मराठी साहित्य – विविधा ☆ आंबा … ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार

☆ विविधा ☆ आंबा … ☆ प्रा. सौ. सुमती पवार’☆

माझ्या समोर खिडकीत आंब्याचं झाड आहे. ३५/४० वर्षे जुनं. इतकी वर्षे त्याला मी बघते आहे. त्याची सारी भाषा मला कळते. मी तेंव्हा दोन रोपं लावली.. शेजारी शेजारी!

एकाच वाफ्यात बरं.. हेतू हा की एक तरी जगावं. मला वाटलं मी खूप शहाणी….! एक जगेल.. एक मरेल …? कदाचित…

अहो ते काय माणूस आहे विश्वासघात करायला…? झाडं जास्त शहाणी निघाली. त्यांनी माझी फजिती केली. दोन्ही बिया रूजल्या. कोण आनंद झाला मला….!

तशी मी निसर्ग वेडीच आहे.. सारा निसर्गच माझ्याशी बोलतो.

अंगणात खूप फुलझाडं लावली होती मी.. दोन्ही कोया फुटल्या. लाल चुटूक पाने वर बघू लागली. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.दिसामासी मी त्याच्याकडे बघत असे. ती बिचारी निसर्ग नियमाने वाढत होती. एकाच वाफ्यात दोन कोया ! खरंतर मी त्यांच्यावर अन्यायचं केला होता.

शेजारी शेजारी दोन झाडे जोमात कशी वाढतील ? माझ्याकडून चूक झाली होती.

मग एक जोमात नि एक हळूहळू वाढू लागले. मोठे डेरेदार… नि छाटे बारकुटले…!

मध्येच मला वाटले, शेजारीच तर आहेत, बांधून टाकू.. एकजीव होतील. मनात यायचा अवकाश नि घेतली दोरी नि टाकले बांधून… पण ते कसले वस्ताद.. !

बागेत झेंडू खूऽऽऽऽऽऽप बहरला होता… कमरे एवढे एक एक झाडं… पिवळ्या लाल फुलांनी मुसमुसणारे…नजरेचे पारणं फिटावं असा कधी न पाहिलेला झेंडूचा बहार… लोक यायचे नि चकित व्हायचे…

हं तर काय…? आंबे ना ? बांधले होते… पण….? त्यांनी स्वतंत्र अस्तित्व ठेवलं… ठीक आहे, वाढा बाबांनो तुम्हाला पाहिजे तसे… मोठे झाले पण… आंबे काही येईनात… पुन्हा माझ्या जीवाची घालमेल….! आणि एका हिवाळ्यात मोहोर आलाच.. झाडे म्हणजे साधू संतच.. सर्व ताप सहन करून जगाची चिंता करणारे…ब्र न काढता सोसणारे जटाधारी साधूच…! माणसांची व झाडांची दिसामासी वाढ होते. संस्कारांचे खतपाणी माणसांनाही मिळतेच.. पण किती माणसात ते मुरते..? आणि कितीकांत विरून जाते…!

पण झाडांना द्या न द्या..त्यांची देण्याची वृत्ती अभूतपूर्व.. अनाकलनीय आहे. मारा.. तोडा.. छाटा… देतांना सर्वांना न्याय सारखांच… दात्याला नि दुष्टाला सारखाच न्याय… सारखीच सावली…खरेच, रोज आपल्या बरोबरीनेच वाढणाऱ्या झाडांचा गुण आपण घेतला तर……..!

हं… तर.. मोहोरा बरोबर फांद्यांना…?

अहो..घोसच्या घोस लागले…खरंच घोस लटकले…हिरवेगार आंबे वाढू लागले पण पिवळे काही होईनात…? साईजही छोटी गावठी आंब्याचीच.. अंदाजाने उतरवले. खूप गोड नव्हते..ते घोस पाहूनच एव्हढी खूष होते की मला काही वाटले नाही… हळू हळू समज वाढत गेली. काय करावे ?

हं… कलम करावे कां… झाले.. मनात विचार आला नि कार्यवाही सुरू.. माझा भाचा योगेश कृषी खात्यात नोकरीला आहे..

बोलावले… योगेश कलम करायचे का झाडांवर… ? योगेशने हापूस, सिंधू. रत्ना केसर च्या काड्या आणून कलम करायचे ठरवले… पण त्या साठी आपण हाता पायाची नखं काढतो , केस कापतो तसे काही छाटणीचे संस्कार करावे लागणार होते ते केले… म्हणाला, आता डिऱ्या फुटतील, करंगळी एवढ्या जाड झाल्या की कलम बांधू… मी पहात होते.. डिऱ्या फुटल्या.. जाड झाल्या नि मग एक कलम तज्ञ बोलवून दोन्ही झाडांवर कलमं बांधली… मोठे मजेशिर दिसत होते दोघे… पट्ट्या लावलेले जखमेबहादूर… मग ठरल्या प्रमाणे निवडक काड्यांची ती कलमे रूजली काही मेली पण ८० टक्के जगली…सर्जरी यशस्वी झाली…!

आता मात्र दोघेही जोमात…बरोबरीनेच वाढू लागले..डेरेदार भरगच्च.. नि हिरवीगार.. व्वा.. आणि तुम्हाला खरं सांगते… माझ्या आंब्या सारखा मधूर,रसाळ आंबा बाजारात मिळत नाही.. एक एक आंबा अर्धा किलोचा.. एका किलोत फक्त तीनचं….जून मध्ये मोजकेच १००/२०० आंबे निघतात. पहिला पाड पडला की मी उतरवून घेते नि… माझे नातलग, नोकर चाकर सर्वांना वानवळा पाठवते… पक्षी पोपट वटवाधळेही आंबे खातात नि मी तृप्त मनाने त्यांच्याकडे बघते. हो.. पहिला वाटा त्यांचाच.. मग आपला.. पूर्ण जून जुलै आमची आमरस पुरणपोळी पुऱ्यांची मेजवानी चालते..दररोज चपाती बरोबर खातोच… मी तर लहानपणी खाल्लेल्या रस शेवयाच खाते… अहाहा…काय मजा येते नुसत्या गिळायला… एकदा खाऊन पहाच.. मग कळेल मी काय म्हणते ते… उन्हाळयात आंबे नातवंडांवर सावली धरून असतात.. मुले मनसोक्त अंगणात खेळतात… किती कृतज्ञता व्यक्त करावी त्यांच्या विषयी…! मला नेहमी वाटतं आपण झाडां सारखं वागायचं ठरवलं तर…… जगात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही… नक्कीच… हो ना…  तुम्हालाही असंच वाटतं ना….

मग…? करू या ना तसं…. झाडांसारखं….

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि : ०७/०८/२०२० वेळ : रात्री ११:०४

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈