर आल्या. श्रोते सुरसागरात डुंबत होते. पाच मिनिटांनी टाळ्यांचा कडकडाट झाला.

अशी ही गानसरस्वतीची गानसमाधी. मला त्यांचा हेवा वाटला. आणि माझेही मन नकळत त्यांच्या तपश्चर्येपुढे लीन झाले. मी त्यांना मनोमन प्रणाम केला. आपण जो काही जीवनमार्ग निवडला आहे त्याच्याप्रती केवढे हे उच्च प्रतीचे समर्पण ! पुन्हा त्यामध्ये स्वार्थाची भावना नाही, हाव नाही, कुठलीही अपेक्षा नाही. ताई कोणासाठी गात होत्या ? म्हटले तर सर्वांसाठी आणि म्हटले तर कोणासाठीच नाही ! त्या गात होत्या आनंदासाठी. आणि हा आनंद श्रोत्यांनाही त्यांनी भरभरून वाटला. त्या आनंदाचे झाड झाल्या. सुरांच्या कल्पवृक्षाला आनंदाची फळे लागली. वृक्ष फळभाराने झुकला. सप्तसुरांची मधुर फळे त्या वृक्षाला लागली. ज्याला हवे त्याने यावे आणि मधुर फळांची गोडी चाखावी.

गीतरामायणातले ग.दि.मांचे शब्द आणि बाबूजींचे स्वर नकळत कानात घुमू लागले.

          सात स्वरांच्या स्वर्गामधुनी

          नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी

          यज्ञ मंडपी आल्या उतरुनी

          संगमी श्रोतेजन नाहती.

असेच नाही का ताईंच्या मैफलीबद्दल म्हणता येणार ?

आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात असेच समर्पण आपल्याला करता आले तर …! आपले जीवन ही सुद्धा एक साधना होईल, एक तपश्चर्या होईल. आपल्या कामाचे समाधान, आपल्या कामाचा आनंद आपल्याला तर मिळेलच पण दुसऱ्यांनाही हा आनंदाचा ठेवा आपल्याला वाटता येईल.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈